प्रेमरहस्य तरंग

।। ॐ ।।
।। श्री सद्गुरु दुर्वास दत्त प्रसन्न ।।
प्रस्तावना

कोंबड्या माणिक काय कळे मोती । काय मुर्खाप्रती संत कळे ।।
रत्नपारखी ही असलियाविण । मोल याचे जाण नोहे कळे ।।
उकिरड्या माजी पडे जरी हिरा । पारखी हा खरा तया जाणे ।।।
वैजनाथ म्हणे संताची पारख । सुकृताच्या वेख विण नोहे ।।
(कलंकी देव वही नं. २१५/४३७)

सुजलाम सुफलाम भारत भूमि ही साधू संत महात्म्याची व पतिव्रता साध्वी नारीची खाण आहे. ह्या भूमिवर अनेक रत्ने जन्माला आली व त्यामळेच वेद व गिता अध्यात्म तत्वाने नटलेली भारतीय संस्कृती सर्व जगात मानाचे स्थान मिळवून आहे.
आजकालच्या मानवाची अवस्था भांबावल्यागत झालेली आहे. देव धर्म ज्ञान-विज्ञान इत्यादिचे काहूर त्यांच्या ठिकाणी माजलेले आहे. खरे खोटे काय समजावे याबद्दलची त्यांची विवेकबुद्धी काम करेनासी झाली आहे. कलीयुगातल्या लोकांचा भोगवादाकडे जादा कल असल्यामुळे व सत्ता संपत्ती विज्ञान यांच्या गर्वामुळे कलीतला मानव फुगुन गेला आहे व त्याची अवस्था भ्रमिष्टागत झाली आहे. त्यामुळे त्याला साधू संत महात्म्यांची ओळख ती काय पटणार बरे ?
‘तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे’ ‘येऱ्या गबाळ्याचे काम नोहे’ ही उक्ती अगदी यथा योग्य आहे. येथे जातीचे म्हणजे, आत्मज्ञानी संताबद्दल म्हटलेले आहे, की ज्यांना सद्गुरु अवस्थेतील महात्म्याची ओळख होऊ शकते. इतरांना त्यांची काय ओळख बरे होणार ? आणि त्यामुळेच ख-या साधू संत महात्म्यांना ह्या कलियुगात खूप त्रास सहन करावा लागला व काही संताना तर लोक शेवट पर्यंत ओळखु शकले नाहीत.
ह्या घोर कलीयुगात अंबा (अनुसूया सती) हीचे पोटी साक्षात श्री. कलंकी १० वा अवतार यांचा जन्म सन १९१६ साली झाला. प्रत्यक्ष त्रैमूति दत्तांनी अवताराला पुणे येथे सन १९३६ साली अनुग्रहीत केले. त्यांच्या हातून भारतीय संस्कृतीचे वेद गीता निरुपणाचे महान कार्य करवून घेतले व सन १९८७ साली त्यांनी आपले अवतार कार्य संपविले तरी सुद्धा बहुतांशी लोकाना त्यांची जाणीव होऊ शकली नाही. नव्हे ते अज्ञातच राहिले ! त्यामुळे त्यांच्या कार्याची माहिती लोकांना कळू शकली नाही. कलियुगात दंभाचारामुळे लोक ख-या अवतार विभूतींना विसरतात हे त्याचेच प्रतिक आहे. असो श्री. कलंकी देव भक्त कार्यकांरी मंडळ हे आपले कर्तव्य कर्म म्हणून आपणापुढे त्यांचे कार्य कूर्मगतीने का होईना ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. आजतागायत आमच्या मंडळाची छोटी मोठी ११ प्रकाशने आम्ही आपणापुढे ठेवली आहेतच. प्रस्तुत पुस्तकात प्रेम रहस्य तरंग व आत्मशांती महायज्ञ हे छोटेसे दोन ग्रंथ समाविष्ट करण्यात आलेले आहे. आपल्या सर्व भक्तांच्या सहकार्यामुळेच व श्री. कलंकी देव कृपाशिर्वादामुळे हे सर्व कार्य चालू आहे.
प्रेम रहस्य तरंग हा ग्रंथ सुमारे २५१ वचनांचा आहे व त्यात श्री. कलंकी देवांनी मानवी प्रेमाचे प्रकार सांगून खरे ईश्वराचे जे प्रेम तेच खरे प्रेम हे अगदी सुलभ सोप्या प्राकृत मराठी भाषेत ग्रंथित केलेले आहे. त्यामुळे आपणास ईश्वरावर प्रेम का करावे व कसे करावे हे कळून येते.
यज्ञयाग व होम ह्यातच काही जण अडकून पडलेले आहेत व असे कर्मठ लोक अज्ञानांची दिशाभूल करतात. त्यामुळे खरे आत्मज्ञान काय याची भाविकांना जाणिव होत नाही; म्हणून वैजनाथ भगवंतानी आत्मशांती महायज्ञ ह्या ग्रंथात खरा यज्ञ कोणता हे दाखवून दिले आहे. त्यांत त्यांनी संत महात्म्यांची ओळख, त्यांच्या वचनाप्रमाणे वागणे व आत्मपरमात्म्याची ओळख धरण्याला जास्त महत्व दिले आहे. हा गद्यमय छोटासा मराठी प्राकृत ग्रंथ खरोखरच उध्दबोधक व ज्ञानदायी आहे.
उपरोक्त ग्रंथ प्रकाशन हे कलंकी देव भक्त कार्यकारी मंडळाचे मोठे आठवे प्रकाशन आहे व कलंकी देव महानिर्वाणानंतरचे तिसरे प्रकाशन. तत्पूर्वी भक्त मंडळाने ७ मोठी व ४ छोटी प्रकाशने केलेली आहेतच. कलंकी देव कृपेनेच हे प्रकाशन कार्य साकार होत आहे. प्रस्तुत प्रकाशनास ह्या वेळीही आमचे कामगार सहकारी मुद्रणालय संगमनेर यांचे बंधू वर्गाचे आम्हास उत्स्फूर्त सहाय्य मिळाले आहे त्याबद्दल त्यांचे आभार. तसेच ह्या वेळी ह्या दोन ग्रंथ पुस्तीकेला अनुरुप अशी मुखपृष्ठ सजवाट स्वानंद आर्ट मुंबईच्या कुमारी गंगागौरी व्हावकर हीने वेळेवर व विनामल्य करुन दिली आहे. तसेच आपणा सर्व दानशुर भक्त मंडळाचे ही तन, मन, धन रुपे सहाय्य लाभले आहे. त्यामुळे हे प्रकाशन कार्य सुलभ होऊ शकले त्याप्रित्यर्थ आपणा सर्वांचे आभार !
शेवटी आपण सर्वांना ह्या दोन ग्रंथाचे ज्ञानांमृत आत्मकल्याणकारी ठरों व ह्या ज्ञानरुप सागरात आपण येथेच्छ डुंबत रहाल अशी कलंकी वैजनाथ भगवंत चरणी प्रार्थना करुन हे अमोलिक ग्रंथ आपणा सर्वांच्या हाती देत आहोत.

।। जय जय दत्तराज माऊली ।।
।। जय जय वैजनाथ माऊली ।।