ज्ञानदेव पाठ

।। श्री कलंकी देव वैजनाथ कृत ज्ञानदेव पाठ ।।

ज्ञानदेव म्हणा ज्ञानदेव म्हणा । ओळखावा जाणा पांडुरंग ।
भक्तासाठी ध्यान झाले हे सगूण । विष्णुमय जाण ज्ञान ज्योत ।
ज्ञानरूपी बारे जन्मला ईश्वर । करण्या उद्धार पतितांचा ।
वैजनाथ म्हणे गिता ज्ञानेश्वरी । कथियली परी ज्ञानदेवे ।।१।।

बौद्ध अवतार झाला ज्ञानेश्वर । आत्म साक्षात्कार पटविण्या ।
तयासाठी पंथ जाणा वारकरी । निर्मियला परी भक्ति प्रेमा ।
वेळे ऐसी वारकरी बारे जाण । मालीका निर्माण संतांचिया ।
वैजनाथ म्हणे क्षेत्र हे पंढरी । वसविले परी संतासाठी ।।२।।

पुंडलिकाचिया भक्तिसाठी परी । झालो मी श्रीहरी ज्ञानेश्वर ।
कृष्णावताराचिया हे विटेवरी । स्मारक गा परी उभे केले ।
साधुसंताचिया जमावया मेळा । राहिला सावळा भिमे तिरी ।
वैजनाथ म्हणे रूप हे सगूण । भक्ति प्रेम जाण वाढावया ।।३।।

गौतमासी बौद्ध कुणी गा म्हणती । जाणा हे करिती दिशा भूल ।
बुद्ध धर्म जेणे केला हा स्थापन । होईल कोठून जाणा बौद्ध ।
गौतमाने बुद्ध धर्म हा स्थापिला । बुद्ध गा तयाला तेणे नाम ।
स्वतंत्र जो धर्म करी हा स्थापन । होईल कोठुन अवतार ।
वैजनाथ म्हणे झाला ज्ञानेश्वर । बौद्ध अवतार भक्ति प्रेमा ।।४।।

अधर्माच्या वेळी वैकुंठी विचार । घेण्या अवतार ठरतसे ।
वेळप्रमाण गा नाम रूप जाण । करी हा धारण पांडुरंग ।
गट व्यापी धर्म कल्पना वाढता । येणे भगवंता लागतसे ।
वैजनाथ म्हणे युगायुगी राहे । धर्म कार्य पाहे वेळे ऐसे ।।५।।

गट व्यापी धर्म कल्पनाते पाही । रहात गा नाही देव येता ।
अंबऋषीसाठी दहा अवतार । घेतिले साचार पांडुरंगे ।
कोण्यावेळी कैसा घेणे अवतार । ठरले साचार आधी सर्व ।
वैजनाथ म्हणे नेमानेम आहे । वैकुंठी हा पाहे सकळीक ।।६।।

तर्क बद्धी वाद लोकातवाढला । धर्म हा लोपला बारे खरा ।
तयासाठी ज्ञानेश्वररूपे परी । नटला श्रीहरी बारे बौद्ध ।
गिता वेदाचिया बारे निरूपण । अवताराविण होत नाही ।
वैजनाथ म्हणे देतसे जागृती । जाणा ही श्रपती वेळे ऐसी ।।७।।

भारत संस्कृती श्रेष्ठजाणा आहे । अध्यात्मगा पाहे यात सर्व ।
गिता वेद जन्मले गा भारतात । संस्कृती जगात तेणे श्रेष्ठ ।
तयाचिया सत्यज्ञान हे लोपता । येणे भगवंता लागतसे ।
वैजनाथ म्हणे राहे शिकवण । धर्माचिया जाण वेळे ऐसी ।।८।।

कलीयुगी सत्यज्ञान हे लोपले । धर्मात वाढले मत भेद ।
तयासाठी पांडुरंगे ज्ञानेश्वर । बौद्ध अवतार धरियला ।
निवृत्ती सोपान मुक्ताबाई परी । जाणा बरोबरी ब्रह्मरुप ।
वैजनाथ म्हणे धर्म कार्यासाठी । दावी जगजेठी बारे लिला ।।९।।

नानाविध धर्म जगात असती । रुढी चालीरिती नानाविध ।
जयामाजी अध्यात्म गा बारे नाही । धर्म श्रेष्ट पाही नोहे उरे ।
अध्यात्म बीज गा रूजले भारती । यामुळे संस्कृती जगी श्रेष्ठ ।
वैजनाथ म्हणे राखण्या भारता । येणे भगवंता लागतसे ।।१०।।

ईतर धर्मात नोहे निरुपण । गिता आणि जाण वेदाचिया ।
गितावेद निरुपण ज्यात नाही । धर्म कैसा पाही ठरे श्रेष्ठ ।
पुर्ण अवतार जन्मा आल्याविण । गिता निरुपण होत नाही ।
इतरा कारण अधिकार नाही । गिता बारे पाही सांगावया ।
वैजनाथ म्हणे अधर्माच्या वेळी । धावे वनमाळी धर्मकार्या ।।११।।

नोहे कवणाचा ताबा देवावरी । अवतार परी धरविण्या ।
अधर्म जगात बारे हा वाढता । देवा लागी चिंता पडतसे ।
ठरुनी वैकुंठी यावेळी विचार । धरी अवतार पांडुरंग ।
ज्या ज्या वेळी जो जो घेणे अवतार । वैकुंठी विचार आधी ठरे ।
वैजनाथ म्हणे ठरल्या प्रमाण । होतसे धारण नाम रुप ।।१२।।

आजवरी ईश्वराचे अवतार । झाले गा साकार नानाविध ।
नामरुपी फरक हा झाला जरी । नोहे मूळ परी बदलले ।
परब्रह्म सत्ता आहे तिच राहे । परमात्मा पाहे एकचि गा ।
वैजनाथ म्हणे भक्तासाठी जाण । अनेक धारण नाम रुप ।।१३।।

वसविले क्षेत्र देवाने पंढरी । भक्ति भाव परी वाढावया ।
आषाढी कार्तिकी चालू केलीवारी । संतमेळा परी जमावया ।
भजन किर्तन आणि प्रवचन । जाण्या उद्धरून जडमुढ ।
वैजनाथ म्हणे वेळेच्या प्रमाण । मालिका निर्माण भक्तांचिया ।।१४।।

कलीयुग जेव्हां घोर हे लागले । जनविसरले देव धर्म ।
पंथ सांप्रदाय उपासना भेद । वाढलासे वाद धर्माविशी ।
साधु संताचिया छळ झाला भारी । सत्यज्ञान परी लोपले गा ।
ठरुनी वैकुंठीया साठी विचार । झालो अवतार कलंकी मी ।
वैजनाथ म्हणे धर्माचे रक्षण । अवतार जाण कार्य माझे ।।१५।।

मानवतेसी हा कलंक लागला । यामुळे लोपला खरा धर्म ।
काढण्या कलंक अवघा हा जाण । कलंकी धारण नाम केले ।
भक्तासाठी कलंकी हा अवतार । दहावा साचार शेवटचा ।
वैजनाथ म्हणे आत्म ज्ञानाविण । ईश्वर मी जाण कुणा कळे ।।१६।।

पूर्ण अवतार बारे आल्या वरी । गटव्यापी परी धर्म नुरे ।
भारत संस्कृती गटव्यापी नाहि । मानवता पाही यात पुर्ण ।
कली माजी केला वेदांत । देवे साधु संत धाडुनिया ।
वैजनाथ म्हणे धर्माचिया ज्ञान । सत्संगा वाचुन होत नाहीं ।।१७।।

ॐ हे मुळाक्षर वेदाचिया आहे। अध्यात्मगा पाहे यात सर्व ।
मानव जन्माचा व्हावया उद्धार । वेदांत साचार संते केला ।
तत्वमसी महावाक्याचा सिद्धांत । येता भगवंत कळतसे ।
वैजनाथ म्हणे गिता निरूपण । अवतारे जाण वेळे ऐसे ।।१८।।

सत्व रज तम तत्व हे त्रिगुण । परब्रह्म जाण नटलेगा ।
त्रिगुणतत्वाने नटुनी ईश्वर । धरी अवतार नाना विध ।
योग्य वेळी धरी पुर्ण अवतार । सांगण्या साचार बारे गिता ।
वैजनाथ म्हणे शुद्ध सत्व गुण । रहातसे जाण परब्रह्मी ।।१९।।

शुद्ध सत्वगुणी दहा अवतार । झाले गा साचार विष्णुचिया ।
अंबऋषीचिया भक्ति साठी परी । नटला श्रीहरी नाम रुपे ।
दिली साधुसंते करुनी ओळख । परब्रह्म देख स्वरूपाची ।
वैजनाथ म्हणे भक्ति ते सगुण । अवतारे जाण प्रगटली ।।२०।।

निर्गुणाचे ध्यान जाणा हे सगुण । अवताराविण होत नाही ।
नाम रूपा माजी नोहे येता जरी । कवणा श्रीहरी सापडता ।
साधु संताचिया थोर उपकार । आणिला आकार देवा तेणे ।
वैजनाथ म्हणे ध्यान हे सगुण । संते केले जाण भक्ति प्रेमे ।।२१।।

जे जे अवतार झाले आजि वरी। ईश्वराचे परी बारे पूर्ण ।
अदृश्य होऊनी निजधामा गेले । शेवटी उरले चिरंजीव ।
स्थान महात्म्य गा केले हे निर्माण । रहावया जाण स्मरण गा ।
वैजनाथ म्हणे भक्ति प्रेमासाठी । लिला जगजेठी दावितसे ।।२२।।

केले आळंदीचे निमित्त गा बारे । जाणा ज्ञानेश्वरे निजधामा ।
मुळ ज्ञान ज्योत आहे तीच राहे । ज्ञान रूप पाहे ईश्वर गा ।
भक्त जनासाठी नानाविध करी । लिला हा श्रीहरी अवतारे ।
वैजनाथ म्हणे साधु संताविण । ओळखही जाण होत नाही ।।२३।।

कलंकी स्वरूपे विष्णुमय दत्त । झालो मी कलीत परमात्मा ।
अनुसूये लागी दिले गा वचन । कलित येईन तुझ्या पोटी ।
झाली अनुसूया तीच अंबा सती । कलंकी श्रीपती तिच्या पोटी ।
वैजनाथ म्हणे खरे हे वचन । केले म्या येऊन दत्त रूपे ।।२४।।

भारत भक्ति हा सांप्रदाय जाण । केलास निर्माण कलंकीने ।
तरण्या अवघे जाणा हे मानव । दिला अनुभव स्वरूपाचा ।
जाती धर्म भेद येथे नोहे काही । गटव्यापी नाही कल्पनांते ।
वैजनाथ म्हणें अध्यात्मिक ज्ञान । तरावया जन सोपे केले ।।२५।।

जेथे देव आहे सगुण । प्रत्यक्ष हे जाण वैकुंठ गा ।
आळंदी पंढरी काशी सर्व कांहीं । तीर्थ येथे पाही घडताती ।
झाले जयालागी भक्तिचिया ज्ञान । जाईल कोठुन ऐसा वाया ।
वैजनाथ म्हणे भक्ति प्रेमापरी । बांधुनी श्रीहरी जातसे गा ।।२६।।

अमृतानुभव बारे हा कथिला । ज्ञानदेवे केला रसगोड ।
निर्गणाचे ध्यान केले गा सगुण । केले गा निर्गुण सगुणाचे ।
परब्रह्माचिया व्हावया ओळख । वर्णियला देख वेदांत हा ।
वैजनाथ म्हणे अवताराविण । महत्त्व हे जाण नोहे कळे ।।२७।।

ज्ञानदेव पाठ हा समनापुरी । अठ्ठाविस परी अभंगाचा ।
पांडुरंगाचिया ध्यान हे सगुण । ज्ञानदेवे जाण प्रगटले ।
शके अठराशे अठ्ठयांशी गा आहे । संवत्सर पाहे पराभव ।
वैशाख वद्य आज बुधवार । जाणा ही साचार त्रयोदशी ।
तये दिनी ज्ञानदेव पाठ पूर्ण । साक्षात्कार जाण रूपे केला ।
वैजनाथ म्हणे करिता पठण । त्रिविध हे जाण ताप जाती ।।२८।।

द्वापारात पांडवांच्या कृष्ण घरी । पांडुरंग परी तेणे नाम ।
कलियुगी तोची मी गा ज्ञानेश्वर । जाणा अवतार पांडुरंग ।
संत रूपे भास दाखवूनी परी । केली ज्ञानेश्वरी कथन गा ।
देव अणि भक्त नटुनी आपण । परब्रह्म जाण वेगळा मी ।
वैजनाथ म्हणे परम गा स्थिती । कलंकी श्रीपती वदलो मी ।।२९।।

।। श्री कलंकी देव वैजनाथ कृत ज्ञानदेव पाठ संपूर्ण ।।