
।। ॐ ।।
।। श्री सद्गुरु दुर्वास दत्त प्रसन्न ।।
प्रस्तावना
मजलागी बारे, घडविल कोण । घडवी मी जाण विश्व जरी
भक्तासाठी स्वयंभु अवतार । मजसी साचार घेणे लागे
नोहे येता मी गा जाणा महिवरी । लोकी वाढे परी भक्ती कैसी
वैजनाथ म्हणे भारताची चिंता । मजसी साचार घेणे लागे
(श्री कलंकी देव)
गीता वेदाची भारतीय संस्कृती ही ईश्वराला फार प्रिय आहे आणि म्हणूनच ती राखण्याकरिता त्या अव्यक्त निर्गुण स्वरुपाला सगुण रूपात येवून सत्य अध्यात्म ज्ञान द्यावे लागते. तद्वत रामकृष्णादी अवतारानंतर ज्ञानेश्वर माऊलीने ‘ज्ञानेश्वरी’ रुपाने ब्रह्मज्ञान प्राकृतात प्रकट केले व त्यांचेच भागवत धर्म कार्य कलंकीरुपे वैजनाथ अवतारात श्री कलंकी देवांनी पूर्ण केले व ते आषाढ शु।। १०, इ.स. १९८७ साली महासमाधिस्थ झाले.
ब्रह्माबरोबर कार्य करण्यासाठी माया ही येतेच. तद्वत ज्ञानेश्वरावेळी मुक्ताई रुपाने ती होतीच. चांगदेवासारख्या महायोग्याला ज्ञान देऊन त्यांनी आपले अवतार कार्य संपविले. त्या अवतारात कार्य करण्याची अपूर्ण राहिलेली इच्छा त्यांनी श्री कलंकी अवताराबरोवर ‘श्री संत कलंकिनी बेबीनाथ माया रुपाने’ येवून चालू ठेवले आहे.
श्री संत कलंकिनी बेवीनाथ माया यांची कर्मभूमी वडगाव लांडगा, ता. संगमनेर ही आहे. त्यांचे बालपण व गृहस्थाश्रमी जीवन अत्यंत कठीण परिस्थितीत गेले. त्यांनी अनेक वेळा वडगाव लांडगा ते गाणगापूर पदयात्रा केल्या. नगर जवळील मिननाथ म्हणजेच मिरावली पहाडावर त्या १०-१२ वर्षे होत्या. त्या काळात कुंडलिनी अवस्थेचा त्रास भोगत होत्या. तदनंतर त्यांची श्री कलंकी वैजनाथ भगवंताची सन १९८३ साली भेट झाली व अनुग्रह झाला. अगोदर पासूनच त्याची आध्यात्मिक तयारी होतीच. गुरुकृपेने तिला अजुन बहर आला व नानाविध अरबी-फारसी, हिंदी, मराठी भाषांतून त्यांची अंतस्फुर्तीतून अभंग पदे प्रगट होऊ लागली. नाथांच्या वेळच्या बराबर भाषेतही त्या बोलत असत व काही लिखाणही केले.
इ.स. आषाढ़ शु।। १०, १९८७ साली श्री कलंकी देव महासमाधिस्थ झाले. त्यानंतर त्यांच्या कार्याची धुरा त्यांनी सांभाळली ती आजतागायत. त्यांच्या सिध्द हस्त प्रासादिक अक्षर ज्ञानातून लाखो अभंग व पदे प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. श्री दत्त कलंकीनी आध्यात्म मिशन त्यांचे यापूर्वी ४ छोटी मोठी ग्रंथ प्रकाशने केली आहेत. त्यांचे हे पंचम प्रकाशन होय. सुज्ञ, स्वाध्यायी अभ्यासकांनी त्याचा लाभ घेवून कृतार्थ व्हावे ही नम्र विनंती.
तदवत श्री कलंकिनी बेबीनाथ माया यांच्या भगिनी दगा आक्का यांना श्री कलंकी देवांचा व बेबीनाथ माया ह्या दोघांचाही शक्तीपात व अनुग्रह झाला आहे. त्यामुळे अत्यंत कष्टमय स्थितीत माताजींच्या सहवासात त्यांची साधना झाल्यामुळे त्यांच्या लेखणीतून प्रासादिक अभंग, पदे, भारुडे इ. वाङमय निर्मिती झाली आहे. दिसायला साध्या असणा-या ह्या साध्वीच्या ज्ञानाची कल्पना वाचकांना यावी म्हणून त्यांच्या काही अभंगावली प्रस्तुत ग्रंथात समाविष्ट करण्यात आली आहे. त्यावरून सुज्ञ वाचकांना ज्ञानदिव्याने ज्ञानदिवे कसे पेटतात याची कल्पना येईल.
तसेच मुंबईच्या मालवणी येथील माताजींच्या एका सामान्य कुटुंबातील भक्त कै. जनाबाई डावरे यांच्या लेखणीतून त्यांनी माताजींवर व श्री कलंकी देवावर अनेक पदांची रचना केली. ती पदे मालवणी व मुंबई येथील भक्तगण अत्यंत आवडीने भजनांमध्ये गात असतात त्यामुळे त्यांची काही पदे अभंगावलीत समाविष्ट करण्यात आली आहे. वाचकांनी त्याचाही आस्वाद घ्यावा.
माताजींचे लेखन कार्य सन १९९१ पासून सुरु झाले. तेव्हापासूनचे त्यांचे लेखन सुवाच्य अक्षरात उतरविण्याचे काम श्री संपत यंदे करतात. काही कलंकिनी भक्तांची प्रकाशन कार्यात बहुमोल मदत झाल्याने ही अभंगावली प्रकाशित करता आली.
तरी सदरहू अभंगवाणी आपणास उद्बोधक होवून आपल्या आध्यात्मिक प्रगतीला सहाय्यभूत होवो. अशी ईश चरणी प्रार्थना करून हे प्रास्ताविक श्री गुरुचरणी अर्पण करीत आहोत.
।। जय जय दत्तराज माऊली ।।
।। जय जय वैजनाथ माऊली ।।
।। जय जय बेबीनाथ माऊली ।।
