
।। श्री कलंकी बेबीनाथ माया कृत आदिशक्ती पाठ ।।
आदिशक्ती म्हणा आदिशक्ती म्हणा । कलंकीनी जाणा मुळ माया ।
असुर मर्दिनी जाणा कलंकीनी । मुळ हिची वाणी स्वयुंभू गा ।
विराट ती माया आदिशक्ती छाया । प्रेरितसे माया जगभर ।
नाथ बेबी म्हणे नाते गोते करी । टाकुनिया दोरी मायची गा ।।१।।
माया ती विराट महादादी स्फुरत । शुद्धी भक्ता देते मायेने गा ।
मायेचा तो झरा मायेने पसारा । घाली येरझारा प्राणी जाणा ।
माया ती पावली भक्तासी सावली । भक्तासाठी आली प्रणवी ही गा ।
नाथ बेबी म्हणे मायेची ती सत्ता । ब्रह्मांडी गा सुत्रा चालतसे ।।२।।
मुळ सुत्रधार अनादी कारण । माया ती स्फुरण पाहे तेथे ।
शुद्ध मती पाहे स्तिथ प्रज्ञ राहे । मुळ माया आहे पाहे तेथे ।
मायेचा विस्तार मायेने संहार । मायेने संसार वाढला हा गा ।
नाथ बेबी म्हणे माये विना जाणा । सुखी नाही भाना लौकिकाचा ।।३।।
माया ती विराट ज्ञान योग्य ठाई । चित्त देई पाही चेतना ही ।
मायेने गुणती मायेने भागती । शुद्ध ते गा होती ऋषीमुनी ।
बुद्धीचा मुढावा शुद्धीने गोडवा । भक्ती प्रेमी भवा साधितसे ।
नाथ बेबी म्हणे मूळ माया जाणी । मायेत टाकुनी काढी दुर्गुणी ।।४।।
सत्ता ती मायेची जगभर साची । सद्गुरू नेमाची जाणताती ।
माया कुळ कर्ती जगा हरविती । बुद्धी ती गा दाती जगाची ही ।
किती जाती बारे मायेच्या या दरी । फासा तया तरी टाकतसे ।
नाथ बेबी म्हणे पडत हा फासा । जीव कासा वीस होतसे गा ।।५।।
विश्वाची जननी माया कलंकिनी । मूळ कर्ती जाणी वेदा ही गा ।
ब्रह्म तेजाने झाली गा तयार । मूळ सुत्रधार ब्रह्मांडी या ।
माये गा वाचुनी विश्वारंभ नाही । चराचर पाही भरली गा ।
नाथ बेबी म्हणे जाणा मुळ माया । भक्ताची ही काया तारितसे ।।६।।
शुद्ध ती करिता भक्ती ब्रह्ममाया । तारिता ती छाया भक्ती भावा ।
मुळ माया जाणा स्वयंभु स्फूर्ती । कर्ती करविती जगाची ही ।
कृपा दृष्टी मुळ मायेची गा होता । शुद्ध होतो गाथा पाहे तेथे ।
नाथ बेबी म्हणे शुद्ध माया भाने । सत्य ज्ञान जाणे सदा तेथे ।।७।।
माया ही मायेने बहाणा करिती । आणावया भक्ती शुद्धी ही गा ।
माया करिती मोहिनी जाणती । असुरा खेळती मायेने गा ।
भक्तीत रमती माया ती स्फुरती । भक्ता सवे बोलती प्रेमाने गा ।
नाथ बेबी म्हणे माया ती ठकवी । ठकव्यासी भावी जैशा तैशी ।।८।।
आदिशक्तीला गा नाम रुप नाही । प्रणवी ती पाही माया ही गा ।
मूळ गा ओंकारी माया ती ईश्वरी । प्रणव लहरी आहे हिच्या ।
प्रणव ते रुप ओंकारी स्फुरत । शुद्धी ती देत ज्ञानास गा ।
नाथ बेबी म्हणे आदिशक्ती भाने । ओंकारी ती म्हणे स्वयंभु गा ।।९।।
शक्ती ती शुद्धीने अध्यात्म जोडती । भक्ती ती स्फुरती ज्ञानाची गा ।
मुळ आदिशक्ती प्रणव रुपिणी । अवतार जाणी स्वयंभू हा ।
ब्रह्म स्वरुपिणी भान कलंकिनी । घोर कली जाणी तैशी लहर ।
नाथ बेबी म्हणे साध्वी जाणती । मूळ ती गा कर्ती माया ईश्वरी ।।१०।।
आदिशक्ती बारे कृपा जाणा होता । बंधने तुटती भव भिती ।
माया ती ईश्वरी शक्ती पात देती । भक्ता ती तारीती शुद्धीने गा ।
आदिशक्ती मंत्र जपतो गा मनी । शुद्धी तया जाणी देहाची गा ।
नाथ बेबी म्हणे शक्ती मुळ मंत्री । करिती पवित्री मनाची ही ।।११।।
आदिशक्ती नाम जे गा उच्चारिती । पूर्ण तया प्रिती जोडती गा ।
आदिशक्ती नाम अमर ती भान । शुद्धीने गा जाण तारितसे ।
जीव चैतन्यासी मिलन ती देती । उद्धार करिती जीव प्राण्या ।
नाथ बेबी म्हणे जाणीव ती घेणे । कलंकिनी जाणे वायू स्थिती ।।१२।।
जड देहाचा होण्या गा उद्धार । येति अवतार माया ब्रह्म ।
मुर्ती रुप भाना अंतर स्फुरती । जडासाठी देती ईश्वर गा ।
कर्ती करविती राहे बारे शक्ती । निमित्य बोलती मानव गा ।
नाथ बेबी म्हणे कृपा ही ईश्वरी । आदिशक्ती नारी बोलती गा ।।१३।।
मायेचा विस्तार मायेने वाढीला । शुद्ध तिने केला संसार हा ।
संसारी ही येति साधु संत जाण । निमित्य गा भान भासती हे ।
भक्तासाठी भास संसारी भासती । परी गा करिती हरी भक्ती ।
नाथ बेबी म्हणे देव देवी जाणे । बदल गा भाने नोहेचि गा ।।१४।।
शक्ती कृपे जाणा ब्रह्मस्थिती भाना । बाणतसे ज्ञाना संतांचिया ।
शिव आणि शक्ती दुजी नाही मती । एकचिया स्थिती बाणतसे ।
ब्रह्मभान देती तेथेची स्फुरत । मायातीत होती शक्ती ही गा ।
नाथ बेबी म्हणे त्रैलोक्याची जाणी । मुळ माया भानी आदिशक्ती ।।१५।।
ॐकार ती गा ध्वनी प्रणवी येति । उच्चार ती देती ठाईच गा ।
महदादि पासून वेद चारी येति । उकार ती देती प्रणवी गा ।
उकारापासुन ॐकार स्फुर्ती । मायेतित होती ब्रह्म माया ।
नाथ बेबी म्हणे निर्गुण भान । सगुण ते गुण धरिताती ।।१६।।
अकार उकार मकार तो नाही । मजला गा पाही शक्ती म्हणे ।
आकारा आणिती भक्त ती जाणती । याच्या साठी येति मायेने गा ।
अकार उकार मजला गा नाही । भक्ती प्रेमा ठाई लीला माझी ।
नाथ बेबी म्हणे जाणती ती जाणे । आदिशक्ती म्हणे दिगंबरी ।।१७।।
कलंकी कलंकिनी मूळ महदादि । दत्त ते आराधी ब्रह्म माये ।
ब्रह्म मायेचा गा होतो अवतार । एकची लहर मूळ कर्ती ।
स्वयंभू ती स्थिती कोल्हाटी ती मती । अनुभव देती भक्ताशी हे ।
नाथ बेबी म्हणे दत्तांची ही माया । कळेना गा छाया जगाला ही ।।१८।।
दत्तांनी पाठविली माया ती कोल्हाटी । जगा ती राहती जैशा तैशा ।
मायेची ती माया अगम्य गा छाया । कर्ती ती गा माया जगावरी ।
जगसृष्टी नेम भासती ती माया । परि जगा छाया उलटी माया ।
नाथ बेबी म्हणे पाहे तैशी नाही । माया ती गा ठाई आदिशक्ती ।।१९।।
किती आले किती गेले मायेशी झुंजले । परी आकळले नाही त्याशी ।
मज आकाळण्या कित्येक गा येति । शेवटी पडती पश्चात्तापे ।
मायेची ही जाणा जाणिव ही ध्याना । अंतर गा भाना पाहे मी गा ।
नाथ बेबी म्हणे मुळ ती गा जाणे । अंतरंगी भाने सर्वा ठाई ।।२०।।
मायेचा विस्तार मायेने वाढला । आनंदे भोगिला संसारी या ।
माया तिने केली प्रेरणा ही दिली । बुद्धीची झाली चालक गा ।
शुद्ध ती गा स्थिती देऊनिया मती । तारता गा मती देहाचिया ।
नाथ बेबी म्हणे आदिशक्ती भान । पवित्र ती खुण देती मज ।।२१।।
निर्गुणाचे ध्यान सगुण हे भान । भक्तासाठी जाण अवतार ।
तारावया भक्ती येतसे शक्ती । भक्तासाठी स्फुर्ती धरुनिया ।
पवित्र हिचे भान शुद्ध ते ज्ञान । भक्तासाठी जाण तारितसे ।
नाथ बेबी म्हणे शुद्ध हिचे गुण । भक्तासाठी जाण अवतार ।।२२।।
पवित्र ही गा स्थिती देतसे मती । पाहुनिया भक्ती प्रेम ठाई ।
भक्तासाठी लागे अवतार घेणे । पडे येणे जाणे माये लागे ।
शुद्ध ही गा स्थिती कदा नाही रिती । माया ती करिती अपरंपार ।
नाथ बेबी म्हणे महामाये जाणे । खेळ तिचा म्हणे ठावे तिला ।।२३।।
मायेच्या मायेने भुलती गा जण । कळेनासे जाण माया हिची ।
नमती गा माते जे गा जाणा श्रोते । ऐशियासी गोते नाही कदा ।
शुद्ध भावे जे का मायेशी नमती । सुखी तया कर्ती शुद्धी मती ।
नाथ बेबी म्हणे मूळ माया स्मरण । मूळ चित्त भान ठाईच गा ।।२४।।
पर्वत शिखरि गुहे गा कारणी । तपा करी जाणी अनेक गा ।
परि न भेटती दांभिक ठरती । अहंकारी होती पाहे यांना ।
साधी सुधी भक्ती संसारी हा मेवा । सहज गा भावा देती लाभ ।
नाथ बेबी म्हणे शुद्धीची ही भक्ती । वाया न ही जाती संसारिया ।।२५।।
शक्तीची जाणिव गुरुविणा नाही । गुरु तेचि ठाई देती जाणिव ।
शक्तीला गा मला नाम रुप नाही । वायू रुप पाही स्थिती माझी ।
ॐकार स्वरूप स्वयंभू लहर । करीतसे संहार असूरांचा ।
नाथ बेबी म्हणे वायू रुप लहर । शस्त्र नाही भार शब्द रुप ।।२६।।
करिताती किती दुर्लभ विचार । परि मी साचार सर्वा ठाई ।
मुंगी पायी बांधियले घुंगरु जरी । परि कळे चोरी माझी मला ।
सत्य बोध ठाई मायेचे हे पाही । चोरी यात नाही कदा काळी ।
नाथ बेबी म्हणे सत्य लोपत नाही । दडवले पाही किती जरी ।।२७।।
दत्त ही कृपेची माउली जाणती । दिली मज स्थिती कृपेची ही ।
शके ऐकोनिशे विस जाणा पाहे । सवंत्सर आहे बहुधान्य ।
कार्तिक कृष्ण सप्तमी ह्या दिनी । बुधुवारी जाणी शक्ती पाठ ।
सद्गुरू कृपेने केला गा पूर्ण । जाणूनिया वर्म शक्तीचे हे ।
शुद्ध भावे जाणा करिती पठण । सुखी होती जाण संसारी या ।
नाथ बेबी म्हणे सत्य हेचि जाणे । आदि शक्ती म्हणे जगी पाही ।।२८।।
झाले अभंग जाणा एकोणतीस । आदिशक्ती यांस कृपा करो ।
आदिशक्ती नाम पावित्र्याचे धाम । सोडविल यम पाश हा गा ।
आदिशक्ती नाम उच्चार तो करा । पवित्रता धरा नामाची गा ।
पार्वती शिव एकची गा मिलन । पवित्र करील उमापती ।
वडगाव लांडगी केला हा पाठ । कलंकीची भेट पाहे येथे ।
नाथ बेबी म्हणे नामाचा महिमा । सांगती ती उमा आदिशक्ती ।।२९।।
।। श्री कलंकी बेबीनाथ मायकृत आदिशक्ति पाठ संपूर्णम ।।
