दत्त पाठ

।। श्री कलंकी देव वैजनाथ कृत दत्त पाठ ।।

दत्त दत्त म्हणा दत्त दत्त म्हणा । विष्णुमय जाणा दत्त सर्व ।
त्रिगुणात्मक हा दत्त मूळ आहे । ब्रम्ह-विष्णू पाहे शिवरूप ।
दुर्वास रुपे गा अनुसये घरी । दत्त जाणा परी वरदाने ।
वैजनाथ म्हणे भक्तासाठी जाण। भेटही सगुण दत्ताचीया ।।१।।

कलियुगीं होशील तू अंबा सती । येईन श्रीपती तुझ्या पोटी ।
अनुसये लागी दिले गा वचन । पुढे भगवान कलंकी मी ।
विष्णुमय दत्त माझा अवतार । पूर्ण हा साचार परब्रम्ह ।
वैजनाथ रूपे मी गा नारायण । शेवट सगुण भेट माझी ।
वैजनाथ म्हणे वचना प्रमाण । कलंकी मी जाण आता झालो ।।२।।

चालू युग चौकडीत अवतार। दहा हे साचार ईश्वराचे ।
अंबऋषी चिया भक्तीसाठी जाण । आलो नारायणा गर्भवासी ।
कलीयुगी कलंकी ह्या अवतारे । शेवटची बारे भेट माझी ।
वैजनाथ म्हणे धर्म कार्या राहे । येणे माझे पाहे युगायुगी ।।३।।

अनूसये पोटी दत्त अवतार । प्रथम साचार त्रेतायुगी ।
श्रीपाद वल्लभ बारे अवतार । दुसरा साचार यती रुपे ।
नरसिंह सरस्वती अवतार । तिसरा साचार संन्यासी हा ।
सर्वज्ञ रूपाने गाणगापुरात । झालो मी कलीत सत्पुरुष ।
विष्णुमय दत्त कलंकी साचार । आता अवतार चवथा हा ।
वैजनाथ म्हणे येथुनिया नाही । पूर्ण माझा पाही अवतार ।।४।।

आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा । प्रथम दत्ताचा अवतार ।
शिवरूप दत्त दुर्वास हा आहे । तेथुनिया पाहे नाथ पंथ ।
त्रेतायुगी जन्म अनुसये घरी । मूढ जन परी तारावया ।
वैजनाथ म्हणे मालिका निर्माण । सिद्धांचिया जाण तेथुनिया ।।५।।

आहे कलियुगी दत्त हे दैवत । सर्वथा जागृत सर्व ठायी ।
चालवी हा विश्वाचिया कारभार। व्यापक साचार राहूनिया ।
मूळ दत्त जाणा वेगळाची आहे । ब्रह्मवेत्ता पाहे जोका असे ।
वैजनाथ म्हणे दिलीगा ईश्वरे । विश्व सत्ता बारे हाती यांच्या ।।६।।

प्रती ईश्वर गा दत्त जाण आहे । ब्रह्मवेत्ता पाहे बारे मूळ ।
परब्रह्म सत्ता मुळ गा निर्गुण। निराकार जाण बारे आहे ।
तिने ब्रह्मवेत्ता करूनि निर्माण । विश्वसूत्र जाणा हाती दिले ।
वैजनाथ म्हणे अंत जाणा नाही । मूळ जाणा पाही सत्तेचिया ।।७।।

होता अधर्म गा जाणा महिवरी । परब्रह्म परी धावतसे ।
भक्तासाठी रूप प्रत्यक्ष सगुण । भेट होय जाण आवतारे ।
वेळेऐसी संत मालिका निर्माण । ईश इच्छे जाणा युगायुगी ।
वैजनाथ म्हणे संताने सगुण । भक्ती लोकी जाण प्रगटते ।।८।।

दत्त आणि परब्रम्ह सत्ता पाही । वेगळी ते नाही शोधियल्या ।
जीव शिव तत्वे नटला आपण । परमात्मा जाण एकलाची ।
भक्तासाठी रुपे नानाविध जाण । करी हा धारण परमात्मा ।
वैजनाथ म्हणे देती संत जन । ओळख करून सगुणाची ।।९।।

वेद ब्रह्म वाक्य गीता निरुपण । अवताराविन होत नाही ।
तयासाठी रूप प्रत्यक्ष सगुण । युगायुगी जाण अवतारे ।
तत्वमसी महावाक्याचा सिद्धांत । येता भगवंता प्रगटे गा ।
वैजनाथ म्हणे अध्यात्मिक ज्ञान । ईश्वरावाचून खरे नाही ।।१०।।
  
नामरूपा माजी मतभेद होता । येणे भगवंता लागतसे ।
मूळ परब्रम्ह एकची गा आहे । आवतर पाहे नानाविध ।
उपासने प्रमाण गा साक्षात्कार । भक्तासी साचार अनुभव ।
नामरूपे भेद भासतसे जरी । परब्रह्म परी बदलेना ।
वैजनाथ म्हणे आत्मज्ञानाविना । ओळख ही जाण होत नाही ।।११।।

शास्त्र वेद बारे आणिक पुराण । झाले गा निर्माण देवापाशी ।
तयाचिया सत्य ज्ञान हे लोपता । धाव भगवंता घेणे लागे ।
पूर्ण परब्रह्म बारे आल्याविण । खरे निरुपण होत नाही ।
वैजनाथ म्हणे भक्तासाठी ज्ञान । देई भगवान युगायुगी ।।१२।।

मानव जन्म हा सर्व एक आहे । ईश्वर हा पाहे सर्वा एक ।
जाती धर्म भेद मूढ वाया जाती । जाणा विसरती खऱ्या देवा ।
भक्ती प्रेमाविण निघणे गा वारी । मानवाचे परी होत नाही ।
वैजनाथ म्हणे पावे भगवंत । ज्या ठाई अद्वैत भक्ती आहे ।।१३।।

ॐ हे मूळाक्षर स्वरूपाचे आहे । परब्रम्ह पाहे सत्तेचिया ।
अकार उकार आणिक मकार । व्यापक साचार रुप याचे ।
अर्धमात्रा मध्यबिंदू जाणा आहे । निरंजन पाहे स्थान याचे ।
वैजनाथ म्हणे यातुनी श्रीहरी । कारभार करी विश्वाचिया ।।१४।।

पंथ सांप्रदाय भेद जाणा पाही । आवडत नाही मज देवा ।
तयासाठी रूप धरी मी सगुण । भक्तासाठी जाण युगायुगी ।
करुनी प्रगट भक्ती गा अद्वैत । शांतता जगात आणितसे ।
वैजनाथ म्हणे धर्म कार्या राहे । येणे माझे पाहे बारे ऐसे ।।१५।।

भारत भक्ती हा संप्रदाय जाण । कलीत निर्माण बारे केला ।
तारावया मूढ अवघे मानव । कलंकी मी देव झालो दत्त ।
अध्यात्म तत्त्वाचे मूळ बीज बारे । केले अवतारे प्रगट गा ।
वैजनाथ म्हणे भूमिकेचे ज्ञान । दिले म्या येऊन भक्तासाठी ।।१६।।

झाल्या प्रणवात वेद वाचा चारी । नामरूप परी जन्मा आले ।
दिली संतनिया करुनी ओळख । ओमकार ह्या देख स्वरूपाची ।
संतापासूनिया भक्तीचिया ज्ञान । आले प्रगटुन सर्व काही ।
वैजनाथ म्हणे नसता हे संत । नोहे भगवंत सापडता ।।१७।।

त्रयमूर्ती दत्ते अनुग्रह केला । विष्णुमय झाला बारे दत्त ।
पूर्व युगींचिया वचना प्रमाण । कलंकी हा जाण अवतार ।
कलीमाझी लोपलें गा सत्य ज्ञान । वाया गेले जण भक्तिमार्गी ।
वैजनाथ म्हणे देण्या शिकवण । आलो मीगा जाण वेळे ऐसी ।।१८।।

ईश्वराचे नाम सर्व एक आहे । कोणतेही पाहे जपलिया ।
नामरूपी जेका भेद गा धरिती । तरणे कल्पाती नोहे याचे ।
सर्व नामी एक आहे मी ईश्वर । आत्मा सर्वेश्वर व्यापीयलो ।
वैजनाथ म्हणे संता हे कळले । सर्वज्ञ बनले तयामुळे ।।१९।।

मोक्षदाता गुरु भेटलियाविण । प्राणी मुक्त जाण नोहे बने ।
भक्तिमार्गाचिया देई हा विचार । सद्गुरू साचार भेटला ज्या ।
सद्गुरुने रूप कळे गा सगुण । ध्यान हे निर्गुण आकळे गा ।
वैजनाथ म्हणे जयाचे सुकृत । ऐशिया भेटत मोक्षदाता ।।२०।।

ईशसत्तेवरी ताबा जाणा पाही । चालत गा नाही कवणाचा ।
भक्तीप्रेमाचिया देवा हा बांधीला । अधिन हा झाला साधुसंता ।
आवडेना देव कर्मठ हे पण । भेदाभेद जाण कदा कोठे ।
वैजनाथ म्हणे आधिन श्रीपती । दृष्टी सर्वाभूती सम ज्याची ।।२१।।

अनंत स्वरूपे मीगा नारायण । भक्तासाठी जाण नटलोगा ।
जैसी उपासना तैसे साक्षात्कार । माझिया साचार अनंतगा ।
भक्ता प्रमाण गा होता मी ईश्वर । व्यापक साचार अधिष्ठान ।
वैजनाथ म्हणे परब्रम्ह उरे । एक मूळ बारे स्वरूपगा ।।२२।।

कलियुगी दत्त प्रत्यक्ष सगुण । विष्णुमय जाण मीगा आता ।
मायावि स्वरूपे करुनि धारण । त्रिभुवनी जाणं फेरी माझी ।
भक्ता प्रमाण गा गुप्त भेटी राहे । उपासना पाहे ज्याची जैसी ।
वैजनाथ म्हणे कलंकी ह्या आहे । अवतार पाहे निमित्तगा ।।२३।।

गाणगापुरगा आणिक पंढरी । घडे तीर्थ परी येथे सर्व ।
जयालागी रूप कळले सगुण । जाईल हा कोण बारे वाया ।
कलियुगी दत्त भेटी माझी आहे । शेवटची पाहे विष्णुमय ।
वैजनाथ म्हणे भेटले ज्या संत । खुण त्या कळत सगुणाची ।।२४।।

रामकृष्ण दत्त पांडुरंग परी । बारे मी श्रीहरी असे एक ।
नोहे नामरूपी भेद जाणा काही । परब्रम्ह पाही मीगा एक ।
संताविण नोहे कळे माझी खुण । सगुण निर्गुण कैसे आहे ।
वैजनाथ म्हणे सत्संगावाचून । कदा आत्मज्ञान होत नाही ।।२५।।

कलियुगी हरी दत्तनाम एक । अवघ्या तारक जाणा आहे ।
नाम संकीर्तन ठायी मी श्रीहरी । रहातसे परी अखंडगा ।
परी भेदाभेद जेथे जाणा आहे । साक्षात्कार पाहे नोहे माझा ।
वैजनाथ म्हणे भक्ती जी निष्काम । मी पुरुषोत्तम तेथे राहे ।।२६।।

षड्विकार गा ऐशाचे नासती । नाम उच्चारिती जे का दत्त ।
परी भक्तीप्रेम शुद्ध झाल्याविण । अनुभव जाण येत नाही ।
प्रेमळ भक्तांची वाट सदा पाहे । मीगा तेथे राहे परमात्मा ।
वैजनाथ म्हणे भक्तांचा निर्धार । पाहे मी ईश्वर सर्वकाळ ।।२७।।

झाला दत्त पाठ हा समनापुरी । अठ्ठावीस परी अभंगाचा ।
वाढावया लोकी भक्ती गा सगुण । दत्त पाठ जाण निर्मियला ।
शके अठराशे सत्यांशी साचार । नाम संवत्सर विश्वासुगा ।
फाल्गुन शुद्धगा अष्टमी ते आहे । सोमवार पाहे दिवस हा ।
तये दिनी भक्ता प्रगट दर्शन । माझिया येथून त्रैमूर्तीचे ।
शुद्ध भावे जे का पाठ हा पढती । नोहे ऐशा प्रती मीगा दूर ।
वैजनाथ म्हणे भाग्य भारताचे । सगुण दत्ताचे येणे माझे ।।२८।।

ब्रम्हाविष्णुशिव त्रिगुण ह्या ज्योती । जाणा झळकती एकत्रगा ।
कलियुगी ध्यान प्रत्यक्ष सगुण । कलंकी ह्या जाण अवतारे ।
दुर्वास दत्ताने झालो मी साकार । बारे गा साचार परब्रम्ह ।
वैजनाथ म्हणे मूळ दुजे नाही । आहे तोचि पाही दत्त आहे ।।२९।।

।। श्री कलंकी देव वैजनाथ कृत दत्त पाठ संपूर्ण ।।