
।। श्री कलंकी देव वैजनाथ कृत राम पाठ ।।
राम राम म्हणा राम राम म्हणा । परब्रह्म जाणा ओळखावे ।
परब्रम्हाचीया झाली ज्या ओळख । मार्ग सोपा देख पुढलीय ।
परे पलिकडे जी का शक्ती आहे । नाम हिचे पाहे परब्रह्म ।
वैजनाथ म्हणे अवघे हे संत । झाले गा निवांत परब्रम्ही ।।१।।
राम नाम मंत्र बरे दोन अक्षरी । जीव शिव परी जाणा तत्वे ।
झाले निर्गुणाचे ध्यान हे सगुण । भक्तासाठी जाण अवतार ।
राम मुळ बीज स्वरूप ओंकार । केलासे साकार संत जने।
वैजनाथ म्हणे राम आत्मा आहे । सकळात पाहे अधिष्ठाने ।।२।।
राम नामे जाणा तरला वाल्मीक । शुद्ध त्या विवेक आला पोटी ।
नारद मुनीने उपदेश केला । गुरु मंत्र दिला राम नाम ।
राम नामी गेले मानवी विकार । आले गा साचार ब्रह्मतेज ।
वैजनाथ म्हणे होता ब्रम्हज्ञान । केले गा कथन रामायण ।।३।।
राम नामे जाणा तरला मारुती । भक्त हा निश्चिती बिभिषण ।
राम नामाचिया महिमा हा थोर । तरले साचार ऋषी मुनी ।
राम नामे तरले गा सर्व संत । झाले गा निवांत परब्रम्ही ।
वैजनाथ म्हणे मुळ बीज आहे । राम नाम पाहे परमार्थी ।।४।।
राम अणू रेणू आहे चराचरी । राम हृदयांतरी सकळांच्या ।
नोहे रामाविण बारे रिता ठाव । राम मी जाणीव सकळांची ।
सती संत जाणा महात्मे विभूती । नटलो निश्चिती मीगा राम ।
वैजनाथ म्हणे वस्तु ह्या उत्तम । आहे मी गा राम सकळिक ।।५।।
राम नाम जप जेथे नित्य आहे । मारुती हा पाहे वास करी ।
राम नामचिया आवड त्या भारी । रक्षण गा करी ऐशियाचें ।
निमित्त गा याचे कळुनी ना येई । कुणा कैसे काई तारील हा ।
वैजनाथ म्हणे राहे गा तल्लीन । सदा हनुमान राम नामी ।।६।।
राम नामी जाणा तरले पाषाण । हृदय कठीण जयांचे गा ।
स्वानंदाचा जेथे फुटला पाझर । झाले गा साचार आत्मज्ञान ।
राम नाम ऐसे तारक गा थोर । संता हा साचार अनुभव ।
वैजनाथ म्हणे संता क्षणभरी । विसर हा परी जाणा नाही ।।७।।
राम नाम जप जववरी आहे । तववरी राहे जाणा विश्व ।
राम नाम ज्योत मावळल्यावरी । आकार हा परी राहिचना ।
राम नाम ज्योतिचिया बळावरी । विश्वातील परी घडामोडी ।
वैजनाथ म्हणे मुळ सत्ताधारी । राम असे परी परब्रह्म ।।८।।
नामाविण मुख सर्पाचे ते बिळ । जपारे सकाळ राम नाम ।
राम नाम आहे तारक संसारी । चौऱ्याशीचा परी फेरा चुके ।
जया मुखी राम नाम येत नाही । जन्म व्यर्थ पाही ऐशीयांचा ।
वैजनाथ म्हणे राम नामाविण । बाधक हि जाण कर्मे होती ।।९।।
राम नामे जपे वासना हरती । संता हि प्रचिती जाणा आहे ।
चंदना परी गा देह झिजविती । अनुभव देती जगासी हा ।
जैसे चंदन गा सुवासाने उरे । तैसी किर्ती बारे संतांचिया ।
वैजनाथ म्हणे मुळ बीज परी । संते अवधारी कळतसे ।।१०।।
जैसे सुर्यासवे रहती किरण । तैसे संत जण मजतसे ।
राम नाम रुपी प्रकाश निश्चिती । जाण पोचविती जगासी हे ।
मजविण संत कदा न राहती । संती मी निश्चिती राम आहे ।
वैजनाथ म्हणे माझे अधिष्ठान । संतात व्यापून सदा राहे ।।११।।
नोहे सोडी गोडी साखरे कारण । संतासी मी जाण नोहे सोडी ।
न सोडी सुवास चंदना कारण । संतासी मी जाण नोहे सोडी ।
संताविण मज करमत नाही । अधिष्ठाने राही सदा तेथे ।
वैजनाथ म्हणे आत्मा मी गा आहे । संती राम पाहे प्रगट गा ।।१२।।
तडफडे जैसे मीन जळाविण । तैसे मजविण संत होती ।
संत विसरेना मी गा क्षणभरी । जवळी गा परी नित्य राहे ।
संती माजी अंत स्फुर्ती राहे खुण । विचार हा जाण जगा देई ।
वैजनाथ म्हणे वेळेच्या प्रमाण । संते शिकवण देई राम ।।१३।।
आदी अंत राम एकची मी आहे । भान गा कदा हे बदलेना ।
मुक्त पुरुषासी अनुभव पुर्ण । माझा बारे जाण सदा आहे ।
संती चार वाचा बोले मी गा वेद । त्या मुखी स्वानंद देत राहे ।
वैजनाथ म्हणे वेद बीजाक्षर । स्वरूप ओंकार संती माझे ।।१४।।
राम नाम शुद्ध आहे गा अमृत । प्राणी जो सेविती संसारी हा ।
ऐशीयांचा जन्म वाया जात नाही । किर्तीवंत पाही होय लोकी ।
राम नामामृत अमर गा करी । भाव ज्याचा परी शुद्ध आहे ।
वैजनाथ म्हणे जेथे राम नाम । नासे सर्व भ्रम माईक हा ।।१५।।
राम नाम दोन जाणा मुळाक्षरे । जीव शिव बारे भिन्न नाही ।
एक तत्वी अधिष्ठान जाणा आहे । व्यापक गा पाहे सर्व काळ ।
एक तत्वी अधिष्ठाने जाणा संत । झाले स्वानंदात निमग्न गा ।
वैजनाथ म्हणे राम नाम थोर । संता हा साचार अनुभव ।।१६।।
जळती अवघे पापाचे डोंगर । ज्या घरी साचार राम नाम ।
आढळूनी येई समाधान शांती । आहे हि प्रचिती राम नामी ।
भय शोक चिंता विघ्ने सर्व जाती । भाव जे धरिती राम नामी ।
वैजनाथ म्हणे जेथे राम आहे । कळीकाळ पाहे टिकतीना ।।१७।।
राम नाम पवित्र हे गंगाजळ । करावे सकाळ स्नान यात ।
तिर्थक्षेत्र सर्व यातच घडती । शुद्ध गा निश्चिती ज्याचा भाव ।
राम नामी मन नाही जे निर्मळ । पचती गा खळ ऐसे नर्की ।
वैजनाथ म्हणे ज्याचे शुद्ध मन । भवाचे बंधन कैसे उरे ।।१८।।
राम सदवस्तु निरामय आहे । निश्चळ गा पाहे मुळब्रह्म ।
भास भास स्थिती येथे मुळ नाही । निर्विकार पाही मी गा सदा ।
सदवस्तु ठायी घेतले स्फुरण । भक्ता साठी जाण घडवुनी ।
वैजनाथ म्हणे ध्यान जे निर्गुण । तेचि गा सगुण अवतारे ।।१९।।
देव भक्त मुळ नव्हते हे काही । परम गा पाही आत्मा एक ।
येण्या अनुभव आपुला आपणा । मी तू दोघे जाणा नटलो गा ।
आधी संता केले बारे म्या निर्माण । सगुण निर्गुण पटविण्या ।
वैजनाथ म्हणे निर्गुणाचा जाण । राम मी सगुण भक्तासाठी ।।२०।।
जगासाठी संता वेद बोलविले । निरूपण केले नानातऱ्हा ।
राम नामे आधी केले अनुष्ठान । संतांनी लक्षुन बारे मुळ ।
राम नाम जपे आली गा जागृती । मुळ भान प्रति सहज गा ।
वैजनाथ म्हणे संती आत्मज्ञान । आले प्रगटुन मुळ भाने ।।२१।।
राम नामे प्राप्त जाणा मुक्ती चारी । वाचा होती परी चारी शुद्ध ।
नोहे जाऊ देती वाया संत क्षण । राम नामी जाण तल्लीन गा ।
राम नाम यांचे टळले आघात । घडले लोकात साक्षात्कार ।
वैजनाथ म्हणे नोहे संताविण । वर्म कळे जाण नामाचे गा ।।२२।।
कलिमाजी सोपा आहे हा उपाय । राम नामी जाय मोक्ष प्राणी ।
रामनामे जाण पालटे कुबुद्धी । होय चित्त शुद्धी सहजची ।
रामनामी घडताती साक्षात्कार । प्राणी होय स्थिर जाणा ठायी ।
वैजनाथ म्हणे वाया जात नाही । राम नाम पाही मुखी ज्याच्या ।।२३।।
घेण्या राम नाम नोहे लागे पैका । आहे जाणा फुका लाभ सर्वा ।
राम नाम घेण्या न व्हावा आळस । धरावा विश्वास मनी पूर्ण ।
मनी विश्वास हा बाळगल्याविण । तरु शके कोण बारे प्राणी ।
वैजनाथ म्हणे धरा सत्संगती । नामाची प्रचिती हवी जया ।।२४।।
घडलीय संत साधू समागम । नोहे मी गा राम कुणा दुरी ।
संता ठायी माझा नित्य वास राहे । गाती माझ्या पाही नित्यकथा ।
राम कथा ज्याच्या नित्य गा श्रवणी । नोहे गेले कोणी वाया ऐसे ।
वैजनाथ म्हणे भवाचिया भिती । हरली निश्चिती राम कथे ।।२५।।
वेदाचिया सार राम नामी आहे । मुळाक्षरे पाहे हि गा दोन ।
मुळाक्षराविण इतर नामासी । नोहे परियेसी श्रेष्ठत्व गा ।
आत्मा हाचि राम बारे गा लक्षुनी । झाले ऋषी मुनी निवांत गा ।
वैजनाथ म्हणे पंथ भेद जाती । मुळ ज्या निश्चिती सापडले ।।२६।।
झालो राम मी गा दहा अवतार । चालू ह्या साचार चौकडीत ।
कलियुगी कलंकी ह्या अवतारे । वैजनाथ बारे माझी भेट ।
नामरुपी झाला फरक हा जरी । परब्रह्म परी बारे एक ।
वैजनाथ म्हणे धर्माच्या रक्षणा । युगायुगी जाणा अवतार ।।२७।।
झाले अभंग हे जाणा अठ्ठावीस । मुळ स्वरुपास लक्षुनीय ।
परब्रम्हाचीया झाली ज्या ओळख । राम मी गा देख दूर नाही ।
शके अठराशे एकोणऐंशी आहे । संवत्सर पाहे हेम लंब ।
मार्गशिर्ष वद्य दशमी साचार । आज सोमवार दिवस गा ।
पिंपळगाव ह्या बारे निपाणीस । केला परियेसी राम पाठ ।
शुद्ध भावे जे का करिती पठण । सुखी होती जाण संसारी ह्या ।
वैजनाथ म्हणे जेथे शुद्ध भाव । माझा अनुभव पूर्ण तेथे ।।२८।।
आहे परब्रह्म मी गा निराकार । मजसी आकार मुळ नाही ।
युगायुगी संत साकार करिती । जाणा मज प्रति जगासाठी ।
दुर्वास मुनीने मज अवतार । कलंकी साचार धरविला ।
शुद्ध भावे जे का मजसी भजती । ऐशिया प्रचिती नानातऱ्हा ।
वैजनाथ म्हणे कलियुगी आहे । भेट माझी पाहे शेवटची ।।२९।।
।। श्री कलंकी देव वैजनाथ कृत राम पाठ समाप्त ।।
