श्री पूर्ण परब्रम्ह कलंकी अवतार ईश्वर वैजनाथ भगवान कृत
शुद्ध अंतस्फूर्तीतून स्फूरलेली सिद्धांत वचने
।। ॐ ।।
।। श्री सद्गुरु दुर्वास दत्त प्रसन्न ।।
प्रस्तावना
पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेंन् स्वयंम्
व्यासेन ग्रंथिताम् पुराण मुनिना मध्ये महाभारतम् ।।
अद्वैतांमृत वर्षिणी भगवती मष्टा दशा ध्यायिनी ।।
मबत्त्वां मनु संदधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम् ।।
(गीता महात्म्य)
अर्जुनाला निमित्तमात्र करून सांगितलेल्या श्रीमद भगवदगीतेचे महात्म्य काही औरच आहे. पुराण महर्षि व्यासमुनी यांनी महाभारतात अंतर्भूत केलेले हे नवनीत आहे. हा अद्वितीय ग्रंथ अद्वैतरुपे अमृताचा वर्षाव करणारा व भवसागरातून पैलतिरी पोहचविणारा आहे. याच्या वाचनाने, मननाने व चिंतनाने कुणाचेही कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, अशी ही गीतेची थोरवी काही आगळीच आहे.
गीतेचा जन्म विश्वारंभी ओंकारापासून झाला. भूमंडळावर अवतार धरून परमेश्वर वेळेप्रमाणे गीता सांगू लागला. भगवदगीता ही परमेश्वराचे आत्मनिवेदन व विश्वरूपदर्शन आहे. कुणाचे तरी निमित्त करून परमेश्वर आपली गीता वर्णन करीत असतो. चालू युग चौकडीत परमेश्वराचे दहा अवतार झाले. चार मायावी स्वरुप धारण करुन तात्पुरते झाले व सहा मानवात अयोनी संभव मायावी स्वरुपाने प्रगट झाले. वेळेप्रमाणे गीता मार्गदर्शन परमेश्वराला प्रत्येक अवतारात करावे लागले. मानवाचे मन अधोगतीला जाऊन पोहचल्यानंतर परमेश्वराला साकार व्हावे लागते. प्रत्येक अवतारातले कार्य सज्जनांचे व भक्तांचे रक्षण , असुरांचे निर्दालन, पतिव्रता धर्माचे मार्गदर्शन व सद्धर्म स्थापना हे होय.
गीता हे परमेश्वराचे विश्वरुप विराट दर्शनच आहे. हे युगायुगात वेळेप्रमाणे परमेश्वराने अवतार धरल्यानंतर प्रगट होत असते. गितेत परमेश्वराचे आत्मनिवेदन होते व विश्वरुप दर्शन घडते. विश्व हे परमेश्वराचे विराट स्वरुप आहे. निर्गुण निराकारातुन भानाठायी स्पंद स्फुरुन ॐ हे मुळाक्षर जन्माला आले तेच ॐकार विराट स्वरुप बनले. साडेतीन मात्रा त्याचा विस्तार झाला, मध्यबिंदूस्थान ब्रह्म आहे व अर्धमात्रा माया बनली. अकार ब्रह्म उकार विष्णू मकार महेश अशा सत्त्व, रज, तम ह्या त्रिगुण तत्वाने परमात्मा विश्वाचा कारभार पहातो. विश्व विस्तार हा अनंत कोटी ब्रह्मांडाचा आहे. ब्रह्मांडाप्रमाणे सुत्रधारी नेमून परमेश्वर विश्वाचा कारभार पहातो. ब्रह्मकल्पांत विश्वभास लयाला जाऊन पंचमहाभुते एकमेकाला गिळून शून्याकार स्थिती होते व ब्रह्म परब्रह्म निश्चल स्वरुप उरते. परमेश्वरासभोवती सिद्ध मुक्तात्मे जाणीव स्वरुपात असतात. भानाठायी स्पंद स्फुरल्यानंतर ब्रह्म जागृत होऊन पुन्हा विश्व भासमान होऊन कारभार चालू होतो. असे श्री. कलंकी देव म्हणतात. असे हे विराट स्वरुप विश्वरुप दर्शन कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला गीतेने आत्मनिवेदनाने घडविले.
गीता म्हणजे परमेश्वराची आत्मप्रचिती होय. त्यात वेळेप्रमाणे मानवांना कर्तव्य मार्गदर्शन व सत्यसदाचर सांगितला जातो. गितेचे रुपक युगायुगात बदलत रहाते. फक्त अध्यात्म बदलत नाही. अधर्म अराजकावेळी परमेश्वराने अवतार धरल्यानंतर वेळेप्रमाणे गीता मार्गदर्शन होत असते. परमेश्वर ही गीता ग्रंथित करुन भक्तजनांना विश्वरुप दर्शन घडवितो, त्यामुळे परमेश्वराचे विराट स्वरुप भक्तजनांना कळते. कृष्णावतारात अर्जुनाच्या निमित्ते गीता सांगितली गेली. नवव्या बौद्धरुपी ज्ञानेश्वर अवतारात ज्ञानेश्वरीच्या रुपाने पुन्हा गीता मार्गदर्शन केले व ह्या घोर कलियुगात परमेश्वराचा शेवटचा १० वा कलंकी अवतार वैजनाथरुपे अयोनी संभव झाला आहे. ह्या अवतारात परमस्थिती गीतेच्या द्वारे अखिल मानवजातीला उद्देशून हे गीतांमृत ग्रंथित केले आहे. हा ग्रंथ एकूण ७७७७ सिद्धांत वचनांचा आहे. त्यापैकी २४७७ सिद्धांत वचने (क्रमांक ५३०१ ते क्रमांक ७७७७) ह्यामध्ये श्रीकृष्णार्जुन संवाद आला आहे. ह्या संवादात मानवी जीवनातील अनेक शंका कुशंकांची उकल करण्यात आली आहे. वाचकांना ह्या भव्य महासागरातले थोडे तरी तीर्थ मिळावे, म्हणून २४७७ पैकी ११५५ सिद्धांत वचने आम्ही कलंकी परमस्थिती गीता भाग १ ह्या ग्रंथ पुस्तीकेत प्रकाशित केले होते. आता संपूर्ण गीता प्रकाशित करत अहोत.
परमेश्वराचा अवतार जर आला नसता तर आपणा मानवांना गीता कोठून बरे कळाली असती? कृष्णावतारात काळ हा कितीतरी हजारो वर्षांपूर्वीचा व तसेच ज्ञानेश्वर अवताराचा काळ हा ही सुमारे ८०० वर्षांपूर्वीचा, त्यामुळे तथाकथित सध्या प्रचलित असलेल्या गीतेत किती तरी बदल झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात त्यावेळेस श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला काय सांगितले हे त्याच्याशिवाय कोण बरे खरे सांगू शकणार ? त्यामुळे परब्रह्माचा अवतार आल्याशिवाय असे निरुपण होणे कठीणच ! विद्वान लोक शाब्दिक पांडीत्याने व विद्वत्तेने फक्त गीतेची इतर भाषेत भाषांतरे अगर विवेचन करु शकतील, परंतु मूळ गीता काय सांगितली गेली याचा अंत त्यांना कसा काय बरे लागू शकेल ? त्यासाठी परमेश्वरी अवतारच यायला हवा. परमेश्वरी अवतार हा अधर्म अराजकावेळीच साकार होतो. चालू युग चौकडीत परमेश्वराने अंबऋषिसाठी दशावतार घेण्याचे ठरविले. त्यापैकी कच्छ, मत्स्य, वराह, नरसिंह हे चार मायावी स्वरुप धारण करुन तात्पुरते येऊन गेले व सहा मानवात वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्धावतार-ज्ञानेश्वर व दहावा शेवटचा कलंकी अवतार वैजनाथ नामे ह्या घोर कलियुगात प्रगट झाला आहे. ह्या कलंकी अवतारात संपूर्ण ब्रह्मसुत्र वर्णन प्रगट केले आहे. त्यात २०-२५ ग्रंथ, लाखो अभंगावली वगैरे सर्व प्रकारचे गद्यमय, पद्यमय लिखाण प्रकट केले आहे. त्यापैकीच परमस्थिती गीता हा एक अभूतपूर्व ग्रंथ आहे. त्यात श्रीकृष्णार्जुन संवाद सुध्दा ह्या ग्रंथ पुस्तिकेत आहे.
त्यातील रसाळता, नैसर्गिकता, सुलभता, स्पष्टवक्ता, उदबोधकता वाचकांच्या ध्यानात येईलच. सत्य सदाचार व ब्रह्मसनातन हाच खरा धर्म होय. त्याचे प्रितपादन कलंकी देवांच्या सर्वांगीण लिखाणातून आले आहेच.
कालांतराने त्याचा संपूर्ण जगभर प्रसार होऊन विश्वातील सर्व मानव एक तत्त्वावर येऊन बंधुभाव प्रेम सौख्यभरे नांदतीलच अशा ह्या अगाध लिखाणाच्या प्रसार कार्यासाठी आपणासारख्या सज्जनांच्या तन मन धन रुपे सहाय्याची नितांत आवश्यकता आहे. ते सहाय्य आपण दिले तरच आम्हा भक्तमंडळाला पुढील प्रकाशन करता येणे लवकर शक्य होईल.
कलंकी देव संस्थानाचे तेरावे प्रकाशन आपणा हाती देताना आम्हास अत्यानंद होत आहे. आपल्या सहाय्यामुळे व मुद्रक संजय ऑफसेट यांच्या सहाय्यामुळेच आम्हाला हे प्रकाशन इतक्या लवकर आपणा हाती देता आले. आपणा सर्व दानशूर भक्तजनांचे हार्दिक आभार ! तसेच आपण पुढेही असेच सहाय्य देऊन ह्या विश्वधर्माच्या कार्यास हातभार लावाल हीच अपेक्षा!
आपणा सर्वांना हा अद्भुत ग्रंथ आत्मप्रेरक, उद्बोधक, जीवनदायी व आत्मकल्याणी ठरो व ह्या ज्ञानसागरात आपण येथेच्छ डुंबत रहाल अशी दत्तचरणी सदिच्छा व्यक्त करून ही ग्रंथ पुस्तिका आपल्या हाती देत आहोत.
जय जय दत्तराज माऊली ।
जय जय वैजनाथ माऊली ।


