कुंडलिनी निरूपण पाठ

। । श्री कलंकी देव वैजनाथ कृत कुंडलिनी निरूपण पाठ । ।

राम कृष्ण म्हणा राम कृष्ण म्हणा । वैकुंठीचा राणा जवळीगा ।
राम कृष्ण नाम जाणा पंचाक्षरी । तेणे मुक्ती चारी साधियतया ।
राम कृष्ण नामे साधेग उन्मिनी । होय कुंडलीनी जागृतगा ।
वैजनाथ म्हणे सत्संगें श्रीहरी । सखा जाणा परी होय मिगा । । १ । ।

नामाचे चिंतन जेथे सदा आहे । उभा तेथे पाहे पांडुरंग ।
ॐ सोहं मंत्र परब्रम्हाय नम: । करी आत्मा रामा जागृतगा ।
राम कृष्ण नामे भेट ही सगुण । सगुण निर्गुण ध्यान लागे ।
वैजनाथ म्हणे गुरु मुखे मंत्र । घेतितया पवित्र भुमिकाते । । २ । ।

ऋषिमुनी योगी तपस्वी तरले । नामी स्थिरावले जाणा ठायी ।
देवा दिक नाम चिंतने तरले । स्वानंदी राहिले जाणा संत ।
नामाचा महिमा थोर जाणा आहे । तेणे आत्मा पाहे साक्षात्कार ।
वैजनाथ म्हणे नामे ब्रह्म स्थिती । कृपे ही प्रचिती सद्गुरुच्या । । ३ । ।

पंथ सांप्रदाय उपासना नाही । भेद नाम पाही चिंतनात ।
नामे येई अंगी जाणा संतपद । बारे हा स्वानंद भोगीतसे ।
नामे संता कानी ब्रह्मनाद ध्वनी । निर्विकल्प ध्यान राहिलेगा ।
वैजनाथ म्हणे नामाचा महिमा । आगम निगमा सापडेना । । ४ । ।

राम कृष्ण नाम बीज मंत्र आहे । पंचाक्षरी पाहे तारकगा ।
गुरु मुखे मंत्र घेतियल्या वरी । मी तू पण परी मोडतसे ।
ईश्वरी नामात भेद जाणा नाही । कोणतेगा पाही नाम असो ।
वैजनाथ म्हणे नामाचे चिंतन । मुक्त बनवुन टाकी प्राण्या । । ५ । ।

नामे सिद्धकोटी अवस्थाते परी । बाणे अवधारी ब्रह्मस्थिती ।
नाथ सिद्धा दत्ते दिला बिज मंत्र । भुमिका पवित्र बनविल्या ।
ब्रह्म विद्या देखा नामाने स्फुरली । स्थिती यांची झाली एकाकार ।
वैजनाथ म्हणे देह जाणा चारी । नाथ सिद्धा परी साधलेगा । । ६ । ।

स्थुळ सुक्ष्म देह बारे हा कारण । हा महाकारण चवथागा ।
नामे ब्रह्म स्थिती बाणलियावरी । देह जाणा चारी साधताती ।
स्वयं प्रकाशीत आत्माबने परी । येता अवधारी ब्रह्मस्थिती ।
वैजनाथ म्हणे गुरु मुखे मंत्र । घेता ब्रह्म सुत्र ज्ञान तेणे । । ७ । ।

स्थुळ सुक्ष्म देह अल्पायुषी आहे । सृष्टी नेमे पाहे जाणा जाय ।
कारण देह हा ब्रम्हाचा कल्पांत । होई तोपर्यंत टिकतसे ।
जाणीव रूपेगा हा महाकारण । देह असे जण चिरंजीव ।
गुरु मुखे बीज मंत्र घेता परी । देह जाणा चारी साधताती ।
वैजनाथ म्हणे येता सिद्ध कोटी । जाणा आटा आटी राहिचना । । ८ । ।

गुरु मंत्रे कुंडलीनी ते जागृत । स्वयं प्रकाशित आत्मा बने ।
प्रणव ऎशाचा राहुनी जागृत । ओंकार बोलत ऐशा सवे ।
मोक्ष दाता गुरु भेटलियाविण । ऐसी स्थिती जाण येत नाही ।
वैजनाथ म्हणे जया शक्ती पात । सद्गुरू करीत ऐसी स्थिती । । ९ । ।

रामकृष्ण नामे ब्रह्म नाद ध्वनी । ध्वनी तयातुनी अनुहात ।
संतांचिया सिद्ध जाणा हे बनती । अंगी ब्रह्म स्थिती बाणतसे ।
संतानिया बनताती ऐसे संत । शरण जे संत पदी जाती ।
वैजनाथ म्हणे आत्मज्ञानी संत । जयासी भेटत अनुभव । । १० । ।

सिद्ध कोटी अंगी आली जाणा जरी । उपासना परी नोहे सुटे ।
तया तारीतसे नामाचे चिंतन । निर्विकल्प ध्यान तेची ठेवी ।
सद्गुरूने शक्ती पात केला जरी । उपासनापरी जाणा हवी ।
वैजनाथ म्हणे येता ब्रह्म स्थिती । नामाची प्रचिती यात ऐसी । । ११ । ।

सद्गुरुच्या भेटी संशयाची तुट । जाय आटा आटी निघोनिया ।
सद्गुरु नामाचा महिमा हा परी । अनुभवे करी जाणा सिद्ध ।
गुरु बीज मंत्र तारक गा राहे । सिद्ध कोटी पाहे माजी नेई ।
वैजनाथ म्हणे रामकृष्ण नाम । परम हे धाम गाठवीगा । । १२ । ।

अनंत ह्या नाम रुपाने ईश्वर । नटला साचार बारे देखा ।
कोणते ही नाम घेतियले जरी । तयाचिया परी तारकगा ।
परी गुरुमुखे घेतियल्यावीण । फल याचे जाण बारे नाही ।
वैजनाथ म्हणे गुरु मोक्षदाता । जाणा हा भेटता सिद्धकोटी । । १३ । ।

उपासनेप्रमाण गा साक्षात्कार । घडती साचार जरी देखा ।
गुरुविणा बारे आत्मसाक्षात्कार । कदापी साचार घडेचिना ।
नाम मंत्रा फळ सद्गुरुपासुनी । प्रचिती यातुनी स्वरुपाची ।
वैजनाथ म्हणे गुरुपदी जाण । जावे गा शरण तयासाठी । । १४ । ।

निर्गुणात नामरुप जाणा नाही । अनुभव पाही कळेचिना ।
तयासाठी नामरुपात ईश्वर । बारे अवतार धरितसे ।
सगुण भेटीचा जाणा गुरुमंत्र । बनवी पवित्र भूमिकाते ।
वैजनाथ म्हणे देण्या ही ओळख । अवतारे देख माऊलीते । । १५ । ।

बेंबी सभोवती साडेतिन आहे । वेढा जाणा पाहे कुंडलिनी ।
सद्गुरुने शक्तीपात केल्यावरी । झटके शरीरी देत हिंडे ।
सप्त धातू नष्ट ही गा जाणा करी । प्राणी पडे परी निचेष्ठीत ।
वैजनाथ म्हणे पहिल्या स्थितीत । अवस्था ते होत जाणा ऐसी । । १६ । ।

पाठीचिया कण्याखाली उतरत । माकड हाडात मध्यभागी ।
सुप्त राहुनिया तेथे कुंडलिनी । बैसे गा जाऊनी ब्रम्हरंध्री ।
तेथे ओकुनिया बारे गा अमृत । दिव्यत्व आणित बारे ऐशा ।
वैजनाथ म्हणे दुसऱ्या स्थितीत । अवस्था ते होत जाणा ऐसी । । १७ । ।

हृदयाकाशी गा कुंडलिनी स्थिर । तिसऱ्या साचार अवस्थेत ।
घडवुनि तेथे आत्मसाक्षात्कार । बनवी साचार सिद्धात्मा त्या ।
सिद्धकोटी माजी ब्रह्मज्ञान राहे । अंतर्ज्ञानी पाहे आत्मा बने ।
वैजनाथ म्हणे येता ब्रह्मस्थिती । आत्मे हे रहाती चिरंजीव । । १८ । ।

रामकृष्ण नामी आत्मसाक्षात्कार । भरुनी साचार उरला हा ।
गुरुकृपे प्राणी होती गा तल्लीन । कुंडलिनी ध्यान लागतसे ।
मी तू पणाचिया न राहे विचार । विश्व हा साचार मीच बने ।
वैजनाथ म्हणे संती अनुभव । ब्रम्ह स्वयमेव सद्गुरुपाने । । १९ । ।

मुळ निर्गुण मी जाणा निराकार । आहे गा साचार परब्रम्ह ।
सिद्ध ब्रह्मवेते मज सभोवती । तेजोमय स्थिती माजी देखा ।
भानासाठी स्पंद स्फुरुनि साचार । ॐ हे मुळाक्षर जन्मा येई ।
साडेतिन मात्रा विश्वाचा विस्तार । होय हा साचार भासमान ।
वैजनाथ म्हणे होतो मी सगुण । अवतारे जाण भक्तिप्रेमा । । २० । ।

मोक्षदात्याविण कुंडलिनी पाही । देता येत नाही अनुग्रह ।
ईतराकारण नोहे अधिकार । देण्या हा साचार अनुग्रह ।
कुंडलिनी जागृत गा झाल्यावरी । सिद्धकोटी परी अवस्थाते ।
वैजनाथ म्हणे शुद्ध भूमिकेत । सद्गुरू करीत शक्तिपात । । २१ । ।

बेंबीचिया अग्रभागी प्रणवात । ओंकार राहत पुरुष गा ।
तया सभोवती साडेतिन आहे । वेढा बारे पाहे कुंडलिनी ।
कुंडलिनी जागृत गा झाल्यावरी । अनुहात परी ध्वनी याचे ।
वैजनाथ म्हणे सद्गुरु कृपेत । अनुभवा येत कुंडलिनी । । २२ । ।

सद्गुरू करूनि प्रणव जागृत । ओंकार बोलत पुरूष गा ।
सद्गुरूने बीजमंत्र दिल्यावरी । अनुहात परी ध्वनी याचे ।
सद्गुरू वचनी विश्वास जो धरी । शाश्वत ह्या परी पदी मिळे ।
वैजनाथ म्हणे मोक्षदात्याविण । नोहे ब्रम्हजाण साक्षात्कार । । २३ । ।

रामकृष्ण नाम जाणा पंचाक्षरी । बीजमंत्र परी जाणा आहे ।
पांडुरंगे दिला संतांचिया कानी । सद्गुरु पासुनी बीजमंत्र ।
ब्रह्मनाद ध्वनीतुनि अवधारी । स्वानंदी हे परी रमले गा ।
वैजनाथ म्हणे सुप्त स्थितीतुनी । तया कुंडलिनी दर्शन गा । । २४ । ।

कुर्तुमाकुर्तुम शक्ती गा ईश्वरी । कुंडलिनी परी जाणा आहे ।
सद्गुरुच्या कृपे झालीया जागृत । ज्ञान प्रगटत ब्रम्हसुत्र ।
मुंगीपायी घुंगरु हे वाजे जरी । कानी याच्या परी आवाज गा ।
वैजनाथ म्हणे होय अंतर्ज्ञानी । जाणे त्रिभुवनी घडामोडी । । २५ । ।

योगयाग विधी मुद्रा दंभाचार । आत्मसाक्षात्कार नेणे नाही ।
उपासना ध्यान नामाचे चिंतन । येतसे यातुन अनुभव ।
साधुसंत याच मार्गाने तरले । ब्रम्हस्थिती गेले माजी देखा ।
वैजनाथ म्हणे सत्य सदाचार । धर्म हा साचार पाळयला । । २६ । ।

शुक कपिलगा याज्ञवल्क्य दत्त । नारदा जागृत कुंडलिनी ।
पाच ब्रम्हवेत्ते मुख्य हे असती । विश्वाचा पाहती कारभार ।
उपासना ध्यान नामाचे चिंतन । भोगिती यातुन ब्रह्मस्थिती ।
वैजनाथ म्हणे परब्रम्हाप्रती । स्मरुनी रहाती कार्यामाजी । । २७ । ।

रामकृष्णपाठी जाणा अठ्ठाविस । अभंग सर्वांस मुक्ताफळे ।
भक्तीभावे जे का पठण करिती । प्राप्त ऐशीप्रती वैकुंठ गा ।
ऐकोणाविसशे सहा हे साचार । शके संवत्सर रक्ताक्षी नाम ।
फाल्गुन वद्य गा तृतिया साचार । जाणा शनिवार संकष्टी गा ।
रामकृष्ण पाठ तये दिनी पुर्ण । ब्रह्मनाद जाण ध्वनीतुनी ।
त्रैमूर्ति दत्ताने पाठ सांगितला । कलंकी लिहीला जाणा देवे ।
संगमनेर गा प्रवरेच्या तिरी । अनुभवापरी आणियले ।
वैजनाथ म्हणे रूप हे सगुण । भक्तिप्रेमा जाण अवतारे । । २८ । ।

जेथे वास करी जाणा अवतार । वैकुंठ साचार पंढरी गा ।
दुर्लभ भेट ही ईश्वरी सगुण । घडवुनि जाणा लाभ घाव्या ।
संगमनेर गा प्रवरेच्या तिरी । करकटावरी ठेवोनिया ।
भक्तजनांचि देव वाट पाहे । अठ्ठाविस आहे योगे ऊभा ।
वैजनाथ म्हणे कलंकी धारण । रूप केले जाण विठ्ठलाने । । २९ । ।

समाधी ध्यानगा जाणा संजीवन । जागृत यातुन कुंडलिनी ।
सद्गुरुच्यापदी गेले जे शरण । शाश्वत त्या जाण पदप्राप्त ।
त्रैमूर्ति दत्ताने अनुग्रह दिला । कलंकी देवाला ब्रम्हसुत्र ।
बुडता देखोनि जन हे अज्ञान । पोटी हा धरुन कळवळा ।
वैजनाथ म्हणे देण्या सत्यज्ञान । झाला भगवान साकार गा । । ३० । ।

। । श्री कलंकी देव वैजनाथ कृत कुंडलिनी निरूपण पाठ संपूर्णम । ।