श्री जालंदरनाथ पाठ

नाथनाथ म्हणा नाथनाथ म्हणा | अंतरीक्ष जाणा नारायण ||
अनंत काळाचा मूळ अनादीचा | कार्य कारणाचा विधानी हा ||
धरूनिया वृत्ती सत्यगा नियती | स्वयंभूगा स्थिती अयोनीसंभव ||
नाही नाम रूप मूळचे अरुप | अग्नीत स्वरूप जागविले ||
दास दगा म्हणे ब्रह्ममय दृष्टी | कार्य कारणासाठी यती पाहे ||१||

भाव अमृताचा वेष वैराग्याचा | संन्यासी हा साचा मूळ पाहे ||
भगव्यात रंग शिंगीशैली संग | चिंतनीतरंग स्मशानी या ||
घेऊनया झोळी अधरगा मोळी | चित्तचेतना मेळी विश्वाचीया ||
जन्म अंगीकारी अग्नीत का धारी | भास अवधारी इहलोकी ||
दास दगा म्हणे भस्म लावी अंगा | सत्य सतसंगा जागवित ||२||

राहातसे वनी चित्त ब्रह्मभानी | पर्णकुटी जाणी शिष्य पाहे ||
ब्रम्ह रस वाटी भिक्षेची या पोटी |काढी आटा अटी मुढाचिया ||
अंधश्रद्धे मार शाबरी गा धार | संजीवनी थोर नाथपंथी ||
जन्मताच पाहे पंथ निवडला हे | भावतोगा मोहे नची ऐहीका ||
दास दगा म्हणे जन्मा चिया भास | पृथ्वीवरी वास आला योगी ||३||

पूर्वीची काळी विद्येचीया रळी | वृत्ती ती केवळी असुरी या ||
दत्तगुरु झाले नाथापंथा दुणिले | शिष्यत्व स्वीकारले नारायणे ||
आदर तो थोरी गुरु अवधारी | प्रेमाची या लहरी उपजता ||
दास दगा म्हणे पायी गा चालत | धरती थरारत तया भेने ||४||

गावोगावी जात स्मशानी राहत | परी ना गुंतत लौकीकाशी ||
आचारीले तप बालपणी साफ | वैराग्याचे माप धरुनी या ||
धरिला से नेम उच्चारी गा सोह:म | अंतरी या राम सत्य आहे ||
मिथ्याची या जगा भोगकाय कामा | वेळ तो रिकामा दवडती ||
दास दगा म्हणे शिकवण जाणे | मुळची गा म्हणे शिष्यालागी ||५||

भाग्याचीया खुणा भेटी झाली वना | बैसलो होतो जाणा वृक्षाखाली ||
कोणाचेगा कोण बाबा तुम्ही जाण | येण्याचे कारण सांगा आम्हा ||
माझेचीया रत्न झाले काय पतन | बहु पस्तावुन बोलतसे ||
हाकामारी दत्ता काय तुझीसत्ता | कन्या ह्याआता ओळखीना ||
जन्म झाला कोठे कोणत्या राहटे | आईबाप मोठे दाखवा जी ||
दास दगा म्हणे पूर्वजन्म जाणे | गुरु हे गा म्हणे अमृतिया ||६||

झाली वना भेटी शब्दे आटाआटी | बोलण्याची दाटी बहु करी ||
नाही आई बाप काय सांगू मत | आम्ही तव वनात बालपणाच्या ||
कोणी सांभाळीले कोणी गा पाळीले | ऋषी ते वहिले एक आहे ||
बोलावा गा ऋषी काळिमा कशाशी | येऊनीया तया पाशी पुसतसे ||
दास दगा म्हणे उलटे बोलत | कोठून या रत्न पैदा केले ||७||

ऋषी म्हणवीता संन्यासी राहता | अपत्या गुंतता कैसे तुम्ही ||
हात जोडी ऋषी कैसे हो तापसी | दोष आम्हासी कैसे देता ||
होम तुम्ही केला भस्म कटोरा दिला | जपूनीया ठेवीला परसदारी ||
आठव नाही झाला पुन्हा पाहण्याला | काळतो लोटला बहु दिवस ||
दास दगा म्हणे पूर्वगासंचित | माय पिता होता नाथ आमचा ||८||

चैत्र गा पाली हिरवळ झाली | कटोरा झाकला तया माझी ||
हरणी गा येत तया पाशी जात | पुन्हा परतत माघारी या ||
शंका आली मनी येथे काय जाणी | आठवण भानी जागी झाली ||
भस्माचा कटोरा शोधीत तातडी | कन्येचिया जोडी तया ठायी ||
दास दगा म्हणे काय माया जाणे | खेळ त्याचा म्हणे तोचि पाहे ||९||

आपली अपत्ये आम्हा काय भीती | खोटे ना म्हणती शब्दे काही ||
ऋषि गा बोलत सांभाळा म्हणत | आम्ही तव येथ पाळीयेले ||
गळा घाली हात पोटाशी धरत | उत्पत्ती म्हणत माझी पाहे ||
धरुनिया हाती पर्णकुटी नेती | मायबाप म्हणती तुमचा मी गा ||
दास दगा म्हणे सर्व तोचि जाणे | लेखणी ही भाने फिरवीतसे ||१०||

ठेवूनिया कर अनुग्रह थोर | अभ्यासतो सार नामाची या ||
दिला पाहे बाना पांढरा तो जाणा | योगिनीच्या खुणा पूर्वीचीया ||
प्रेम पाहे दाटे अलोट ते लोटे | नेत्री अश्रू दाटे याही जन्मी ||
जन्म तुम्हा आला कार्यकारणाला | पूर्णत्व होण्याला कलियुगी ||
दास दगा म्हणे अक्षर हे जाणे | लेखणीत गुणे आत्माराम ||११||

अष्टदिशा व्यापी अष्ट योग स्थापि | मूळ पाहे व्यापी सिद्ध हा गा ||
त्रिगुणाचा संग निर्गुणाचा रंग | सगुण स्वरूप नाथ माझा ||
अविरत गोडी प्रेमाची या बेडी | भक्तीच्या या गोडी लावूनिया ||
सुख दुःख सांडी पैल पार मांडी | नावेत नावाडी बैसोनिया ||
दास दगा म्हणे सर्व फीके जाणे | नाथावीना म्हणे जीवनात ||१२||

केल्याविना भक्ती कैसी मीळे मुक्ती | जाणीव निवृत्तीकळा त्याची ||
लावूनिया गोडी प्रारब्ध निवडी | लावी देशो धडी सुख दुःख ||
समाधान शांती विश्राम ही प्रीती | घेऊनी चराप्रती मिरवीतसे ||
अग्नि याचे नाव|क्षमा पाहे भाव | शितळ तो देव नाथ माझा ||
दास दगा म्हणे प्रचिती गा जाणे | घेतल्या गा विणे काय कळे ||१३||

नाही भेदीभाव सर्वां ठाई ठाव | कृपेची ही माव तया जवळी ||
जन्मोजन्मी ऋणी शिष्याची या जानी | दुभंग तो भानी कदा नोहे ||
निरंतर जागा हृदयी अभंग | क्षणोक्षणी संग राहतसे ||
भिक्षेची या झोळी प्रेमाची आरोळी | सादय ते केवळी हिता लागे ||
दास दगा म्हणे सदा गा गुंतता | हित चिंतनात नाथ माझा ||१४||

सांगितली खूण पूर्वीची गा जाण | कलीत येईन कलंकी मी ||
रुपे त्या भेटेन कृपा गा करून | तारुनी नेईन भक्ता लागे ||
कलंक घेतला कलंकित झाला | एकची तो भला नाथ कलंकी ||
द्वैत गा नाही ब्रह्म एक पाही | दत्त नाथ ठायी एकची या ||
दास दगा म्हणे मालिका दत्ताची | कलंकी गा साची अवतारिया ||१५||

प्रेम तेच देई प्रेमतेच घेई | भेद तोगा नाही काही एक ||
रुपावती नामे आदिशक्ती भाने | नामते बीधाने बेबी माया ||
पूर्वी सांगितले खुणे स्पष्ट केले | अवतारी आले कलंकी गा ||
कार्य करविले भाषा बोल खुणे | बरबर वहिले पूर्व कृपा ||
दास दगा म्हणे गुरु सत्य जाणे | प्रचिती गा विणें काय कळे ||१६||

अबोल तो बोल वाच्या पाहे खोल | सांभाळीतो तोल वेदाचा गा||
वेद काढी खेद ज्ञानानी या बाध | शुद्ध पाहे गोद भरूनी या ||
वैराग्य विरह ज्ञानाचा गा मोह | माया ती पाहावी भक्ती योग ||
लोभाचा हा भाव स्वार्थाची या ठेव | हिताची या माव सार्वभौम ||
दास दगा म्हणे निरमोह जाणे | स्वार्थ लोभ गुणे तया माजी ||१७||

नाथ आले जगी अभोग गा भोगी | निरंजन जोगी रात्रंदिना ||
योगी पाहे त्यागी जोगी पाहे भोगी | भिक्षांतीएकांगी मागूनी या ||
जोगीभोगी झाले निरांजन ल्याले | स्वप्न हरविले कित्येकांच्या ||
अंतरंगी बाना भगवातो भाना | गुणतोगा गुना निवडूनी ||
दास दगा म्हणे अह़॒म ब्रह्मभाना | निरंतर जाणा जागविती ||१८||

सत रूप भाना सदवस्तू ज्ञाना | मुद्रा वियोगाना जाणिवेत ||
सदा चित्त घोकी सर्व भावव्यापी | विश्वाचीया रुपी आपणची ||
करीत असे काला भस्म झोळी भला | ब्रह्मविद्या तोला धरूनिया ||
साबरी संजीवनी मंत्र गा पठूनी | ध्यान ध्याता भानी अविरत ||
दास दगा म्हणे बिन तारे जाणे | तयाचा गा म्हणे अभ्यासगा ||१९||

कंथा ती घोंगडी कृष्ण सवंगडी | गोकुळची आढी धरूनिया ||
ज्ञानात वैरागी संसारी सारंगी | भाव पाहे रंगी कृष्णाची या ||
हाची ज्ञानकाला वाटी सवंगड्याला | ब्रह्मरस भला कलंकी गा ||
भासमानेभाना कार्य कैचेजाणा | जाणूनी या खुणा द्वैत सोडा ||
दास दगा म्हणे संन्यासी गा जाणे | संसारात गुणे आत्माराम ||२०||

षडन्यास झाला संन्याशीगा भला | मग संसाराला काय दोषी ||
संसार विषय कृष्ण तो संशय | वैराग्य विषय भूल पडे||
मुळपाहे दोष वासनेचा नाश | मग काय पाश पडतीया ||
भासा भाशी खेळकृष्ण तो केवळ | ब्रह्मतेगा बळ आत्माराम||
दास दगा म्हणे युगा युगी जाणे | अवतार म्हणे खूण एक ||२१||

जाणूनिया खुणा काढी उना सुना | गुण म्हणे जाना भावनेचा ||
भक्ती पाहे एक ईश्वरा तो एक | उपासना देख एकनिष्ठी ||
दारोदारी हिंडती भेदभाव भोगिती | द्वहिता जागवी परमार्थ ||
सत्य काढी उणे मनाची या जाणे | तेव्हा पाहे म्हणे हिता जोडी ||
दास दगा म्हणे नाथपंथा जाणे | भक्ती योगा पहाणे पवित्र गा ||२२||

अवतारा घेती शक्ती एकची ती | नाम बदलती सुष्टी नेमे ||
मायेचा आकार शक्ती ती साचार | अवतारी धार ती ची पाहे ||
ब्रम्ह येत नाही अवतरा पाही |ठायी च ते राही स्थिरत्व गा ||
सिद्ध हीगा शक्ती महदादी होती | अवतार धरती नाथ पाहे ||
दास दगा म्हणे वरची माया जाणे |नाम वीधाने स्त्री पुरुष ||२३||

मुळ ते पाहिले मुळते जाणिले | जाणीवती वहिले सिद्धांतात ||
सिद्धासिद्ध केले ज्ञान ते गा भले | ब्रह्मशक्ती वहिले एकजाणा ||
अवतार घेती मर्यादा धरती | कार्य कारण म्हणती तैसी पाही||
साधु संत सिद्ध महात्मे गा बोध | अवतारी खेद काढीतसे ||
दास दगा म्हणे पाहु जात जाणे | मुळ एक म्हणे ईश्वर गा ||२४||

रंग रंगवीती माया जागवती | कार्य गा करिती कारणाशी ||
जैसी आली वेळ तैसा पाहे खेळ | भूमीवरी मेळ धरुनी या ||
जडा मुढा साठी अवतार राहती | ज्ञान उठाउठी करू नीया ||
परमार्थ करा अर्थथोर भरा | उगा येरझारा आल्या जन्मे ||
दास दगा म्हणे काढी उने सुने | सिद्ध म्हणे जाने सिद्धांतात ||२५||

जागे व्हा रे सारे भय भ्रांती निवारे | उगा पाहीभारे वाहू नका ||
नाथांनी वाहिले निराधार भले | तृणते वहिले लक्ष्मीची ||
गमन करिती कळा पाहे स्थिती | विश्वा अवलोकिती ब्रह्मविद्ये ||
दत्त म्हणती गुरु मर्यादा ही थोर | निष्कामी दोर तया हाती ||
दास दगा म्हणे ब्रह्माची या जाणे | ब्रह्म ओज म्हणे मीरवती ||२६||

चराचरी भार दृष्टी पाहे थोर | पूर्णकोटी सार तयाचागा ||
भगवे गा वस्त्र मूळचे हे शस्त्र | अंतरी हे अस्त्र ज्ञानवंता ||
भस्म गंधमाळ अलंकार सोहळा | ज्ञानाचीया ज्वाला उफाळती ||
त्रिशूळ चिमटा गुणकाढी भामटा | शब्द दांडपट्टा उडवीती ||
दास दगा म्हणे घडवा अमृती | जीवदान देती मृता पाही ||२७||

झाले अभंग हे बारे अठ्ठावीस | मूळ स्वरूपास स्मरूनिया ||
जालंदर नाथे कृपा जाना केली | लेखणी गिरवली मज हस्ते ||
शके एकोनाविससे पंचेचाळीस पाहे | शोभन नाम हे संवत्सर ||
कृष्ण पक्ष ज्येष्ठ मास हा साचार | आज सोमवार प्रतिपदा ||
वडगाव लांडग्यास केला पूर्ण पाठ | नाथ चिंतनाते राहुनीया ||
दास दगा म्हणे नामाचीया आवडी | नेवो पैलथडी भक्त नौका ||२८||

झाले अभंग एकोणतीस परी । चला करू वारी गुरूचिया ||
गुरू मोक्षदाता सदा चिंती हिता। सोडवी तो गुंता जन्ममरण ||
कारणे माझी झोळी हिंडे गल्ली बोळी । भिक्षा ते केवळी शिष्यासाठी ||
पृथ्वी गा आसन स्मशानी राहणे । पांघरे आसमान नित्यानंदी ||
प्रेमाचिया लोट तिक्ष्ण ते अलोट । सत्याविण भेट देईचना ||
दास दगा म्हणे काढी भ्रम जाणे । अज्ञानाचा गुणे ज्ञानाचिया ||२९||

गुंतलाशी कोठे सांग या राहटे । ऊगा ऊठाऊठे देवा कधी ||
तुजविण कोण जगी यारे जान । बोट गा धरून चालवितो ||
चारी वाटा धुंद आनंदी आनंद । ऐहिकाचा बंध तयालागे ||
अंधारली मती धुंद झाली स्थिती । जगाची ही प्रिती नाशिवंत ||
दोन दिना सुख पुन्हा आहे दुःख । ऐसे कोण सख्य निवडीती ||
दास दगा म्हणे नाही घेणे देणे । परमार्थी म्हणे संसारी या ||३०||