श्री संत बेबीनाथ माया अल्प-चरित्र

श्री संत कलंकी बेबीनाथ माया

ॐ ब्रह्मस्वरूपिणी कलंकी बेबीनाथ माया अल्पचरित्र

। माया ब्रम्हाचीय बारे अवतार । दत्त हा साचार जाणा बने ।।
। कोल्हाटी ते माया बारे येत नाही । तयाची पाहे कळुनिया ।।
। अवतारे यांचे सगुण दर्शन । येतसे घडुन सुकृताने ।।
। वैजनाथ म्हणे युगायुगी राहे । येणे जाणा पाहे तयासाठी ।।
( कलंकी देव त्रैमूर्ति पाठ – १४ )


वंश परिचय

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एक खेडे गाव. कडलग आडनावाची बरीचशी घर या गावी असल्यामुळे त्याचं नाव पडलं आहे ‘जवळे कडलग’ ! सह्याद्रीच्या कुशीतील हे एक दुमदार खेडे चहुबाजूंनी डोंगरांनी व दऱ्याखोऱ्यानी वेढलेले. आढळा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे खेडेगाव तसे हिरवळीने बाराही मास भरलेलं दिसत असे. पाण्याची मुबलकता यामुळे ऊस आणि द्राक्षे यासाठी एक प्रसिद्ध ठिकाण ! त्यामुळे अनेक मजूर लोक आपला पोटापाण्याचा व्यवसाय करण्यासाठी या गावी येऊन राहात. गावातील मुख्य व्यवसाय शेती असल्याने शेतीला उपयोगी पडण्यासाठी अनेक कारू-नारू या गावी वस्ती करून होते. त्यापैकी शेतीसाठी लागणारी अवजारे व घरबांधणीचे लाकडीकाम करणारे कै. म्हातारबा कदम हे एक सद्गृहस्थ. त्यांचा पिढीजात सुतारकीचा व्यवसाय होता. विश्वकर्मा हे त्यांचं कुलदैवत ! परंतु त्यांच्या घराण्यात शिवभक्तीच विशेष वेढ ! त्यांच्या धर्मपरायणतेमुळे म्हातारबा सर्वांना प्रिय वाटत असे. लाकडी अवजारे बनवताना रामायण महाभारतातील गोष्टी सांगत म्हातारबा अनेक शेतकऱ्यांना तासानंतास खिळवून ठेवत असे. भोळसर स्वभावामुळे म्हातारबाची परिस्थिती जेमतेम अशी होती. म्हातारबाला दोन तीन मुली झाल्या पण एकही जगली नाही. फक्त एकुलता एक मुलगा सदाशिव हाच काय तेवढा कुळाचा वारस वाचलेला. सदाशिव हा आपला वडिलोपार्जित व्यवसाय करत असत. सदाशिव नावा प्रमाणे शीव भक्त होता. तो शिवलिलामृत ग्रंथाचे पारायण करत असत. तसेच अनेक जवळ पासच्या तीर्थयात्रा करणे, कीर्तन, प्रवचन, भजन ऐकणे त्याला आवडत असे. त्याचा पत्नीचे नाव होत लक्ष्मीबाई. नावा प्रमाणे त्या लक्ष्मी भक्त होत्या. त्यांची देवीची उपासना नित्य असल्यामुळे त्यांना अनेकदा देवीचे दृष्टांत होत असत. लक्ष्मीबाईंना तीन अपत्ये झाली. त्यांची नावे त्रंबक, चंद्रभान व निवृत्ती अशी होते. त्यापैकी श्री. चंद्रभान यांचा जन्म एप्रिल १९२४ साली झाला. तेच या कलंकिनी बेबी नाथ आदिशक्ती अवताराचे पिताश्री होत. त्यांचे शिक्षण जेमतेम दुसऱ्या इयत्तेपर्यंत झाले. तरीसुद्धा त्यांच्या अंगी बऱ्याच कला उपजत आहेत. भजनीकाम, दगडाच्या मूर्ती बनविणे, पोथीपुराण ग्रंथवाचन करणे, पेटीमास्तर इतर कलागुणांनी ते संपन्न आहेत. त्यांचा पहिला विवाह भागीरथी ह्या साध्वी स्त्री बरोबर झाला तो सन १९४२ साली. तिला एक मुलगा झाला. त्याचे नाव दत्तात्रय ठेवले. परंतु लवकर सन १९५० साली त्यांनी आपली इहलोकाची यात्रा संपवली. तदनंतर त्यांनी एक दीड वर्षांनी म्हणजे सन १९५१ – ५२ साली श्री. चंद्रभान यांचा नाशिक भागातील एक मुलीशी दुसरा विवाह झाला. तिचे नावही भागीरीती हेच ठेवले गेले. त्यावेळी श्री. चंद्रभान यांचे नाशिक भागातच बारा वर्ष वास्तव्य होते. त्यापैकी तीन वर्ष चांदवड दोन वर्ष भगूर येथे राहणे झाले. भागीरथी बाईंना लग्नानंतर एक-दीड वर्ष सारखे देवीचे दृष्टांत होत असत. सफेद पातळ घातलेली व कुमकुम तिलक लावलेली दिव्यस्त्री येऊन मला तुझ्या घरी यायचं आहे अशी सांगत असे. असेच एके दिवशी दुपारी दीड दोनच्या सुमारास त्या घरात एकटया असताना एक तेजस्वी पुरुष त्यांच्या पुढे येऊन उभा राहिला. तो फक्त त्यांनाच दिसत होता. त्या आरडाओरडा करू लागल्या. सुमारे अर्धा तास तो तेजस्वी पुरुष त्यांच्याशी संभाषण करून आदिशक्तीच्या जन्माची पूर्वसूचना देऊन नंतर अदृश्य झाला. तसेच श्री चंद्रभान मिस्त्री यांनाही मारुतीचा दृष्टांत होऊन आदिशक्तीच्या जन्माची कल्पना दिली गेली होती.


जन्म व बालपण

त्यावेळी श्री. चंद्रभान मिस्त्री कुटुंब नाशिक येथील डिंगर आळीतील मुळे पाटील यांच्या वाड्यात राहत होते. चैत्र महिन्याचे ते दिवस होते. संन १९५३ सालातील १३ एप्रिलचा मंगळवारचा दिवस उजाडला होता. सकाळी सहा वाजल्यापासून भागीरथी बाईंना कळा सुरू झाल्या. नंतर काही वेळाने गर्भावर नागाची छाया पडली. त्या देहपान हरपल्या. नंतर गोंडस अशा गौरी स्वरूप बालिकेचा जन्म झाला. तेव्हा सकाळी सात-साडेसात ची वेळ होती. घरातील पहिली कन्या म्हणून तिला सर्वजण बेबी या नावानेच पुकारू लागले. पुढे कलंकिनी बेबी नाथ मातेच्या लिखाणातून विष्णूच्या नाभी पासून म्हणजे बेंबीपासून जन्म झाल्याकारणाने बेबी हे नाव धारण केल्याचे वर्णन आले आहे. तसेच त्यांचे माता-पिता म्हणजे श्री. चंद्रभान व सौ. भागीरथी हे दक्ष राजाच्या वेळी क्षत्रिय घराण्यात होते. तसेच रामअवताराच्या वेळी तेथील क्षत्रिया घराण्यात त्यांचा जन्म होता व सीतेच्या रावणाकडून सोडविण्यासाठी त्यांची मदत झाली होती. म्हणून त्यांच्या इच्छेपोटी ह्या घराण्यात कलंकिनी मातेने जन्म घेतला. बेबी बालिकेसह श्री. चंद्रभान मिस्त्री यांचे कुटुंब पुन्हा जवळेकडलग येथे आले. या बालिकेचे इतर मुलींपेक्षा वागण्यात बोलण्यात चालण्यात खेळण्यात तसंच वेगळेपण होतं. परंतु ते त्यांच्या पालकांच्या त्यावेळी लक्षात यायचे नाही. बेबी चे नाव जवळे येथे शाळेत घातले होते. परंतु त्यांचा अभ्यासात मन रमत नसे. त्या बऱ्याच वेळेला आढळा नदीच्या किनारी असलेल्या अढळेश्वराच्या मंदिरात जाऊन बसत असत व एकट्याच शिवलिंगाशी बोलत असत. हा शिव माझ्याशी का बोलत नाही याबद्दल त्यांच्या बालमनाला खेद वाटत असे. कधीकधी गाभाऱ्यातून आवाज निघत असे “बाळ अजून तू लहान आहेस. पुढे माझे सांगून तुला भेटेल. ”
तरीसुद्धा त्या बालमनाचे समाधान होत नसे. बेबी बालिका सात-आठ वर्षाची असताना शाळेत न जाता आढळेश्वराच्या मंदिराबाहेर ठाण मांडून बसली व तिने मनोमन संकल्प केला की मला जर भगवंता तू आता भेटला नाहीस तर मी माझा देहत्याग करीन. ते दिवस उन्हाळ्याचे होते जमीन क्षणोक्षणाला तापत होती. दुपारचे बारा वाजले होते. बालिकेचा हट्ट पाहून भोळ्या शंकराला राहवले नाही. त्यांनी मंदिरातून बाहेर येतोय असे तिला भासवले व बेबी बालिकेला मिठी मारण्यासाठी पुढे सरसावले. परंतु त्यांचे ते जटाधारी व त्रिशूल डमरूधारी भयंकर रूप पाहून बेबी बालिका घाबरली. तिला भयाने कंप सुटू लागला आणि ती मागच्या पाऊली पळू लागली. त्यावेळी भगवान तिला म्हणाले बाळ ह्या जन्मी तुला बरेच व्याधी दुःख भोगावे लागेल. तरी तू नाथांकडे जा मग मी तुला पुढे भेटेन. असे म्हणून ते अदृश्य झाले व बेबी बालिका घरी परतली.


गृहस्थाश्रमी जीवन

बेबीचे शिक्षण जेमतेम चौथ्या इयत्तेपर्यंत झाले. बेबीचे आता १४ व्या वर्षात पदार्पण होताच त्यांना लग्नाची स्थळे येऊ लागली. त्यांची लग्न करण्याची इच्छा नव्हती. परंतु वडिलांपुढे त्यांचे काही चालण्यासारखे नव्हते. बेबी यांना अजून दोन भावंडे होती. एक बहिण दगडाबाई व बंधू नाना यांच्या ही जबाबदारी आई-वडिलांवर होतीच. त्यामुळे सन १९६७ साली वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा धांदरफळ येथील, श्री. नाना रामभाऊ वाकचौरे यांच्या बरोबर विवाह संपन्न झाला. ते कपडे शिवण्याचे काम करीत. सहा महिने आपल्या सासरी धांदरफळ येथे राहिल्यानंतर त्यांच्या सासरची परवड सुरु झाली. त्यांना अनेक शारीरिक व्याधीने पछाडले होते. त्यांची अंतःस्फूर्ती खुलवताना त्या वेदनेने मोठ्याने ओरडत असत. इतर लोकांना वाटायचे त्यांना भूत-पिशाच्चने पछाडले आहे. म्हणून त्यांना नगर जवळील मिरवली बाबांच्या( मूळस्थान – मीननाथ सिद्ध) पहाडावर नेऊ लागले. वर्षातील जवळजवळ सात-आठ महिने तरी त्या तिकडे राहत. त्यांना चार अपत्ये झाली पैकी दोन आपत्य मीना, फकीरा हे दोघेच जगली. लग्नानंतर सुमारे १४ वर्षे त्यांना वनवास घडला. त्यांचा निमगाव, हनुमंतगाव, पोहेगाव, राजापूर, वडगावलांडगा, संगमनेर ठिकाणी रहिवास झाला. त्यांचे यजमान टेलरचा व्यवसाय करून त्यांना पैसे पुरवत परंतु त्यांची फारच तारांबळ होत असे. त्यामुळे नगरच्या पहाडावर असताना त्यांना बऱ्याच वेळी माधुकरी मागून उदरनिर्वाह करावा लागला. पाणी तर त्यांना खालून पहाडावर न्यावे लागेल. त्या तेथे दोन बालकांसमवेत राहत. यजमान अधूनमधून येऊन जाऊन असत. इकडे आई-वडिलांचे ही परिस्थितीही जेमतेमच ! एकदा ऐन दीपावलीत सुद्धा त्यांना केवळ बटाटे उकडून खाऊन साजरी करावी लागली. मग ते तरी आपल्या मुलीला कोठून मदत करणार?
नगरच्या पहाडावर असतानाच त्यांचे चार महिन्याचे मूल निर्वतले. परंतु त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी कोणी मदतीस आले नाही. त्यावेळी बेबीमाईनी स्वतच आपल्या बालकाचा अंत्यविधी स्वहस्ते पार पाडला. दुखी अंतकरणाने त्या नगरच्या पहाडावरून खाली उतरल्या. ऊन मी म्हणत होते. अनवाणी पावलांनी त्या चालल्या होत्या. एस टी भाडेही त्यांच्याजवळ नव्हते. तरी त्या स्टँडवर पोहचल्या. अशावेळी भगवंत कृपावंत झाले. त्यांनी मुजावर बनवून त्यांना मदत केली व त्या वडगाव लांडग्यास परतल्या. हा १४ वर्ष त्रास त्यांनी सहन केला. त्यांच्या नगरच्या पहाडावर फेर्या सुरू होत्या. नगरच्या पहाडावरील मुजावर ह्यावेळी म्हणाला, आता तुमचा शेवट होणार व तुमचा विधी येथेच करावा लागेल. त्यावेळी बेबी माया बरोबर आलेले सर्वजण निघून गेले. त्या बेशुद्ध होऊन पडल्या होत्या प्राण निघून जाणार होता. एवढ्यात नाथांनी मानवी रूप धरून त्यांच्या मुखात अमृत तीर्थ टाकले व त्यांना उठुन बसवले आणि त्यांना आता ९ वर्ष गाणगापूरला जाण्यास सांगितले. त्यानंतर त्या पुन्हा वडगावी परतल्या. त्यावेळी त्यांच्या छोट्या भगिनी दगडाबाई यांचे नुकतेच आठ-दहा दिवसांपूर्वी लग्न झाले होते. परंतु यांना बोलावणे पाठवले नव्हते. दोघींनी एकमेकींना बघितल्यावर त्यांचे हृदय दाटून आले व त्या एकमेकींना कडकडून भेटल्या. यातच भगिनी दगडाबाई हीस शक्ती पात झाला व त्यांनाही पुढे आध्यात्मिक कृपा होउन त्यांच्यासारखे आदेश वगैरे सुरू झाले.
आता बेबीनाथ माया यांच्या गाणगापूरास फेऱ्या सुरू झाल्या. त्यांच्याबरोबर गावातील स्त्री पुरुष आठ दहा जण असत. काही वेळा त्यांनी पायी प्रवास केला. गाणगापूरास त्यांना श्री. दत्तांची भेट होत असे. तेथून निघण्याचे त्यांचे मन होत नसे. त्या श्री. दत्तांपाशी हट्ट धरून बसत. श्री. दत्त त्यांना समजावून सांगून घरी पाठवत असत. बऱ्याच वेळेला ते अधिष्ठानाणे त्यांच्याबरोबर असत व पुढे मी सगुण रुपाने तुला भेटेन असे वचन देत. तेव्हा कुठे त्या शांत होत असत. बेबी माई यांना सहा महिने बिलकुल जेवण जात नव्हते. तरी शौचावाटे रोज मालमलीछ पडत असे. एक-दोन महिने त्यांच्या रोमारोमातून पू बाहेर पडत असे. त्यांच्या शरीराचा केवळ सापळा राहिला होता. त्यांचा हा त्रास म्हणजे कुंडलिनी जागृती अवस्थेचा काळ होता. हे पुढे त्यांची श्री. कलंकी दहावा अवतार ईश्वर वैजनाथ भगवान यांची भेट झाली तेव्हा खुलासा झाला. एकदा त्या गाणगापुरास गेल्या तेथील एका भक्ताच्या अंगात आले व तो बेबीमाई यांना दरडाऊ लागला. तेव्हा बेबीमाई यांनाही अंतस्फुर्ती आली व त्यांची जोरदारपणे नानाविध भाषेत प्रश्नोत्तरे सुरू झाली. शेवटी तो भगत पुजारी बेबीमाईना शरण आला व माफी मागितली. त्यांच्यात काही वेगळीच शक्ती असल्याची त्याला प्रत्ययता आली.
असेच एकदा बेबीमाई यांना हाजी मलंग येथे जाण्याची इच्छा झाली. त्यांचे वडील श्री. चंद्रभान मिस्त्री यांना सोबत घेऊन तेथे गेल्या. मुसळधार पावसात त्या ओल्याचिंब झाल्या होत्या. जवळच्या शिदोरीवर माकडांनी झेप मारून पिशवी पळवली होती. श्री. चंद्रभान मिस्त्री यांनी एका सज्जनाला विनंती करून तेथे आडोशाला जागा मिळवली. तेथे त्यांनी विश्रांती घेऊन ते मूळ स्थानाकडे जाऊ लागले जिथे स्त्रियांना प्रवेश नव्हता. तरीपण बेबीमाई याना अंतस्फुर्ती आली व त्या दर्ग्यावर नाचत गेल्या व अदृश्य दर्शन घेऊन त्याला प्रदक्षिणा घालून आल्या. तेथील पुजारी व मुजावर आकस्मित होऊन पहात राहिले कारण आतापर्यंत अशी कुठल्याही स्त्रीची हिम्मत झाली नव्हती. श्री. चंद्रभान मिस्त्री मात्र भयाने कापत होते. आपली पोर आता उगीच वाद करणार व हे लोक आपल्याला हाकलून देतील अशी भीती त्यांना वाटत होती. परंतु तसे काही न झाल्याचे त्यांना सुद्धा आश्चर्य वाटले.


कलंकी सद्गुरूची भेट

सन १९८३ साली बेबीमाई वडगाव लांडगे येथे त्यांना भक्त तान्हुबाई लांडगे यांनी दिल्येल्या घरात उदास होऊन बसल्या होत्या. त्यांना काही करमत नव्हते. तेव्हा तेथील भक्त श्री. संपत यांना विचारले अरे संपा ! मला काही वाचायला तरी पुस्तक देरे? तेव्हा संपत कडे नुकतयेच संगमनेर येथील श्री. कलंकी देवाचे आत्मचरित्र पुस्तक आणले होते. ते वाचायला देताच त्या पुस्तकातील श्री. कलंकी वैजनाथ भगवानचा फोटो साक्षात त्यांच्याशी बोलू लागला व तुझा दत्तच मी येथे प्रकट आहे, मला भेटण्यास ये असे म्हणू लागला. कशीबशी त्यांनी रात्र उजाडली. दुसऱ्या दिवशी त्या यजमानांना घेऊन संगमनेर येथील नगर रोडला ज्ञानमाता शाळेसमोर असलेल्या श्री. कलंकी दहावा अवतार ईश्वर वैजनाथ भगवान यांच्या आश्रमी पोहोचल्या. त्यांची व श्री. कलंकी देवांची दृष्टांत होतास दोघांनीही एकमेकांना ओळखले. श्री. कलंकी देवांनी त्यांना जवळ बोलावून घेऊन त्यांच्या तोंडावरून व पाठीवरून हात फिरविला व लगेच त्यांना नामस्मरण दिले. पुढे महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांच्यावर शक्तिपात केला व काही दिवस आपल्या आश्रमात ठेवून घेतले. तेव्हापासून त्यांचा त्रास हळुहळु कमी होत गेला. त्या लक्ष्मीचे स्वरूप असल्याचे जाणीव त्यांचे यजमान नाना यांना श्री. कलंकी देवांनी दिली व पूर्वजन्मी तू शिवभक्त होतास, तेव्हा पार्वतीची आराधना करून मनात तिच्याबद्दल इच्छा धरली होती. त्या तपाचे फळ म्हणून भासमान रीतीने त्या तुझ्याजवळ राहिल्या व आता त्या तुझे ऋणमुक्त झाल्या आहेत. तरी तू आता ह्या लक्ष्मी शिवस्वरूपाचा चांगला सांभाळ कर असा आदेश दिला. तेव्हापासून इतर भक्ता प्रमाणे श्री. नाना हेही त्यांचा आदर करू लागले. श्री. कलंकी देवाच्या भेटीनंतर वैजनाथ देवांनी त्यांचे नाव बेबीनाथमाया असे ठेवले. तेथे आश्रमात श्री. कलांची देव समावेत त्यांची आरती होत असे. समाजकंटकांना ह्या ब्रह्ममाया स्वरूपाची जाण नसल्याने ते टीका व निंदा करत. त्यामुळे बेबीनाथमाया यांनी श्री. कलंकी देवांना त्याबद्दल विनवणी करून स्वतःची आरती थांबवली व आश्रमात त्या वडगाव लांडगा येथून अधून मधून येऊन जाऊन राहू लागल्या. त्यांना त्यावेळी नानाविध भाषेत आदेश येत. त्यात नाथकालीन बराबर भाषा, अरबी, मराठी, हिंदी इत्यादी भाषा त्या बोलत. भक्तगण त्यांचे आदेश शांतचित्ताने ऐकत व दिडमूढ होऊन जाऊन जात.