
।। श्री कलंकी बेबीनाथ माया कृत नवनाथ पाठ ।।
नाथ नाथ म्हणा नाथ नाथ म्हणा । पूर्ण कोटी जाणा सिद्ध पंथा ।
झाला तो जागृत पंथ संप्रदाय । कृपा देई तया दत्तात्रय ।
दत्तांनी ही केली मालिका निर्माण । नाथ पंथ जाण सांप्रदाय ।
नाथ बेबी म्हणे तिच जाणा आली । दत्तांनिया केली कृपा पुन्हा ।।१।।
कलंकी गा रुप दत्त पुन्हा आले । निर्गुणाचे झाले सगुण हे गा ।
कारवाया जाणा मालिका ही सिद्ध । केले ठाई बोध जागृत गा ।
कृपा ही दत्तांची जागृती गा साची । माया ही त्यांची केली त्यांनी ।
नाथ बेबी म्हणे अमर ही वेली । नाही सुकू दिली माउलीये ।।२।।
पूर्वी नाथ मुनी पर्वत शिखरी । तप ते आचारी शुद्धीने गा ।
कदा नाही जाणा दंभाचारी भाना । शुद्धी ती जाणा होती तयांची ।
निरअहंकारी सेवा त्यांनी केली । शक्ती ती आणिली तपाने गा ।
नाथ बेबी म्हणे मुनी जालिंदरे । ब्रह्म ते बारे दावियले ।।३।।
करिती जे बारे नाथ पंथी भक्ती । तया ही प्रचिती ठाईच गा ।
शुद्ध ती गा करावी भक्ती गा तयांची । याने गा मनाची मती बाणे ।
आला जरी मना दुष्ट हा विचार । काढिती साचार सिद्ध मुनी ।
नाथ बेबी म्हणे मुळ मंत्र जाणे । सिद्धांचीया भाने पामरि गा ।।४।।
बिजा गा पासुनी प्रेरणा करिती । नाथांचीया शक्ती भक्ती बळें ।
बिजा ती अंकुर आणिती गा स्थिती । मुळ पाहे देती अनुभवा ।
जो गा नाथ पंथी बारे जाणा झाला । नाही एैसा गेला वाया जगी ।
नाथ बेबी म्हणे सिद्ध मुनी जाणे । सत्य त्यांनी भाने दिली भक्ती ।।५।।
नाथांची शक्ती योग माया स्फूर्ती । प्रेरणा ती देती वेळे ऐशी ।
नाथ यती योग मायेने फिरती । गमन ती कर्ती कळा देखा ।
कलियुगी आले बारे नाथ यती । संसारी भासती ठाई ठाई ।
नाथ बेबी म्हणे राहिले अपूर्ण । आले होण्या पूर्ण पाहे जगी ।।६।।
जालिंदरे मज कृपा जाणा केली । वैजनाथे दिली जाणा मज भेटी ।
शुद्ध तयांची जाणा ही गा शक्ती । बाणिली गा स्थिती मजलागी ।
सिद्ध मुनिंची गा कृपा ही झाली । पवित्र गा केली धारणा ही ।
नाथ बेबी म्हणे नाथांची संगती । मूळ ती प्रचिती देती ठाई ।।७।।
मागील गा जन्मी मुनी जालिंदरे । कृपा केली बारे मऊलीये ।
कलयुगीं जाणा वैजनाथ भाना । ब्रह्म विद्या ज्ञाना शिकवली ।
ब्रह्म मुळाक्षरी ब्रह्मच जोडीती । मूळ भानप्रती ठाईच गा ।
नाथ बेबी म्हणे नाथ सिद्ध योगी । ब्राम्ह्णा स्थिती भोगी युगा युगी ।।८।।
नाथ पंथी सेवा केली बारे जरी । वाया ती परी जायेची ना ।
जो गा सिद्ध भक्त आला जाणा कली । शुद्धी तया वेळी येतसे गा ।
सिद्धांची ती भक्ती वाया नाही गेली । जागृत ती झाली वेळोवेळी ।
नाथ बेबी म्हणे नाथ सिद्धा ज्ञाने । अध्यात्म गा भाने पाहे तेथे ।।९।।
सिद्ध नाथ यती वेदा बोलाविती । अज्ञान काढिती भक्तीचिया ।
नाम रुपा जाणा फरक भासती । परी ज्ञान देती एकचि ती ।
शक्तीचे भान बदलत नाही । आहे तेची ठाई राहे सदा ।
नाथ बेबी म्हणे घटा अनेक येति । परी ती गा शक्ती एकची गा ।।१०।।
नाथ शक्ति पुढे जोडत गा नाही । पाखंडी ती पाही मती ही गा ।
भक्तीने गा होती तया गाठी भेटी । राखती गा पाठी भक्तीचिया ।
नाथ सिद्ध पंथा जया गा आवडी । अमृताची गोडी पाहे तेथे ।
नाथ बेबी म्हणे मालिका ही सिद्ध । देणार गा बोध पाहे पुढे ।।११।।
गुरु परंपरे केली गा जागृती। सिद्ध नाथ स्थिती पाहे ही गा ।
नाथ नामे मती शुध्द ती गा होती । पाहे ती बाणती ब्राम्ह्णा स्थिती ।
सिद्ध कोटी माजी सिद्ध ती राहती । बोध ती गा देती सकळांसी ।
नाथ बेबी म्हणे सिद्ध गा संगती । सन्मार्ग गा देती भक्ती प्रेमे ।।१२।।
नाथ नामाची जया लागली गोडी । ऐशा ती आवडी सिद्ध पंथी ।
नाथ नामाचा गा उच्चार करिती । भव गा तुटती पाश देखा ।
नाथ पंथी शिक्का अमृती हा लेख । पाडितसे फिक्का अज्ञानासी ।
नाथ बेबी म्हणे संत तेची जाणे। उणीव न भा ने कृपे त्यांच्या ।।१३।।
किती गा करिती पाही जपा तपा । परी मार्ग सोपा नाही सोपा ।
सिद्ध ती स्फुर्ती मार्ग गा आणिती । सत्य निती देती भक्ताशी गा ।
नितीमत्ता धरा नाथ नाम स्मारा । चुकवा तो फेरा चौऱ्यांशीचा ।
नाथ बेबी म्हणे सिद्धाने तारीले । सुखी मज केले संसारी या ।।१४।।
नाथ मुनी ज्ञान अध्यात्माची खाण । पवित्र ते भान करीताती ।
नाथ संगती मूळ मार्ग नेणती । अज्ञान फिटती मनाचे गा ।
शुद्धीने करावी नाथ सेवा भावी । पवित्रता ठेवावी देहाची गा ।
नाथ बेबी म्हणे जाणीव मज जाणे । दिली या गा भाने नाथ सिद्धे ।।१५।।
नाथ मालिका ही दत्तांनी आणिली । वाढविली वेली सिद्ध पंथी ।
सिद्ध नाथ पंथी पवित्र ही स्थिती । बाणवली मती दत्तांनि ही ।
ब्राम्ह्णा स्थिती माजी गूढ विद्या जाणी । पवित्रता भानी देतसे गा ।
नाथ बेबी म्हणे ब्राम्ह्णा स्थिती भानी । बाणतसे जाणी पूर्णत्व गा ।।१६।।
नाथ मालिका ही पूर्व युगि झाली । कलियुगी झाली कलंकी गा ।
जया अनुभवली सिद्ध ही स्थिती । तया ही प्रचिती आत्मरुपा ।
मुळ ती गा कर्ती सिद्ध या नाथांची । देती जाणा साची प्रचिती ही ।
नाथ बेबी म्हणे प्रचिती ही झाली । कृपे नाथे दिली मजलागी ।।१७।।
जीवा शिवाचे होता हे मिलन । चेतना ही जाण खुलतसे ।
चित्त चेतनेने खुलूनिया भाने । शुध्द तेथे म्हणे बीज मंत्र ।
नाथांच्या या कृपे होताती लेखे । दाखविती शिक्के भक्तीचे हे ।
नाथ बेबी म्हणे नाथांची ही कृपा । मज बारे रुपा लेखिले गा ।।१८।।
चित्त चेतनेने खुलती ही गा भाने । मुळ कर्ते जाणे नाथ सिद्ध ।
चित्ता गा पासुनि चेतना वाढती । शक्ती यात देती प्रकाश तेजाचा ।
दृष्टी तेज प्रकाशित कृपेने होती । शक्ती ती जाणती नाथांची गा।
नाथ बेबी म्हणे शक्ती तेज जाणे । नाथांच्या या भाने सदा राहे ।।१९।।
ॐकारापासुनी बिजा ती धारणा । बिजा ती प्रेरणा नाथ कृपे ।
धारणा ही पाही मायिक मानवी । परी यात भावी शक्ती कला ।
जाणता तोची गा जाणतो या नाथा । मार्ग मूळ पंथा जाणीतसे ।
नाथ बेबी म्हणे जाणता तोची जाणे । मार्ग पाहे त्याने दिला हा गा ।।२०।।
जिव्हा माझी बोले निमित्य गा भले । कर्ता तो गा खुले वेदाला गे ।
ब्रह्मा गा पासुनी मुळ वेद पाही । तेथेची गा राही उत्पत्ती गा ।
उत्पत्ती व्यवहार चार खाणी केला । विस्तार तो झाला जगभरी ।
नाथ बेबी म्हणे ब्रह्म माया जाणे । विस्तार हा म्हणे जगाचा गा ।।२१।।
ॐ पासुनि मूळ अक्षरे जोडिली । विधात्याने केली जगसेवा ।
देहरूपी जमिनी बिजा प्रेरीली । अंकुरा आणिली तयांनी ही ।
निसर्ग रुपे त्यानेच गा धरिली । माया ती प्रेरिली जगभरी ।
नाथ बेबी म्हणे चराचरी भाना । भरलासे जाणा ईश्वर हा ।।२२।।
ईश्वरी ही स्तुती नाथांनी गायली । जगी वाणी दिली उपदेश ।
नाम उच्चार हा जपुनी दाविला । साधीली ती कळा ब्राम्ह्णा स्थिती ।
यांच्या नामे जप करु तुम्ही आम्ही । उद्धारुन पाही जाऊ जगी ।
नाथ बेबी म्हणे सिध्दंची ही कला । त्याचा तोची भला जाणतसे ।।२३।।
नाथ चरणाची जाणा ही धुळी । पाही उद्गारली कृपे त्यांनी ।
नाही ठेविला हा भेद भाद मनीं । शुद्ध मज ध्वनीं दिली पाहे ।
कृपा तयांची गा जाणा मजवरी । स्वयंभू लहरी दिली मज ।
नाथ बेबी म्हणे गुरु दयाघना । कृपा मज जाणा करितसे ।।२४।।
गुरु माझे जाणा पूर्व जन्मी भाना । जालिंद्र गा जाणा होते मुनी ।
त्यांनी कृपा केली मागील गा जन्मी । दाखविले मर्मि अध्यात्म गां ।
ठेविले गा नाही दुजे भाव मनी । प्रकृती ती जाणी केली शुद्धी ।
नाथ बेबी म्हणे गुरुकृपे जाणे । भेटी झाली भाने परब्रम्ही ।।२५।।
मिळविले मज शुध्द चैतन्याशी । दिली आत्म्याशी गा साक्षा ही ।
नाही ठेवली गा भाव दूजे मती । शुद्ध केली प्रिती भक्तिने गा ।
मायिक ही कुढी शडरिपू मुढी । वासना ही खोडी अज्ञानाची ।
नाथ बेबी म्हणे सिद्ध मुनी गुरु । पैलहेगा पारु उतारु मज ।।२६।।
कृपाळू दयाळू नाथ ही माऊली । तारितसे वेळीं भक्ति प्रेमा ।
शके एकोनिशे वीस जाणा पाहे । संवत्सर राहे बहुधान्य ।
कार्तिक सोमवार कृष्ण त्रयोदशी । प्रदोष दिवशी पाहे हा गा ।
पूण्य तिथी महाराज ज्ञानेश्वर । होती तिथी थोर या गा दिनी ।
पूर्ण केला जाणा नाथ पाठ भाना । तल्लीन या जाणा राहुनिया ।
नाथ बेबी म्हणे माउलिये नाथे । वाचका ते श्रोते करा कृपा ।।२७।।
केले अठ्ठावीस बारे या अभंगा । वाहिली गा गंगा कृपेची ही ।
शुद्ध भावे जे का पठण की करिती । सुखी बारे होती संसारी या ।
गुरु शिष्य जाणा मिलन हे होती । कृपा जाणा होती भक्ता घरी ।
विश्वास हा ठेवी नाथ मुनी वरी । भव भिती परी हारितसे ।
नाथ बेबी म्हणे शुद्धीचे हे धन । अमर गा भान भक्त सवे ।।२८।।
टिप : पाठ नंतर म्हणावयचा अभंग
मिळाली ही ज्योती । गुरु शिष्या प्रीति । नाचती गा आनंदे । देव भक्ती ।
नाथ पाठ म्हणा । मुखी या गा खुणा । सुखी करी संसारी । भाना या गा ।
नाथ बेबी म्हणे । शुद्ध याचे गुणे । मिळविले म्हणे । नाथ पाठे ।।
।। श्री कलंकी बेबीनाथ माया कृत नाथ पाठ सम्पूर्ण ।।
