
कलंकी अवतार ईश्वर वैजनाथ भगवंताच्या पूर्वजांचा
– थोडक्यांत परिचय –
परम पूजनीय वैजनाथ देवांचे पूर्वज हे मूळचे हैदाबाद भागातील राहाणारे! अर्थात त्यांच्या घराण्यांत तेलगू भाषा पिढीजात आहे. त्याप्रमाणे त्यांना मराठी सुद्धा चांगले बोलता येते, समजते. त्यांचे भोसले घराणे! शिंदे हे त्यांचे मातुल घराणे होय.
त्याच्या चार पांच पिढया मागील संबंध लक्षात येत नाही. एवढ समजते की, त्यांच्या आईच्या पणजीला पुण्यात पेशवे कालांत पालखीतुन आणीत नेत असत. त्याच्या समवेत बरेच नोकर चाकर, दास, दासी असत. यावरून असे वाटते की, वैजनाथ देवांच्या पूर्वजांचा राजे घराण्याशी संबंध होता. शहाजी राजे भोसले हे निजामाच्या पदरी होते ना? त्यांचे तेलगू भाषेत फार मोठे चरित्र उपलब्ध आहे. तसाच काहीसा संबंध हा वैजनाथ देवांच्या भोसले घराण्याचा असावा.
देवांचे आजोबा कै. सखारामपंत वर्धेकर भोसले हे धुळे येथे गोंधळे गल्लीत राहात असत. तेथूनच ते पुढे नाशिक येथे आले. त्यावेळी नुकत्याच मोटारी सुरु झाल्या होत्या. वैजनाथ देवांच्या आजीने प्रथमच मोटार पाहिली व “हे काय पळते आहे” असे म्हणून त्यांना आश्चर्य वाटले. तसेच भीतीपण वाटली व घरात दडून बसल्या. इतर लोकांनी तर मोटारीवर हळदी-कुंकू वाहिले.
देवांचे वडील कै. लक्ष्मण सखाराम वर्धेकर भोसले यांना एक भाऊ होता. त्याचे नांव कै. नरसिंगजी सखाराम वर्धेकर भोसले असे होते.
वर सांगितल्याप्रमाणे त्यांचे मातुल घराणे शिंदे! हया घराण्यांत देवांचे आजोबा (आईचे वडील) कै. भवानी बापूजी शिंदे हे संगमनेर येथे साळीवाड्यात राहात होते. ते मोठे विठ्ठल भक्त होते. विशेष म्हणजे ते अजानुबाहू होते. त्यांचा भक्त म्हणून मोठा लौकिक होता. पुढे ते परिस्थितीमळे नाशिकला राहू लागले. त्यांना अंबा उर्फ अनुसया (देवांचे मातोश्री) व भागुबाई (देवांच्या चुलती) अशा दोन मुली होत्या. लक्ष्मणराव व नरसिंगराव हयांना नाशिकमध्ये भांड्याचा व्यापार व किराणा दुकान वैगरे काम करतांना पाहिल्यावर भवानीबुवांनी आप्त-संबंध लक्षात घेऊन या दोन्ही मुली दोघा भावांना दिल्या. दोघी बहिणी जाऊ झाल्या.
देवांचे वडील कै. लक्ष्मणराव हे ह्या युगातील साक्षात अत्रिमुनी व त्यांच्या पत्नी अंबाबाई ह्या साक्षात अनुसया होत. तसेच चुलते कै. नरसिंगजी यांचा सावता बाबाचा जन्म, व त्यांच्या पत्नी भागुबाई ह्या जनाबाई होत. अशी हि दिव्य माणसे पुनरुपी ह्या भूतलावर जन्मास आली. कारण त्यांच्या घराण्यात जगदोद्वारक, सर्व शक्तिमान, त्रैलोक्यनायक, विश्वभर परमात्मा सगुण रूपाने व वैजनाथ नावाने जन्मास यावयाचे होते.
कै. नरसिंगराव उर्फ सावता बाबा यांच्या धर्मपत्नी भागुबाई उर्फ जनाबाई यांना ९ मुलगे व ७ मुली झाल्या. पण दुर्दैव असे कि, त्यापैकी एकही अपत्य असे वाचले नाही. तेव्हा दत्त भगवान म्हणाले, “जनाबाई पहिला का हा प्रपंच! कसा गमतीदार आहे.” ह्या घराण्यात वैजनाथ देवांच्या आई वडिलांना दत्तांच्या साक्षात भेटी होत. दत्त भगवंताचे त्यांच्याकडे गुप्त रूपाने विचारविनीमय, राहणे, खाणे पिणे होत. ह्या विस्मयजनक घटना पुढे क्रमाक्रमाने येतीलच.
नाशिक येथे असताना घडलेला प्रसंग! देवांच्या मातोश्री अंबा उर्फ अनुसया सती ह्या साक्षात अनुसयेचेच रुप असल्याने एका साधू पुरुषाने त्यांना ओळखले. त्यावेळी त्यांनी वैजनाथ देवांच्या आईच्या वडिलांना सांगितले की, ह्या तुमच्या मुलीस गोदावरीचे स्नान करून काळ्या रामाच्या देवळात औदुंबर वृक्षाच्या झाडाखाली प्रदक्षिणा घालावयास सांगा. त्याप्रमाणे वैजनाथ देवांच्या आई अंबाबाई नियमित औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालू लागल्या. सन १९१३ साली प्रदक्षिणा घालीत असताना ऐके दिवशी वृद्ध संन्यासी स्वरूपात दत्त महाराज ओवरीत बसले होते. ते अंबा उर्फ अनुसया सतीस म्हणाले, “हे मुली! तुझ्या त्या दत्तला सांग की, ह्या म्हाताऱ्याला थंडी वाजू देऊ नको.” हे ऐकून अंबाबाई आश्चर्यचकित झाल्या, व म्हणाल्या, “महाराज! काय म्हणता?” नंतर महाराजांनी आईला जवळ बोलावून घेतले व विचारले “हे मुली! तुला काय होते?” तेव्हा वैजनाथ देवांच्या आईने सांगितले की, “माझ्या अंगावर नाग, सर्प पडतात. भय वाटते.” तेव्हा दत्तांनी सांगितले की, “मला ओळखलेस काय? मी मानव स्वरूपात प्रत्येक्ष दत्त तुला भेट देण्यासाठी आलो आहे. तुझ्या बुटकुल्यात पाणी आहे काय?” तेव्हा आई म्हणाल्या “होय” नंतर आईने ते बुटकुले दत्तात्रेयांच्या हाती दिले. दत्त महाराजांनी मंत्र म्हणून ते बुटकुले आईला परत दिले. ते तीर्थ अंबाबाई उर्फ अनुसयास प्यावयास सांगितले. नंतर आईने ते तीर्थ दत्ता समक्ष घेतले. नंतर दत्त भगवान म्हणाले, “तुझ्या पोटी कलंकी अवतार होईल.” असे म्हणून तेथेच अदृश्य झाले. नंतर वैजनाथ देवांच्या आई घरी आल्या. हि सर्व घडलेली हकिकत सर्वाना सांगितली, त्यावेळी आश्चर्य वाटले.
नंतर ३ वर्ष गर्भ पोटात फिरत होता. पुढे तापसारी सुरु झाली. त्यावेळी वैजनाथ देवांचे आई-वडील संगमनेर येथे साळीवाड्याला श्री. गणपतसिंग सरदारसिंग परदेशी यांच्या वाड्यात राहत असत. हा जवळ जवळ १९१५ चा काळ होता.
संगमनेर येथे वैजनाथ देवांच्या मातोश्री अंबा उर्फ अनुसया सती ह्या शनी मंदिरासमोरील दत्त मंदिरात नियमित प्रदक्षिणा घालत असत. त्यावेळी दत्त मंदिरात मनोहर पुजारी होते. त्यांनी आईला गुरु चरित्र ऐकावयास सांगितले. तेव्हा पोटातील गर्भ वाढीस लागला. नंतर एके दिवशी घरी त्या जमिनीवर झोपल्या असताना गर्भावर नागाची छाया पडली व तिसरे दिवशी म्हणजे श्रावण शु. १! सन १९१६ सोमवार सूर्योदयाचे वेळी ६-00 वाजता वैजनाथ नामक साक्षात जगदात्मा, विश्वचालक शक्ती, लोककल्याणार्थ सगुण रुपाने अवतीर्ण झाली. वैजनाथ देवांना आधी साक्षात्कार होऊन आयोनी संभवच जन्म झाला.
वैजनाथ देवांच्या जन्मानंतर सव्वा महिन्यांनी अंबा उर्फ अनुसया बाई नाशिक पंचवटी येथे आल्या. पंचवटी येथे देवांच्या मातेचे ३ ठिकाणी राहणे झाले. एक तर शनिदेवाजवळ मारवाडी यांचे घरात, नंतर दुसरे सीताबाई सोनार यांचे घरात, व तिसरे ठिकाण काळ्या रामाच्या मागे बापू छत्रे यांच्या वाड्यात राहणे झाले.
कलंकी देवांचे बालपण पंचवटीत झाले व अक्षर ओळख इतकेच म्हणजे प्राथमिक चौथ्या इयत्तेपर्यंत शिक्षण झाले. संगमनेर येथे देवांच्या सुमारे दहाव्या वर्षी शाळेत असताना श्री. दगडू आप्पाजी निऱ्हाळी हे त्यांना गुरुजी होते. वैजनाथ देवांच्या डाव्या डोळ्याच्या खाली मऊ भागात एक पांढरा केस मोठा होत होता. ते पाहून निऱ्हाळी गुरुजी वैजनाथ देवांच्या आईला म्हणाले, “हा मुलगा कोणीतरी सत्पुरुष होईल.” कारण असा पांढरा केस सत्पुरुषाशिवाय कोणासही उगवत नाही व निऱ्हाळी गुरुजी मुलास म्हणाले, “बाळ! पुढे मोठा झाल्यावर आम्हाला ओळखशील काय?” वैजनाथ देव “होय” म्हणाले.
वैजनाथ देवांच्या वयाच्या पंधराव्या वर्षापर्यंत देव आई-वडिलांसह नाशिक पंचवटी येथे राहिले. कलंकी वैजनाथ देवांच्या वयाच्या आठव्या वर्षाची एक घटना – नाशिक पंचवटीत काळ्या रामाच्या देवळात मातेच्या प्रदक्षिणा चालूच होत्या. एके दिवशी काळ्या रामाच्या देवळातील मारुतीच्या सभामंडपात साईबाबा तपस्व्याच्या स्वरूपात तरुण, नखें, केस, दाढी वाढलेली, कृश शरीर, मृगासनावर बसलेले होते. लोकांची गर्दी जमली होती. पुढ्यात मेवा मिठाई भरपूर पडलेली होती. मात्र ते खात नव्हते. मग आई त्यांना म्हणाल्या, “जेवावयास चलावे महाराज!” मग आई बरोबर ते घरी जेवावयास आले. पुढे ते नियमित वैजनाथ देवांच्या मातोश्री बरोबर जेवावयास येत. असे सहा महिने चालले होते. मात्र वास्तव्य काळ्या रामच्या मंदिरातच होते.
सहा महिन्यानंतर एके दिवशी जेवण घेतल्यानंतर साईनाथ पांजरपोळा जवळ दात करीत उभे होते. वैजनाथ व इतर मुले तेथे खेळत खेळत गेली. इतर मुलांना साईनाथांनी हुसकावून दिले व वैजनाथ देवांना मांडीवर घेऊन तोंडा वरून हात फिरवला व म्हणाले, “बेटा! मत घबराओ! मै साईबाबा हू! मुझे दत्त महाराज ने भेजा है! राम अवतारमे हम वसिष्ठ थे! ज्ञानेश्वरके समय मै कबीर था! अब हम साईनाथ है! तुम बडे होणे के बाद दत्त भगवान आयेंगे और तुमको अनुग्रह देकार जायेंगे! तुम माताजी को जाकर कह दो!” नंतर वैजनाथ देव घरी आले व त्यांनी आईला घडलेला वृत्तांत निवेदन केला. इतक्यात साईनाथही वैजनाथ देवांच्या पाठोपाठ घरी आले व अंबा सतीस (आईस) सर्व हकीकत सांगितली व सर्वा समक्ष साईनाथ अदृश्य झाले.
या नंतर दत्त भगवान दोन वेळा प्रत्येक्ष भेटून गेले. एकदा तर संन्यासी स्वरूपात भिक्षेसाठी देवांच्या घरी आले होते. इतर लोक भिक्षा देत असतानाही दत्त भगवंतांनी भिक्षा घेतली नाही. मात्र देवांकडील भिक्षा घेतली. वैजनाथ देव व त्यांच्या मातोश्री यांना पाहून दत्त भगवान गहिवरले. नंतर इतर लोक दत्तांना (संन्याशाला) नावे ठेवू लागली कि, “तुम्ही आमची पवित्र भिक्षा न घेता मराठ्याकडची भिक्षा घेता! असे कसे संन्याशी!” परंतु तिकडे लक्ष न देता दत्त भगवंतांनी हि भिक्षा नाशिकच्या गोदावरीच्या मोठ्या पुलाखालील एका मोठ्या मंदिरात खाल्ली व अदृश्य झाले.
पंचवटीत काळ्या रामाच्या मंदिरात औदुंबर वृक्षाला आई प्रदक्षिणा घालीत असताना एक जन्मांध विष्णू स्वामी संन्याशी दर्शनास येत असत. शिष्य त्यांना दर्शनासाठी आणीत. ते आईला म्हणाले, “जय अनुसया माता!” असे म्हणून नमस्कार करीत. त्यांना आईस दत्तांची भेट झाली हे माहित होते. ते आईस भिक्षेची मदतही फार करीत. तेथे काळ्या रामाच्या ओवरीत द्वारकाबाई नावाची एक विधवा पोक्त गुरुभक्त बाई अनुसया आईस फार मानीत असे. वर्षातून दोन वेळा पुरणाचा सिधा देत असे व सिधा देताना म्हणे, “हे अत्री अनुसयेला अर्पण करीत आहे” व मोठी दक्षिण देत.
काळ्या रामाच्या मंदिरात काकडाच्या निमित्ताने भजनी मंडळ स्त्रिया पुष्कळ जमत असत. ते आईला फार मानीत असत. त्यांना आईस दत्त भेट झाली आहे हे माहित होते. ग. भा. बबई मानकर व अक्का मानकर ह्या शिंप्याच्या बाया व तांबट आळीतील मुकुंदबुवा तेली व त्यांची मंडळी यांचे वैजनाथ देवांच्या आईवर नितांत प्रेम होते. पुढे सन १९३१ साली देवांची धाकटी बहीण शांताबाई तेरा वर्षाची होऊन वारली त्यावेळी वैजनाथ देव पंधरा वर्षाचे होते. या आधी देवांचे मावस भाऊ श्री. गजानन दुध यांच्या मातोश्री यल्लूबाई पंचवटीत वारल्या.
नंतर वैजनाथ देव आई-वडिलांसह शुक्रवार पेठ गवळी आळीत राहावयास आले. तेथे आधी पासूनच आईचे भाऊ मिससिंग वर्ड व बहीण जाणकाबाई राहत होत्या. व सदाशिव पेठेत आईचे भाऊ आण्णासाहेब राहत होते. पुढे तेथे राहत असताना रविवार पेठेत माळी लोकांच्या सोमनाथ मंदिरात अनेक देवतांची मंदिरे आहेत. त्या ठिकाणी देवांच्या मातोश्री अंबासती बरोबर वैजनाथ देव प्रदक्षिणा घालीत होते. वैजनाथ देवांना भावसमाधीचा त्रास होत होता. अन्न जात नव्हते. वैजनाथ देव देहभानावर नव्हते. त्या मंदिरात दत्ताचे पुजारी शंकरराव ब्राम्हण होते. ते पूर्वी रेल्वेत स्टेशन मास्तर होते. परंतु त्यांच्या घरातील सर्व माणसे मृत झाली. त्यामुळे त्यांना शुद्ध वैराग्य निर्माण झाले व ते गुरुचरित्राची ७:७ पारायणे करीत. त्यांची दत्त भक्ती मोठी होती.
असे चालू असताना ब्रह्मचाऱ्याच्या स्वरूपात तरुण, जटाधारी, मृगाजीन इ. सह दत्त भगवान तेथे आले व शंकरराव पुजाऱ्याकडे उतरले. दत्त भगवंतांनी आपली ओळख त्यांना घडू दिली नाही. नंतर देवांच्या प्रदक्षिणा व आईंच्या प्रदक्षिणा चालूच होत्या. त्यावेळी दत्त महाराजांनी वैजनाथ देवांना व मातोश्रीस गुप्तपणे सांगितले की, “मी आलो आहे, हे पुजाऱ्यास व इतरांस सांगू नका.” नंतर दत्त महाराजानी स्वत: गुरुचरित्र वाचन केले. आंबा उर्फ अनुसया मातेने समाप्तीला मोठा सिधा देऊन स्वतः दत्त भगवंताकरवी पुरण पोळयांचा स्वयंपाक करविला व सर्वानी प्रसाद भक्तीभावाने ग्रहण केला. त्या प्रसादास शंकरराव पुजारी पण होते. त्यांना दत्त भगवंतांनी स्वतः बनविल्याले प्रसादाचा दिव्य लाभ झाला. नंतर दत्त भगवान् काही दिवस राहून मातोश्री व वैजनाथ देवांचा निरोप घेऊन अदृश्य झाले. पुजाऱ्यास “जातो” एवढेच सांगीतले. दत्त महाराज गेल्या नंतर त्यांनी पुजा-यास दष्टांत दिला. “अरे! माझी का पूजा करतोस! महाराच्या देवाची पूजा कर. मला तू ओळखले नाहीस.” हा दृष्टान्त पुजाऱ्याने देवांचे मातोश्रीस सांगितला, त्यावेळी त्या पूजाऱ्यास म्हणाल्या, “साक्षात् दत्त भगवान आले होते. तुम्ही त्यांना ओळखले नाही.” हे ऐकताच शंकरराव पुजारी ओक्स-बोक्सी रडू लागले व म्हणाले “मी किती पापी आहे! मला दत भगवान् ओळखू आले नाही.”
पुण्यात देव असतांना शक्रवार पेठ, गवळी आळीत नमस्कार काढावयास शिवराम दादा वस्ताद यांच्या तालमीत वैजनाथ देव जात. त्यावेळी देवांबरोबर गवळयांची बरीच मुले असत. लहानपणीं वैजनाथ देवांच्या काखेत दत्त व मारुती यांच्या लहान मूर्ती पिशवीत घातलेल्या असत. एका विठोबा चौधरी नांवाच्या गवळ्याच्या मुलाने विचारले “वैजनाथ! ह्या पिशव्यांत काय आहे?” वैजनाथ देव म्हणाले, “दत्त व मारुती यांच्या लहान मूर्ती आहेत. तेव्हां अजाणतेने तो विठोबा चौधरी वाईट बोलला. देव व इतर मुले तालमीबाहेर आली.
पुढे हाच विठोबा चौधरी घरीं गोठ्यांत गेला असतां एक रेडा सुटला, व त्याने विठोबाच्या हाताच्या पंजांत शिग खुपसले. हा चमत्कार पाहून बाकी मुले म्हणाली “वैजनाथ ईश्वरी अवतार आहेत.” तेव्हा पासून गवळयाची मुले वैजनाथ देवांना भिऊन वागत. त्रास देत नसत.
पुढे सोमनाथ मंदिरात काही कर्मठ लोकांचा त्रास होऊ लागला. पुढे वैजनाथ देव गवळी आळीतून शुक्रवार पेठ, गाडीखाना, बाळोबा वंजारी यांच्या वाड्यांत राहावयास गेले. आईच्या प्रदक्षिणा गाणी म्हणत म्हणत पुण्याच्या बुधवार पेठ, दगडू हलवाई यांच्या दत्त मंदिरात सुरु झाल्या. तेथे संगमनेरचे बापूराव जोशी पुजारी होते. त्यांनी वैजनाथ देवांच्या आईला ओळखलें, व म्हणाले, “तुम्ही भवानी बापू शिंदे यांच्या मुली ना?”
इकडे वैजनाथ देव बॅ. खाजगीवाले यांच्या रामेश्वराच्या मंदिरांत औदुंबर वृक्षाखाली दत्त पादुकांना प्रदक्षिणा घालींत होते. तेथे एक ओवरी होती. वैजनाथ देवांच्या आई तुळशीबागेत (पुण्यात) जात येत होत्या. एके दिवशी वैजनाथ औदंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालीत असतांना ओवरीत फक्त लांबट कफनी घातलेले दिगंबर जटाधारी, जवळ झोळी अशा अवस्थेत दत्त भगवान पडले होते. वैजनाथ देवांना पाहिल्याबरोबर ते ताडकन् उठले व दत्त भगवंताच्या डोळ्यातून अश्रुधारा सुरु झाल्या. व स्वतःशीच दत्त भगवान् बोलू लागले, “ॐकार स्वरूपा! आपल्याला जी शक्ति पाहिजे ती भेटली.” नंतर रामेश्वर मंदिरांतच मारुतीला वैजनाथ देव प्रदक्षिणा घालू लागले. तेथहि दत्त भगवान् येऊन बसले. इतक्यान दत्तानी टाळी वाजवून वैजनाथ देवाना बोलावून घेतलें, व म्हणाले, “मी पाषाणात नाही. मी आलो आहे असे आईस सांग, मी तीर्थ दिले होते त्याची आठवण आहे काय?” नंतर वैजनाथ देव घरी गेले व त्यांनी आईस दत्त भगवान् आल्याची माहिती दिली. नंतर आई म्हणाल्या, “हे साक्षात् दत भगवान् आहेत बाळ!” नंतर आई घाई घाईने मंदिरांत आल्या. दत्त भगवान म्हणाले, “मला ओळखले काय? मी तीर्थ दिल्याची आठवण आहे काय?” आई “होय” म्हणाल्या “तुमची सेवा चालूच आहे.” तेव्हा दत्त भगवान म्हणाले की, मी मुलाचे (वैजनाथ देवांचे) भविष्य सांगण्यासाठीच आलो आहे. नंतर आईने दत्त भगवंतांना जेवणासाठीं स्वयंपाक केला. नंतर वैजनाथ देव देवळांत आले. नंतर दत्त भगवान् व वैजनाथ देव बोलत बोलत घराकड येऊ लागले. व वाटेत येत असतांना एक गृहस्थ दुकानात बसला होता. तो जगनियंत्या परमेश्वराला वाईट वाईट आईवरून शिव्या देत होता. व म्हणत होता की, “देवाच्या आईला…….. देवांनी माझे काय बरे केले आहे?”
दत्त भगवान् वैजनाथ देवांना म्हणाले, “आपण तर निर्गण, निराकार! हा आपल्याला व आपल्या आईला शिव्या देतो. आपल्याला मूळ आई बाप कोठे आहे? बरे मरतात भडबे.”
असे दत्त भगवान् व वैजनाथ देव बोलत असतांनाच अचानक अदृश्य झाले. वैजनाथ देव घाबरले व घरीं आलें. पाहातात तों भगवान् दत्त महाराज पाटावर बसलेले आहेत. वैजनाथ देवांना मोठा विस्मय वाटला. त्यानंतर दत्त भगवान्, वैजनाथ देव त्यांच्या मातोश्री व वडील हया सर्वांनी मिळून जेवण केले.
जेवणे आटोपल्यावर वैजनाथ देवांच्या मातोश्रीने दत भगवंतांना प्रश्न केला की, माझ्या बहिणीस जानकाबाईस मुलगा होत नाही. तरी आपल्या कृपेने तो व्हावा व तिला भेट द्यावी. दत्त भगवान प्रथम “नाही” म्हणाले. “मागच्या जन्मातील ही कोण होती?” असे दत्तांनी विचारले असतां वैजनाथ देवाच्या मातोश्रींने काहीच उत्तर दिले नाही. तेव्हां दत्त भगवंतांनी आईस सांगितले की “तुमच्या बहीणीस जानकाबाईस इकडे आणा” त्याप्रमाणे जानकाबाई दत्ता समोर आल्या. नंतर कलंकी देवांच्या हातून त्यांच्या ओटीत नारळ घातला व दत्तात्रेय म्हणाले, “आधी मुलगी होईल व नंतर मुलगा होईल.” त्याप्रमाणे जानकाबाईला मंदा व भोलानाथ अशी दोन अपत्ये झाली. अद्यापहि ही मुलें वैजनाथ देवांकडे कार्यक्रमाला येत असतात.
नंतर दत्त भगवंतांनी वैजनाथ देवांचे सर्व भविष्य सांगण्यास सुरवात केली व ते म्हणाले, “विभूती कोठे काम करीत असते काय? विभूतीचा जन्म धर्म कार्यासाठीच आहे. वैजनाथांच्या तोंडून सहा शास्त्र, आठरा पुराणे व चार वेद यांचे सार निघणार आहे. हे लिखाण सर्व प्रकारचे असेल व ते सर्व जगांत प्रसिध्द होईल.” दत्त भगवान् दररोज घरी येत भोजन करीत व संध्याकाळी अदृश्य होत. असे तीन आठवडे चालू होते. या दत्ताच्या वास्तव्यांत एके दिवशीं त्रैमूर्ति झोपले असतांना कलंकी देव दत्तांच अंग दाबीत बसले होते. शेजारी तूप विकणारे लोक राहत होते. त्रैमूर्ति दत्त दिगंबर असल्यामुळे कलंकी वैजनाथ देव पाय दाबतांना ते लोक हासत होते. ते बघून दत्तांनी विचारले, “वैजनाथ! लहान तोंड कां केले?” तेव्हां कलंकी वैजनाथांनी सांगितले की, हे तूप विकणारे लोक तुम्हाला पाहून हंसतात. तेव्हां दत्त भगवान् म्हणाले की,” संध्याकाळ पर्यंत काय घडते ते बघ.” नंतर ते तूप एकाएकी खवट (घाण वास येणारे) काही ग्राहकांना विकलेले आढळून आल्यावर लोकांनी तुप विकणाऱ्यांना बेदम चोपले. नतर ते हिरमुसले होऊन परत आले. नंतर दत्त भगवान् वैजनाथ देवांना म्हणाले. “कलंकी देवा! पाहिलंस कां हे तूपवाले कसे रडत बसले आहेत? माझी कोल्हाटी माया कोणासच समजणार नाही.” दत्त भगवान् नेहमी म्हणत, “मेरा लिखा हुआ किल्ला कभीं नहीं टूट सकता है!”
तीन आठवड्याच्या काळांत विजया दशमीचा सुयोग पाहून संध्याकाळी आई वडिलांसमक्ष त्रैमूत दत्तांनी कलंकी देवांचे डोक्यावर हात ठेवून अनुग्रह दिला. त्यावेळी मस्तकांत ज्योत गेली. हें आई वडिलांनी समक्ष पाहिले. दत्त महाराज एकच मुखीं, अंगात लांब कफणी व शरीर भयंकर तेजपुंज दिव्य असे होते.
अनुग्रह झाल्यानंतर भोजन करीत असतांना दत्तांनी वैजनाथ देवांच्या पायाच्या नखापासून तों डोक्याच्या केसापर्यंत न्हाहाळून पाहिलें, व म्हणाले, “आता माझे काम झाले आहे.” त्रैमूर्ति दत्तांनी जे भविष्य सांगितले त्याप्रमाणे पुढे सर्व घडणारच होते. याच वेळी आई वडिलांनी दत्तांना विचारले, “आम्ही अमर होऊ काय?”, दत्त भगवान म्हणाले, “जग रहाटीप्रमाणे तुमचा देह पडणारच! कलंकी देवांना मात्र त्यांच्या पद्धतीप्रमाणे म्हणजेच अदृश्य करून नेणार!” नंतर त्रैमूर्ति दत्त दोन तीन दिवसांनी जावयास निघाले व जातांना वैजनाथ देवांना म्हणाले, “ चिरंजीव हो ” असा त्रिवार आशीर्वाद दिला. हि घटना सन १९३६ साली झाली.
वैजनाथ देवांच्या आई वडिलांना त्रैमूर्ति दत्तात्रय म्हणाले, “जगात विभूती अनेक असतात व आहेत. त्यात पूर्ण परब्रम्ह अवतार, परमात्मा विभूती एकच असते. बाकीच्या विभूति अंशात्मे, उत्तम वस्तु माझ्याच आहेत. शिर्डीचे साईबाबा, शेगांवचे गजानन महाराज, नगरचे मेहरबाबा, साकुरीचे उपासनीबाबा, साताऱ्या जवळील माहुलीचे कृष्णधाम येथील कृष्ण महाराज गोगटे, रामदासी पुरुष, पूर्ण प्रज्ञ ब।ब।जान, संत गाडगेबाबा, अक्कलकोट स्वामी, वज्रेश्वरीचे नित्यानंद महाराज, केडगावचे नारायण महाराज, संत गंगागीर बाबा इ. अनेक माझे अंशात्मे आहेत. आता मी पूर्ण परब्रम्ह कलंकी अवतारें नटलों आहे.”
या आधी एके दिवशीं दत्त भगवान् आले व लगेच सर्वासमक्ष अदृश्य झाले. त्यांनी वैजनाथ देवांना अणुरेणु पासून आपले स्वरुप दाखविले. प्रथम त्यांनी अर्धा इंच केसाच्या धाग्याएवढे रुप दाखविले व पुढे क्रमाक्रमानें आपलें स्वरुप मोठे मोठे करीत मोठया माणसाइतके सुमारे सहाफुट उंच बनविले, “हीच स्थिति पुढे तुम्हास प्राप्त होईल.” असे दतांनी सांगितले. तसेच ‘‘आपापल्या कामाला लागा, बाहेर पडा. मला (वैजनाथ देवांना उद्देशून) पुढे फार काम आहे. ” त्याचप्रमाणे आई-वडिलांकडे पाहून म्हणाले, “माझे आई वडिलांचा देह वाई येथे पडला. त्यांच्या समाधीच्या दर्शनाला मी रोज जात असतो. याचा अर्थ असा की, अहंब्रह्मास्मि या नात्याने कलंकी देवांचे आई वडिल व माझे आई वडिल एकच आहेत. व वैजनाथ व मी एकच आहे. असो. आणि एवढे हि सांगितले की, “या युगात तुमचे आमचे नाते बदलले आहे. आतां परब्रम्ह तुमचा मुलगा (वैजनाथ देव) झाला आहे.
पुढे धर्म कार्यासाठी स्वतः कलंकी वैजनाथ देव, मातोश्री, वडील व चुलता-चुलती हया पांच मूर्ति पुण्याहून बाहेर पडल्या. पुण्यात रहात असतांना चुलता व वडिल यांची रोज़ ब्राम्हणांकडे भिक्षा चालू होती. ते मधुकरी आणीत व त्यावरच त्या पांच विभूतींचा चरितार्थ चाले. पुण्याबाहेरही प्रवासात भिक्षाच चालू होती. रोज १०:१२ मैल प्रवास होत होता. पुढे वैजनाथ देव पुण्याहन भोर येथे आले. भोर येथे मारुतीच्या देवळांत सात दिवस वास्तव्य झाले. तेथून पुढे देव मांढरदेवी काळुबाई डोंगरावर आले. तेथे दोन दिवस राहून खिंडीतून वाई येथे गेले व कृष्णा-काठी असलेल्या रास्ते यांच्या हरेश्वराच्या देवळांत राहू लागले.
मागे दत्त भगवंतांनी जाण्याआधी सांगितले होते की, “वाटेत तुम्हाला सिद्ध पुरुषांच्या भेटी होतील.” त्याप्रमाणे हरेश्वराच्या मंदिरांत आई वडिल सिद्ध पुरुषाबाबत विचार करीत होते. तोच दोन तीन दिवसांत तरूण स्वरुपांत हातात चिमटा घतलेले, कान फाडलेले, काखेत लहान झोळी, अंगावर कफणी, कानांत नाथांची मोठी कुंडले अशा स्वरुपांत गोरक्षनाथ तेथे आले. ते वैजनाथ देवांच्या मातोश्रीना मंदिराकडे बोट करून म्हणाले, “यह क्या है? ” मातोश्रोने उत्तर दिले, “हे हरेश्वराचे मंदिर आहे. ” तेव्हां गोरक्षनाथ सिद्ध म्हणाले “यह तो फत्तर है! हम भगवान है?” नतर गोरक्षांनी वैजनाथ देवांच्या चुलत्यांना सांगितले की, “कलंकी देवांना बोलावून आणा” त्यावेळी कलंकी वैजनाथ देव कृष्णेच्या पुलावर बसले होते. चुलता आल्यानंतर कलंकी वैजनाथ देव गोरक्षनाथांकडे आले. नंतर गोरक्षनाथांनी वैजनाथ देवांना कडकडून आलिंगन दिले. व आईना म्हणाले, “तुम्हाला दत्त भगवान् म्हणाले होते ना कीं, सिद्ध पुरुषांच्या भेटी होतील. तर मी गोरक्ष आहे.” त्या दिवशीं आईला मंगळवार, उपवास होता. गोरक्षनाथ म्हणाले, “माताजी! तुमको मंगलवार (उपवास) है?” नंतर त्या सिद्ध पुरुषाने आपल्या जवळील रिकामी झोळी पालथी केली. तोंच काय आश्चर्य! त्यातून एक आठवाभर शेंगदाणे व आठवाभर तूर डाळ बाहेर पडली. व गोरक्षनाथ म्हणाले, “माताजी पकाव.”
नंतर आईने स्वयंपाक केला. त्यावेळी गोरक्षनाथ सिद्ध व कलंकी वैजनाथ देव एकत्र एका ताटांत जेवले. गोरक्षनाथ जाताना म्हणाले, “माताजी बारा बरसके बाद तुम यही ठिकाणपर वापस आओगे! “कलंकी वैजनाथ देवांना असेहि म्हणाले, दवा खाते जाव!” याचा अर्थ असा कीं, वैजनाथ देवांवर विष प्रयोग होतील. शरीर कृश होईल. त्यातून बचावण्यासाठी वरचेवर दवापाणी घ्यावा लागेल. नंतर गोरक्षनाथ चिमटा वर करून समक्ष अदृश्य झाले व त्यावेळी म्हणाले, “तुम चलो! हम तुम्हारे साथ हैं!”
त्यानंतर देव साता-यास आले. तेथे एका मुन्सी हवालदाराची ओळख झाली. पुण्याच्या गवळयांच्या ओळखीने त्यांच्याकडे पांच सात दिवस राहून पुढे वैजनाथ देव उंब्रज चाफळला गेले. चाफळ येथे रामदास स्वामींच्या मठात उतरले. चाफळला रामी रामदास (रामदास स्वामींचे भाऊ) व स्वामी रामदास यांचे दोन अलग मठ आहेत. त्यावेळी रामदास स्वामींच्या गादीवर बापुसाहेब होते. तेथील लोकांनी त्यांची खूप चांगली व्यवस्था ठेवली. बापुसाहेब प्रभूती लोक म्हणाले, “या सज्जन गडावर हा तरुण मुलगा (वैजनाथ देव) कायम राहिला तर काय हरकत आहे?” आईने सांगितले कि ह्या मुलावर (वैजनाथ देवांवर) दत्तांचा अनुग्रह आहे. ही स्वतंत्र गादी आहे. अवतार कार्य आहे. आम्हाला कोणत्याही गादीवर राहता येत नाही. तेथून निघण्याचे दिवशी मठाधिकाऱ्यांनी त्या पांच मूर्तींना दुधारसाचे भोजन दिले व दक्षिणा दिली, व आमच्यावर कृपा असू द्यावी अशी विनंती केली.
पुढे देव कऱ्हाडला गेले. तेथे कृष्ण व कोयना संगमावर स्नाने केली व कोल्हापूरकडे निघाले. तेथे गेल्यावर देवांजवळ काहीही नव्हते. मग ते आई, वडील, चुलता, चुलती यांचेसह महालक्ष्मीच्या मंदिरात गेले. त्यावेळी वैजनाथ देवांच्या आई महालक्ष्मीला म्हणाल्या, “लक्ष्मीबाई! आमच्या दत्तांना लवकर भेटावयास सांग, नाहीतर बघ!” नंतर ते तेथून माघे परतले. जवळ दोन आणे होते. त्यापैकी सहा पैशांचे आठवभर तांदूळ घेतले. लाखेचें पीठ घेतले व कोल्हापूर पासून चार मैल दूर येऊन रानात एका गोठ्यात मराठ्यांकडे राहण्यास जागा मागितली. त्यांनी राहण्यास जागा दिली. नंतर तेथे मातोश्रीने तांदूळ शिजवले, पिठले बनविले. त्याच वेळी डोक्याला फडके बांधलेले, हातात दंडा घेतलेले, दुसऱ्या हातात छत्री घेतलेल्या वृद्ध स्वरूपात दत्त भगवान जंगलातून पळत आले. गोठ्यातील शेतकरी म्हशीचे दूध काढीत होते. दत्तानी त्यांचे जवळ दूध मागितले. ते शेतकरी म्हणाले, “हे गोसवड्या! येथे रानात कशाला आला? कोल्हापूरला जा.” आईने त्यांना ओळखले. नंतर दत्त भगवान जवळ आले. त्यांनी सर्वांच्या तोंडावरून हात फिरवला. दत्त महाराज म्हणाले, “तुम्ही खूप थकलात!” नंतर दत्त भगवान व त्या पांच मूर्ती यांचे एकत्र भोजन झाले. दत्त महाराजांनी आपल्या ताटातला प्रसाद सर्वांचे हातावर दिला. त्यावेळी आकाशात ढग वैगरे काहीही नव्हते. नंतर दत्त भगवंतांनी मायाने ढग निर्माण केले व खूप पर्जन्यवृष्टी केली. तेव्हा गोठ्यातील शेतकरी निघून गेले. दत्त महाराजांनी ह्या पांच मूर्तींवर छत्री धरली व बोलू लागले, “केडगावचे नारायण महाराज यांचा बंगलोरला देह पडणार आहे. तुम्ही आता पायी यात्रा चालू ठेवा. गाणनापुरला जा. आम्ही आहोतच!” असे म्हणून सकाळीच अदृश्य झाले.
मिरजेहून पंढरपूरला जाण्यास रस्ता आहे. वैजनाथ देव आई, वडील, चुलता, चुलती यांचेसह चार पांच दिवस थांबले. पुढे सोलापूर, अक्कलकोट मार्गे गाणगापूरला आले. गाणगापूरला भीमा अमरजा संगम पाहून, सात दिवस थांबून देव परत अक्कलकोटला आले. तेथे स्वामीच्या मठात उतरले.
त्या ठिकाणी अक्कलकोट स्वामींचा देह पडला होता. मठात असताना सावित्रीबाई खोत किर्तनकार ह्या स्वामींच्या दर्शनासाठी आल्या, त्यांच्या बरोबर त्यांची मुलगी वत्सलाबाई ही पण होती. त्यांनी आई वडिलांचे व मुलाचे (वैजनाथ देवांचे) तेज पाहून विचारले, “आपण कोण? कोठून आलात?” तेव्हां आई वडिलांनी सांगितले, “हे अवतार आहेत. दत्तांची कृपा आहे.” त्यावेळी खोत बाई म्हणाल्या की, “आमच्या बेळगांवला चला, आम्ही वैजनाथ देवांना सांभाळू” आई वडिल म्हणाले, “हे दत्त भगवंताचे अवतार कार्य आहे. आम्हास यावयास जमणार नाही.” याच सुमारास लिखाण लिहण्यास सुरवात झाली होती.
तेथून ही मंडळी सोलापूर येथे आली होती. कलंकी देव धोंडिबा शिंपी तुळजापूर वेस, सोलापूर येथील वाड्यात काही दिवस राहिले. नंतर वैजनाथ देव पंढरपुरास आले. लगेंच मिरज सांगली मार्गे सांगलीस आले.
सांगलीहून ब्रम्हनाळ येथे आनंदमूर्ती या सत्पुरुषाची समाधि पाहून क्षेत्र औदूंबरास आले. तेथे सात दिवस राहून सांगलीहून साता-याकडे निघाले.
त्यांचा सर्व प्रवास पायींच असे. तेथे शेख मुन्सी हवालदार यांचेकडे परत उतरले. त्यांनीं मुसलमान असूनहि वैजनाथ देवांचा अनुग्रह घेतला व मुंबईहून दत्तात्रेयांचा मोठा फोटो आणून वैजनाथ देवांना अर्पण केला. तो फोटो आजही कलंकी आश्रमांत पाहावयास मिळतो.
कलंकी वैजनाथ देवांच्या चुलती जनाबाई गांवात भिक्षेसाठी जात असत. तेव्हा एके दिवशी भिक्षेस गेल्या असतांना पोलीस सब् इन्स्पेक्टर श्री. सदाशीव गोविंदराव गायकवाड यांच्या घरी अचानक गेल्या. त्यांच्या आईने जनाबाईस भिक्षा वाढली व विचारपूस केली, “आम्ही पांचजण आहोत. आमचा मुलगा अवतारी आहे. त्यांना दत्तांचा अनुग्रह झालेला आहे.” हे ऐकून गायकवाड फौजदारांच्या आई म्हणाल्या, “आम्हाला तुमच्या मुलाच्या दर्शनासाठी न्या.” नंतर एके दिवशी गायकवाड फौजदारांच्या मातोश्री व सूनबाई वैजनाथ देवांच्या दर्शनास आल्या. त्यांनी एक शेर पेढे व हार आणला होता. शेख मुन्सी हवालदार यांचा विडीचा छोटा कारखाना होता. तेथे कलंकी वैजनाथ देव बसले होते. याच ठिकाणी ह्या दोन्ही स्त्रिया दर्शनास आल्या. काही पोलीस लोकही तेथे बसलेले होते. त्यांनी फौजदाराच्या आईस ओळखले. त्यावेळी मोठा चमत्कार झाला. वैजनाथ देवांचे जवळ दत्त व मारुती उभे असलेले त्या बाईस (फौजदाराच्या आईस) दिसले. त्या मोठ्याने म्हणाल्या, “वैजनाथ देवांच्या जवळ दत्त व मारुती साक्षात उभे आहेत.” हे ऐकताच पोलिसाना आश्चर्य वाटले व ते म्हणाले कि, “आईसाहेब! ते आम्हाला दिसत नाही.” फौजदाराच्या मातणे त्यांना उत्तर दिले, “तुमची दिव्य दृष्टी झालेली नाही.” पुढे काही दिवस त्या नियमित दर्शनास येऊ लागल्या.
एके दिवशी त्या म्हणाल्या, “माझी मानलेली मुलगी मंगळवार पेठेत राहते. तेथे वैजनाथ देवांच्या राहण्याची सोय करू.” नंतर तेथे जावयाचे ठरले. जाण्याच्या आदल्या दिवशी गायकवाड फौजदाराकडे जेवण झाले व त्यांच्या मुलास अनुग्रह द्यावयास लावला. हा मुलगा आईच्या आज्ञेत वागत असे.
वैजनाथ देव विठ्ठलदास गोकुळदास गुजर सातारा, मंगळवार पेठ, काळ्या रामाच्य मागे बगीच्यात राहत होते. त्याठिकाणी चार खोल्या होत्या. सर्व प्रकारची सोय होती. तेथे देवांच्या चुलती दररोज भिक्षेसाठी जात. वडील व चुलते ब्राह्मणांकडे मधुकरीसाठी जात. सातारच्या गावात बरीच प्रसिद्धी झाल्याने बरेच लोक दर्शनास येऊ लागले. पुष्कळ लोकांना बरे वाईट अनुभव आले. रात्री वैजनाथ देवांच्या आरतीसाठी अनेक भाविक स्त्री पुरुष जमत.
सातार येथे विकल्पामुळे काही अज्ञान व कर्मठ लोकांकडून देवांचा बराच छळ झाला. देवांना दृष्ट लोकांकडून चार वेळा विष प्रयोगही झाले. विश्वनाथ जंगम हा भिक्षा मागून जगणारा लिंगायत स्वामि! हा सर्प धरीत असे. तो वैजनाथ देवांकडे नेहेमी येत असे. मात्र त्याची भावना दृष्ट होती. एके दिवशी त्याने भला मोठा सर्प पकडून आणला व हळूच देवांचे खोलीत सोडला. देव त्यावेळी झोपलेले होते. जंगमने शंख वाजवून म्हंटले, “तुमची आमची शेवटची भेट!” व निघून गेला. सकाळी कलंकी देव उठले तो मागे भिंतीवर उभ्या काठीप्रमाणे तो सर्प रात्रभर उभा चिटकून राहिलेला! तो सर्प खाली उतारलाच नाही. नंतर घरवाल्याच्या मुलाने तो सर्प पकडून मारला. त्या पासून वैजनाथ देवांना कसल्याच प्रकारची इजा झाली नाहीं. हे मोठं आश्चर्य होय. पुढे घटना अशी झाली की, विश्वनाथ जंगम सर्प धरण्यास गेला असता त्याच्या हातास सर्पदंश झाला. त्याला सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. पंधरा, वीस इंजक्शने दिली. हात खूप सुजला होता. मोठया प्रयासाने तो जंगम सर्प दंशांतून बचावला. त्याला पुढे झाल्या गोष्टींचा पश्चाताप झाला व तो म्हणाला, “माझ्या कडून फार मोठी चूक झाली होती. मला माफ करा.”
मागे ज्याचा उल्लेख आला ते गायफाड फौजदार कोरेगाव येथे राधाबाई जिजाबा बर्गे यांच्या वाड्यात राहात होते. पुढे बदलून साताऱ्यास आले. तेव्हा राधाबाई बर्गे यांना वैजनाथ देवाबद्दल समजले व त्यांना वैजनाथ देवांच्या दर्शनाची उत्कंठा लागली. त्यापण महिन्यातून एक वेळ (वारी) दर्शनास येऊ लागल्या. गायकवाड फौजदारांच्या मातोश्री मात्र दररोज दर्शनास येत. त्याचप्रमाण चिंगुबाईं महादेवराव कासार, अनुसयाबाई सासवडे, वाईकर, तांबटीन आई, तान्हुबाई ढोर इ. अनेक भक्त दर्शनास येत. तान्हुबाई ढोर या तर दररोज मोळी विकून देवांना पैसे आणून देत.
पुढे १९४२ मध्ये दुसरे महायुद्ध चालू होते. भारतांत गांधीची चळवळ सुरु झाली. अनेक देशभक्त भूमिगत झाले. अशावेळी अनेक मिलिटरीतील अधिकारी व भूमिगत लोक देवांकडे येऊन गेले. कॅप्टन भाऊसाहेब तुकाराम शिंदे राधाबाई राऊत बर्गे यांचा भाचा सुभेदार महाडीक, शिलेदार नारायण भोईटे (हा युद्धात लंगड़ा झाला होता) हा तर हेरगिरीने देवांकडे आला होता. त्यांनी वर वर गोड गोड थापा मारुन पेढ्यातून विषप्रयोग केला होता. वैजनाथ देवांच्या चुलत्यांनाहि चहातून विषप्रयोग झाला. त्यामुळे रक्तस्राव होऊन त्यातच चुलत्यांचा अंत झाला.
या आधी उमाबाई सदाशीव पारेकर या सालसबाई देवांचे दर्शनास येत होत्या. त्यांना कृष्ण महाराज गोगटे हे सत्पुरुष तरुणपणी भेटले होते, त्या कृष्ण महाराज गोगटे यांचेकडे जात येत असत. कृष्ण महाराज म्हणाले, “आईसाहेब! कलंकी अवतार वैजनाथ नामाने पंचवटीत गरीब ब्राम्हणांच्या घरी जन्मास आलेले आहेत. ते मोठे झाल्यावर इकडे येतील. त्यांना तुम्ही ओळखाल काय?” उमाबाई होय म्हणाल्या. त्याप्रमाणे उमाबाईला वृद्धपणीं वैजनाथ देवांची भेट झाली. वैजनाथ देवांना बघून त्या रडू लागल्या, त्यावेळी देवांच्या आरतीसाठी शेकडो स्त्री पुरुष जमत असत.
नारायण भोईडे (लंगडा) सुभेदार याने जेव्हा वैजनाथ देवावर विषप्रयोग केला तेव्हा देवांना कोरेगाव जवळ सासुरणे येथे नेले. तेथे एक म्हातारी विष पाडीत असे. दर शनिवारी शेकडो लोक या कामी तेथे जमत. त्या बाईने वैजनाथ देवांना ओळखले व पैसेहि न घेता तिने त्यांचे ते विष पाडले व विष बाधेतून वैजनाथ देवांना वाचविले. नंतर राधाबाई जिजाबा बर्गे यांनी सर्व भक्तांसह वैजनाथ देवांना साताऱ्यास पोहोचविले. विष प्रयोगाच्या दुर्घटनेमुळे आई वडील भंयकर दुखी झाले होते. पुढे हाच नारायण भोईडे (लंगडा) भूमिगत लोकांकडून ठार मारला गेला. त्याच्या दुष्कृत्याचा त्याला अशा प्रकारे परिणाम भोगावा लागला.
त्यावेळी सोनुबाई मारुती पास्टे (आजी) हया उमाबाई पारेकर यांच्या ओळखीने येत होत्या. नंतर त्यांनीच (आजीने) सेवेचा पक्का पाया घातला.
सोनुबाई आजींच्या समक्ष वैजनाथ देवांना तीन वेळा असेच विषप्रयोग झाले. त्यावेळी त्यांच्या समोर रामकृष्ण कोंडो पेंडारकर उर्फ धावडशीकर डॉक्टर राहत होते. त्यांना आजीने आणले व त्यांनी तीन वर्षे देवांना औषध मोफत दिले व या संकटातून सोडविले. हे डॉक्टर आयुर्वेदिक औषधें वापरीत. ते मोठे दत्त भक्त होते.
पुढे सोनुबाई मारुती पास्टे व त्यांचे मालक मारुती पोस्ट यांना दृष्टांत होऊन त्यांनी आपली आंबू नांवाची मुलगी वैजनाथ देवांना दिली. ती अंशात्मक होती. ही घटना १९४३ साली घडली. ही आंबू मुलगी लग्नात तेरा वर्षाची होती. तिला वैजनाथ देवांना होत असलेला छळ बघवेना. काही समाज कंटकांनी लग्नात अडथळे आणले. पण मुलगी खंबीर होती.
एके दिवशी ती आंबू आपल्या धाकट्या बहिणीला म्हणाली, “मी आठ दिवसांनी जाणार आहे.” आणि विशेष म्हणजे आठव्या दिवशी- लग्नानंतर फक्त सहा महिन्यांतच त्या इहलोक सोडून गेल्या.
मृत्युच्या आधी आंबुने आपल्या आईला सोनाबाईस सांगितले, “वैजनाथ देवांना सोडू नकोस” तिचा तो शब्द शिरसावंद्य मानून सोनाबाईने घरावर तुळसीपत्र ठेवले व वैजनाथ देवांबरोबर राहून एकतीस वर्षे निस्सीम सेवा केली. ह्याच सोनाबाईनी वयाच्या पंच्याण्णवाव्या वर्षी संगमनेर येथे देह ठेवला. तसेच देवाच्या चुलती जनाबाई यांनी १९४५ साली परम भक्ता सोनाबाई (आजी) यांचे घरी देह ठेवला.
गायकवाड फौजदाराच्या मातोश्री गोदावरीबाई बदली झाल्यामळे वैजनाथ देवांना निदिध्यास घेऊन शेवटी एके दिवशी पंचतत्वात विलीन झाल्या. त्याचप्रमाने राधाबाई जीजोबा बर्गे, उमाबाई पारेकार ह्यांनीही वैजनाथ देवांचा ध्यास घेऊन देह ठेवले.
साताऱ्यात सात, आठ वर्ष राहुन वैजनाथ देव, आई वडील व परमभक्त सोनाबाई (आजी) यांचेसह कोरेगावास झाले व तेथे अपिले भक्त भाऊसाहेब जीजाबा बर्गे डेप्युटी यांच्या वाड्यात दोन वर्ष राहिले. वैजनाथ देवाना कोरेगांवात कसल्याच प्रकारचा बाह्य उपद्रव झाला नाही. मात्र वैजनाथ भिक्षेवर उपजीविका करीत.
नंतर तेथेच वैजनाथ देवांचे आई वडिल आजारी पडले. कोरेगाहून त्यांचे वाईस जाण्याचे ठरले. त्याप्रमाणे कोरेगांवातील सर्व भक्तांचा निरोप घेऊन वैजनाथ देव आई वडिलांसह व सोनाबाई आजी सह वाई येथे हरेश्वराच्या मंदिरति येऊन उतरले. “बारा वर्षांनी परत याच जागी याल” असे गोरक्षनाथ सांगून गेले होते. त्यांच्या भविष्यवाणीप्रमाणे प्रत्यक्षात घडून आले व वैजनाथ हरिहरेश्वराच्या मंदिरात जवळ जवळ पाच महिने होते. त्यांच्या आई-वडिलांचा आजार वाढत गेला. लोक अवतारी पुरुष म्हणून दर्शनास येऊ लागले. नंतर सन १९४८ मार्गशीर्ष शुद्ध ।।५।। सकाळी आंबा उर्फ अनुसया आई सती (वैजनाथ देवांच्या आई) दत्त स्वरूपी विलीन झाल्या. मातेचा देह पडताना त्यांना साक्षात योगिनी आलेल्या दिसल्या. वडील अंथरुणावर पडून होते. मातेच्या निर्याणाचे वेळी त्या सोनाबाई आजीस म्हणाल्या, “हे बाळ तुमच्या पदरात घालते. यास चांगल्या प्रकारे जतन करा.” सोनाबाई आजीने वैजनाथ देवांना चांगल्याप्रकारे प्रकारे संभाळण्याची हमी दिली होती.
वैजनाथ देवांच्या आईचे निर्याण झाले त्या दिवशी वाईच्या भक्तांनी वर्गणी काढली व शंकरराव कळेकर सोनार, पंडित माधवराव इ. लोकांनी साताऱ्याहून खास बोलावून घेतले. ही सर्व मंडळी जमा झाली व त्यांनी वैजनाथ देवांच्या मातेच्या पार्थिव देहाची वाजत गाजत बोळवण केली. झिमझिम पाऊस येत होता. शेकडो लोक कृष्णा नदीच्या पुलावर हा अपूर्व परंतु दुःखद सोहळा पाहण्यासाठी जमा झाले होते. आई निवर्तल्यानंतर दुसऱ्या दिवशी लोक स्मशानात गेले. त्यावेळी मातेची ओटी व गळ्यातील पोत या वस्तू जशाच्या तशा निघाल्या त्या जळाल्या नाही हीच खरी सतीच्या जिवनाची कसोटी असते.
वैजनाथ देवांच्या मातेच्या अंत्यविधि नंतर गरुचरित्राचा पाठ सुरु केला. नागेश्वर भटजी गुरुचरित्र वाचीत होते व ते वैजनाथ देवांकडेच जेवण करीत असे.
पुढे दत्तजयंति आली. त्या दिवशीं वैजनाथ देवांच्या आरतीसाठी २००-३०० लोक जमा झाले होते. सोनाबाई (आजी) देवांच्या आरती करीत होत्या. तोंच काय चमत्कार! वैजनाथ देवांच्या आई अनुसया सती प्रगट झाल्या. त्यांनी आगळेच तेजःपुंज रुप धारण केले होते. हातांत राजवर्खी बांगड्या होत्या. त्या आरती होईपर्यंत वैजनाथ देवांजवळ उभ्या होत्या. नंतर एकदम् अदृश्य झाल्या. लोक म्हणू लागले. “ही कोण बाई! येथे कशी अदृश्य झाली? ” सोनाबाई आजीने त्या जमलेल्या लोकांना सांगितले की, त्या साक्षात् सती अनुसया होत्या. या घटनेचे लोकांना मोठे आश्चर्य वाटले. त्या दिवशी रात्रीं फिडलवादन झालें. रात्रीं भक्त मंडळी तेथेच बसलेली होती. त्यात गणपतसिंग यशवंतसिंग परदेशी हि त्यांच्या सहका-यांसह उपस्थित होते. तोच वैजनाथ देवांचे वडिल निवर्तले. तेथे बसलेली भक्त मंडळी व गांवांतील लोक यांना हां हां म्हणतां बातमी समजली. लोक चिंतातूर झाले. रात्रीचा समय होता. तेव्हां गणपतसिंग वैजनाथ देवांना म्हणाले. “थोडे थांबा” वैजनाथ देवांनी दत्त भगवंतांना विनंती केली कीं, आज तुमची जयंती आहे. हेच आई वडिल मागील जन्मीं तुमचेहि माता-पिता होते. तरी मातेचा तेरावा होऊ द्या. नंतर वडिलांना न्या. असे म्हणून वैजनाथ देवांनी वडिलांचे कान फुकून त्यांना तीर्थ पाजले. तो काय चमत्कार! थोडयांच वेळांत वैजनाथ देवांचे वडिल पूर्ववत् उठून बसले. लोक आश्चर्यचकित झाले. नंतर मातेचा तेरावा करण्यांत आला. खूप मदत मिळाली. पुरणपोळ्यांची जेवणे झाली. गांवांतील सुवासिनींना कुंकू व दूध देण्यात आले.
मात्र चौदाव्या दिवशीं वैजनाथ देवांचे वडिल निवर्तले. दत्त भगवंतांनी जणू काय वैजनाथ देवांचे म्हणणे मान्य केले व इह लोकाची मुदत दोन तीन दिवसांनी वाढवून दिली. त्यांचीहि व्यवस्था (अंत्यविधी इ.) यथासांग करण्यांत आली. गावांतील भक्त लोक वैजनाथ देवांच्या माता पितरांची मासिक जेवणे घालू लागले. वैजनाथ देवांनीं आई वडिलांच्या अस्थि जपून ठेवल्या होत्या. श्री. गणपतसिंग माधवसिंग परदेशी यांनी आई वडिलांच्या समाधीसाठी वाई येथे बावधन रस्त्यावर शेतांत स्वमालकीची जागा दिली. याबाबत सरकारी स्टॅप करण्यात आला. वर्षश्राद्ध होईर्यंपतं लोकांनी वर्गणी काढून वैजनाथ देवांच्या मातापित्याची एकच शेजारी शेजारी समाधी बांधविली.
वर्षश्राद्धा दिवशी अस्थींची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. ढोल, लेझीम, डफ वाजवित मिरवणूक समाधीजवळ आली. अस्थीं समाधीत घालून वर चार पादुका व नंदी, पिंड बसविण्यात आली. सर्व भक्तगणांनी सहभोजन केले अशाप्रकारे ही समाधी वाई येथे पाव्ह्यास मिळ्ते. वैजनाथ देवांचे भक्त या समाधीच्या दर्शनास जातात.
पुढे वाई येथील सीताबाई कढणे सोनार, चिंचकर बाई तेली, अभ्यंकर गुरुजी, गजानन शंकर पिंजरे यांच्या वाड्यात असे अनेक ठिकाणी देवांचे राहणे झाले. समाज कंटकांचा त्रास वाढल्यामुळे व सोनाबाई आजीस विष प्रयोग झाल्यामुळे वैजनाथ देव वाई सोडून संगमनेर येथे सन १९४९ चे सुमारास आले.
साताऱ्यास असताना आजीकडे रेवननाथांची भेट झाली होती व मत्स्येंद्रनाथ भेटून गेले.
संगमनेर येथे असल्यावर सळीवाड्यात लहानू बनाजी यांच्याकडे प्रथम आले. त्यावेळेस श्री. गणपतीसिंग सरदारसिंग परदेशी यांची भेट झाली. यांच्यात वाड्यात वैजनाथ देवांचे आई-वडील राहत असत व देवांचा जन्म झाला होता. बऱ्याच वर्षांनी भेट झाली तरी देखील गणपतीसिंगने वैजनाथ देवांना ओळखले त्यांना आश्चर्य वाटले व आनंदही झाला. नंतर वैजनाथ देव श्री. माधवराव शिंगारे यांच्याकडे राहू लागले. येथे असतानाच सोनाबाई आजीच्या विष प्रयोगाचा त्रास पाटील डॉक्टरांकडूनु औषधे घेऊन नाहीसा झाला. याकामी लोकांनी बरीच वर्गणी दिली होती. वैजनाथ देव संगमनेरला आले असे् समजताच बरेच लोक दर्शनासाठी येऊ लागले. भावसमाध्या चालू होत्या. भावसमाधीचा प्रकार संगमनेर येथे भक्तांना पहावयास मिळाला. भावसमाधी साताऱ्याहून सुरू झाली. आरती चालू असताना वैजनाथ देवांची शुद्ध हरपली जाई. त्यांना समाधी लागे व समाधी अवस्थेत दत्तात्रय म्हणे असे अभंग निघत. जवळ जवळ आर्ध्या तासा नंतर त्यांची समाधी उतरली जात. असे दररोज होई. येथे वैजनाथ देव चार महिने राहिले. पुढे भक्तांनी त्यांना वेल्हाळे येथे नेले.
त्या गावी बजाबा पाटील व निवृत्ती वाल्हेकर आजचे देवाचे परम सेवक यांनी वैजनाथ देवांना सांभाळून घेतले. नंतर वैजनाथ देवांचे कासारवाडी येथे गाडे पहिलवान यांच्या मळ्यात जाणे झाले. तेथे रेसिडेंट मॅजिस्ट्रेट श्री. रामभाऊ वाघमारे गाडे पहिलवान नित्य येत. त्यांच्या परिचयाने इतर भक्तही येऊ लागले. येथे मेहेरबाबा, साईबाबा मंडळांतील काही लोक येऊन गेले. संत तुकडोजी महाराजांच्या शिष्यांची भजने देखील झाली. येथे असतांना काहीं सुशिक्षित समाज कंटकांनी वैजनाथ देवांची परीक्षा पाहाण्यास सुरवात केली. त्यामुळे त्याचा छळ होऊ लागला.
नंतर तेथून वैजनाथ देव राजापूर येथे किसनराव हासे यांच्या मळयांत दोन चार महिने राहिले. पुढे वडगांव लांडगा येथे राहावयास गेले.
समाज कंटकांच्या त्रासामुळे आजी व वैजनाथ देव यांची ताटातूट झाली. पुढे किसनराव हासे यांच्या मळयांत आजी येऊन राहिल्या. पुढे त्यांना वाटले की, आई वडिलांच्या समाधीच्या दर्शनास वाईस जावे. त्याप्रमाणे वैजनाथ देव, आजी व गजानन शंकर गिजरे यांचा विजय नांवाचा मुलगा इ. वाईस जाण्यास निघाले. वैजनाथ देव पुण्यांत गेले. तेव्हा काही दृष्ट लोकांनी त्यांचा गुप्त पिच्छा केला व ते वैजनाथ देवांबरोबर वाईस उतरले. तोंच स्टॅडवर काय चमत्कार! पिच्छा करणा-या दृष्ट लोकांनी व एस. टी. मधील काही दृष्ट कर्मचा-यांनी वैजनाथ देवांना काठ्यांनी खूप झोडपून काढले. त्यांच्या अभंगाच्या वह्या, पोथ्या, सामान हिसकानून घेतेले. व सामान, अभंग, वहया न देतांच तसेच त्यांना एस. टी. स्टडवरुन घालवून दिले. तेव्हा ही निराधारी व अभंग वहया गेल्यामुळे अतिशय दुःखी झालेली माणसे मोठ्या जड़ अन्तःकरणाने तेथून निघाली. डोळ्यातून अश्रू येत होते. तसेच जड पावले टाकीत साता-यास गेले व शंकरराव कळेकर यांचेकडे उतरले. त्यांना झालेला सर्व वृतांत निवेदन केला. तेव्हा कळेकरनी आपल्या विश्वासातील काही माणसे वाई एस. टी. स्टॅन्डवर पाठवून अभंग व सामानाबद्दल चौकशी करविली. अभंग, पोथ्या इ. वैजनाथ देवांचे सामान एस्. टी. स्टॅन्डच्या खोलीत असल्याचे समजले. दोन तीन दिवस राहून कळेकरांनी वैजनाथ देव, विजय, आजी यांना कोरेगांव येथे पाठवून दिले. कोरेगांवात ही मंडळी दत्तात्रेय भाऊसाहेब बर्गे तालुका पाटील यांच्याकडे भक्ता चिंगुबाई कासार यांच्या आश्रयाने राहू लागली. पोथ्या, अभंगाच्या वह्या लुटल्या गेल्याची बातमी हां हां म्हणतां सर्व भागांत पसरली. पुढे भक्तांनी वर्गणी जमा करून या तीन मूर्तीना संगमनेर येथे परत पाठवून दिले. पुढे लगेच ते वडगांव लांडगा येथे आले. त्यावेळी वडगांव लांडगा येथे श्री. राजाराम ओमकार माळी हे खानदेशचे गुरुजी होते. ते मोठे भाविक आहेत. ते नित्य दर्शनास येत. मागे देव वडगांव लांडगा येथे असतांना त्यांनी वैजनाथ देवांच्या व्हयांचे नंबर टिपून नेले होते.
अशा प्रकारे वड़गांवी, वाई येथे घडलेली सर्व हकिगत भक्तांना सांगितली. लोक हळहळले. त्यांनी आपापसांत वर्गणी जमा केली. व खानदेशचे माळी गुरुजी यांना वाई येथे पाठविण्याचे ठरविले. याकामी वडगांवच्या डॉ. हांडे मास्तर, गणपतराव लांडगे मास्तर, राधूशेट दुकानदार इ० गांवातील प्रमुख मंडीळीणी पुढाकार घेतला होता. विजयचे वडिल वाईसच होते. त्यांनी वडिलांना पत्र पाठवून एस्. टी. वरून अभंग पोथ्या, सामान घरी आणून ठेवण्याबद्दल सूचविले. व शिक्षक श्री. माळी गुरुजी सामान नेण्यासाठी येत आहेत याची सूचना दिली.
त्याप्रमाणे पत्रानुसार विजयचे वडिल श्री. गजानन शंकर गिजरे यांनी सामान अभंग, पोथ्या आणल्या व ते वाचीत बसले. इतक्यात माळी गुरुजी तेथे गेले त्यांनी वैजनाथ देवांच्या सर्व सामानाची गिजरे यांचेकडे मागणी केली. त्यांनी काहिही आढेवेढे न घेता सामान देण्याचे कबूल केले. एक दिवस मुक्काम करून माळी गुरुजींनी देवांचे सर्व सामान वडगांव लांडगा येथे व्यवस्थित परत आणले. ते पुणे मार्गे आले होते. अभंगाच्या वह्या परत मिळाल्याबद्दल सर्वानाच मनस्वी आनंद झाला. सर्वांनी मिळून मिष्टान्नाचे भोजन केले. ही घटना १९५४ साली घडली. यावेळी कर्पे वकील उपस्थित होते.
इकडे वाईस अभंग लुटणा-या एस्. टी, कामगारांचे जबाब झाले. कोरेगांव सातारा येथे एस. टी. अधिकारी श्री. पाटील यांनी स्वतः जाऊन भक्तांचे जाच जबाब घेतले. व हे दुष्ट लुटारु एस्. टी. कर्मचारी पुढे कामावरून कमी झाले. वैजनाथ देवांनी मात्र या प्रकरणी काही एक तक्रार न नोंदविल्याबद्दल व खरोखरच वैजनाथ देव हे अवतारी पुरुष असल्याबद्दल श्री. पाटील यांना धन्यता वाटली.
नंतर वैजनाथ देव वडगांव लांडगा येथे दोन वर्षे राहिले. तेथे असतांनाच भारत भक्ति सांप्रदायाची स्थापना झाली व विश्वधर्माचा पाया घातला गेला.
त्यानंतर वैजनाथ देव पोखरी बाळेश्वर येथे गेले. त्या ठिकाणी चार पांच महिने राहून परत वडगांव लांडगा येथे आले. प्रसिद्धी वाढतच होती. पुढे पिंपळगाव निपाणी येथील भक्तांनी त्यांना नेण्याचे ठरविले. पिंपळगांव निपाणीला शंकर बाबा गोसावी यांनी आपली जागा वैजनाथ देवांना राहाण्यासाठी दिली. शंकरबाबाची इस्टेट व पैसे गांवातील लोकांकडे होते. ते सर्व पैसे व अधिक वर्गणी जमा करून वैजनाथ देवांना आश्रम बांधून देण्याचे ठरले. नंतर शंकरबाबानी जागा बाधली व देवांसाठी आश्रम बनवून दिले व देवांसाठी आसन बनवून दिले. हे आजहि पिंपळगांव निपाणी येथे पाहावयास मिळते. तेथे श्री. गोपाळा खंडुजी झापटे मोठ्या भक्तीने दररोज आरती करतो व व्यवस्था पाहातो. त्यांचा आवाज खूप गोड आहे. ते मोठ्या कार्यक्रमांत मोठ्या भक्तीभावाने वैजनाथ देवांनी लिहिलेला रामपाठ म्हणतात. जमलेले सर्व भक्त मोठ्या शांततेने तो पाठ ऐकतात व मंत्रमुग्ध होतात. तसेच भोजनापूर्वी सुरेल आवाजात श्लोक म्हणण्याचा तर श्री. गोपाळा खंडुजी झापटे यांचा मानच ठरला आहे. इतर परम भक्त सुद्धा गादीच्या दर्शनास जातात. येथे असतांनाच रामपाठ, विठ्ठलपाठ, हरीपाठ, एकेश्वरण कृष्णपाठ असे चार पाठ लिहिले गेले. ही घटना १९५७ सालीं घडली.
पुढे वैजनाथ देवांची ब्रम्हस्थिति जागृत होऊन त्यांनी ग्रंथ व अभंग खूप लिहिले. येथे भक्त मंडळीनी अभंगाच्या रक्षणासाठी पंचकमेटी स्थापन केली. या कामी श्री. रावसाहेब वाकचौरे पाटील, गोपाळा झापटे, कारभारी वाकचौरे, यादवबाबा, भीमबाजी, भगवान, पंढरीनाथ पाटील इ. ची खूप मदत झाली.
परंतु पुढे पुढे गांवांतील काही कर्मठ व राजकारणी लोकांकडून वैजनाथ देवांना त्रास होऊ लागला. त्यांच्या निकट भक्तांना याबद्दल वाईट वाटू लागले. त्यांच्याच सहाय्यावरुन वैजनाथ देवांनीं पिंपळगांव निपाणी सोडण्याचे ठरविले व एके दिवशी ते संगमनेर येथे श्री. भाऊसाहेब देशमुख अंभोरकर यांच्या वाड्यांत येऊन राहिले.
वैजनाथ देव अंभोरकरांच्या वाड्यांत राहात असतांना कुंडलिनी जागृत झाली. त्यात काही राजकारणी व कर्मठ लोकांनी त्यांना विषप्रयोग केला. त्यामुळे वैजनाथ देव खूपच आजारी झाले. देवांना अन्न जात नव्हते. आजी खूपच घाबरुन गेल्या. वैजनाथ देव सहा महिने फक्त दूधावरच होते. या आधी वडगांव लांडगा येथे असतांना विजय हा मुलगा निघून गेला होता. या आजारांत आजी, तुकारामबुवा शिदे, आनंदसिंग परदेशी टाहकारी गावचे रामकृष्ण बाबा व वैजनाथ देव चिताक्रांत झाले. काहीहि सुचेना. परंतु ईश्वरी लीला अगाध म्हणावयाची! अकस्मात् दाराशी टुरिग़ येऊन उभी राहिली. सर्वांना आश्चर्य वाटले. वैजनाथ देवांना त्या टुरिंगमधून पुणे येथे ग्रँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना हॉस्पिटलमध्ये सात आठ दिवस राहावे लागले. सातशे आठशे रुपये खर्च झाला. नंतर ग्रँड हॉस्पिटलमध्ये कोणत्यातरी ख्यिश्चन डॉक्टरांने औषधामधून वैजनाथ देवान विषप्रयोग केला. त्यातूनही ते बचावले हा सर्व प्रकार पाहून तेथील सिस्टर्स व इतर डॉक्टर्स लोकांना या गोष्टीचे मोठ आश्चर्य वाटले.
नंतर वैजनाथ देवांनी ग्रँड कडून जाण्याची परवानगी मागितली. परवानगी मिळताच वैजनाथ देवांना परत संगमनेर येथे न्यावयाचे ठरविले. त्यावेळी आनंदसिंग परदेशी यांचा भाचा श्री. नरेंदसिंग ठाकोर उर्फ किशोर यांनी हॉस्पिटलजवळ टुरिंग आणली. वैजनाथ देवांनी कपडे बदलले व संगमनेरला निघण्यासाठी टुरिंग मध्ये बसले. त्यांच्या बरोबर अभ्यंकर गुरुजी पण होते. ते मध्येच जाण्यासाठी उतरले. नंतर देव सर्वांसह अंभोरकर यांच्या वाड्यात आले. ग्रँड डॉक्टरांनी टिपून दिलेली औषधे बरोबर आणलीच होती. वडगाव लांडगा येथील कै. डॉ. हांडे मास्तर यांनी देखील त्यांवेळी वैजनाथ देवांना काही दिवस औषध दिले. आजारांत सुरवातीला फक्त दूध, नंतर दूध पाव व पुढे पुढे दूध भाकरी याप्रमाणे वैजनाथ देवांनी आहारांत बदल केला. डॉक्टरांचा सल्ला चालून होता. असो.
वैजनाथ देव आंभोरकर यांच्या वाड्यात असतांना श्री. देवराम बापू जाधव समनापूरकर हे देवांच्या दर्शनास येऊ लागले. अंभोरकर वाड्यात काही कार्यक्रम झाले, त्यावेळी देवरामबुवा येत एके दिवशी त्यांनी वैजनाथ देवांना विनंती केली की, “आपले पाय आमच्या घरास लागावे, ही आमची इच्छा आहे. आपण आमच्या मळ्यात यावे” त्याप्रमाणे देवराम बापू जाधव यांच्या मळयांत जायचे ठरले. दुसया दिवशी त्यांनी वैजनाथ देवांना बैलगाडीत बसवून त्यांच्या मळ्यात जेवावयास नेले. तेथील सर्व शांत वातावरण पाहून व गावापासून दूर एकांत स्थान लक्षात घेऊन देवराम बापू जाधव यांच्या मळयांतच पुढील काळात राहावे असा मनोदय वैजनाथ देवांनी त्यांना बोलून दाखविला. त्याप्रमाणे त्यांनी कबूल केले व लगेच दुस-या दिवशी बैलगाडीमधून सर्व सामान देवरामबुवांचे मळयांत पोहचविले. अशारितीने वैजनाथ देव आंभोरकर यांच्या वाड्यातुन देवरामबुवा जाधव यांच्या मळ्यात गेले. तेथे देवांना राहाण्यासाठी खोली लहान होती. आसन व स्वयंपाक यांची अडचण होती. तेव्हां बाजीराव पाटील व बाबुराव शेटे व इतर भक्त मंडळींनी वर्गणी काढून वैजनाथ देवांच्या खोलीची दुरुस्ती केली. दोन स्वतंत्र खोल्या काढल्या. त्यामुळे स्वयंपाक व बैठक असे दोन भाग स्वतंत्र झाले. वैजनाथ देवांचे आसनही तयार केले. वैजनाथ देवांनी तेथे असताना ज्ञानदेव पाठ व दत्त पाठ लिहला. बाकी इतर लिखाण चालूच होते.
देवराम बापू जाधव यांनी सुमारे चार वर्षे वैजनाथ देवांची खूप चांगल्या प्रकारे सेवा केली. त्यांची मुले बाळेही देवाची भक्ति करु लागले. गांवोगावचे कलंकी भक्त पुढे हळू हळू वाढत गेले. संदेश पत्रिका छापून वैजनाथ देवांच्या लिखाणाची, कार्याची चोहोकडे प्रसिद्धी करण्यात आली. या पत्रिका पाहुन पुणे, वाई, नाशिक तसेच जवळपासच्या अनेक खेड्यांमधून अनेक लोक जमू लागले. भक्त वाढत गेली व देवांसाठी स्वतंत्र सुव्यस्थित, शहरालगतच एक भव्य आश्रम असावा असे वाटू लागले. तेव्हां मोठे सुदैव कीं श्री. मुरलीधर विठ्ठलराव नवले यांची नगररोड लागत जागा विकाऊ होती. पुण्याच्या श्री. फुलचंद केशरचंद बागमार या भक्ताने स्वखर्चाने तीन गुंठे जागा वैजनाथ देवांचे नांवावर खरेदी केली.
त्याचप्रमाणे हे धार्मिक कार्य लक्षात घेऊन श्री. मुरलीधर विठ्ठलराव नवले यांनी स्वमालकीची दोन गुंठे जागा आश्रमासाठी मोफत दिली. त्या जागेचे बक्षीस पत्र झाले अशाप्रकारे वैजनाथ देवांच्या आश्रमासाठी पांच गुंठे जागा उपलब्ध झाली.
या जागेवर बांधकाम होणे अगत्याचे आहे. हे लक्षात घेऊन सर्व निकटवर्ती भक्तांनी यथा शक्ति वर्गणी देण्याचे ठरविले व अडीचशे रुपयांपासून ते आठशे रु. पर्यन्त भक्तांनी रकमा दिल्या. कमी वर्गणी देणारेहि बरेच भक्त आहेत. पुढे आश्रमात इमारती उभ्या करण्यासाठी देखरेखीची व काम करून घेण्याची फार गरज होती. त्यासाठी परम भक्त श्री. निवृत्तिनाथ हनुमंता वाल्हेकर यांनी वेल्हाळ सोडले व आश्रमाच्या बांधकामास वाहून घ्यावयाचे ठरविले. ते पूर्वी वेल्हाळे येथे राहात होते. ते गांव वाल्हेकरांचे आजोळ होते. घोंगड्या विकणे व घोंगडयाचा व्यापार हा त्याचा व्यवसाय होता. त्यांनी आश्रमांतील इमारतीचा पायाभरणी पासून तो इमारती पूर्ण होईपर्यन्त जातीने मेहनत व सहकार्य केले. गांवोगांवी फिरून आश्रमासाठी भक्तांकडून देणग्या मिळविल्या व ही वास्तु वैजनाथ देवांसाठी निर्माण केली. तेव्हा पासून श्री. निवृत्तीनाथ हनुमंता वाल्हेकर हे आपल्या सहकुटुंब सहपरिवारे देवांची नित्य आरती सेवा इतर कामें पाहत व वैजनाथ देवांच्याच आश्रमात शेजारी वस्ती करुन राहत. त्यांनी वैजनाथ देवांच्या सेवेत स्वतःच्या जीवनास वाहून घेतले व ते देवांची मनोभावे सेवा करीत असत. श्री. देवरामबापूहि आणण्यानेण्याची जबाबदारी मोठ्या आस्थेने पार पाडायचे. त्यांची बांधकामाच्यावेळी फार मोठी मदत झाली. इतरहि भक्तांनी याकामी यथाशक्ति हातभार लावला. त्यावेळी आजी देखील आश्रमात देवांकडे होत्या.
आश्रमाचे काम सन १९६८ साली पूर्ण झाले. नंतर वैजनाथ देव सोनाबाई आजीसह आश्रमात राहू लागले. शेजारी निवृत्तिनाथ हनुमंता वाल्हेकर आपल्या कुटुंबासह राहात होते. येथेहि काही कर्मठ व राजकारण लोकांपासून वैजनाथ देवांना व सोनाबाई आजीना खूप त्रास झाला. पुढे आजीस पक्षवात व मधुमेह हे विकार जडले व त्यातच मार्गशीष वद्य नवमी गुरुवार सन १९७२ सायंकाळी सहा वाजता त्यांचा अंतः झाला. त्या दत्त स्वरुपी विलीन झाल्या. आजींनी देवांची एकतीस वर्षे मनोभावे व घरावर तुळशीपत्र ठेवून भिक्षा मागून अनन्यभावे सेवा केली. याची आठवण म्हणून कलंकी आश्रमांत त्यांची मांडणूक आहे. भाविक लोक वैजनाथ देवांच्या दर्शनाबरोबर शबरी समजल्या जाणा-या सोनाबाई आजीच्या मंदिरात जाऊन भक्तिभावाने दर्शन घेतात.
कलंकी वैजनाथ देवांच्या आश्रमांत देवांना थोड स्वास्थ्य लाभले, कार्याला स्थिरता आली. परंतु जगात जसे हरणासारखे निरुपद्रवी प्राणी असतात. त्याच प्रमाणे वाघ, सिंहा सारखे क्रूर जनावरे हि आहेत. सुवासिक चंदनासारखी झाडे आहेत. त्याचप्रमाणे बाबूळासारखी काटेरी उपद्रवी झाडे देखील आहेत. त्याचप्रमाणे वैजनाथ देवांचे निस्सीम भक्तही आहेत व त्यांचा छळ करणारे महाभागहि आहेत. दुष्टांच्या आघातामुळे वैजनाथ देवांना सृष्टीनियमानुसार मधुमेह व रक्तदाब इ. आजार उद्भवले त्यातून डॉ. ठाकुर व डॉ. गंगवाल यांनी वेळोवेळी औषधोपचार करुन त्यांना जरा बरे वाटले. पथ्य पाणी चालू होते. परंतु हे धार्मिक कार्य आहे. अनंत संकटांना तोंड देऊन आरंभिलेले कार्य शेवटाप्रत न्यावयाचे आहे. ईश्वरी सहाय्यता आहेच. अनेक अधिकारी, नोकरवर्ग, कामगार, भोळे भाबडे शेतकरी येऊन गेले. येतात. त्यांनाहि वैजनाथ देवांचा हस्तलिखित ग्रंथ सांभार पाहून विस्मय होतो. एखाद्या जादूच्या कांडीप्रमाणे त्यांच्या वृत्तीत पालट होतो. हाच त्यांच्या कार्याचा प्रभाव होय.
श्री कलंकी देवांचे महानिवार्ण आषाढ शु।। १० ।। सोमवार दिनांक ६ जुलै १९८७ साली संगमनेर येथे झाले.
श्री. कलंकी देव शिष्या श्री. संत बेबीनाथ माया यांनी कलंकी देवांचे कार्य पुढे चालू ठेवले आहे. वडगांव लांडगा, संगमनेर येथे श्री. संत बेबीनाथ माया यांचा आश्रम, दत्त मंदिर व ध्यान मंदिर आहे. माताजींनी हस्तलिखीतातून अनेक अध्यात्मिक ग्रंथांची निर्मीती केली आहे व अभंगवाणी आजही चालू आहे. अनेक भाविक भक्त श्री. कलंकी देव समाधी दर्शनाचा व ज्ञानाचा लाभ घेतात व श्री. संत बेबीनाथ माया यांच्या दर्शनाचा व ज्ञानामृताचा लाभ घेऊन कृतार्थ होतात !

