श्री त्रैमूर्ति कलंकी दत्त पाठ

।। श्री सद्गुरु दत्त दुर्वास प्रसन्न ।।
श्री पूर्ण परब्रह्म कलंकी अवतार ईश्वर वैजनाथ भगवान
– यांच्या अनुहात ध्वनीतून निघालेला –
श्री त्रैमूर्ति कलंकी दत्त पाठ

स्वयंप्रकाशित आत्मा जाणा आहे । निर्गुण हा पाहे निराकार ।।
सत्व रज तम तत्वे ही निर्माण । भानी स्पंद जाण स्फुरोनिया ।।
ब्रह्मा विष्णु शिव या माजी निर्माण । एकरूप जाण दत्त झाला ।।
वैजनाथ म्हणे आत्मा सर्वेश्वर । विश्व गा साचार तेणे भास ।। १ ।।

अत्री अनुसूये बारे जाणा घरी । त्रेतायुगी परी अवतार ।।
त्रिगुणात्मक हा दत्त जाणा आहे । ब्रह्मा विष्णु पाहे शिव शक्ति ।।
नाथ सिद्ध संप्रदाय हा निर्माण । दत्तात्रया जाण पासूनिया ।।
वैजनाथ म्हणे एक मुखी आहे । दर्शन गा पाहे दत्ताचिया ।। २ ।।

अत्री अनुसूये दत्त जो का घरी । अवतार परी पुन्हा नाही ।।
याच्या ईच्छे झाले अंशात्मे निर्माण । नानाविध जाण बारे देखा ।।
श्रीपादवल्लभ हा गाणगापुरी । नरसिंह परी सरस्वती ।।
अक्कलकोटि गा अंश अवतार । जाणा हा साचार दत्ताचिया ।।
वैजनाथ म्हणे भक्ती प्रेमा परी । येणे महीवरी अंश रूपे ।। ३ ।।

विष्णुमय कलंकी साचार । पूर्ण अवतार शेवटचा ।।
ठरूनी वैकुंठी बारे हा विचार । झाले गा साकार परब्रह्म ।।
येथूनिया पूर्ण अवतार नाही । शेवटची पाही दत्त भेटी ।।
वैजनाथ म्हणे धर्मकार्यासाठी । आला जगजेठी धावुनिया ।। ४ ।।

दत्तनाम मुखी जया नित्य वाचे । कळीकाळ याचे दास होती ।।
गुरुभक्तिनिया प्राणी चिरंजीव । जाणा अनुभव नाथ सिद्धा ।।
मृत्यु लोकी जन तरण्या कारण । नाथ रूपे जाण दत्त देखा ।।
वैजनाथ म्हणे सिद्ध नारायण । अवतार जाण दत्ताचिया ।। ५ ।।

आधी व्याधी रोगराई गा हरती । भक्ती जे करीती दत्ताचिया ।।
संसारिची दुःखे संकटे हरती । शरण रहाती दत्तासी जे ।।
दत्त ब्रह्मवेत्ता ईश्वर हा आहे । त्रैलोक्याचा पाहे बारे स्वामी ।।
वैजनाथ म्हणे संकटी हा राहे । भक्ती प्रेमा पाहे ठायी ऊभा ।। ६ ।।

दत्तासवे श्वानरूपे वेद चारी । कामधेनु परी ब्रह्मस्थिती ।।
झोळी माजी यांच्या अवघे भांडार । देतसे साचार कृपा जया ।।
नाथ सिद्धा दीक्षा दिली दिगंबर । मायिक संसार अनुभव ।।
वैजनाथ म्हणे नाथ सिद्धा प्रती । कृपे ब्रह्मस्थिती दत्ते दिली ।। ७ ।।

मोक्षदात्याचिया कृपा जयावरी । कुंडलिनी परी जागृत गा ।।
दत्तकृपे जागृत गा कुंडलिनी । बैसले होवुनी नाथसिद्ध ।।
कुंडलिनी जागृतीने अवधारी । झाले स्वयं परी प्रकाशित ।।
वैजनाथ म्हणे ब्रह्मविद्या स्फुरे । कुंडलिनी बारे जागृतीत ।। ८ ।।

शुक कपिल गा याज्ञवल्क्य दत्त । नारदा जागृत कुंडलिनी ।।
पाच ब्रह्मवेत्ते प्रति गा ईश्वर । दत्त दिगंबर यात मुख्य ।।
सत्पुरुष रूपे अंश अवतार । तयाचे साचार भूमंडळी ।।
वैजनाथ म्हणे सत्पुरुषा राहे । ब्रह्मभान पाहे विदेही गा ।। ९ ।।

मूळ परमात्मा दत्त जाणा आहे । त्रिगुण गा पाहे तत्त्वे देखा ।।
ब्रह्मा विष्णु शिवाचिया अवतार । आत्मा सर्वेश्वर दत्त एक ।।
कलियुगी शेवटच्या अवतारी । कलंकी ह्या परी रूपे भेट ।।
वैजनाथ म्हणे भेट ही सगुण । दुर्लभ गा जाण ईश्वराची ।। १० ।।

करिताती तपे जाणा गुहागिरी । परमात्मा परी भेटावया ।।
होवूनि सापळे योग्यांचे पडती । नोहे तयाप्रती दर्शनगा ।।
अवतारे देखा सहज ही भेटी । संशयाची तुटी येथे घडे ।।
वैजनाथ म्हणे तळमळीविण । लाभ नोहे जाण सगुणाचा ।। ११ ।।

सगुण दर्शन घ्यावया कारण । देवादिक जाण बारे येती ।।
घ्यावया लाविती तया अवतार । भेट गा साचार ही गा होण्या ।।
तीर्थव्रत नेमधर्म आचरती । भेटावा श्रीपती म्हणूनिया ।।
वैजनाथ म्हणे भक्तीप्रेमासाठी । येई जगजेठी अवतारे ।। १२ ।।

योग याग मुद्रासने गा करिती । प्राप्त गा श्रीपती बारे होण्या ।।
ऐशा दंभाचारा प्राप्त होत नाही । बारे जाणा पाही परब्रह्म ।।
भक्तिप्रेमातुनि सहज दर्शन । येतसे घडून ईश्वराचे ।।
वैजनाथ म्हणे अवतार जाण । घेता हा सगुण दर्शन गा ।। १३ ।।

माया ब्रह्माचिया बारे अवतार । दत्त हा साचार जाणा बने ।।
कोल्हाटी ते माया बारे येत नाही । तयाचिया पाही कळुनिया ।।
अवतारे याचे सगुण दर्शन । येतेसे घडुन सुकृताने ।।
वैजनाथ म्हणे युगायुगी राहे । येणे जाणा पाहे तयासाठी ।। १४ ।।

त्याग वैराग्य हे अनुष्ठानातुन । येई प्रगटुन ब्रह्मस्थिती ।।
दत्त घडवुनि आणी साक्षात्कार । जागृत साचार कुंडलिनी ।।
कुंडलिनी जागृत गा झाल्यावरी । अमरत्व परी अंगी बाणे ।।
वैजनाथ म्हणे ब्रह्मविद्या स्फुरे । अंतर्ज्ञानी बारे आत्मा बने ।। १५ ।।

दु:खे संकटे गा होण्या निवारण । संसारिक जाण मानवांची ।।
सत्पुरुष रूपे येणे महिवरी । अंशरूपे परी दत्ताचिया ।।
ब्रह्मवाक्याचिया सिद्धता ते राहे । सत्पुरुषा पाहे जाणा मुखी ।।
वैजनाथ म्हणे सेवेत जो परी । यांच्या अवधारी सुखी ऐसा ।। १६ ।।

सत्पुरुषालागी शरण जे जाती । ऐहिक पुरती सर्व इच्छा ।।
दुःखे संकटे गा होती निवारण । यांच्या देखा जाण आशीर्वादे ।।
सत्पुरुषाचिया महिमा हा थोर । सेवेने साचार यांच्या प्राप्ती ।।
वैजनाथ म्हणे कलियुगी आहे । सत्पुरुष पाहे रूपे दत्ता ।। १७ ।।

पूर्ण अवतार प्रत्यक्ष ईश्वर । दुर्लभ साचार ही गा भेटी ।।
होता अधर्म गा जाणा महिवरी । वैकुंठी हा परी विचारगा ।।
संतमालिकाते सवे गा घेऊनि । साकार होवुनि हरी येई ।।
वैजनाथ म्हणे कलंकी ह्या बारे । आता अवतारे दर्शन गा ।। १८ ।।

पंथ सांप्रदाय ऊपासना नाही । देवापाशी पाही बारे भेद ।।
कोणतेही नाम घेतिलये जरी । ईश्वर मी परी तेणे पावे ।।
माया ब्रह्माचिया उपासना परी । सर्व महिवरी एकचि गा ।।
वैजनाथ म्हणे दत्त मीगा आहे । सर्व नामी पाहे व्यापुनिया ।। १९ ।।

पंथ सांप्रदाय रूढीने वागुनी । प्राप्ती गा कोठूनी ईश्वराची ।।
आत्मतत्व वागणे गा जेथे आहे । भेट ऐशा पाहे ईश्वराची ।।
आत्मतत्वानिया संत हे वागले । रूप त्या कळले ईश्वराचे ।।
वैजनाथ म्हणे आत्मसाक्षात्कार । सद्गुरु साचार कृपा जया ।। २० ।।

तीर्थ क्षेत्र स्थाने पवित्र निर्माण । अवतार जाण सत्पुरुषे ।।
याच रूपे ईश्वर गा महिवरी । महिमा हा परी राखीतसे ।।
धातु पाषाणाच्या मूर्ती न बोलती । भेटे हा श्रीपती सत्पुरुषे ।।
वैजनाथ म्हणे तयाचे दर्शन । आलिया घडुन प्राणी तरे ।। २१ ।।

दत्ताचिया घ्यावे त्रिकाल दर्शन । जाणा हे भेटुन सत्पुरुषा ।।
यांच्या आशिर्वादे सुखी ह्या संसारी । व्हाल जाणा परी सकळीक ।।
सत्पुरुष रूपे चिंता नारायणा । अनाथ ह्या जाणा भक्ता तारी ।।
वैजनाथ म्हणे धरिता विश्वास । नुरे ऐशियास भव भय ।। २२ ।।

सत्य सदाचार बाळगावा धर्म । घडे सत्यकर्म जाणा हाती ।।
आणिक ह्या धर्मरूढी अवधारी । तारक न परी जाणा होती ।।
आत्मीयतेविण तरणे गा नाही । समाधान पाही तेणे शांती ।।
वैजनाथ म्हणे दत्त अवतार । देण्या ही साचार शिकवण ।। २३ ।।

कर्तुमाकर्तुम शक्ती गा ईश्वरी । जाणा महिवरी अवतारे ।।
दत्त ह्याच रूप बारे हा साकार । याचा साक्षात्कार सगुण हा ।।
उपासने प्रमाण गा साक्षात्कार । जाणा अवतार घडवी गा ।।
वैजनाथ म्हणे शुद्ध ज्याचा भाव । ऐशा अनुभव अवघा हा ।। २४ ।।

विश्वामाजी कुठे काय जाणा आहे । दत्त जाणे पाहे परमात्मा ।।
मुंगी पायी घुंगरू गा वाजे जरी । दत्त कानी परी आवाज हा ।।
दीन भक्तांचिया करी गा रक्षण । संकटा मी जाण हा धावुनिया ।।
वैजनाथ म्हणे जाती जे शरण । दत्तपदी जाण तरती हे ।। २५ ।।

सर्व पंथ सांप्रदायी संत येती । एकचि असती आत्मज्ञानी ।।
पंथ रूढी ऐसे बोलती हे जरी । मुळाशी त्या परी अध्यात्म गा ।।
आत्मतत्त्वे विभूतींची शिकवण । विभूतीत जाण भेद नाही ।।
वैजनाथ म्हणे लोकी एकात्मता । वाढविण्या संताचिया येणे ।। २६ ।।

त्रेतायुगी अत्री अनूसये घरी । कारणे हा परीक्षा देखा ।।
तयांच्या भक्तिने प्रसन्न हा झाला । त्यासाठी धरिला अवतार ।।
नाथ सांप्रदाय करणे निर्माण । कार्यापुढे जाण बारे होता ।।
वैजनाथ म्हणे यारूपे सगुण । भेट बारे जाण जाणा दिली ।। २७ ।।

दत्तपाठी अभंग हे अठ्ठावीस । मूळ स्वरूपास लक्षुनिया ।।
एकोणावीसशे सात जाणा बारे । शके संवत्सरे क्रोधन नाम ।।
ज्येष्ठ वद्य त्रयोदशी ते साचार । जाणा रविवार तये दिनी ।।
संगमनेर गा प्रवरेच्या तिरी । दत्तपाठ परीपूर्ण केला ।।
शुद्धभावे जेका करिती पठण । वैकुंठी गा जाण वास यांचा ।।
अनुहात ध्वनीतूनी साक्षात्कार । दत्त हा साचार पाठ झाला ।।
वैजनाथ म्हणे भेट ही सगुण । भक्तिप्रेमा जाण साठी आहे ।। २८ ।।

सत्पुरुषाचिया सेवा जे करिती । तेथे मी श्रीपती दत्त आहे ।।
अवतारे समाधी ते संजीवन । दर्शन यातून सगुण गा ।।
अमृतवाहिनी प्रवरेच्या गा तिरी । ह्या संगमनेरी कलंकी हा ।।
वैजनाथ म्हणे भेट ही दुर्लभ । घ्यावा पद्मनाम ओळखुनी ।। २९ ।।

तुमची आमुची भेट हीच आहे । मृत्युलोकी पाहे शेवटची ।।
विष्णुमय दत्त कलंकी श्रीहरी । तुम्हासाठी परी साकार गा ।।
भारत संस्कृती अध्यात्माची आहे । आलो जाणा पाहे राखावया ।।
वैजनाथ म्हणे धर्मकार्यासाठी । आलो जगजेठी भक्तिप्रेमा ।। ३० ।।

।। श्री त्रैमूर्ति कलंकी दत्त पाठ संपूर्ण ।।