ओंमकार पाठ

।। श्री कलंकी बेबीनाथ माया कृत ॐकार पाठ ।।

ॐकार तो म्हणा ॐकार तो म्हणा । साडेतीन जाणा मंत्र हाची ।
मूळ गा अक्षरी झाली ही जाणीव । परब्रम्ही भाव लहरी गा ।
परब्रह्माची ही जाणीव गा पाही । आत्माराम ठाई दर्शवित ।
नाथ बेबी म्हणे निर्विकार आहे । परब्रम्ह पाहे आहे नाही ।।१।।

परब्रह्माची जाणीव ती पाही । निर्गुण गा राही निराकार ।
ॐकार स्वरूप मूळ गा अक्षरी । स्वयंभू लहरी प्रणवी गा ।
शुद्ध तत्त्वज्ञान तेथेची घोकिती । आत्म ती जाणती स्थिती ही गा ।
नाथ बेबी म्हणे स्वयंभू हे बीज । अंकुरी ते तेज पाहे हे गा ।।२।।

परे पलिकडे आहे गा बिज । शुद्ध याचे तेज परब्रम्ही ।
पूर्ण जे का होती तेच गा जाणती । अवस्था पाहती निर्गुणी ।
शुद्ध चित्ता ठाई ब्रम्ह ठसे पाही । मूळ अक्षरी ही जाणतसे ।
नाथ बेबी म्हणे जाणते ते ठाई । जाणूनिया पाही घेती ब्रह्म ।।३।।

ॐकार स्वरुपा नाही नाम रुप । बिजा त्या स्वरुप आहे नाही ।
बिज अक्षराने जाणिव ती झाली । परब्रम्ह मूळी पाहे ही गा ।
आधि हे काहि नव्हते गा पाही । परम गा ठाई आत्मा एक ।
नाथ बेबी म्हणे अवचित झाले । ब्रह्म भान खुले पाही येथे ।।४।।

जन्मा ती मी आले देह गा धारणा । मानव मी भाना पाहे ही गा ।
अवचित पाही स्फुरण हे झाले । परब्रम्ह ठेले कळले गा ।
आदि अंत पाहि नव्हता गा काही । भासा भास ठाई झाला हा गा ।
नाथ बेबी म्हणे चित्त चेतनेने । अक्षर हे भाने कळले गा ।।५।।

चित्त चेतनेसी दिला हा गा भास । मुळा पुरुषासी पाहे हा गा ।
आदि अंत दोन्ही नव्हते हे पाहि । भासा भास राही धारणा ही ।
प्रकृती हा भास मानव निमित्यास । पाहे गात्रे यास मानवी गा ।
नाथ बेबी म्हणे ॐकारी ही लीला । कलंकीची कला पाहे ही गा ।।६।।

ॐकारा पासुनी माया ही गा झाली । कला ही केली ॐकाराने ।
मायेने ही झाली लीला अपरंपार । पवित्र लहर परब्रम्ही ।
मायेने हे केले अधिष्ठान भाना । कळावया खुणा भक्तीशी या ।
नाथ बेबी म्हणे मूळ गा अक्षरी । जाणावी लहरी पाहे ही गा ।।७।।

मुळ गा अक्षरी ब्रम्ह ही जागृती । स्फुरण गा स्मृति पाहे ही गा ।
मूळ उच्चारिती ब्रम्ह वेद अक्षरी । येती गा लहरी पाहे तेथे ।
ब्रम्ह नाद हरी स्वर गा अंतरी । पवित्र ती करी ध्वनी स्वर ।
नाथ बेबी म्हणे ॐकार ते सुत्र । कळेनासे मात्र कुणाशी गा ।।८।।

ब्रम्ह नादापासून लहरी बनती । शुद्ध भान स्फुर्ती पाहे तेथे ।
ब्रह्म नाद ध्वनि लहरी उमटती । कानी ती गा येती वाणी पाहे ।
शुद्ध बोध देती ॐकार गा स्फुर्ती । मूळ ती गा करती शक्ती ठाई ।
नाथ बेबी म्हणे ब्रम्ह ते गा बिज । ॐकारी ते तेज पाहे राहे ।।९।।

ॐकारा पासूनी बीज मंत्र येती । स्फुर्ती ती बाणती अध्यात्मी गा ।
शुद्ध चैतन्याच्या गाठी गा पडती । अमृती ती येती कानी ध्वनि ।
ॐकार स्फुर्ती बिज चित्ता प्रेरती । शुद्ध ती बाणती स्मृती ज्ञान ।
नाथ बेबी म्हणे मूळ ॐकार हा । बिज ते पहा करीतसे गा ।।१०।।

शुद्ध अंतर स्फुर्ती बिजा प्रेरती । ॐकार ती स्थिती पाहे ही गा ।
ॐकार ही स्थिती उत्पत्ती बिज । प्रेरती गा तेज श्वासोच्छवासी ।
ॐकार ते बिज जन्मा येत नाही । अयोनी गा राही संभव हे ।
नाथ बेबी म्हणे उत्पत्ती स्थिती । श्वासोच्छवासी होती पाही जाणा ।।११।।

ॐकारापासूनी बिज उत्पत्ती । होती जाणा स्थिती अधिष्ठाने ।
शुद्ध चैतन्याचे मुळ ते जाणते । स्वयंभू ते स्फुरते शुद्धीने गा ।
ॐकार तो गा निश्चळ निराकार । निर्विकल्पी स्वर पाहे तेथे ।
नाथ बेबी म्हणे ध्वनि येते कानी । अकार तो जानी नाही तेथे ।।१२।।

अकार गा ध्वनि ॐकारी ही भानी । अवतारा जाणी राहतसे ।
आला गा अवतार जाणा धरणी । शुद्ध तेथे वाणी स्फुरतसे ।
अवतार स्थिती ॐकार गा स्फुर्ती । दैवी भान स्थिती पाहे तेथे ।
नाथ बेबी म्हणे स्वयंभू हे भाने । बिनतारे जाणे संदेश गा ।।१३।।

अवतारा ठाई पाठांतरी नाहि । मूळ वेद राही परब्रम्ही ।
चित्त तेथे शुद्धी दैवी भान स्पंदी । सदा असे छंदी अध्यात्म गा ।
मूळचे ते वेद ब्रह्म देते स्पंद । शुद्ध तेथे बोध ज्ञानाचे गा ।
नाथ बेबी म्हणे मूळ ते गा भाने । दैवी ज्ञान म्हणे भगवंते ।।१४।।

ॐकारापासूनी अंकुर वाढती । रोपे ती होती वृक्षालागी ।
वृक्षालागे पाहे शुद्ध गोड फळे । येताती गा मुळे अध्यात्माने ।
मधूर पाहे गोड याचा गोडवा । अध्यात्माने भवा कळतसे ।
नाथ बेबी म्हणे ॐकार तो भाने । ठसतसे जाणे अध्यात्माने ।।१५।।

ॐकारापासूनी निर्विकल्पी भान । लागतसे जाण स्वयंभू गा ।
ॐकार ही शक्ती स्वयंभू स्फुरती । मुळ ती प्रेरती ज्ञाना लागे ।
संता ठिकाणी आकाशवाणी देती । मधूर ती गाती ध्वनि स्मृति ।
नाथ बेबी म्हणे गुण ते गा गाणे । संत हे गा भाने अभंगी गा ।।१६।।

शुद्ध गा कुढी अंकूर तेथे वाढी । पवित्र गा गोडी पाहे तेथे ।
ॐकार स्फुर्ती अध्यात्माने वाढती । मूळ ते प्रेरती ज्ञानाचे गा ।
शुद्ध भावे भावती ॐकार स्फुर्ती । तया ही स्थिती बाणतसे ।
नाथ बेबी म्हणे जाणीव ती भाने । सद्गुरु ज्ञाने होतसे गा ।।१७।।

ॐकार स्फुर्ती वायूरुप गा स्थिती । मुळ ती गा कर्ती अंतर्बाह्य ।
अनादी गा सुत्री व्यवहार जाणती । जगाचा नेणती कारभार ।
ओमकार स्थिती ब्रह्मवेत्ते जाणती । मुळ ती कर्ती व्यवहार हा ।
नाथ बेबी म्हणे जाणीव नाहि । भान येथे पाही मानवी गा ।।१८।।

देहात असूनी शक्ती ती अलिप्त । मानवी हे हस्त मी निमित्याला ।
कर्ती गा करविती ॐकार स्फुर्ती । अज्ञान मी मती मानवाची ।
कळत हा नाही ॐकार गा पाही । कार्य याचे राही वेळ तैसे ।
नाथ बेबी म्हणे अज्ञान मी भाने । ॐकार हे म्हणे कार्य करी ।।१९।।

ॐकार ध्वनी नादे जागृती होते । ज्ञानाची प्रचिती येते ठाई ।
ॐकार स्फुर्ती ज्ञानाची गा जागृती । दिव्यत्व देती ठाईच गा ।
ॐकार हा स्मरा शुद्ध याची धरा । पूर्णत्वाच्या स्वरा पाहे हा गा ।
नाथ बेबी म्हणे ज्ञानाच्या संगती । ॐकार प्रचिती येते ठाई ।।२०।।

पहिला ॐकार ॐ गा जपतो । पहिली ती गातो मात्रा ही गा ।
ॐ गा पासूनी जप तो वाढतो । शुद्धी तोची देतो गात्रा या गा ।
होता गात्रे शुद्ध पंच इंद्रियांची । इच्छा होती सच्ची वासनेची ।
नाथ बेबी म्हणे वासना ही जळती । शुद्धी ती बाणती वेदालागी ।।२१।।

ॐ स्वाहा पासुनी उच्चार ध्वनि । मनाची ती भानी शुद्धी होती ।
ॐ तो उच्चार ध्वनि प्रणवाची । बेंबी गा देठाची पाहे रग ।
तेथुनी सुटती साडेतीन मात्रा । वेष्टुनिया गात्रा पाहे तेथे ।
नाथ बेबी म्हणे प्रणवी विळखा । नागिनी ती चोख सच्ची राहे ।।२२।।

सुटता वेष्टन बेंबी सभोवती । पाहे गा चढती पाठी कणा ।
इडा नि पिंगला नाड्या दोन्ही जाणा । चढूनिया खुणा ब्रम्ह रंध्रा ।
तेथे गा ओकुनी अमृती ही धारा । मध्यमा वैखरी परा पश्चंती ।
नाथ बेबी म्हणे चारी वाचे भानी । अमृत ही जाणी पुरविती ।।२३।।

प्रणवी ती सीमा उल्लंघन करी । शक्ती गा न्यारी ॐकाराची ।
पंच अमृत गा शरीरी ओकती । माया ती प्रेरती शक्ती ठाई ।
अमृताने देहि धुवून काढिती । मळ मुत्रा कर्ती साफ देखा ।
नाथ बेबी म्हणे शुद्धीचे हे गुण । प्रणवी ही खुण साफ असे ।।२४।।

शुद्ध गा तळमळी ॐकार स्फुर्ती । बिजा ते प्रेरिती शक्ती ने गा ।
ॐकार ती शुद्धी मारती गा बुद्धी । पाहे ती गा बुद्धी वासनेची ।
करिती गा शुद्धी वासना ही बुद्धी । पाहे ती गा छंदी असल्या ही ।
नाथ बेबी म्हणे ॐकारी भाषण । जेथे पूर्ण भान तेथे पाहे ।।२५।।

शुद्ध तळमळी विना नाही स्फुर्ती । भान ती गा स्थिती पाहे हिची ।
जेथे तळमळ शुद्ध जाणा आहे । तेथे गा पाहे स्फुर्ती हि गा ।
मुळ ती गा कर्ती ॐकारी ही शक्ती । स्वयंभू गा स्फुर्ती माया हिची ।
नाथ बेबी म्हणे जाणीव ही घेणे । स्वयंभू ती भाने भगवंते ।।२६।।

भगवती माया अंतर गा स्फुर्ती । कळेच ना गा स्थिती मायिकांसी ।
माया मोहा पासूनी अलिप्त जो असे । त्यासी ही गा ठसे माया पाहि ।
विराट ही गा शक्ती ॐकार स्थिती । कळतसे भक्ती जडल्या गा ।
नाथ बेबी म्हणे जाणीव ही देणे । भगवंत जाणे हाती असे ।।२७।।

ॐकार तो पाहे अंतरी हा आहे । मुळ गा ते राहे परब्रम्ह ।
नाम उच्चार गा याशी काही नाही । निर्गुण गा पाही निराकार ।
वेद ते बोलती उच्चारा आणिती । निर्गुण आणिती सगुणासी ।
शके एकोनिसे विस जाणा आहे । बहू धान्य पाहे संवत्सर ।
मार्गशीर्ष मास सोमवार दिनी । एकादशी जाणी केला पूर्ण ।
ॐकार पाठ पूर्ण जाणा केला । गिता जयंतीला पाहे हा गा ।
नाथ बेबी म्हणे ॐकारी ही कृपा । मार्ग देखा सोपा जात असे ।।२८।।

झाले अभंग हे जाणा एकोणतिस । ॐकार कृपेस आली फळे ।
ॐकार या नामा रंग रुप नाही । निराकार राही स्थिती ही गा ।
शुद्ध भावनेने मनन जो करी । शुद्ध तेथे प्रेरी अध्यात्म गा ।
ॐकार आणि स्फुर्ती बीज प्रेरती । मिलन ती स्थिती ऐक्य असे ।
ॐकार जप सद्गुरु करिती । पूर्ण तेथे स्फुर्ती पाहे ही गा ।
नाथ बेबी म्हणे उच्चार हा करा । चुकवा तो फेरा चौऱ्यांशीचा ।।२९।।

।। श्री कलंकी बेबीनाथ माया कृत ॐकार पाठ संपूर्णम् ।।