कलंकी आत्मबोधनमृत

।। ॐ ।।
।। श्री सद्गुरु दुर्वास दत्त प्रसन्न ।।
प्रस्तावना

आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद्|
वदति तथैव चान्यः ।।
आश्चर्यवद् चैनमन्यः शृणोति ।।
श्रुत्वाऽप्येनं वेद न चैव कश्चित् ।।
– श्रीमद् भगवदगीता (२/२९)

“जणू काय आश्चर्य म्हणून ह्या आत्म्याकडे कोणी पाहतो, तसेच दुसरा कोणी आश्चर्यासारखे ह्याचे वर्णन करतो आणि अन्य कोणी जणू काय आश्चर्य म्हणून ऐकतो; पण ह्याप्रमाणे पाहून ऐकूनही कोणी त्याला जाणत नाही.”
आत्मानुभव हा परमार्थातला श्रेष्ठ दर्जाचा पाया आहे. तो दर्शविण्यासाठीच युगायुगी परमेश्वराला साकारत्व पत्करावे लागले व मी कोण हे दिग्दर्शन करून अंतःस्फुर्तीची स्पष्टता दाखवावी लागली. म्हणूनच ब्रह्माची चंचलता असणाच्या ह्या आत्म्याचे वर्णन परमेश्वराने अवतार धरल्यानंतर वेळोवेळी केलेलेच आहे. श्रीमद् भगवद्गीतेत व अमृतानुभव ह्यात आत्म्याविषयी वर्णन आढळतेच.
गीता व वेदांताचे मूळ अध्यात्म तत्त्व सांगण्यासाठीच अवताराचे प्रयोजन आढळून येते. त्यामुळेच ह्या चालु युग चौकडीत मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्धावतार ज्ञानेश्वर व आता शेवटचा वैजनाथरुपे कलंकी अवतार प्रकट होवून दशावताराची सांगता झाली आहे. श्रीकृष्णावतारातील भगवदगीता, ज्ञानेश्वरावतारातील ज्ञानेश्वरी व अमृतानुभव ही ब्रह्मज्ञानाची रत्ने प्रकट केल्यानंतर ह्या घोर कलियुगात संपूर्ण ब्रह्मसूत्र वर्णन गीता वेद निरुपणाचे सार श्री. कलंकी वैजनाथ भगवंतांच्या लेखणीतून प्रकट झालेले आहे. ह्या अवतारात ब्रह्मज्ञानाचा कळसच चढविला गेला आहे. त्यातील भाषा अगदी समजण्यास सोपी, सुबोध, प्रासादिक व सर्वसामान्य माणसाला पचेल व रुचेल अशाच स्वरुपाची आहे. प्रस्तुत ग्रंथातून वाचकाला त्याची कल्पना येईलच.
आत्मा हा ज्ञानरुप आहे. त्यामुळे आत्म्याविषयी होणारे जे ज्ञान तेच खरे ज्ञान होय; म्हणून इतर भौतिक विषयाच्या ज्ञानापेक्षा अध्यात्मिक ज्ञानाला महत्त्व दिले जाते. मग जेव्हा हे अध्यात्मिक ज्ञान त्याच्या मूळ स्व-रूपातून प्रकट होते. तेव्हाच खरे सत्यज्ञान काय आहे याची मानवाला कल्पना येते. परमेश्वराने अवतार धारण करून जर हे ज्ञान आपणास दिले नसते तर आपणास खरे सत्यज्ञान कळलेच नसते व आपणास ईश्वरी सत्तेची जाणिवही झाली नसती. आजच्या विज्ञानयुगात मानवाची भौतिक ज्ञानाची झेप जरी उंचावली असली तरी अध्यात्मिक ज्ञानाविषयी तितक्याच प्रमाणात अनभिज्ञता आढळून येते. अध्यात्मिक ज्ञान हा अंतींद्रिय अनुभूतीचा विषय असल्याने त्याची प्रत्यता फारच थोड्यांना येते. त्यामुळे ह्या ज्ञानाविषयी अनेकांना साशंकता निर्माण होणे स्वाभाविकच आहे. मायेच्या प्रभावामुळे हे सृष्ट जगत्च बहुतांशी जनांना सत्य वाटत असत. परंतु ह्या दृष्टा दृश्य व दृश्यमान ह्या त्रिपुटी पलीकडील जे काही सत्य आहे तेच खरे एकमेव ब्रह्मसत्य होय असा अध्यात्माचा सिद्धांत आहे. तो अनुभव ज्याला येतो त्यालाच आत्मसाक्षात्कारी म्हणतात. अशा ह्या आत्मसाक्षात्कारी महापुरुषांच्या ठायीच खरे आत्मिक समाधान आढळून येते व तेच खर! समाधानाचा मार्ग कोणता हे ईतरांना दाखवून देतात. आत्मा अमर आहे, तो अविनाशी आहे, तो फुटत, तुटत, जळत, बुडत किवा सुकत नाही. तो नित्य शाश्वत अज पुराणपुरुष आहे अशी त्याची ख्याती आहे. तो जुने वस्र टाकून देऊन नवीन वस्त्र धारण करत असतो वगैरे आत्म्याविषयी बरेचसे वर्णन भगवद्गीतेत आढळते; परंतु ह्या आत्म्याचा शोध कुणालाच लागत नाही. फक्त सद्गुरुकृपेने आत्मरुप बनता येते. अशी ह्या आत्म्याची विशेषता आहे म्हणूनच परमात्म्याला ह्या आत्म्याविषयी ज्ञान देण्यासाठी स्वतः आकारात यावे लागते व स्वानुभवाने ज्ञान प्रकट करावे लागते. तेच अद्भुत ज्ञान प्रस्तुत आत्मबोधांमृत ह्या ग्रंथात कलंकी भगवंतानी प्रकट केलेले आहे. आत्म्याविषयीचे इतके गहन ज्ञान इतक्या सोप्या भाषेत सापडणे कठीणच ! ह्या ग्रंथात मानवाच्या जीवनातील बहुतेक शंकाकुशंकांचे निरसन आढळून येते व शेवटी वाचक स्तब्ध होवून जातो व त्याची प्रज्ञा स्थिरावते.
प्रणवाच्या अग्रभागी असलेला ॐ कार पुरुष जेव्हा जागा होतो व आत्मा बोलावयास लागतो. तेव्हाच खरी ईश्वरी साक्षात्काराला सुरुवात झाली असे म्हणता येते. तो पर्यंत होणारे दृष्टांत व ईतर चमत्कार, साक्षात्कार हे केवळ भावनेपोटी उठलेले ईश्वरी शक्तिचे वादळ होय. हा सर्व भास साधकाची निष्ठा वाढवून जातो खरा; परंतु शेवटी तो भासच नाही का? म्हणून खरा ईश्वरी साक्षात्कार होण्यासाठी सद्गुरूची कृपाच व्हावी लागते. जगात मार्गदर्शक गुरु पुष्कळ आढळून येतात; परंतु मोक्षदाता सदगुरु विरळाच ! त्याची भेटही दैवयोगानेच होत असते. हा अलभ्यलाभ अनंत सुकृते बळावल्यानेच घडून येतो. ज्यांना अशा सद्गुरुची कृपा लाभली असा जीवात्मा संसारी धन्य होय ! सद्गुरुचे आगमन हे कालमानानुसार होत असतेच; परंतु परब्रह्म परमात्मा हा अधर्म अराजकावेळीच साकार होत असतो. आता ह्या घोर कलियुगात वैजनाथ रुपाने कलंकी अवतार भारतात महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात संगमनेर येथे प्रकट झालेला आहे.
कलंकी देव भक्त कार्यकारी मंडळाचे हे पंचम प्रकाशन आपणा हाती देतांना आम्हास अत्यानंद होत आहे. आपणा सर्व सज्जनांच्या तन, मन व धनरूपी सहाय्यामुळे व ज्ञानेश प्रिटर्सचे श्री. गधे सर व त्यांचे सहकारी ह्यांच्या सर्वतोपरी सहाय्यामुळेच हे प्रकाशन आम्ही फारच थोड्या अल्पावधीत प्रकाशित करु शकलो. कार्यकारी मंडळ आपणा सर्वांचे ऋणी आहे. तसेच आपणा सर्व सज्जनांचे आमच्या पुढील प्रकाशनास सहाय्य लाभून ह्या विश्वधर्माच्या कार्यास आपण हातभार लावाल हीच अपेक्षा !
शेवटी आपणा सर्वांना हा अद्भुत ग्रंथ आत्मप्रेरक, उद्बोधक, जीवनदायी व आत्मकल्याणकारी ठरो व ह्या ज्ञानरूपी महासागरात आपण यथेच्छ डुंबत रहाल अशी सद्गुरु दत्त भगवंता चरणी सदिच्छा व्यक्त करुन हा अमोलिक ग्रंथ आपणा सर्वांच्या हाती देत आहोत.

।। जय जय दत्तराज माऊली ।।
।। जय जय वैजनाथ माऊली ।।

– कलंकी आत्मबोधांमृत –

आत्मानुभव हा परमार्थातला श्रेष्ठ दर्जाचा पाया आहे. तो दर्शविण्यासाठीच युगायुगी परमेश्वराला साकारत्व पत्करावे लागले व मी कोण हे दिग्दर्शन करून अंतःस्फुर्तीची स्पष्टता दाखवावी लागली.
ह्या घोर कलियुगात पूर्ण परब्रह्म कलंकी अवतार ईश्वर वैजनाथ भगवंतांनी हेच विवेचन स्पष्ट, सुलभ व रसाळ अशा गद्यमय मराठी प्राकृत भाषेत “कलंकी आत्मबोधांमृत” या ग्रंथात ग्रंथित केले आहे. यात ९५१ वचने आली आहेत.