श्री संत बेबीनाथ माया यांचे मनोगत

श्री संत कलंकीनी बेबीनाथ माया यांचे – मनोगत
(श्री कलंकी देव सद्गुरू भेट व आत्मानुभवाचे अल्पबोल)

श्री गणेशाय नमः श्री गुरूब्रह्माय नमः श्री गुरूदेव दत्त, वैजनाथ रामकृष्ण, ॐ सोहं परब्रह्माय नम:
गुरू बंधू भगिनीनो ! तसेच जग जनार्धन हो !
मी एक पामर भक्त आहे. श्री कलंकी देवांचा मला पामरीला वरदकर असून कृपाप्रसाद वाणी आहे. मी बालपणा पासून शिवभक्त होते. वयाच्या सहाव्या वर्षापासून मी भगवान शिवाची निष्ठेने व प्रेम प्रितीने भक्ती करत होते. तरी त्यात माझा मायिक स्वार्थ होताच; कारण मी लहान असतांना माझी माता भोळी अज्ञान अल्लच होती. तिला मूल झाले की ते वर्षातच मृत्युमुखी पडत असे. ते दुःख मला पहावत नसे म्हणून मी बाल वयातच शिव भक्ती करू लागले. आढळा नदीच्या कडेला जवळे येथे आढळेश्वराचे शिवमंदिर आहे. तेथे मी पूजा प्रार्थना करत असे. तरीही ते माझ्या अज्ञान बाल अवस्थेला प्रतिसाद देत होते. तेव्हापासून देव मला बाळकृष्ण रूपात भेटत व माझ्या मनाची घालमेल ओळखून मला चांगले म्हणजे समाधान कारक संकेत देत असत, अशी भोळी भक्ती करून मी मोठी झाले. वयात आल्यानंतर इतरांप्रमाणे लग्न झाले खरे, परंतु माझे चित्त संसारात रमत नव्हते. त्यात मला दु:खाचेच अनुभव येत असत. याप्रमाणे चौदा वर्ष दु:ख यातनेतच गेले. नंतर मी जालंदर नाथांची उपासना केली. त्यांनी भगवान शिव अधिष्ठानाने मला प्रचिती दिली. ती उपासना करता करताच माझे गाणगापूर येथे जाणे येणे होऊ लागले. तेथे दत्तांनी मला कृपाशिर्वाद देऊन मी तुझा गुरु होईल असे सांगीतले.
श्री. दत्तांच्या भेटीची मी वाटच पहात होते ते कुठल्या स्वरुपात आहे व कोठे आहे हे मला माहित नव्हते. एक दिवस श्री. कलंकी देवांचे अल्प चरित्र मला एका सद्भक्ताने वाचण्यास दिले. त्यात कलंकी देवांचे संगमनेर येथील वास्तव्य कळले व त्यातला फोटो जणूकाय माझ्याशी हासतो व बोलतो अशी जाणीव होऊन भेटीची तीव्र ओढ लागली. लगचेच दुस-या दिवशी मी ज्ञानमाता विद्यालयासमोर संगमनेर येथील श्री. कलंकी देवांच्या आश्रमात गेले. त्यावेळी श्री. कलंकी देव झोपलेले होते व मी त्या आश्रमात भिंतीस पाठ टेकून बसले होते. काही क्षणात श्री. कलंकी देव उठले व मला पाहून हास्य वदनाने बोलले. जणूकाय आमची अनेक काळापासून ओळख आहे अशारितीने ते म्हणाले “आलीस का सर्व जगाला भोवरा देऊन, मला मायेत टाकायला भवाने! तुला दत्तांनी पाठवले काय? ” ते असे म्हणताच माझे हृदय दाटून आले व मी महाराज म्हणून रडू लागले. तितक्यात त्यांनी जवळ ये बाळ म्हणून माऊलीप्रमाणे हाक दिली. मी जवळ जाताच कुठलाही विचार न करता मला अनुग्रहीत केले व शक्तिपात केला. नंतर माझे भान हरपून वेगळीच अनुभूति आली. त्याचे विवेचन केल्यास हा शब्दप्रपंच वाढेल म्हणून त्याला येथेच पूर्णविराम देऊन पुढे आत्म्याविषयी स्वानुभवात्मक अल्पबोल विशद करीत आहे.
सञ्जनांनो व भक्तगण हो ! आत्मा सिद्ध आहे हे प्रचितीने कळू लागते. स्वानुभव हाच खरा सिद्धांत आहे. आत्मा स्वयंसिद्ध व प्रकाशरूप आहे. तेथे अंधकार नाही. त्याची जाणिव भानाठाई शुद्ध स्पंद उमटू लागले की अंधकार नष्ट होऊन शुध्द प्रकाश अंतरंगी चकाकू लागतो. तेथेच मीचा प्रश्न सुटतो व मी देह नाही हे स्वयंभू तत्वाने कळू लागते. कारण देह जर मी असतो तर स्वईच्छेने जन्म मृत्यू चुकवू शकलो असतो. तर देह दास आहे व तो स्वावलंबी नसून आत्मतत्वांच्या स्वाधिन आहे. आत्मा हा प्रबल बलशाली आहे. त्याच्या इच्छेवर ही मायिक धारणा चालते. रोज मायिक कार्यात असणारा मी मिथ्या आहे. तो खोटाही नाही अन खराही नाही. हा मध्येच कार्यकारणी असतो. तरीही तो अहंकारात सापडतो व फजित पावतो. त्यासाठी खरा मीचा शोध घ्यावा लागतो. तोही कार्यकारणीच असतो. तो अध्यात्म तत्वाने स्फुरतो. पण त्यासही अहंकार होतो. ह्या अध्यात्म तत्त्वातला मी सुद्धा देहापलीकडे आहे. म्हणून येथेही गर्व होता कामा नये. कारण ही अनात्मी विद्या कधीतरी शब्दचोरी करते व साधकाला फसवते. कारण मायेत राहून त्यातून अलिप्त राहणे सोपे नाही. याकरिता खऱ्या मीची प्रचिती आली तरीही तो ईश्वर आहे हे विसरु नये व आपण लिनता व निरहंकारात राहणेच बरे, ती अनुभूती सदगुरुचिच समजून त्यानांच समर्पित करुन आपण दास्यत्व पत्करावे.
मी म्हणवणारा आत्मा स्वयंसिद्ध आहे. माझी जाणीव करणारा मिच आहे. मला जाणता असा कोणी नसून जाणता जाणिवेत येणारा मिच आहे. मी ईच्छाशक्तीने येतो व आहे तोच राहतो. माझी घडामोड होत नसून मी स्वयंभु साकार असतो व आहे. घडामोड ही देह धारणेची होत असते. मी देहात असून त्यातून वेगळाच उरतो. मी पणाची जाणिव देहाला जीवामुळे होते. जीव हा माझ्या आत्म्याचा अंश आहे. संचिताप्रमाणे त्याला प्रेरणा देऊन माझ्या मिची जाणिव करुन देतो. याकरिता मागील संचित बलवान हवे. संचिताने प्रेरणा होते व चित्ताला चेतना मिळून चैतन्य खुलते. बरे असो, आत्मारामाची वाणी त्यालाच समर्पित करते.

आपली
भक्त बेबीनाथ माया