विठ्ठल रखुमाई पाठ

।। श्री सद्गुरु दत्त दुर्वास प्रसन्न ।।

श्री पूर्ण परब्रह्म कलंकी अवतार ईश्वर वैजनाथ भगवान
– यांच्या ब्रह्मनाद ध्वनीतून निघालेला –
विठ्ठल रखुमाई पाठ

माया ब्रम्ह जाणा माया ब्रम्ह जाणा । अंतरीच्या खुणा ओळखाव्या ।।
आत्मा हा विठ्ठल माया रखुमाई । विटेवरी काई ब्रम्ह उभे ।।
काया पुरी देखा जाणा ही पंढरी । करा जाणा वारी सर्वेश्वर ।।
वैजनाथ म्हणे सुंदर ते ध्यान । सगुण दर्शन अवतारे ।। १ ।।

ॐ हे मुळाक्षर स्वरुपाचे आहे । विश्वरूप पाहे दर्शनगा ।।
अकार उकार आणिक मकार । तयाचा विस्तार जाण झाला ।।
मध्यबिंदू ब्रम्ह अर्धमात्रा माया । विश्व याची छाया बारे आहे ।।
वैजनाथ म्हणे नामाचे चिंतन । सर्वेश्वर ध्यान धरूनिया ।। २ ।।

ब्रम्हातुनि माया बारे गा निर्माण । मायेतुनि जाण विश्व आले ।।
नामरूप देखा आला हा आकार । ध्यान हे साचार सर्वेश्वर ।।
चार खाणी बिजे यातुनि निर्माण । चौऱ्यांशीगा जाण लक्ष योनी ।।
वैजनाथ म्हणे नाम जीव भाव । साक्षी तया शीव जाणा आहे ।। ३ ।।

मूळ नामरूप बारे जाणा नाही । गुणातीत पाहे बारे ब्रम्ह ।।
भानाठायी स्पंद स्फुरला हा जेव्हा । नामरूपा तेव्हा हे गा आले ।।
मूळ पुरुष हा जन्मला ओंकार । मायेने साचार नामरूपा ।।
वैजनाथ म्हणे नामाचे चिंतन । यावया घडून साकार ।। ४ ।।

नामरूप बारे जाणा हा आकार । देव गा साचार भक्त दोघे ।।
भक्ताचिया संत जाणा हा बनला । तेणे आकाराला परब्रम्ह ।।
परब्रम्हातुनि अध्यात्म निर्माण । स्वरूपाची खूण दाखवी ।।
वैजनाथ म्हणे वेदाचा वेदांत । केला बारे संत जगे ऐसा ।। ५ ।।

कर्तुमाकर्तुम शक्ती गा ईश्वरी । सुप्तस्थिती परी माजी देखा ।।
सद्गुरु कृपेने जाणा ही जागृत । आत्म जाणा होत साक्षात्कार ।।
बेंबी सभोवती साडेतीन आहे । वेढा जाणा पाहे बारे ईचा ।।
वैजनाथ म्हणे मोकळा हा करी । सद्गुरु गा परी बारे वेढा ।। ६ ।।

कुंडलिनी वेढा सुटलियावरी । झटके शरीरी देत हिंडे ।।
सप्तधातू नष्ट बारे गा करीत । प्राणी निचेष्ठित पडतसे ।।
पाठी कण्याखाली माकड हाडात । सुप्त त्रिकोणात जाणा राहे ।।
ब्रम्हरंध्री तेथुनिया धाव घेत । ओकी हा अमृत जाणा तेथे ।।
वैजनाथ म्हणे पहिल्या स्थितीत । अवस्था ते होत जाणा ऐसी ।। ७ ।।

हृदयाकाशात होय जाणा स्थिर । तेथुनि साचार कुंडलिनी ।।
दिव्यत्व गा आणी दुसऱ्या स्थितीत । आत्मा जाण हो साक्षात्कार ।।
आत्मसाक्षात्कार घडलियावरी । सिद्ध कोटी परी अवस्थाते ।।
वैजनाथ म्हणे होय अंतर्ज्ञान । प्रकट यातुन बारे देखा ।। ८ ।।

कुंडलिनीचिया अवस्था तिसरी । मोक्षदाता परी गुरू बने ।।
स्थुल सूक्ष्म देह बारे हा कारण । हा महाकारण भोगितसे ।।
मायावी स्वरूप यातुनि धारण । करुनिया जाण बारे हिंडे ।।
वैजनाथ म्हणे ब्रम्हविद्या स्फुरे । ठायी जाणा बारे ऐशियाच्या ।। ९ ।।

ब्रम्हविद्या बारे स्फुरलियावरी । ईश्वरत्व परी जाणा भोगी ।।
अहंब्रम्हास्मिगा तत्वाचे वचन । जाणा हा धरून बोलतसे ।।
शास्त्र वेद देखा आणिक पुराण । अठ्ठावीस जाण युगे येथे ।।
वैजनाथ म्हणे आत्मा विटेवरी । उभा ध्यान परी सर्वेश्वर ।। १०।।

इडा पिंगला नाड्या एक होती । सुशुन्मा बनती रूपके ही ।।
दोन चार अंगली हा श्वास राहे । चालू जाणा पाहे सिद्धात्म्यात ।।
याच स्थितिमाजी चिरंजीव राहे । वायुरूप पाहे अवस्थेत ।।
त्रिभुवनी ऐसा गमन गा करी । कारण ह्या परी जाणा देहे ।।
वैजनाथ म्हणे उपासना ध्यान । नामाचे चिंतन सर्वेश्वर ।। ११ ।।

सिद्धकोटी अंगी आली जाणा तरी । उपासना परी नोहे सुटे ।।
परब्रम्हाचिया ठेवी हा स्मरण । ब्रम्ह जरी जाण स्वयंमेव ।।
विठ्ठलाची माया बारे गा रुख्मिण । कुंडलिनी जाण बनतसे ।।
वैजनाथ म्हणे यातुनि साचार । ब्रम्ह साक्षात्कार विठ्ठल मी ।। १२।।

भक्तिप्रेमासाठी नामरूप जाण । विठ्ठले धारण बारे केले ।।
अठ्ठावीस युगे उभा विटेवरी । रखुमाई परी मायासवे ।।
अवतारासवे माया जाणा राहे । सुप्त देखा पाहे कुंडलिनी ।।
वैजनाथ म्हणे संता ही ओळख । तल्लीन हे देख याच ध्यानी ।। १३ ।।

मुंगी पायी घुंगरु गा वाजे जरी । सिद्धात्मा हा परी जाणा ऐके ।।
भक्ताचिया संत भक्तिप्रेमेपरी । सिद्ध अवधारी गुरुकृपे ।।
ब्रम्हनाद ध्वनी जाणा अनुहात । चालु गा रहात तया ठायी ।।
वैजनाथ म्हणे तयाचे भाषण । ओंकाराच्या जाण सवे राहे ।। १४ ।।

ब्रम्हासवे कुंडलिनी माया आहे । कायमगा पाहे जाणा देखा ।।
एकमेका लागी बारे न सुटती । हे गा ब्रह्मस्थिती धरूनिया ।।
अवतारे भेट तयाची सगुण । भक्तिप्रेम जाण वाढावया ।।
वैजनाथ म्हणे नामाचे चिंतन । उपासना ध्यान घडावया ।। १५ ।।

सिद्ध ब्रम्हवेत्ते ध्यान हे करिती । जाणा हे भजती माया ब्रम्हा ।।
जाणीव नेणीव पलीकडे आहे । माया तेचि पाहे जाणा ब्रम्ह ।।
कुंडलिनी रूपे आत्मसाक्षात्कार । तयाचा साचार सद्गुरूने ।।
वैजनाथ म्हणे नरदेही ज्ञान । स्वरूप दर्शन सद्गुरूने ।। १६ ।।

नोहे तुटे फुटे नोहे जळे परी । ब्रम्ह अवधारी नोहे बुडे ।।
आहे तीच स्थिती कायमगा राहे । चिरंजीव पाहे अक्षयीगा ।।
जयाचिया जन्म झाला जरी नाही । मृत्यू येथे पाही जाणा कैसा ।।
वैजनाथ म्हणे तीच कुंडलिनी । सद्गुरुपासूनी जागृत गा ।। १७ ।।

पंथ सांप्रदाय उपासना नाही । नामामाजी पाही बारे भेद ।।
नामरूप फक्त बदले आकार । एकची साचार परब्रम्ह ।।
सद्गुरूने होय अध्यात्म हे ज्ञान । प्रकटे यातून अनुभव ।।
वैजनाथ म्हणे गुरु मोक्षदाता । प्रचिती भेटता जाणा येई ।। १८।।

दत्तकृपा बारे नाथ सिद्धप्रती । जाणा ब्रम्हस्थिती अंगी आली ।।
कुंडलिनीरूपे स्वरूप दर्शन । दत्तकृपेतून जाणा झाले ।।
गेला निघुनिया यात अहंभाव । ब्रम्ह स्वयंमेव बनले गा ।।
वैजनाथ म्हणे गुरूबीज मंत्र । यातुनि पवित्र भूमिका ह्या ।। १९ ।।

गुरुमुखे बीजमंत्र घ्या पवित्र । तेचि कृपाछत्र तारितसे ।।
नामाचे चिंतन गुरुमुखे तारी । सिद्धकोटी परी माजी नेई ।।
कोणतेही नाम दिले याने जरी । गुरुमुखे परी तारकगा ।।
वैजनाथ म्हणे नामी भेद नाही । परब्रह्म पाही एकट्यानं ।। २०।।

उपासना ध्यानी प्रत्यक्ष ईश्वर । भजेगा ओंकार स्वरूपासी ।।
शुक कपिलगा याज्ञवल्क दत्त । नाम चिंतनात नारदगा ।।
पूर्ण ब्रम्हवेत्ते असती हे जरी । परब्रम्ह परी चिंतनात ।।
वैजनाथ म्हणे नामाचे चिंतन । उपासना ध्यान सर्वा तारी ।। २१ ।।

द्वापरात कृष्ण पांडवांच्या घरी । पांडुरंग परी तेणे नाम ।।
नामरूपे बदल हा झाला जरी । परब्रम्ह परी बारे एक ।।
टिळा माळा मुद्रा करूनि धारण । संतपद जाण अंगी नये ।।
संताठायी आत्मज्ञान हा स्वानंद । प्राप्त त्या गोविंद भक्तिप्रेमे ।।
वैजनाथ म्हणे उपासनेतून । नामाचे चिंतन तारितसे ।। २२ ।।

नामे साधतसे उन्मिनीगा ध्यान । प्राप्त गा यातुन कुंडलिनी ।।
कुंडलिनी जागृत गा झाल्यावरी । सिद्धकोटी परी अवस्थाते ।।
सद्गुरूपासुनि मन हे उन्मन । होय अंतर्ज्ञान प्रकटला ।।
वैजनाथ म्हणे नामे अनुभव । ब्रम्ह स्वयंमेव गरुकृपे ।। २३।।

उपासना ध्यान नामाचे चिंतन । यावया घडुन बारे देखा ।।
सती साध्वी सत्पुरुष गा साचार । हरी अवतार विभूतिगा ।।
अनंते स्वरूपे नटे नारायण । कळण्या आपण सगुण हा ।।
वैजनाथ म्हणे देवादिका ध्यान । नामाचे चिंतन तारितसे ।। २४ ।।

नामाचे चिंतन हवे गा अद्वैत । खंड न जयात द्वैताचिया ।।
पंथ सांप्रदाय उपासना पाही । नाम घेण्या नाही जाणा भेद ।।
जात धर्म कुळ नामी भेद नाही । धर्म सत्य पाही सदाचार ।।
वैजनाथ म्हणे सकळा ईश्वर । एकची साचार विश्व याचे ।। २५ ।।

कुंडलिनी रूपे सुप्तगा ईश्वरी । शक्ती जाणा परी सकळात ।।
संत सद्गुरूने होतसे जागृत । ध्यान गा लागत निरामय ।।
कुंडलिनी जागृत गा झाल्यावरी । मी तू पण परी उरेचिना ।।
वैजनाथ म्हणे विश्व मीच पाहे । अवस्था जाणा हे याची होय ।। २६ ।।

भक्तिप्रेमातुनि संत अवधारी । बनतसे परी भक्ताचिया ।।
त्याग वैराग्य हे जाणा अनुष्ठान । प्राप्त गा यातुनि सिद्धकोटी ।।
सद्गुरूने शक्तिपात केल्यावरी । येई ऐसा परी अनुभव ।।
नोहे घडे ऐसे मोक्षदात्याविण । ब्रम्हस्थिती जाण प्राप्त नाही ।।
वैजनाथ म्हणे गुरु बीज मंत्र । बनवी पवित्र भूमिकाते ।। २७ ।।

विठ्ठल हा रखुमाई पाठ झाला । प्रवरा तिराला संगमनेरी ।।
एकोणावीसशे सातगा साचार । शके संवत्सर क्रोधन नाम ।।
चैत्र शुद्ध देखा पंचमी साचार । हा मंगळवार दिवस गा ।।
ब्रम्हनाद ध्वनीतूनि हा साचार । ब्रम्हसाक्षात्कार घडविला ।।
त्रैमूर्ति दत्ताने धरूनिया हात । पूर्ण लेखणीत ज्ञान दिले ।।
शुद्ध भावे जेका पठण करिती । वैकुंठा श्रीपती ठेवी ऐशा ।।
वैजनाथ म्हणे ध्यान विटेवरी । रखुमाई परी विठ्ठलाचे ।। २८ ।।

प्रवरा तिरी गा ह्या संगमनेरी । वैकुंठ पंढरी उभारिली ।।
जेथे अवतारे बारे हा श्रीहरी । सर्व तीर्थ परी येथे देखा ।।
ज्ञानेश्वर पांडुरंग अवतार । कलंकी साचार तोचि देव ।।
वैजनाथ म्हणे भेट ही सगुण । विठ्ठलाची जाण पुन्हा नाही ।। २९ ।।

अंबऋषीसाठी दहा अवतार । चालु ह्या साचार चौकडीत ।।
असुर कुळीचे जाणा निर्दाळण । स्थापावया जाण बारे धर्म ।।
सज्जनांचे देखा करणे रक्षण । राखणे गा जाण पतिव्रता ।।
दत्ते भविष्य गा वैकुंठात केले । कलंकी धाडिले अवतार ।।
वैजनाथ म्हणे गीता ब्रह्मज्ञान । दावी भगवान विश्वसूत्र ।। ३० ।।

।। विठ्ठल रखुमाई पाठ तथा कुंडलिनी माया संपूर्ण ।।