
।। श्री सद्गुरु दत्त दुर्वास प्रसन्न ।।
।। श्री गणपती पाठ ।।
गजानन म्हणा गजानन म्हणा । कलंकी तो जाणा गणपती ।।
मूळ तो ओंकार गणाधी गा पती । तया गा नमती सर्वा आधी ।।
दुःख व्याधी हरती तया गा कृपे । घेता नाम जपे तयाचे गा ।।
नाथ बेबी म्हणे गणपती जाणा । कलंकी तो भाना ज्ञान योगे ।। १ ।।
सत्य मिथ्य पाही तया पाशी राही । मूळ कर्ता ठाई गणपती ।।
कलंकी नाम रूपे तो नटलासे । देऊनिया भासे कली माजी ।।
कळला तो नाही कलंकी गा पाही । गणपती ठाई जगामाजी ।।
नाथ बेबी म्हणे पूजावा तो गण । ओंकार तो जाण ठाईच गा ।। २ ।।
गणपती पूजा करुनिया नेम । मूळ तेथे वर्म करुनिया ।।
स्वयंभू तो पाहे गणपती राहे । निराकार पाहे स्थिती याची ।।
आकार तो नाही ओंकाराच्या ठाई । निश्चल तो पाही गणपती ।।
नाथ बेबी म्हणे गणेशा देखिले । स्वयंभू तत्व भले जाणुनिया ।। ३ ।।
गणाधिपती सर्वांचा तो जाणता । जगा तो नेणता पूर्ण ब्रम्ह ।।
माया त्याची जाणा सरस्वती रूपा । ज्ञान ती रोपा लावीतसे ।।
चार वेद ध्वनी सरस्वती जाणी । दत्त कृपे भानी संतासी या ।।
नाथ बेबी म्हणे चार वेद भानी । ब्रम्ह माया जाणी ठाईच गा ।। ४ ।।
गणाचा तो पती गणपती आहे । सर्वा आधी पाहे पूजा याची ।।
दुःख ते दारिद्रय नाशविता पाहे । सुख देत राहे संसारी या।।
गण गण मंत्र याचा गा पवित्र । सढळ ते सूत्र आणितसे ।।
नाथ बेबी म्हणे गण गणात बोते । मंत्र तया स्फुर्ते संतांशी या ।। ५ ।।
शेगावी घेतला अवतार तयाने । उध्दारिले जने बहु तेथे ।।
साक्षात ते आले गणपती भले । नाम रूप ठेले घेऊनिया ।।
गजानन माझा गणांचा गा पती । शुद्ध तया प्रिती सदा असे ।।
नाथ बेबी म्हणे गणेश तो माझा । शेगावीचा राजा शोभतसे ।। ६ ।।
कधी रे भेटसी वाटतसे मज । खंत ती रोज मना वाटे ।।
शेगावीचा राजा गणपती माझा । नग्न तो साजा फिरे जगी ।।
गण गणात बोते करुनिया श्रोते । अज्ञान ते झाडते राही सदा ।।
नाथ बेबी म्हणे गजानन माझा । आंतरीचा राजा ठाई स्थिर ।। ७ ।।
गण गणात बोते स्विकारी श्रोते । अज्ञान झडते मंत्रे या गा ।।
गजानन आले शेगावी राहिले । भले तेथे केले तीर्थ त्यांनी ।।
गजानन माऊली जगाची सावली । सुख तया भली देण्या आली ।।
नाथ बेबी म्हणे गजानन बोला । इडा पिडा घाला गण नामे ।। ८।।
गणांचा गण मूळ गणाधिपती । आधी याची स्तुती करिताती ।।
स्वयंभू तो निर्मिला ओंकार स्फूर्ती । बीज मंत्र प्रेरती सगुणाते ।।
बोध याने केला गण गणात बोते । मंत्र हे पवित्रे गाती देखा ।।
नाथ बेबी म्हणे गणपती जाणा । ओंकार तो ज्ञाना बाणतसे ।। ९ ।।
गणाधिपती जाणा गणपती । वेद याची स्तुती करिताती ।।
रिद्धी सिद्धी जाणा दास्यत्व करती । हवे तेच देती गणराया ।।
परी या मोहात कदा ना घावतो । वैराग्या जाणतो आंतरी गा ।।
नाथ बेबी म्हणे गण तो गणात । थोर तो जगतात आहे जाणा ।। १० ।।
स्वयंभू ती स्थिती गणेश गा मूर्ती । मायातीत होती जगासाठी ।।
माता ती पार्वती माय गणेशाची । पूजा करीती त्याची जाणूनिया ।।
गणात गणपती लीला त्याची स्फूर्ती । माते संभवती जाणती गा ।।
नाथ बेबी म्हणे म्हणूनिया स्फूर्ती । माया कृपे देती गणेशाशी ।। ११।।
गण गणाधिपती तो मी ओंकार । असे गा असार वृत्ती माझी ।।
परी करून घेण्या गा सारासार । करील विचार तोचि जाणा ।।
गणपती झालो कलंकी मी थोर । करण्या सारासार विचार ।।
नाथ बेबी म्हणे शेगावी गजानन । तेचि भगवान कलंकी गा ।। १२ ।।
अवतारा सवे भेद भाव नव्हे । सर्वा ठाई भावे एकची तो ।।
गजानन मूर्ती तिची कलंकी स्फूर्ती । भेद या गा मती नसेची या ।।
विष्णू रामकृष्णादी तोचि गणपती । भेद यात स्थिती नसेची गा ।।
नाथ बेबी म्हणे गणेशा बरवा । सर्वा ठाई भवा एकची तू ।। १३ ।।
अज्ञानपणी भेदा तूज पहाती । परी विष्णू मूर्ती तू एकची ।।
झाला गणाधी गणपती बारे तूची । भीती अज्ञानाची काढावया ।।
मंगलमूर्ती गणाधिपती तूची । दाखवली साची लीला तैशी ।।
नाथ बेबी म्हणे देवा गणपती । विष्णू तूची मुर्ती प्रगटला ।। १४ ।।
शेगावी गजानन तु बारे झाला । जडा मूढा भला उध्दरण्या ।।
आता कलंकी गणपती बा झाला । जगासाठी आला पुरुषा तु ।।
अज्ञान या जडा मूढा पामराशी । घ्यावे गा तयासी तारुनी बा ।।
नाथ बेबी म्हणे गणपती राये । अज्ञान हे पाहे आम्हा पाशी ।। १५ ।।
शेगावी गजानन तु बारे झाला । उद्धारण्या आला जडा मूढा ।।
कलंकी तु आता झाला गणपती । शुद्ध देण्या प्रिती भक्ता ठाई ।।
तारण्या तु आला जडा मूढा कारणा । भाव भक्ती जाणा जाणूनिया ।।
नाथ बेबी म्हणे गणपती राये । अज्ञान हे पाहे काढी आता ।। १६ ।।
ओंकार तु पूर्ण परब्रह्म जाण । मुळ कर्ता गुण तुज पाशी ।।
तुच गणपती तुच विष्णू मुर्ती । भक्ती प्रेमा प्रिती अवतार ।।
वेळोवेळी बारे धरीयेला तुरे । नाम रूप बारे भास ऐसे ।।
नाथ बेबी म्हणे एकची तु पाहे । भेद यात नोहे परमात्मी ।। १७।।
ओंकार तो मुळ पुरुष तु देख । भेद यात लेख नाही केव्हा ।।
लांब सोंडीचा म्हणती गणपती । अध्यात्म ती स्थिती अर्थ यासी ।।
सुपाची ती कर्ण म्हणती गा जाण । परी हेचि ज्ञान कळेचिना ।।
नाथ बेबी म्हणे अज्ञान हे जाणे । आल्लड गा म्हणे बाळ आम्ही ।। १८ ।।
गणपती पूजा केली तु गा जाण । होण्या ते गा मिलन समाजात ।।
याने ती गा जाणा अध्यात्म जागृती । होण्या समता ती सर्वा ठाई ।।
परी याचा पाहे करती कैसा संग । नास्तिक ते भंग करीताती ।।
नाथ बेबी म्हणे कली जोर पाहे । उन्मत्त तो राहे सकळीक ।। १९ ।।
शुद्ध हरपती जुगार खेळती । वितंड वाद ती घालती गा ।।
बहु धुमाकूळ गणपतीत जाण । उन्मत्त ती भान विसरती ।।
लफडे गा करीती वाईट विकृती । अनीती भ्रष्टती बारे सारी ।।
नाथ बेबी म्हणे शुद्ध ना धरती । विपरीत वागती कलीमाजी ।। २० ।।
गणपती देवा नाम तुझे भवा । लाविती गा दावा भ्रष्ट्राचारी ।।
शुद्ध हरपली बद्धी गा शिरली । भ्रांती भय भली सोडली गा ।।
गणपती उत्सव साजरा तो करी । अध्यात्माची थोरी करुनिया ।।
नाथ बेबी म्हणे गणपती देवा । शुद्धी देरे भवा सर्व यांना ।। २१ ।।
भाव भक्ती करा गणपती स्मरा । शुद्ध हिची धरा उत्सवी गा ।।
करू नये जाणा उन्मत्त हा पणा । गुन्हा हाचि जाणा होतो जगी ।।
गणपती जाणा उत्सव करीती । परी वाढवती अधोगती ।।
नाथ बेबी म्हणे शुद्ध याची धरा । गणपती खरा जाणूनिया ।। २२ ।।
बोल हे ओंकार गणपती बोले । उत्सव तो भले भक्ती करा ।।
विराळ करीती भक्ती भाव भले । इतर ते ठेले वागताती ।।
गणपती नावे उत्सव करीती । संधी ते साधती नास्तिक गा ।।
नाथ बेबी म्हणे गणराया गुणे । पवित्र ते म्हणे नाम याचे ।। २३ ।।
ओळख ती धरा गणपती देवा । उगाच तो दावा करू नका ।।
नास्तिक वागती गणपती भोवती । नामे त्याची स्तुती वरचे वरी ।।
भक्ती गा दाविती गणपती नावाची । दारू ती गा साची नाचती गा ।।
नाथ बेबी म्हणे नास्तिक वागती । भांग ती गा पिती उत्सवी गा ।। २४ ।।
याने त्या ओंकारा शांती नाही जाण । अधोगती भान उचंबळे ।।
स्तुती त्याची करा कीर्तने प्रवचने । अध्यात्माने जाणे शांती असे ।।
स्वयंभू तो पाहे गणपती आहे । शुद्ध चित्ता ठाई सदा असे ।।
नाथ बेबी म्हणे मुळ तो पुरुष । सर्वा सवे भास भासतसे ।। २५ ।।
गणपती देव नामाचा हा भाव । सोडी जड जीव भक्ती योगे ।।
नाम याचे धरा गणपती स्मरा । नास्तिका तो थारा देऊ नका ।।
शुद्धीने स्मरा गणपती देवा । तारील तो भवा जडा मूढा ।।
नाथ बेबी म्हणे गणेशाचे नाम । सोडवील यम पाश देखा ।। २६ ।।
गणपती जाणा गणराया भाना । तोची सांगे खुणा लोकांची गा ।।
शुद्ध याची धरा गणपती स्मरा । अधोगती परी जाऊ नका ।।
गणपती देव शुद्दीचा तो भाव । मुळ कर्ती ठेव पाहे जगी ।।
नाथ बेबी म्हणे गणपती देव । संसारी हा भव हारविता ।। २७ ।।
गणपती गण शुद्धीचा तो गुण । नाम घेता भान स्फुरतसे ।।
मुळ तो गा कर्ता आहे गणपती । सर्वा ठाई प्रिती जोडोनिया ।।
भक्तीने जाणावा तो गा गणपती । ओंकार ती स्थिती पाहे याची ।।
नाथ बेबी म्हणे गणपती राहे । हारविता पाहे दुःख क्लेशा ।। २८ ।।
झाले अभंग हे जाणा एकोणतीस । गणराया त्यास कृपा करो ।।
शके एकोणीसशे वीस बारे आहे । संवत्सर पाहे वृषभ नाम ।।
भाद्रपद शुद्ध नवमी साचार । आज सोमवार दिवस गा ।।
वडगाव लांडगा जाणा हा थोर । गणपती परी पाठ केला ।।
शुद्ध भावे जाणा करा गा पठण । याने ती नासून बाधा जाय ।।
नाथ बेबी म्हणे गणपती कृपा । वाचका तो सोपा मार्ग दावी ।। २९ ।।
गणपती पाठ करी जो श्रवण । सुखी होय जाण संसारी या ।।
गणपती पाठ नित्य गा श्रवणे । विघ्न तो गा जाणे हरविता ।।
नाम याचे घेण्या नोहे लागे धन । लाभ यासी जाणा फुकट गा ।।
भक्ती भावे करा पाठ हे गा जाणा । सुखाचा तो भाना स्वानंद गा ।।
नाथ बेबी म्हणे ओंकार हा जाणा । सर्व श्रेष्ठ माना कलीयुगी ।। ३० ।।
।। श्री कलंकी बेबी मायकृत गणपती पाठ संपूर्ण ।।
