
।। श्री सद्गुरु दत्त दुर्वास प्रसन्न ।।
।। श्री कलंकी वैजनाथ भगवान कृत ।।
।। शिव पाठ ।।
शिव शिव म्हणा शिव शिव म्हणा । कैलासीचा राणा सुख देई ।।
शिव नाम मुखे प्राणी जो उच्चारी । अक्षरी संसारी सुख भोगी ।।
शिव भक्ता घरी नोहे जाय यम । मायिक हा भ्रम नोहे बाधे ।।
वैजनाथ म्हणे नामी ज्या विश्वास । नोहे ऐशियास उणे काही ।। १ ।।
ॐ नम: शिवाय मुखी ज्याच्या मंत्र । राहे हा पवित्र सदा प्राणी ।।
नम: शिवाय हा जोका जप करी । भय शोक परी नुरे चिंता ।।
शिव नामे सर्व पातके हरती । भवाचिया भीती उरेचिना ।।
वैजनाथ म्हणे माया ब्रह्म आहे । शिव आणि पाहे पार्वती गा ।। २ ।।
शिव नामे जागृत गा कुंडलिनी । वासना जळुनी जाती सर्व ।।
सद्गुरूच्या कृपे बने शिव योगी । ब्रम्हस्थिती भोगी प्राणी ऐसा ।।
राहे निर्विकार नित्य दिगंबर । विदेही साचार बनतसे ।।
वैजनाथ म्हणे होय अंतर्ज्ञान । ब्रम्हानंदी ध्यान लागावया ।। ३ ।।
दशभुज पंचानन त्या म्हणती । शंकर पार्वती एकरूप ।।
भूत भूतावळी बारे शिवगण । सभोवती जाण नित्य ज्यांच्या ।।
नित्य स्मशानात वास जाणा राहे । भस्म चर्ची पाहे तेची अंगी ।।
भाळी चंद्र शोभे गंगाही जटेत । शोभे कैलास शिव सांब ।।
कर्पूरगौर गा वर्ण याची कांती । त्रिशूळ हे हाती डमरू गा ।।
नर मुंडमाळा नाग शोभे गळा । व्याघ्राबंर कळा वस्त्र याचे ।।
वैजनाथ म्हणे ध्यान हे सुंदर । संती निरंतर ईश्वराचे ।। ४ ।।
शिव सांब बहु भोळा नाथ आहे । भक्ती प्रेमा पाहे भूलतसे ।।
मनात आलिया वाटेल तोवर । देतसे साचार जाणा भक्ता ।।
येथे सुरासूर भेद जाणा नाही । समान हा पाहे सकळासी ।।
वैजनाथ म्हणे ऋषी मुनीजन । ध्यान हे लावून बैसताती ।। ५ ।।
समुद्र मंथनी विष पचविले । कंठी ठेवियले हलाहल ।।
तेणे नीलकंठ नाम हे शंकरा । देव सुरवरा वाचविले ।।
राम नामे दाह विषाचिया शांत । झालेसे निवांत शिव सांब ।।
वैजनाथ म्हणे एक शिवराम । भक्तासाठी नाम रूपे देख ।। ६ ।।
अधर्माच्या वेळी येती अवतार । विधी हरिहर भूमंडळी ।।
त्रिगुणात्मक हा दत्त जाणा आहे । विष्णुमय पाहे रूप याचे ।।
शिवरूपे असुरासी हा संहारी । ब्रह्म अस्त्रे परी सुदर्शने ।।
वैजनाथ म्हणे माया ब्रह्म आहे । अधिष्ठाणे पाहे सर्व साक्षी ।। ७ ।।
गृहस्थाश्रमी गा काही अवतार । शिवाचे साचार भूमंडळी ।।
काही शिवयोगी जाणा दिगंबर । मालिका साचार वेळे ऐसी ।।
विदेही स्थितीने भासती गा काही । ध्यान नित्य पाही सर्वेश्वर ।।
वैजनाथ म्हणे पाहुनी निर्धार । यांचे साक्षात्कार नानाविध ।। ८ ।।
पाचामुखी पाच वेदही बोलती । पूर्ण जे असती शिव योगी ।।
घडवूनी लोकी आत्म निवेदन । नेती उद्धरून जाणा देखा ।।
शास्त्र वेद बारे घडवी पुराण । शिवयोगी जाण बारे आत्मा ।।
वैजनाथ म्हणे वायूरूप स्थिती । भोगूनी हिंडती त्रिभुवनी ।। ९ ।।
ज्योतिर्लिंग रूपे जाणा महिवरी । भक्ती प्रेमा परी शिव सांब ।।
भक्ती प्रेमा आहे पिंडाची धारणा । साक्षात्कार जाणा नानाविध ।।
पिंडी ते ब्रह्मांडी तत्व एक आहे । खूण कळे पाहे सद्गुरूने ।।
वैजनाथ म्हणे सगुण निर्गुण । पटवी हा जाण मोक्ष दाता ।। १० ।।
झाल्याविना पिंड रूपाची धारणा । साक्षात्कार जाणा नोहे भास ।।
माया ब्रम्हरूपे जाणा अवतार । अनेक साचार भूमंडळी ।।
वैजनाथ रूपे जाणा ज्योतिर्लिंग । आला पांडुरंग अवतारे ।।
भक्ती प्रेमासाठी झालासे सगुण । कलंकी धारण रूप केले ।।
वैजनाथ म्हणे संत ही ओळख । स्वरूपाची देख बारे जगा ।। ११ ।।
जेथे शिव पिंडाचिया हे पूजन । साक्षी येथे ध्यान पुढे उभे ।।
आराध्य दैवत जयाचे शंकर । दारिद्र्य साचार दुःख नुरे ।।
गाया म्हशीचीया त्या ठायी खिल्लारे । अखंड ही बारे लक्ष्मी गा ।।
वैजनाथ म्हणे ज्याचा शुद्ध भाव । ऐसा पुढे शिव सांब उभा ।। १२ ।।
ज्याची मन माळ रुद्राक्ष धारण । धन्य झाला जाण संसारी ह्या ।।
दया शांती क्षमा बिल्व दळ वाही । मानस गा पाही पूजा ज्याची ।।
तन मन धन हेचि गा अर्पण । निर्धार गा जाण पूर्ण ज्याचा ।।
वैजनाथ म्हणे जेथे आत्मज्ञान । भवाचे बंधन राहिचना ।। १३ ।।
ऋग्वेद गा यजुर्वेद सामवेद । आथर्व वेद चवथा हा ।।
जाणीव रूपाने वेद हा पाचवा । जाणा जीव शिवा माजी गुप्त ।।
पूर्ण अवतारे आत्मनिवेदन । येई प्रगटून तयाचिया ।।
वैजनाथ म्हणे संतामुखे परी । वेद त्रिपुरारी बोलवी मी ।। १४ ।।
अहं ब्रम्हास्मिगा तत्वानिया राहे । अवतारे पाहे बोलणे गा ।।
अनंत रूपे मी झालो उमापती । जाणा भक्ताप्रती राखावया ।।
एकाचिगा आम्ही विधी हरिहर । झाले अवतार भक्तीप्रेमा ।।
वैजनाथ म्हणे प्रगट कलित । शिव मी गा दत्त रूपे आहे ।। १५ ।।
पंथ सांप्रदाय भेद जाणा नाही । भक्ती मार्गी पाही बारे देखा ।।
अद्वैत ही भक्ती आवडे शंकरा । आवडता खरा भक्त हाचि ।।
गंधमाळा टिळा भस्माचे लेपन । तयाने कोठून शिव प्राप्त ।।
वैजनाथ म्हणे ज्याचे शुद्ध मन । दुरी मी कोठून उमाकांत ।। १६ ।।
पूजे माजी थोर मानस ही पूजा । कैलासीचा राजा पावे मीगा ।।
रिद्धी सिद्धी नीदे शीव भक्ता घरी । सुखी हा संसारी भक्ती प्रेमे ।।
शिवलीला संत जाणा हे वर्णिती । अध्यात्मे काढिती वरी भक्ता ।।
वैजनाथ म्हणे भेटे आत्म लिंग । घडे ज्या सत्संग जातिवंत ।। १७ ।।
आत्मलिंगाचिया होतसे दर्शन । आलिया घडून गुरुकृपा ।।
सात पाच तीन मेळा दशकाचा । यामाजी शिवाचा साक्षात्कारे ।।
होऊनिया बैसे विश्व माझे घर । शांतीचा संसार साक्षात्कारे ।।
वैजनाथ म्हणे नुरे मी तू पण । बनलिया जाण शिवयोगी ।। १८ ।।
विधी हरिहर प्रतिमा कळती । भेटे जया प्रती आत्मलिंग ।।
आत्म साक्षात्कारा माजी सर्व आहे । भेदाभेद पाहे सर्व मोडे ।।
अहंब्रम्हास्मिगा तत्वाचे वचन । येई प्रगटून सद्गुरूने ।।
वैजनाथ म्हणे पूर्णत्वा कारण । शिव योगी जाण म्हणताती ।। १९ ।।
प्रदोष आणिक व्रत सोमवार । जाणाही साचार शिवराज ।।
नानाविध नेमधर्म उपोषणे । लाविली कारणे संसारी गा ।।
घडावया भक्ती निमित्ते कोण्याही । नानाविध पाही बंधने गा ।।
वैजनाथ म्हणे भावे साक्षात्कार । अनेक साचार भासमान ।। २० ।।
जीवस्वर शिवस्वर प्रगटती । अंगी ब्रह्मस्थिती बाणलिया ।।
वायुरूप स्थिती माजी नित्य राहे । उमाकांत पाहे बारे देखा ।।
घाली संकटी गा उडी भक्ता घरी । रूपे जाणा धरी मायाविगा ।।
महानंदा वेश्या जाणा उध्दरली । शिव नामे झाली निवांत गा ।।
वैजनाथ म्हणे गेले कैलासात । जेणे उमाकांत ओळखिला ।। २१ ।।
शिव स्वरूपाचा नोहे कुणा अंत । राहे उमाकांत जाणा कैसा ।।
सत्पुरुष रूपे येई महिवरी । पतिता उध्दारी भक्ती प्रेमे ।।
जया सत्पुरुष वचनी विश्वास । नोहे ऐशियात उणे काही ।।
वैजनाथ म्हणे ठावे जाणा राहे । अंतयीम पाहे सर्वाचे त्या ।। २२ ।।
देऊनिया ठगे भोळा सांबवर । जाणा भस्मासूर मातलासे ।।
मागितली शिवा तपाने पार्वती । भस्म होण्या प्रती धावला हा ।।
नोहे लागला हा शीव तया हाती । मोहिनी श्रीपत तेणे झाला ।।
म्हणे मोहिनी मी तुझी होते कांता । असुर पहाता भांबावला ।।
न्य ग्रोध वृक्षाच्या आले गा छायेत । केली सुरवात बारे नृत्या ।।
ठेवियला हात मस्तकी हा जाण । असुरा कारण करविले ।।
तीन चिमुटी गा झाली याची राख । भेटले गा देख हरिहर ।।
वैजनाथ म्हणे लीला ही ईश्वरी । कळुनिया परी येत नाही ।। २३ ।।
सत्य लोक बारे वैकुंठ कैलास । रहाण्या भक्तास देवे केले ।।
ब्रम्ह कल्पांत गा होई तोपर्यंत । करिता स्वर्गात वास येई ।।
कल्पांतासी जाणा लोपे सर्व काही । स्थिती बने पाही शून्याकार ।।
वैजनाथ म्हणे मुक्त जे बनती । समरस होती ब्रम्हा ठायी ।। २४ ।।
मायेपासूनिया अवघा विस्तार । जन्मली साचार तीन बाळे ।।
सत्व रज तम ब्रम्हा विष्णू शिव । ब्रम्ह सत्यमेव एकचिगा ।।
स्वरूपाचा अंत लागतची नाही । मूळ असे पाही जाणा काय ।।
वैजनाथ म्हणे संता हे कळले । निरूपण केले स्वरूपाचे ।। २५ ।।
नामरूपा माझी फरक हा जरी । परब्रह्म परी बदलेना ।।
परब्रह्म बारे कळलियाविण । उमाकांत जाण सापडेना ।।
झालासे निर्गुण तोचि गा सगुण । संते निजखूण पटविली ।।
वैजनाथ म्हणे विधी हरिहर । भक्ता अवतार उध्दरण्या ।। २६ ।।
अधर्माच्या वेळी शिव सांभ धरी । साकारत्व परी धर्म कार्या ।।
बारा ज्योतिर्लिंगे एका ठायी येती । येता उमापती भूमंडळी ।।
काशी अविनाशी तेची पद आहे । अवतार पाहे जगी येता ।।
वैजनाथ म्हणे वेळे ऐसा राहे । नेमानेम पाहे अवतारे ।। २७ ।।
शिवपाठी अभंग अठ्ठावीस । मूळ स्वरूपास जाणावया ।।
जया सद्गुरूची झाली जाणा भेटी । संशयाची तुटी येथे होय ।।
शके अठराशे एक्याण्णव पाहे । संवत्सर आहे सौम्य नाम ।।
फाल्गुन शुद्ध गा पंचमी साचार । आज गुरुवार दिवस गा ।।
संगमनेर गा प्रवरेच्या तिरी । शिव पाठ परी झाला पूर्ण ।।
जो का शुद्ध भावे करी हा पठण । वास याचा जाण कैलासी गा ।।
वैजनाथ म्हणे निजागे शंकर । भक्ता मी साचार राखीतसे ।। २८ ।।
त्रैमूर्ति दत्ताने उपदेश केला । मज करविला शिवपाठ ।।
खरा धर्म बारे दाखविण्या परी । आलो त्रिपुरारी बारे मी गा ।।
अध्यात्म आणिक जाणा तत्वज्ञान । आत्म निवेदन जन्मविले ।।
झाल्या समरस एका ठायी ज्योती । प्रगट भारती स्वरूप गा ।।
वैजनाथ म्हणे नामी भेद नाही । परब्रह्म पाही सर्वा ठायी ।। २९ ।।
।। श्री कलंकी वैजनाथ भगवान कृत शिव पाठ संपूर्ण ।।
