गुरुमार्गदर्शन गीता

।। ॐ ।।
।। श्री सद्गुरु दुर्वास दत्त प्रसन्न ।।
प्रस्तावना

गुरु ब्रम्हा: गुरु विष्णु: गुरु देवो महेश्वर: ।
गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमः ।।

उपरोक्त श्लोक बहुतांशी आपण सर्वांना ज्ञात आहेच. त्यात गुरुची म्हणजे मोक्षदाता सद्गुरूची महत्तत्ता वर्णन केलेली आहे व तो परब्रम्हासमच असतो. अशा सद्गुरूच्या कृपाप्रसादाला पात्र होऊनच आपणास परब्रम्हाशी एकरूप होता येते.
बालपणापासूनच आपणाला अनेक प्रकारच्या गुरूंशी संबंध येत असतो.  प्रथम गुरु आपली माताच असते तदनंतर अक्षर ओळख देणारे गुरु व वेगवेगळ्या विषयांचे भौतिक ज्ञान प्रदान करणारे गुरु असे कितीतरी गुरु आपल्या जीवनात येत असतात. त्यांच्याद्वारे आपल्याला त्या त्या विषयांचे ज्ञान दिले जाते व शिष्याच्याद्वारे ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार ते ग्रहण केले जाते; म्हणूनच आपणाला जीवनत पदोपदी गुरुची आवश्यकत लागते; काही वेळेस ग्रंथ किंवा अनुभवही आपला गुरु ठरतो व आपण त्याद्वारे ज्ञान ग्रहण करतो.
साधारणतः भौतिक गुरुच्या बाबतीत तो किती चारित्र्यवान आहे किंवा नाही याकडे फारसे लक्ष नाही दिले तरी चालण्याजोगे आहे. परंतु परमार्थीक गुरुच्या बाबतीत तो चारित्र्यसंपन्न असणे आवश्य आहे. त्याच्याठाई शास्त्राचे मर्माचे ज्ञान असणे अत्यावश्यक आहे. दुसरा गुण म्हणजे तो निष्कलंक, निष्पाप असला पाहिजे. गुरुच्या बाबतीत तिसरा महत्त्वाचा गुण म्हणजे त्याची प्रसिद्धी विन्मुखता! फक्त त्याचे ठाई शिष्या वरील विशुद्ध प्रेम हाच त्याचे शिकवणचा उद्देश असणे आवश्यक आहे. तोच सद्गुरु सत्य प्रेमाने अध्यात्मीक शक्ती आपल्या शिष्यामधे संचारीत करु शकतो. आणखी असे की, ज्याला स्वतःला ईश्वरी साक्षात्कार झालेला आहे तोच खरा सद्गुरु होऊ शकतो. व तोच ईतरांना ईश्वरी सक्षात्कार घडवू शकेल. वरील प्रमाणे जर अध्यात्मिक सद्गुरु भेटला तरच त्या शिष्याची धडगत! अन्यथा आडग्या गुरूचा वाडगा चेला! व त्याची गत तरी काय बरे होणार? सद्गुरु हा अध्यात्मिक दृष्टया पूर्वज असून शिष्य हा त्याचा अध्यात्मिक वंशज होय. त्यांच्या संबधात पावित्र्यता असणे अत्यावश्यक आहे. गुरुप्रामनेच शिष्याच्या ठायीही पावित्र्य, खरी ज्ञानपिपासा निष्ठा व चिकाटी हे गुण असणे अत्यावश्क आहे. तरच तो आपल्या सद्गुरुमधील शक्ती ग्रहण करु शकेल अन्यथा नाही. सदगुरु म्हणजे मानवी जीवनरुपी वृक्षावरील फुलेच होत त्यांच्या अस्तित्वामुळेच जग चालते.
येशु ख्रिस्त, गौतम बुद्ध, महंमद पैगंबर इ. प्रेषित अवतार हे सर्व गुरुचे गुरु होत. ते साक्षात मानव रुपातील ईश्वरी अवतारच असतात. ते केवळ स्पर्शाने अगर ईच्छेने दुस-यामध्ये अध्यात्मिक शक्ती संचारीत करू शकतात. ही शक्ती अगदी हीन अधम व्यक्तीला सुद्धा एका निमिषार्धात साधुरुषच बनविते.
तसेच सर्वात श्रेष्ठ म्हणजे भगवान श्री. कृष्णांनी भगवदगीतेत सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या वेळी धर्माची अवनती होते व अधर्म बळावतो त्यावेळी मी मानवाच्या मदतीला धावून येतो व त्यासाठी मनुष्यरुपात साकार होतो. अशा पूर्ण परब्रह्म अवताररुपी गुरु चालू युग चौकडीत संत साधू जणांच्या रक्षणासाठी व सद् धर्म स्थापनेसाठी ह्या पूण्य भारतभूमीत परब्रम्हाचे दशावतार झाले. त्यात मत्स्य, कच्च, वराह, नरसिंह नंतर वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्धवतार श्री ज्ञानेश्वर व ह्या घोर कलीत कलंकी अवतार वैजनाथ भगवान प्रगटले. प्रत्येक अवताराच्या नेमानेमे घटना घडल्या व जगाला त्यांनी अनमोल असे ज्ञान प्रदान करून मानव जन्माचा उद्धार करण्याचा प्रयत्न केला. ह्या घोर कलियुगात कलंकी देव वैजनाथ भगवान यांचा दहावा अवतार झाला. परंतु फार थोड्यांना त्यांची ओळख पटली. बहुतेक सर्व अवतारांचे हयात असताना असेच होते. श्री. प. पू. वैजनाथ भगवान यांनी अमोल व अद्भुत असे सर्वप्रकारचे अध्यात्मिक ज्ञान सोप्या व सर्व सामान्यांना समजेल अशा प्राकृत मराठी व इतर भाषेत ज्ञानभांडार सर्वांसाठी खुले केले व हि मक्तेदारी केवळ विद्वानांची नव्हे त्याची ओळख जगाला पटवून दिली.
अशा महान परब्रह्म सद्गुरूच्या हातून अनेक अद्भुत ग्रंथाचे लिखाण झालेले आहे. त्यापैकी ५-६ ग्रंथ व ३-४ छोटी मोठी प्रकाशाने आम्ही यापूर्वी केलेली आहेच. सदरहू ग्रंथ हा तसा छोटासा जरी असला तरी त्यातील गुरु मार्गदर्शन वाचून अनेक अनभिज्ञाच्या जीवनात प्रकाश पडल्यावाचून राहणार नाही. त्या सर्व ज्ञानपिसासूचे जन्म कृतकृत्य होऊन त्यांना आत्मसाक्षात्काराची ओढ लागून तशी प्राप्ती होवो हीच सदिच्छा !

।। जय जय दत्तराज माऊली ।।
।। जय जय वैजनाथ माऊली ।।