
।। श्री कलंकी बेबीनाथ माया कृत वैजनाथ पाठ ।।
वैजनाथ म्हणा वैजनाथ म्हणा । परब्रह्म जाणा थोर हे गा ।
संगमनेरी बारे प्रवरेच्या तिरी । धरी अवतार श्रीहरी हा ।
जगासाठी आले अवतीर्ण झाले । पूर्ण ब्रह्म पाहे ठेले हे गा।
नाथ बेबी म्हणे अमर हे भाने । विष्णू मय जाणे दत्त हे गा ।।१।।
महाविष्णू भान पाहे हे गा ज्ञान । प्रवरेच्या जाणं तिरी हे गा ।
धरी अवतार कलंकी साचार । भक्तासाठी भार झेलितसे ।
होण्या गा कल्याण जगाचे हे जाण । नटतसे भान ईश्वर हे ।
नाथ बेबी म्हणे शुद्धी साठी येणे । भक्त गा तारणे पाहे राहे ।।२।।
वैजनाथ रूपे नटले गा देव । भक्तीचे हे भाव तारण्या गा ।
विष्णू रूप पाहे वैजनाथ आहे । कलंकी गा पाहे देव हा गा ।
दत्तांनी आणिला अवतार जाणा । कलंकित खुणा कलीत या ।
नाथ बेबी म्हणे कळले हे नाही । लोपुनी गा पाही राहिले हे ।।३।।
जाणीव ती देण्या भक्तित या खुणा । दिल्या आम्हा जाणा देवांनी गा ।
पूर्ण परब्रह्म कलंकी हे थोर । विष्णू मय स्वर पाहे हे गा ।
जाणीव ती देण्या कृपा यांची भाना । तोची जाणी खुणा देवांच्या या ।
नाथ बेबी म्हणे कृपा जया केली । त्यानेच जाणिले माया ही गा ।।४।।
जाणून ती घ्यावी मालिका कलंकी । सृष्टी नेमा राखी देव येथे ।
जाणत्या गा विना नेणता तो नाही । ऐसे कर्म पाही नाही सकळांचे ।
जाणता तो आला कलंकी गा झाला । म्हणून गा भला नेणता गा ।
नाथ बेबी म्हणे माया ती कोल्हाटी । कलीत रहाटी दत्ताची गा ।।५।।
कलंकी ही वाणी कलंकित झाली । सृष्टी नेमे केली देवांनी गा ।
सृष्टी हा नेम चुकत नाही जाण । देवादिका भान भासे हे गा ।
आला जरी बारे अवतार भुमी । कर्म कांड मर्मी चुकेचना ।
नाथ बेबी म्हणे सृष्टी नेमे जाणे । राहे गा भोगणे सर्वांशी हे ।।६।।
कलंकी मी देव शुद्दीचा तो भाव । पहातसे ठाव भक्तीचा हा ।
भक्ती भावे जेका मजसी पुजिती । ऐशियाची प्रिती राखितसे ।
देव मी गा पाही गेलो नाही कोठे । आहे तो रहाटे जगाशी या ।
नाथ बेबी म्हणे जाणीव ती घेणे । देवांची ही म्हणे स्फुर्ती गा ।।७।।
शुद्धीने ती पाही देव कलंकाई । भक्तीच्या गा ठाई पावतसे ।
देव भक्त यात भेद नाही काही । आत्मा तो गा पाही भाव एक ।
भुकेला तो देव भक्तीचा गा भाव । शोधुनिया देव पाहतसे ।
नाथ बेबी म्हणे प्रेमे ज्याशी भाव । उभा तेथे देव सदा असे ।।८।।
कलंकी मी आलो भक्तित रमलो | मायेत भरलो प्रेमाने गा |
प्रेम भक्ती केली ऐसी वाया गेली | नाही गा ऐकिली कदा ऐशी |
कृष्ण अवतारे गोपीत रमलो | प्रेमे गा भुललो गोपींना मी |
नाथ बेबी म्हणे शुद्धी तया दिली | लिला ती गा केली कृष्णनाथे ।।९।।
कृष्ण तो मी जाणा वैजनाथ खुणा । कलंकी या भाना पाहे आलो ।
लिला क्रिडा केली भक्तीच्या ठिकाणी । भक्तांनी ती ज्ञानी जाणिली गा ।
गुपित मी राहिलो कलंकी चोर । जाणील लहर प्रेमा भक्ती ।
नाथ बेबी म्हणे शुद्धी तया दिली । भक्तीने भावली माऊली ही ।।१०।।
जाण्या न लागले मजला कोठे । ठायीच गा भेट कृष्ण मज ।
कृष्ण गा पाहुनी मन स्थिर झाले । चैतन्य खुलले ठाईच गा ।
गेली ती गा पाहे इडा पीडा सारी । शुद्ध ती लहरी उरली गा ।
नाथ बेबी म्हणे सावळा तो हरी । आला गा कैवारी भक्ताचा हा ।।११।।
अनुभव दिला लिला यांनी केली । ठाईच भरली पोकळी गा ।
पाहिले गा ठाई राधा कृष्ण रुप । मिलन स्वरूप झाले ठाई ।
राधा कृष्ण जाणी भेद नाही भानी । शुद्ध ती गा जाणी लहरी ही ।
नाथ बेबी म्हणे जाणीव ती धरा । कलंकी तो खरा राहे कृष्ण ।।१२।।
कलंकीने केली लिला ती गा थोर । अध्यात्मी गा भार दाखविला ।
शुद्ध चित्त केले बारे ही गा थोरी । पवित्र लहरी मज दिली ।
थोर ही दाविली माया कलंकिने । जाणीव ती भाने दिली मज ।
नाथ बेबी म्हणे अनुभवा विणा । कळेचिना जाणा कलंकी हा ।।१३।।
सत्ता लौकिकाचा जोरा गा भुलती । देवा न जाणती लोके कली ।
ओळख नुरली कलीत ही भावी । लौकीका अभावी आली धुंदी ।
ओळखिना कुणी संत गा विभुती । उन्मत्त वागती पाहे जगी ।
नाथ बेबी म्हणे घोर कली जाणे । ओळख न भाने धर्म अधर्म ।।१४।।
गोड़ गा बोलुनी संता भुलविती । छेड ती काढिती दुर्गुणी गा ।
शुद्ध भक्ती जाणी जयाच्या गा ध्यानी । तेथे संतवाणी रमतसे ।
कली घोर आला मानव मातला । दांभिक तो झाला कली भावी ।
नाथ बेबी म्हणे अहंकारे नाडिले । देवा विसरले म्हणूनी या ।।१५।।
दत्त दुर्वासांनी भविष्य गा केले । अवतारे आले कलंकी गा ।
विष्णूमय दत्त उभे गा ठाकले । मुळगा जाणिले धर्मकार्या ।
धर्माला ती जाणा लागली गा किड । काढण्या गा गुढ पाठविले ।
नाथ बेबी म्हणे मूळ सत्तेविना । धोरणे ते जाणा कैचे चाले ।।१६।।
चालता बोलता पंढरीचा देव । आला येथे भाव जाणुनिया ।
भाव भक्ती विणा देव येत नाही । बाजारची पाहे नाही भाजी ।
दिसत तो नाही परी अधिष्ठान । राहे भक्ती भान ओळखुनी ।
नाथ बेबी म्हणे पंढरीचा हरी । संतांचा कैवारी पाहे हा गा ।।१७।।
दत्तांनी तो जाणा कार्या गा कारण । अवतार भाना आणिला गा ।
धर्म आली ग्लानी म्हणूनी आणिली । प्रेरणा ती दिली धर्मकार्या ।
विश्वधर्माची ती गा स्थापना केली । आज्ञा ती दिली दुर्वासांनी ।
नाथ बेबी म्हणे कलंकी माऊली । गुरु गा सावली पाहे जगी ।।१८।।
विश्वधर्माची गा केली ही स्थापना । आणूनिया भाना कलंकीशी ।
कलंकी हा देव जागृत गा भाव । सगुण ही ठेव भक्ती भावे ।
भक्ती प्रेमासाठी देवा गा आणिले । अज्ञान काढीले भक्तीचे हे ।
नाथ बेबी म्हणे धर्म तो दाविला । खरा गा सकळ जगाशी हा ।।१९।।
धर्मासाठी येति देव जग जेठी । भक्ता देती भेटी कार्यासाठी ।
धर्मालागी ग्लानी काढण्याकारणी । देव भक्ता जाणी येताती गा ।
देव भक्त भोगिती अघाद जगी । टिकविण्या लागी धर्म हा गे ।
नाथ बेबी म्हणे धर्म शुद्धी जाणे । ईश्वर ते म्हणे येत असे ।।२०।।
हरी उच्चारी पाप कर्म जळती । शुद्ध गा बाणती शक्ती लहरी ।
हातुन गा घडता कर्मे ती शुद्ध । बाधती ना बुद्धी दुर्गुणी ही ।
शुद्ध हिची धरा मार्ग तोची स्मरा । नको येर झरा पुन्हा पुन्हा ।
नाथ बेबी म्हणे कर्म फळे भाना । चुकती ना जाणा कुणा कैचे ।।२१।।
हरी उच्चार गा प्रणवाच्या तिरी । स्वयंभू लहरी पाहे ही गा ।
हरी उच्चारितां मन हे पवित्रे । होतसे गा गात्रे देहाच्या या ।
वैजनाथ नामे हरी उच्चारी गा । अभंगी ती गंगा पाहे तेथे ।
नाथ बेबी म्हणे वैजनाथ नामे । पूर्ण तेथे वर्में जोडतसे ।।२२।।
हरी नामाचा गा महिमा तो थोरी । पवित्र गा करी देहधारी ।
वैजनाथ नामे हरी गा उच्चारा । पवित्र ती स्वरा जिव्हा बोले ।
स्वर ती गा नादा पाहे ही लहरी । बिन तारी स्वरी पाहे ध्वनी ।
नाथ बेबी म्हणे वैजनाथ जाणे । ॐकार तो भाने दिव्यत्वाने ।।२३।।
वैजनाथ नामा शुद्ध जप करा । ठाईच गा स्मरा आत्माराम ।
गुरु तो मेरु सकळ सिद्ध तारु । संसारी उतारु पाहे सदा ।
नाम वैजनाथ कलंकी हे गुरु । कृपे तुम्हा तारु सकळीका ।
नाथ बेबी म्हणे शुद्ध तया वाणी । जगाला ही ध्वनी कलंकीची ।।२४।।
सत्ता संपत्तीच्या नका जाऊ जोरे । ओळख ती बारे करा हरी ।
शुद्ध चैतन्याची गाठी या पडती । जाणीव ती स्थिती देती तया ।
वैजनाथ नामे गोड़ गुण गाणे । भक्त पामराने गाईले गा ।
नाथ बेबी म्हणे जाणीव ती ध्याना । कलंकी या भाना कलियुगी ।।२५।।
शुद्ध चित्तासाठी देव जाणा येति । पवित्र करिती भक्ती भाव ।
देव भक्ती साठी जाणा हा भुकेला । करितसे गोळा भक्त मेळा ।
उच्च नामे जाणा ॐकार तो भाना । करीत बहाणा भक्तीचा गा ।
नाथ बेबी म्हणे नामे वैजनाथ । आत्म सिद्ध पंथ सांगतसे ।।२६।।
हरी उच्चारी गा जिव्हा ही बोलती । वाणी ही स्फुरती वेदाची गा ।
उच्चारितां जिव्हा बोलती गा वाणी । बिनतारी जाणी संदेश गा ।
सत्य मिथ्य पाहे कळेचिना काही । म्हणून गा पाहे अल्पमती ।
नाथ बेबी म्हणे भान शुद्ध वाणी । कलंकीची जाणी कलियुगी ।।२७।।
हरी गुण गाण्या नोहे लागे पैका । आहे लाभ फुका पाहे हा गा ।
हरी नामी जाणा तल्लीन राहती । तया अंतर स्फुर्ती देती ठाई ।
हरी नामी रस्ता सुलभ तो आहे । प्रचिती ती पाहे ठाईच गा ।
चित्त शुद्धी ठाई मिलन हे राही । गुरु शिष्य पाही प्रेमाने गा ।।
शुद्ध भावे पाही पठण करिती । सुखी जाणा होती संसारी हे ।
नाथ बेबी म्हणे धन्य मी गा झाले । कलंकीने दिले कृपे फळे ।।२८।।
झाले अभंग हे जाणा एकोणतीस । देवा स्वरुपास जाणुनिया ।
मुळ तो कर्ता हर्ता जगा जाणता । स्वरूप गा श्रोता कलंकी हा ।
शके ऐकोनिसे वीस जाना आहे । सवंत्सर पाहे बहू धान्य ।
मास गा मार्गशीर्ष शुद्ध तृतीया । रविवार गा या दिनी केला ।
साधिला गा सिद्धयोग या दिवशी । पूर्ण केले यासी वडगावी ।
नाथ बेबी म्हणे कलंकी गा देवा । कृपाळू गा ठेवा दिला मज ।।२९।।
हरी नामी जान जप तो गा केला । कैलासिचा दिला ध्वनी मज ।
उच्चार गायिले हृदय आंतरी । शुद्ध गा लहरी मज दिली ।
देहू आळंदी झाली संगमनेरी । मुळ ती गा नारी आदिशक्ती ।
कलंकी कलंकीनी बारे एकेश्वरी । मुळ कर्ती स्वरी लहरी ही गा ।
शुद्ध भावे पठण करा हे स्वरा । देतिल ते थारा ब्रह्ममाया ।
नाथ बेबी म्हणे मुळ ब्रह्ममाया । महदादी छाया पाहे केली ।।३०।।
।। श्री कलंकी बेबीनाथ माय कृत वैजनाथ पाठ संपूर्णम ।।
