ध्यानधारणा आणि भक्ती रहस्य

ध्यानधारणा आणि भक्ती रहस्य अर्थात भक्तीचे वेड

।। ॐ ।।
।। श्री सद्गुरु दुर्वास दत्त प्रसन्न ।।
प्रस्तावना

भक्त जनांचिया घ्यावया कैवार । धावे मी ईश्वर युगायुगी ।
दत्त दुर्वासाने झालो मी साकार । आता अवतार कलंकी हा ।
वैजनाथ रुपे बारे ज्ञान ज्योत । झालो भगवंत कलियुगी ।
वैजनाथ म्हणे ज्ञानी भक्तविण । नोहे मी सगुण लाभे कुणा ।।

(कलंकी देव कृष्ण पाठ – २८)

मूळारंभी श्री. गजानन व ज्ञानमाता सरस्वती चरणी वंदन करुन हे प्रास्ताविक लिहीत आहे. साधू संत व सती – साध्वींच्या ह्या अध्यात्मिक भारत भूमित अनेक महापुरुषांचा जन्म झाला व त्यांनी ह्या मानवजातीला अमोलिक असे अध्यात्मिक ज्ञानभांडार प्रदान केले.
नरदेह हा सर्वात उत्तम आहे. ह्या देहातून मानवाला आपल्या षडविकारांवर नियंत्रण आणता येते. आपली स्वत:ची ओळख होऊन ‘मी’ चा प्रश्न सोडविता येतो. मानव जन्माच्या चार अवस्था आहेत त्या म्हणजे (१) बध्द (२) मुमुक्षु (३) साधक (४) सिध्द होत. ह्या चार अवस्थांमध्ये अध्यात्मिक आठ भूमिका मोडतात त्या पुढीलप्रमाणे –
१) बध्द :- सर्व सामान्य मानवाची पशुवत अवस्था फक्त प्रापंचिक ज्ञान.
२) मुमुक्षु १ :- पंचवीस टक्के ईश्वराविषयी ज्ञान, भक्ती व पंचाहत्तर टक्के लक्ष संसाराकडे केंद्रीत.
३) मुमुक्षु २ :- पन्नास टक्के लक्ष ईश्वरी भक्तीकडे, पन्नास टक्के प्रपंचाकडे.
४) सत्पुरुष (साधक योगी) :- परमार्थातील ह्या भूमिकेत रिध्दी-सिध्दी प्राप्त होतात. ध्यान समाधीयोग साधला जातो. काही साधक ह्याच रिध्दी सिध्दीच्या आकर्षणामुळे सदर अवस्थेत अडकून पडतात.
५) संत :- ह्या भूमिकेत ख-या ईश्वरी साक्षात्काराला सुरुवात होऊन स्वानंद प्रगटतो. अभंग, प्रासादिक वाणी बाहेर पडते. उदा. संत रामदास स्वामी, तुकाराम महाराज, संत एकनाथ, संत नामदेव, साध्वी मिराबाई इत्यादी.
६) सद्गुरु :- ह्या भूमिकेत ब्रह्मनाद ध्वनी कानी प्रगटून सत् चित आनंद प्रगट होतो. चित-प्रकाश दर्शन होऊन सिध्दावस्था प्राप्त झाल्याने दुस-याचा गुरु होऊन नामस्मरण इत्यादि मार्गदर्शन करण्याचा अधिकार प्राप्त होतो. उदा :- रामकृष्ण परमहंस, अक्कलकोट स्वामी, साईबाबा, गजानन महाराज, नित्यानंद स्वामी इत्यादी.
७) ब्रह्मवेत्ता :- या भूमिकेत ब्रह्मानंद प्रगट होतो. ब्रह्मसुत्राचा अधिकारी परुष, ब्रह्मांड चालवू शकतो. प्रति ईश्वर अशी सर्वोच्च अवस्था मानवाला प्राप्त होऊ शकते. उदा :- श्री गुरुदत्त, याज्ञवल्क्य, शुकदेव, कपिल मुनी, नारद मुनी इत्यादी.
८) परब्रह्म :- मूळ ब्रह्म माया ह्या अवस्थेत राहतात. परमानंद अवस्था भोगून अभास अशी स्थिती. उदा. :- श्रीराम, श्रीकृष्ण, पशुराम, ज्ञानेश्वर, आदिशक्ती सीता, पार्वती इत्यादी शीव व शक्ती स्वरुपे.
वरील भूमिकांचे ज्या परमपुरुषाने वर्णन केले आहे ते आहेत ह्या कलियुगातील परब्रह्म अवस्थेतील महात्मे “श्री कलंकी ईश्वर वैजनाथ भगवान” ! ह्या परमपुरुषाचा रहिवास महाराष्ट्र भूमित सन १९१६ ते १९८७ च्या दरम्यान झाला. त्यांच्या प्रसिध्दी पराङमुख भूमिकेमुळे ते बहुतांशी मानवाजातीला अज्ञातच राहिले. फारच थोड्या सज्जनांनी त्यांना जाणले व त्यांच्या कार्यास मदत करण्याचा प्रयत्न केला. सध्या संत कलंकिनी बेबीनाथ माया यांच्या मार्गदर्शनाखाली काही भक्तगण त्यांच्या कार्याचा प्रसार करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
परंतु हल्लीचा कलियुगाचा काळ म्हणजे आधुनिक विज्ञानाचा. अण्वस्त्रांच्या अघोरी शोधांचा, फॅशन युगाचा व भोगवादी अप्पलपोटी मानवांचा आहे. अशा ह्या घोर कलीयुगात ख-या विभुतींना विचारतो तरी कोण? चार्वाकवादी ह्या मानवाला कोणाला आत्मसाक्षात्कार हवाय बरे? इथे फक्त ईश्वर साध्य नव्हे तर साधन म्हणून पाहण्याचा बहुतांशी उपासकांचा कल. जिंदगी आहे तो पर्यत खा – प्या व मजा करा. कोणास ठाऊक मेल्यावर काय होते? अशीच विचारधारा ह्या कलीत जगभर दिसून येते. मात्र भारतीय संस्कृतीचा वारसा असलेल्या साधू संतानी ह्या घोर कलीतही मानवांना ज्ञानोपदेश देऊन वर काढण्याचा प्रयत्न केला व करत आहेत. त्यामुळे थोडीफार संस्कृती टिकून आहे. अन्यथा ह्या कोलाहलात जगाची अवस्था काय झाली असती व होईल हे ईश्वरच जाणे.
खरे पाहता स्त्री आणि पुरुष ह्याच मानवाच्या दोन जाती. व माणुसकी, समानता व विश्वबंधुत्व भाव हीच मूळ ईश्वराची शिकवण ! परंतु मानवाने आपल्या चालिरीती, रुढी परंपरा वेगवेगळ्या बनवून धर्माला आपापल्या मतांप्रमाणे नावे दिली. जसे हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन, बौध्द, पारशी, जैन इत्यादी. ईश्वराने प्रत्येक धर्मात त्या त्या लोकांच्या उन्नतीकरीता प्रेषित पाठविले. महंमद पैगंबर, गौतम बुध्द, वर्धमान महावीर, झरतृष्ट, गुरु नानक इत्यादी. ईश्वर प्रेषितांनी आपणा सर्वांना मानवतावादाची शिकवण दिली. परंतु मानवांनी आपल्या स्वार्थ बुध्दीने धर्म भेद, पंथभेद वाढवून अखंड मानवजातीत तेढ निर्माण केली व त्यामुळेच धर्माचे खरे मर्म विसरले गेले, अधर्म वाढून धर्माला ग्लानी आली. ती काढण्याकरिताच ह्या मानवेतचा कलंक धुवून काढण्यासाठी मूळ ईश्वराने ह्या घोर कलीत श्री संत रामदास स्वामी यांच्या “अनाथा दीनाकारणे जन्मताहे । कलंकी पुढे देव होणार आहे “. ह्या उक्तीनुसार वैजनाथ नामे कलंकी अवतार धारण केला व ह्या मानवजातीपुढे विश्वधर्माची शिकवण देणारे तत्वज्ञान प्रगट करुन अखंड मानवजातीसाठी सत्यज्ञानाचे ज्ञानभांडार निर्माण करुन ठेवले आहे. हे सर्वांच्या दृष्टीने खरोखरच महत्भाग्य आहे. हा कलंकी परब्रह्माचा ह्या चौकडीतील शेवटचा अवतार ! त्यांच्या ब्रह्मनाद ध्वनीतून बाहेर पडलेले दोन ग्रंथ ह्या पुस्तिकेत आम्ही प्रकाशित करत आहोत ते म्हणजे ‘ध्यान धारणा’ व ‘भक्तीरहस्य’ अर्थात भक्तीचे वेड.
‘ध्यानधारणा’ ही नानाविध तर्हेने करण्याचा मनुष्य प्रयत्न करतो. परंतु कलंकी वैजनाथ भगवंतानी ह्या ग्रंथात मूळ ईश्वराकडे अवधान ठेवून ध्यानधारणा कशी साधायची हे स्पष्टपणे सांगितले आहे. प्रत्येकजण कुठले ना कुठले ध्यान करीत असतो. जसे कुणाला पैशाचे, तर कुणाला स्त्रीचे, तर कुणाला सत्तेचे, तर कुणाला आणखी कशाचे ध्यान लागलेले असते. परंतु आत्म्याचे ध्यान लागण्यासाठी काय करावे व जनता जनार्दनातला ईश्वर ओळखून आपल्या सद्गुरुकृपेने आत्म्याचे ध्यान कसे साधून घ्यावे ह्याचे प्रस्तुत १९५ वचनांच्या ह्या छोट्याशा ग्रंथात विवेचन केले आहे. गद्यमय मराठी भाषेतील हा ग्रंथ मननीय व आचरणीय असाच आहे. तो परब्रम्हाचा प्रसाद आपल्या जीवनाचे कृतार्थ करणारा आहे.