
।। श्री कलंकी देव वैजनाथ कृत विठ्ठल पाठ ।।
देवाचिया द्वारी उभ्या मुक्ती चारी । जोडूनिया परी बारे हात ।
आत्मा हा विठ्ठल देह ही पंढरी । उभे विटेवरी चैतन्य गा ।
विठ्ठल मुखे म्हणा विठ्ठल मुखे म्हणा । पंढरीचा राणा जवळी मी ।
वैजनाथ म्हणे सत्संगे श्रीहरी । प्राप्त झडकरी होय मी गा ।।१।।
कलीयुगी सोपे नामाचे साधन । उध्दरण्या जन महापापी ।
संत संगतीने महिमा हा परी । कळे अवधारी नामाचिया ।
नामा ऐसे श्रेष्ठ नोहे गा साधन । निघण्या तरुन बारे दुजे ।
गंगाजाळा ऐसे ज्याचे शुध्दमन । दूर त्या कोठुन चंद्रभागा ।।
वैजनाथ म्हणे साक्षात्कार आहे । चैतन्याचा पाहे ठायीच गा ।।२।।
मूळ निर्गुण हे ध्यान निराकार । संताने साकार भूमंडळी ।
भक्त जनांसाठी प्रत्यक्ष सगुण । भेट होय जाण अवतारे ।
पर ब्रह्माचिया सापडते खुण । सत्संग हा जाण जया आहे ।
वैजनाथ म्हणे होता आत्मज्ञान । जाय निरसुन भ्रम सारा ।।३।।
ॐतत्सदिती वेदाचिया सार । स्वरुप ॐ कार मूळ आहे ।
अकार उकार आणिक मकार । केले मुक्तद्वार निरुपणा ।
झाल्याविण बारे ब्रह्म निरुपण । परब्रह्म जाण कळेचिना ।
वैजनाथ म्हणे पूर्णत्वाच्या विण । बारे निजखूण सापडेना ।।४।।
रामकृष्ण हरी केशव माधव । आहे अनुभव सगुणाचा ।
कोणतेही नाम घेतीयले जरी । पावे मज परी पांडुरंगा ।
आवडती मज भक्त हे प्रेमळ । तेथे मी गोपाळ नांदतसे ।
वैजनाथ म्हणे तळमळी विण । माझी या चरण लाभतीना ।।५।।
संत समागमी धरीरे आवडी । हीच घडोघडी वारी घडे ।
नोहे जावे लागे तुज पंढरपुरा । दिनाचा सोयरा मी गा तेथे ।
तिर्थक्षेत्र सर्व त्या ठाई घडती । ज्या ठाई विभुती संताचिया ।
वैजनाथ म्हणे जया सत्संगती । भवाचिया भिती उरेचिना ।।६।।
सत्य सदवस्तू निरामय आहे । निश्चळ गा पाहे मूळ ब्रह्म ।
भक्त जनासाठी बारे अवतार । मी तू हा विचार प्रगटला ।
संत सत्पुरुष नटलो श्रीपती । बारे मी विभूती नानाविध ।
वैजनाथ म्हणे देव भक्त खुणा । अवतारे जाणा बारे माझ्या ।।७।।
योगयाग क्रिया मिथ्या नेमधर्म । नामाचे ज्या वर्म नोहे कळे ।
कलियुगी नाम महिमा हा थोर । नामे साक्षात्कार सहजची ।
संत साधुजना प्रचिती गा आहे । नामे स्थिती पाहे निर्विकल्प ।
वैजनाथ म्हणे सद्गुरुच्या भेटी । संशयाची तूटी होतसे गा ।।८।।
कटेवरी कर ठेवूनिया परी । उभे विटेवरी परब्रह्म ।
भक्तजनांचिया वाट सदा पाहे । चैतन्य मी आहे सर्व साक्षी ।
नटलो मी वस्तू अवघ्या उत्तम । हरविण्या भ्रम मायीकांचा ।
वैजनाथ म्हणे देई सत्यज्ञान । मी गा भगवान विभूतीने ।।९।।
नामाविण जपतप मिथ्या आहे। तरणे कदाहे घडेचिना ।
रिध्दी सिध्दी मुद्राचारी दंभाचार । तेणे शारंग्धर नोहे जोडे ।
हरि नामी जे का चित्त हे रंगले । ऐशाचे हरले मी तू पण ।
वैजनाथ म्हणे जाता मी तू पण । बनले हे जाण विठ्ठलाची ।।१०।।
प्रपंच करुनी साधा परमार्थ । बाणवा समर्थपण अंगी ।
आत्माज्ञानाविण बारे मी तू पण । कदाकाळी जाण जाईच ना ।
विठ्ठल नामाची धरारे आवडी । क्षण अर्ध घडी दवडू नका ।
वैजनाथ म्हणे पांडुरंगा चिंता । धाडुनिया संता तारितसे ।।११।।
आला भाग्याचिया चालुनिया क्षण । नोहे बारे जाण दवड़ावा ।
गुरुमंत्र दिक्षा भेटतसे जरी । नोहे लाभ परी दवडावा ।
मोक्षदाता गुरु भेटला ज्या परी । धन्य हा संसारी प्राणी होय ।
अनंत सुकृते बळावती जेव्हा । मोक्षदाता तेव्हा गुरुभेटे ।
वैजनाथ म्हणे प्राप्त मी ईश्वर । सहज साचार सद्गुरुने ।।१२।।
ब्रम्हनादी ध्वनी कानी उमटती । येतसे प्रचिती सद्गुरुने ।
महाकारण या देहात प्रवेश । सुटे तेणे पाश भवाचिया ।
होय सद्गुरुने बारे ब्रम्हज्ञान । ब्रम्हानंदी ध्यान लागतसे ।
ब्रम्हज्ञाने खुले होय अंतर्ज्ञान । मायिक हे भान लोपतसे ।
वैजनाथ म्हणे हरी भक्ती विण। नोहे योग जाण येती ऐसे ।।१३।।
समाजरुपी मी चैतन्य गा आहे । पांडुरंग पाहे सर्वसाक्षी ।
पंढरीची वारी हीच बारे करा । ओळखावा खरा आता देव ।
जगरुपी जनार्दन मीच आहे । आत्मा जाणा पाहे सकळांचा ।
वैजनाथ म्हणे पहा निरखुन । सत्संगाने जाण शोधुनिया ।।१४।।
शिवहरी एक प्रतिमा असती । नटलो श्रीपती मीच सर्व ।
सांडा काल्पनीक सर्व उपासना । धरारे भावना सत्यावरी ।
अवतारा माजी धरु नका भेद । नटलो गोविंद मीच सर्व ।
वैजनाथ म्हणे परब्रम्ह पूर्ण । अवतारा जाण नोहे दडे ।।१५।।
जिवंत देवाची धरारे ओळख । भक्ती करा देख सगुणाची ।
सती सत् सत्पुरुष अवतार। स्वरुपे साचार माझी सर्व ।।
मानवा कारण सगुणाची भेटी । बारे आटा आटी चुकावया ।
वैजनाथ म्हणे ज्याचे शुध्द मन । सहज चालून योग येई ।।१६।।
नको करु देवा विण दुजी आशा । नको जगदीशा विसरुरे ।
मायिक हे जन कायतुज देती । बाजार निश्चिती स्वार्थाचा हा ।
येई कामा हरिनाम अंत:काळी । धावे वनमाळी भक्तासाठी ।
वैजनाथ म्हणे ज्योती माजी ज्योत । मिसळुनी घेत भक्तांची मी ।।१७।।
मायाबापाचिया जो का सेवा करी । आवडे हा भारी मज भक्त ।
पुंडलिका साठी झालो मी साकार । बारे अवतार पांडुरंग ।
ज्ञानेश्वर माझी पटविली खुण । वारकरी जाण पंथ केला ।
वैजनाथ म्हणे भूत दया आहे । धर्म खरा पाहे प्रत्येकाचा ।।१८।।
करा वेद गिता श्रवण पठण । ब्रह्म निरुपण तेणे घडे ।
हेची सिध्दातांचे खरे आहे सार । कळता साचार परब्रह्म ।
टिळा माळामुद्र करुनिया धारण । संत पद जाण नये खरे ।
वैजनाथ म्हणे होता आत्मज्ञान । लागे ब्रह्मभान सहजची ।।१९।।
भक्त जनांचिया घ्यावया कैवार । होतसे साकार पांडुरंग ।
जमवूनी अवघा हा संत मेळा । करी गा सोहळा अनुपम्य ।
युगायुगी माझ्या वेळेच्या प्रमाण। लिला बारे जाण ईश्वराच्या ।
वैजनाथ म्हणे नामरुप राहे । अवतारे पाहे फरक गा ।।२०।।
सगुण निर्गुण दशकाचा मेळा । केला म्या सोहळा अनुपम्य ।
धरुनिया बारे दहा अवतार । केलासे उध्दार पतितांचा ।
कलीयुगी कलंकी हा अवतार । माझीया साचार शेवटचा ।
शिवहरी ध्यान एकत्र गा केले । स्वरुप दाविले वैजनाथ ।।
वैजनाथ म्हणे परब्रह्म आहे। सत्ता मुळ पाहे बारे एक ।।२१।।
नामे सोपे केले उन्मि:नी साधन । आले प्रगटून ब्रम्ह तेज ।
रामकृष्ण नाम बारे पंचाक्षरी । वासनेचे परी जाळी बिज ।
रामकृष्ण नामी विश्वास ज्या पूर्ण । स्थिरावले जाण ठायी ऐसे ।
वैजनाथ म्हणे ब्रम्ह साक्षात्कार। घडेगा साचार नाम मंत्रे ।।२२।।
रामावतारात भक्त हे वानर । मारुती साचार बिभीषण ।
कृष्णावतारात गोप गा गौळणी । सखा चक्रपाणी पांडवा मी ।
बौध्दावतारात झालो ज्ञानेश्वर । सखा मी साचार वारक-या ।
कलंकी ह्या अवतरी भेट आहे । वैजनाथे पाहे जगा माझी ।।
वैजनाथ म्हणे नेमानेम राहे । वेळ ऐसा पाहे युगायुगी ।।२३।।
भोगावा स्वानंद आणि ब्रह्मानंद । हा परमानंद सद्गुरुने ।
भुमिके प्रमाण बाणतसे स्थिती । येतसे प्रचिती पुढलिया ।
संत सद्गुरु गा ब्रम्हवेत्ता परी । माझीया ईश्वरी अनुभव ।
वैजनाथ म्हणे जैसी स्थिती आहे । ईश्वर मी पाहे तैसा भासे ।।२४।।
प्रगटवा गोकुळीचा हा आनंद । धावे मी गोविंद भक्ती प्रेमा ।
गोप गौळणींचा झालो कृष्ण प्राण । शुध्द भक्ती जाण प्रेमामुळे ।
विश्वरुप माझे सगुण दर्शन । अर्जुना दावून स्थिर केले ।
वैजनाथ म्हणे देहाचा विसर । पडेगा साचार भक्ती प्रेमे ।।२५।।
भक्तासर्व मीगा बोले गा ईश्वर । गुप्त गा साचार अधिष्ठाने ।
मुक्त पुरुषासी आहे अनुभव । येथे भक्त देव भेद नुरे ।।
ब्रम्हनाद ध्वनी पूर्णत्वाच्या विण । कदाकाळी जाण नोहे येती ।
वैजनाथ म्हणे कलिमाजी खरे । मुक्त ऐसे बारे फार थोडे ।।२६।।
सत्य सदवस्तू दडेचिना खुण । परब्रह्म जाण प्रत्यक्ष गा ।
विश्वरुप बारे या ठायी दर्शन । येतसे घडून सहज गा ।
कलिमाजी पूर्ण परब्रह्म आहे । क्वचितची पाहे अवतार ।
वैजनाथ म्हणे ज्ञानयोगी राहे । आत्मा पूर्ण पाहे परब्रह्म ।।२७।।
झाले अभंग हे बारे अठ्ठावीस । ध्यान पूर्णतेस पोचावया ।
दत्त दुर्वासाने आदेश हा दिला । अवतार केला कलंकी हा ।
शके अठराशे चौऱ्याशी ते आहे । संवत्सर पाहे शुभ कृन्नाम ।
गोकुळाष्टमी गा आज बुधवार । श्रावण साचार पक्ष वद्य ।
पिंपळगाव ह्या बारे निपाणीसी । केला परियेसी विठ्ठलपाठ ।
शुध्द भक्ती प्रेमे केलिया पठण । प्राणी मुक्त जाण भवातुनी ।
वैजनाथ म्हणे विठ्ठल मी आहे। सज्जनाचा पाहे बारे दास ।।२८।।
समाधी ते संजीवन लागे ध्यान । होता ब्रम्हभान बारे पूर्ण ।
सद्गूरु दुर्वासे मज अवतार । कलंकी साचार धरविला ।
सद्गूरुच्या कृपे परब्रम्हपूर्ण । स्थिती बारे जाण गाठली म्या ।
भक्तजनासाठी झालो गा साकार । बारे मी ईश्वर सद्गुरुने ।
वैजनाथ म्हणे सगुण हा आहे । साक्षात्कार पाहे शेवटचा ।।२९।।
।। श्री कलंकी देव वैजनाथ कृत विठ्ठलपाठ संपूर्णम ।।
