
।। ॐ ।।
।। श्री सद्गुरु दुर्वास दत्त प्रसन्न ।।
प्रस्तावना
कलंकी वैजनाथ भगवंताच्या ब्रह्मज्ञानाचे नवनीत असा ‘कलंकी गिता सत्यनारायण’ हा ग्रंथ वाचकांच्या हाती देताना आम्हा भक्तजनांना अत्यानंद होत आहे. आजच्या काळाची गरज लक्षात घेऊन रुढीजात अंधश्रध्देने पिडीत अज्ञान जड:मूढांना पाठातरी ज्ञानाने खोटी विद्वता अंगी असणा-या पंडीतांना, कर्मठांना, तर्कीकांना, बुरसटलेल्या व संकुचित मनोवृत्तीने वहात चाललेल्या मानव प्राण्यास व इतर जनांना उद्बोधक प्रेरक व ख-या सत्यनारायणाची जाणिव करुन देणारा हा जीवनामृताचा साठा कलंकी देवांनी मानव जातीपुढे ठेवला आहे.
कलंकीची ही गिता १८ अध्याय व ४ स्वतंत्र अध्याय मिळून २२ अध्यायाची. शिवाय त्यात स्थल काल व अध्यायाची महती पटविणारा उत्कृष्ट समारोप आला आहे. साध्या, सोप्या, सुटसुटीत, रसाळ व पद्यमय प्रासादिक वाणीचा हा अमोलिक ग्रंथ कलंकी देवांच्या ब्रह्मस्थिीतुन संगमनेर येथ प्रगट झाला. त्यात ब्रह्मत्मा वर्णन, ओंकार स्वरुपाचे विराट स्वरुप दर्शन संताचे कार्य, संत सिध्द, सत्पुरुष अवतार याची स्थिती व वर्णन, भागवत धर्माची महती, कलंकी अवतार येण्याच्या अगोदर वैकुंठातील विचार, खरा सत्यनारायण कोण व त्याची कशा प्रकारे पूजा करावी याचे यथासांग वर्णन व इ. ब्रह्मज्ञानाचे सार ग्रथित करण्यात आलेले आहे. ग्रंय छोटा नित्य पठनीय आचरणीय, एहीक जीवनात सुखशांती मिळवून देणारा व आत्मोध्दारक असाच आहे.
मूळ ब्रह्मशक्ती निर्गुण निराकार त्रिगुणात्मक दत्त होय. त्यांचे पासून पुर्ण परब्रह्म शक्ती निर्माण झाली. जीव व ईश मिळून जी शक्ती निर्माण होते त्यास ईश्वर असे म्हणतात. ती त्रिभुवन व्यापी असते. उत्पति स्थिती, लय त्रिगुणात्मक शक्तीने चालते. मुळ ब्रह्मशक्ती कोणासच दिसत नाही म्हणूनच पूर्ण परब्रह्म सगुण रुप निर्माण होते. तेच ईश्वराचे खऱ्या स्वरुपाचे व शक्तीचे ज्ञान देत असतात व ब्रह्मनिरुपण करु शकतात. ते ‘अह ब्रह्मस्मि’ तत्वाने बोलत असतात व त्यांचे ठायी मायिक अहंकार असत नाही. केवळ पाठांतरी ज्ञानाने व ग्रंथ पठनाने ब्रह्म निरुपण होऊ शकत नाही. मोक्षदाता सद्गुरु भेटल्याने ब्रह्म निरुपण होते. हा अनुभव त्रैमूर्ती दत्तांनी नाथ सिध्दांना दिला. त्रिगुणात्मक दत्त असून अवतार विष्णुमय पूर्ण परब्रह्म असतात. राम, कृष्ण, ज्ञानेश्वर व कलंकी वैजनाथ हे पूर्ण परब्रह्म अवतार होत. हे ईश्वर जरी असले तरी सद्गुरुची महतीं पटविण्यासाठी सदगुरुची उपासना भक्ती दाखवतात. राम अवतारांत वसिष्ठ, कृष्णवतारात सांदिपनी ज्ञानेश्वरांच्या वेळी निवृत्तीनाथ व कलंकी अवतारात दत्त सदगूरु झाले त्यामुळे अवताराला ब्रह्मस्थिती भोगता आली. पूर्ण परब्रम्ह सिध्द कोटीतील आत्मे चिरंजीव असतात. त्यांच्या ठरल्याप्रमाणेच निजधामास जाण्याच्या घटना घडून येतात.
चाल युग चौकडीत आजपर्यन्त मत्स्य कूर्मादी ज्ञानेश्वरापर्यन्त नऊ अवतार झाले. पहिले चार अवतार तत्कालिक व मायावी स्वरुपात व नंतरचे मानवात आले. ह्या घोर कलियुगात सध्या शेवटचा १० वा कलंकी अवतार वैजनाथ रुपे प्रगटला आहे. लेखणीरुपे वारुवर स्वार असलेल्या ह्या सत्यनारायणचे ब्रम्हसुत्र निरुपणावरील लिखाण अफाट अद्वितीय जगध्दौरक आत्मोध्दारक असेच आहे. त्यात लाखो अभंग, श्लोक दोहरे १७-१८ लहान मोठे ग्रंथ इ. स्वहस्ते लिखीत प्रचंडप्राय ब्रम्हज्ञानाच्या साठयाचा ग्रंथ सांभार मानवाच्या कल्याणासाठीच प्रगट केला. त्यातीलच अलीकडच्या काळात निघालेला “कलंकी गिता सत्यनारायण” हा छोटासा ग्रंथ अम्ही आपणापुढे मांडत आहोत. अवताराचे भागवत धर्म कार्य विश्वव्यापी प्रेम व बंधुभावाची शिकवण देण्यासाठीच आहे. आचरण शुद्ध बनणे हाच खरा धर्म होय. संकुचित वृत्ती, अंधश्रध्दा, जातीनिष्ठपणा, कर्मठ व असुरी वृत्तीला तिलांजली देऊन दया, क्षमा, शांती, सत्य, अहिंसा ह्या पंचशिला तत्वाने वागावयास हवे. त्यातच सर्व मानवजातीचे हीत सामावले आहे. संत सिध्द सत्पुरुष अवतार विभूती हेच खरे सत्यनारायण होत. त्यांचे यथासांग पूजन करणे हेच खरे सत्यनारायणचे व्रत पाळणे होय. त्यांची जाणिव धरलो नाही व शिकवण मानली नाही तर मानवाला पुढे कठीण दिवस येतील. बुरसटलेल्या व संकुचित मनोवृत्तीच्या आडपडद्यातून बाहेर पडून भाविकांनी परमेश्वराकडे पहाण्याचा दृष्टिकोन विशाल व्यापक व पवित्र भावनेतून ठेवण्याची आजच्या काळाची गरज आहे. तत्व सिध्द विचार मानवाने “हे विश्वचि माझे घर” या भावनेतून व “व्योम म्या बाहु कवळिले” या विराट रुपातून आत्मसात केले पाहिजे.
कलंकी देव भक्त कार्यकारी मंडळाचे हे प्रथमचेच ग्रंथ प्रकाशन होय. कलंकी अवताराची व त्यांच्या ब्रह्मज्ञानाची व जनमाणसांना कल्पना यांवी म्हणून हे भक्त मंडळ प्रयत्नशील आहे. त्या कार्यास आपणही यथाशक्ति हातभार लावुन सहाय्यभूत व्हावे व आल्या नरजन्माचे सार्थक करुन घ्यावे ही मंडळाची आपणास नम्र विनंती आहे. ह्या घोर कलियुगात यांत्रिक जीवनाने पिळवटून निघालेल्या मानवास हा अद्वितीय ग्रंथ एक वरदानच ठरणार आहे. व ख-या सत्यनारायणाची पूजा घडल्यानेच मानवास पुढे सुखाचे दिवस येणार आहेत. असेच कलंकी देव सांगतात कलंकी गिता सत्यनारायण हा ग्रंथ मानवजातीस प्रेरक, उद्बोधक, ज्ञानदायी, आत्मकल्याणी ठरो व अखंड विश्व ह्या ज्ञानांमृतात येथेच्छ डुंबत रहो अशी सदिच्छा व्यक्त करुन हे प्रास्ताविक कलंकी देव चरणी अर्पित आहोत.
