
।। श्री कलंकी बेबीनाथ माया कृत शिव पाठ ।।
शिव शिव म्हणा शिव शिव म्हणा | कैलासीचा राणा शिव भोळा ।
जगाचे अराध्य दैवत गा राही | मूळ कर्त्ते पाही स्वयंभू गा ।
शिव जटाधारी सर्प याच्या गळी | वग्राला हा आळी क्षणामाजी ।
नाथ बेबी म्हणे मायबाप भाना | जगाचा हा जाणा शिवमौळी ।।१।।
ॐनामे जपा सदाशिव देखा | हरविता दुःखा पाहे तो गा।
रानीवनी राहे कैलासीचा राजा | पाठी घेतो ओझे जगाचे गा।
जगासाठी येतो ॐकार नटतो | दुःख हरवितो भक्ती प्रेमा ।
नाथ बेबी म्हणे पंचाक्षरी स्मरा | शुद्ध कुडी करा नामाने गा ।।२।।
शिवपंचाक्षरी जाणा हा मंत्र | होतसे पवित्र मन हे गा ।
शिव नामी जाणा तरतो पाषाण | घेता नाम जाण तयाचे गा ।
शिव ही गा गोडी नामाची आवडी | करी शुद्ध कुडी नाम हे गा ।
नाथ बेबी म्हणे शिवनामी जाणी | अमृताची भानी गोडी पाहे ।।३।।
शिव हाचि मंत्र पंच गा अक्षरी | प्रणवी गा स्मरी शुद्धी याची ।
शिवनामाचा जप जाणा करी | सुखी होती नरनारी संसारी या ।
शिव शिव म्हणा पवित्र या भाना | हरण होते जाणा दुःख हे गा ।
नाथ बेबी म्हणे शिवनामी स्तोत्र | गाताती पवित्र भक्त जन ।।४।।
शिवनाम जपा माळ ही अंतरी | शुद्ध तया लहरी पाहे तेथें ।
भक्तीच्या संगती शिव अधिष्ठान | ठेविती गा जाणा प्रेमा भक्ती ।
शिवनामाचे गा जपा ते साधन | शुद्ध होते भान भक्तीचे गा ।
नाथ बेबी म्हणे शिवमंत्र भाने | अक्षरी गा जाणे पाहे हेचि ।।५।।
शुद्ध भक्ति करा शिव नाम स्मरा | पवित्रता धरा मनाची ही ।
शुद्ध भक्ती भावे जाणावी गा भक्ती | तया ही विश्रांती ठाईची गा ।
मायातित होती शिव गा जाणती | प्रितपाहे देती भक्तीशी ही ।
नाथ बेबी म्हणे हरहर शिवा | भक्ती प्रेम ठेवा देई आम्हा ।।६।।
शिवनामाचा गा महीमा थोर | पवित्र गा लहर पाहे हिची ।
शिव नाम गाती ऋषी मुनी तपी | उल्हासी गा जपी शंभोसी हे ।
शिव हा ॐकार स्वयंभू गा स्वर | प्रणवाची तार नटतसे ।
नाथ बेबी म्हणे जाणा शंभो शिवा | घेई गा तो धावा भक्तासाठी ।।७।।
धावले गा भक्ती प्रेमासाठी शिव | राखिला गा भाव भक्तीचा हा ।
वैजनाथ नाम रुपा आला हर | कलंकी ॐकार पाहे हा गा ।
करावया स्थापना हा विश्वधर्म | धरिले गा मर्म अवतारी हे ।
नाथ बेबी म्हणे शिव शंभो पाही | गुप्त गा ते राही कलित या ।।८।।
शिव मेरु जाणा शिव तारु भाना | शिव तोची ज्ञाना संसारी या ।
शिव विणा पाही रिता ठाव राही | शिव तो गा ठाई आत्म ज्योत ।
शिव नामाचा गा उच्चार जो करी | चुकेल गा फेरी चौऱ्यांशिची ।
नाथ बेबी म्हणे नामे बने मोक्षी | मिळतसे साक्षी अधिष्ठाना ।।९।।
शिव उच्चार गा बेबी सभोवती | प्रणवी ही देती साक्षा पाही ।
शिवॐकारी गा जाणा ही स्थिती | कुंडीलनी मती उमा ही गा ।
शुद्ध जे गा घेती नाम पार्वती | शुध्दी तया येती प्रकृती गा ।
नाथ बेबी म्हणे शिव ही प्रकृती | पार्वती ही स्थिती पाहे गा ।।१०।।
शिव पार्वती उच्चार करिती । दरिद्री हरती ऐशियाची ।
शिव पार्वती नाम हे स्फुर्ती । शुध्द तया मती पावित्र्याची ।
शिव हा गा जप आहे सर्व सोपा । मार्ग उत्तम मापा पाहे ।
नाथ बेबी म्हणे अनंत जन्माची । ऋणी मी गा त्यांची जन्मा आले ।।११।।
शिव शिव मंत्र मनाचा पवित्र | जाणी मुळ सुत्र देहाचे गा ।
ॐकार स्वरुप शिव राम घेई । प्रणव तो ठाई उमा रुप ।
प्रणवाची सीमा उल्लंघन करी । आत्मा गा लहरी पाहे सिध्द ।
नाथ बेबी म्हणे प्रणव तो भाना । खुला होई जाणा भाग्यवंत ।।१२।।
शिव कृपा होता वाचा चारी श्रोता । येती पवित्रता पाही तेथे ।
खुलता गा वाचा कृपे चारी । शिव गा लहरी पाहे येती ।
ॐ उच्चार गा प्रणवाच्या तिरी । वाचा होती चारी पाहे शुध्द ।
नाथ बेबी म्हणे स्वयंभू ते भाने । कलंकी गा म्हणे पाहे राजा ।।१३।।
ब्रम्ह रुप पाहे शिव तेची राहे । विष्णु रुप मोहे कलंकी गा ।
खेळ यांनी केला त्रयमूर्ती झाला । पुन्हा आता आला वैजनाथ ।
कळला हा नाही कुणा कैसा काही । लोपोनिया ठाई कलंकी हा ।
नाथ बेबी म्हणे माया त्याची जाणे । त्याचा तोची भाने कलंकी गा ।।१४।।
शिव नामी ज्योती पवित्र गा होती । वासना ही जाती मनाची गा ।
वासने पलिकडे आहे आत्मज्योती । शुध्दती बाणती शिवनामे ।
शिव अधिष्ठानाने आहे जाणा साक्षा । मार्ग पाहे मोक्षा मिळतसे ।
नाथ बेबी म्हणे शिव साक्षेविना । नोहे अधिष्ठान पाहे हे गा ।।१५।।
जीवा शिवाची जमता गा गोडी । दशा ती गा सोडी जिवाला या ।
जीव चैतन्यासी मिश्र करी शिव । शुध्दीचा गा ठाव देऊनिया ।
शुध्द भक्ती करा शिव नाम स्मरा । चुकवा गा फेरा चौऱ्यांशीचा ।
नाथ बेबी म्हणे शिव नामा राही । कुढी जाणा पाही सुखी ही गा ।।१६।।
शिव शक्ती नाम अमृत गा करी । चौऱ्यांशिची फेरी चुकवी गा ।
शिव उच्चार हा बेंबी सभोवती । शितल करिती पंचप्राणा ।
विश्वास गा ठेवा शिव नाम स्मरा । ईच्छा शुध्दी धरा नामाची गा ।
नाथ बेबी म्हणे शिव स्मृती पाहे । तारक गा राहे जीवनासी ।।१७।।
शिव नामी जाणा वासना हरती । मती शुध्द होती मायिकांची ।
शिव जाणा दत्त भेद यात नाही । अराध्य हे पाही दैवत गा ।
मिथ्य गा कल्पना स्वर्ग पाताळाची । खरी पाहे साची नाही ही गा ।
नाथ बेबी म्हणे मुळ पुरुषा पाहे । ॐकार हा पाहे जगताचा ।।१८।।
शिव भोळा सांब पावे भक्ता घरी । भाव ज्याचा परी शुध्द आहे ।
नोहे उचनिच करी शिव भेद । साक्षी हा गोविंद सर्वांठाई ।
महानंदा वेश्या जाणा उध्दरिली । शिवकृपे झाली निवांत गा ।
नाथ बेबी म्हणे मुळ पुरुष आहे । ॐकार पाहे जगताचा ।।१९।।
सत्य मिथ्य पाही कळत हे नाही । म्हणून संताठाई ॐकार हा ।
सत कल्पनेची कल्पना ही पाही । शुध्द ती गा राही भाना ठाई।
भक्ती भाव धरा शिव नाम स्मरा | राखिता गा स्वरा ध्वनी हाची ।
नाथ बेबी म्हणे शिव नाम स्वरी । अमर गा करी ध्वनी नादे ।।२०।।
शिवाची ही माया मायातित होती । प्रचिती ही देती भक्ता सवे ।
शिव नामा जाणा अधिष्ठान स्थिती । शुध्दी ते देती भक्ती प्रेमा ।
शिव भक्त जाणा भक्तीने तारिले । अनुभव दिले भक्ती ठाई ।
नाथ बेबी म्हणे मूळची ही ध्वनी । ॐ नामे जाणी उच्चार गा ।।२१।।
प्रणवाची पाही जागृती ती होता । ॐ तो उमटतो ठाईच गा ।
प्रणव ही स्थिती भक्तीची गा प्रिती । भक्तीने गा स्फुर्ती पाहे ही ।
शिव जाणा ध्वनी सच्छितानंदी । विलीन गा स्पंदी पाहे भक्त ।
नाथ बेबी म्हणे पूर्व जन्म कर्म । येते जाणा वर्म ध्यानी हे गा ।।२२।।
शुध्द चित्त घोकी शिव नाम जपी । ऐशियाची सोपी स्थिती पाहे ।
शिव शिव उच्चार प्रणवी स्फुरतो । मुळ तो करितो कृपा शिव ।
शिव नामी जाणा तल्लीन हे होती । प्रेम तया देती भक्तीने गा ।
नाथ बेबी म्हणे शिव नामे वाणी । अमर गा ध्वनी पाहे येथे ।।२३।।
शिव नामे जाणा भवाची प्रचिती । हरतसे चित्ती नाम घेता ।
शिव शिव मंत्र सुलभ हा जाणा । तारितसे भाना शुध्दीने गा ।
शिव नाम घेता हटतसे बाधा । मिळतसे सुधा मार्ग हा गा ।
नाथबेबी म्हणे शिव नाम चित्ती। हरतसे वृत्ती वासनेची ।।२४।।
शिव नाम जाणा शुध्द होय कुढी । वासनेची ही मुढी जळती गा ।
शिव साक्षी जाणा आहे अधिष्ठान । माया तेच जाणा करिताती ।
भक्तीने ही स्फुर्ती माया गा ईश्वरी । पाहे गा लहरी स्वयंभूची ।
नाथ बेबी म्हणे जाणीव ती घेणे । मायातित होणे शंभो तेची ।।२५।।
ॐ ह्या अक्षरी गा जप तो करिती । हरती विकृती ऐशियाची ।
माया मायेनी साधे जाणा ही स्फुर्ती । अनुभव देती भक्ता सवे ।
अर्धनारी नटेश्वर जाणा शिव । प्रकृती या भाव पाहे तेथे ।
नाथ बेबी म्हणे ॐ हा जप करा । शिव नाम स्मरा भाव चित्ते ।।२६।।
शिव नाम शुध्द आहे हे अमृत । भक्त भाग्यवंत सेविती गा ।
शिव नाम मंत्र भक्तीने हे गात । शुध्द तया होत भक्ती ही गा ।
भक्तीचा महिमा भक्तच जाणत । सुखी पाहे होत संसारी या ।
नाथ बेबी म्हणे शिव नाम करी । भव भिती हरी भक्ताचिया ।।२७।।
कलंकी कृपेने शिवपाठ झाला । वडंगावी केला भक्तीभावे ।
शके एकोनिसे विस जाना पाहे । सवंत्सर आहे बहु धान्य ।
कार्तिक शुध्द पंचमी जाना दिनी । रविवारी जाणी केला पूर्ण ।
शुध्द भावे जे का करीती पठण । शिव नामी तल्लीन राहती गा ।
नाथ बेबी म्हणे शिव मंत्र सोपा । मार्ग तया मापा शुध्दीचा हा ।।२८।।
केले अभंग हे जाणा एकोणतीस । शिव कृपा यास राहे ही गा ।
शिव नामाचा गा उच्चार करिता | पाप दरिद्रता हटेल गा ।
होतील गा ठाई सुखी जीव प्राणी । शिव नाम ध्वनी गाऊनिया ।
गौरीहर शिव पवित्र हे भवा । सुखी करी जिवा भक्ती भावे ।
नाथ बेबी म्हणे जाणीव ती धरा । शिवपाठ स्मरा अंतरी हा गा ।।२९।।
।। श्री कलंकी बेबीनाथ मायाकृत शिव पाठ संपूर्णम् ।।
