सत्यज्ञान बोध ग्रंथ

।। ॐ ।।
।। श्री सद्गुरु दुर्वास दत्त प्रसन्न ।।
प्रस्तावना

सर्व मंगल मांगल्ये । शिवे सर्वार्थ साधीके ।।
शरण्ये त्र्यंबके गौरी । नारायणी नमोस्तुते ।।

सर्वांचे जीवन मंगलमयी करणाऱ्या आदिशक्तीला स्मरुन, शरण जाऊन, तिच्याठायी विनम्र भावाने नतमस्तक होऊन व प्रथमचरणी मूळारंभी श्री. गजानन व सरस्वती यांना वंदन करुन हे प्रास्ताविक विवेचन करत आहोत.
शिवशक्ती ब्रह्ममाया अशा एकरुप अर्धनारी नटेश्वर स्वरुपाला कोण बरे जाणत नाही ? सर्व जगताचे मूळ कारण तर तेच होत. निर्गुण निराकार परमात्म स्वरुपाचे प्रकट रूप म्हणजे ब्रह्मा आणि माया ! हैं दैत भासून अद्वैत आहेत. म्हणूनच ‘यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत’…. ह्या परमेश्वराच्या दशावतार कार्यात मायेचे कार्य महान आहेच. परब्रह्म रामाबरोबर सीतामाई, कृष्णावतारी रुक्मीणी व नवव्या बौद्धरूपे ज्ञानेश्वरी अवतारी मुक्ताई रुपाने मायेचे अवतार होते. हा चिमुरड्या मुक्ताईची त्यावेळी फार ईच्छा होती की मी ही ज्ञानेश्वरांबरोबर अध्यात्मिक जगतात महान कार्य कराव. परंतु सदगुरूच्या आज्ञेमुळे व तत्कालीन परिस्थितीमुळे हे सर्व आत्मे लवकरच महासमाधीस्त झाले. त्यावेळी अपूर्ण राहिलेली ‘आदिशक्तीची कार्य करण्याची ईच्छा कलंकी वैजनाथरुपे दहाव्या अवतारी बेबीनाथ हे नाम धारण करुन पूर्ण होत आहे व त्यामुळे अज्ञ जड़मूढ मानवजातीसाठी अनमोल असा ज्ञानाचा खजिना लाभला आहे. नाथसिद्ध जालंदरनाथ यांचेवेळी योगिनी रुपाने रुपवती नावाची शिष्या होती. नाथांना तिने ‘संसार कसा असतो’ ? असा प्रश्न केला होता. तेव्हा नाथसिद्ध जालंदरनाथ म्हणाले होते, कलंकी दहाव्या अवताराच्यावेळी तुला त्याचा अनुभव येईल. त्यानुसार ह्या बेबीनाथ अवतारी संसाराचे चटके अनुभवत जगाला ज्ञानरुप अमृत पाजत आहेत.
एका खेड्यात राहून केवळ नाममात्र ४ थ्या इयत्तेपर्यंत शिक्षण त्यात घरी अठराविश्वे दारिद्रय ! तशात लग्नानंतर काही काळ सतत व्याधीग्रस्त जीवन व अज्ञाणी लोकात वावर. इतक्या सर्व प्रतिकूल परिस्थितीतून ह्या स्त्री जीवनाची वाटचाल चालत असतानाच अध्यात्मिक कुंडलिनी शक्तीची प्रत्यक्षानुभूति घेऊन ते संत भक्त तयार करण्याचे अत्यंत कठीण कार्य करत आहेत आणि सर्व जगाला उपयोगी असे ज्ञानभांडार आपणा सर्वांपुढे मांडत आहे. त्यांच्या अध्यात्मिक साहित्यात २0-२२ छोटे मोठे ग्रंथ, हजारो अभंग, पदे सुविचार इत्यादी हस्तलिखित आहे. त्यापैकी त्यांच्या ज्ञानाचा थोडातरी रसास्वाद खरोखरीच आत्मज्ञानपिपासू तळमळीच्या भक्तांना घेता यावा म्हणून कलंकीनी आदिशक्ती मंडळातील भक्तांनी त्यांचे ज्ञान जगापुढे आणण्याचे ठरविले. कलंकीनी बेबीनाथ मातेच्या ‘सत्यज्ञान बोध’ ह्या एका छोट्या ग्रंथाचे त्यांच्या अल्पचरित्रासोबत प्रकाशन करताना आम्हा सर्व भक्तांना अत्यानंद होत आहे.
प्रस्तुत ग्रंथ पुस्तीकेत प्रथम भागात कलंकिनी बेबीनाथ माया यांचे संसारमय जीवन किती खडतर परिस्थितीतून गेले याची थोडीतरी आपणाला कल्पना यावी व प्रपंचात राहून अनेक सुखदुःखाना सामोरी जाऊन सुद्धा अध्यात्मिक उच्च पातळी गाठता येऊ शकते हे कळावे म्हणून त्यांचे चरित्र विदीत केले आहे.
प्रस्तुत ग्रंथ पुस्तीकेतील द्वितीय भागात कलंकिनी बेबीनाथ माया यांचा सत्यज्ञान बोध ग्रंथ प्रकाशित केला आहे. त्यात माताजींनी भक्ताच्या सबबीवर शंकाकुशंकावर मनाच्या व निश्चयाचा ढिलेपणावर भक्तीशैथील्यावर मर्मभेदी प्रहार करीत अनेक अंधश्रद्धेचा समाचार घेतला आहे. त्या पटवून देतात की खरोखरच देव मला हवा आहे अशी मनाची आर्तपणे तळमळ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत देव तरी काय करणार ? देव द्यायला तयार आहे परंतु घ्यायलाच कुणी तयार नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे चूक ही देवाकडे नसून भक्ताकडेच आहे. ती त्याने सुधारन घेऊन विभूती हयात असतानाच अत्यंत तळमळीने व सगुण भक्ती करावी, असा ही विश्वमाऊली सद्भक्तांना उपदेश करीत आहे. यातील प्रत्येक सिद्धांत हा अनमोल रत्नासम आहे. वाचकांना ह्या ज्ञानाची कल्पना वाचनांती येईलच व त्यामुळेच संतस्वरुपी असलेल्या बेबीनाथ ह्या खरोखरच ब्रह्मस्वरूपिनी आदिशक्ती होत याची जाणीव होईल. सदभक्तांना त्यामुळे आपले उर्वरीत जीवन त्याच्या ज्ञानाचा व मार्गदर्शनाचा लाभ घेऊन सार्थकी लावता येईल.
शेवटी ऋणनिर्देश म्हणून ह्या ग्रंथाची सुवाच्य अक्षरात प्रतिलिपी करुन देणारे वडगाव लांडगे येथील कलंकिनी भक्त श्री. संपत यंदे यांच्या सहकार्यामुळेच हे ग्रंथ प्रकाशन शक्य होत आहे म्हणून प्रथम त्यांचे आभार ! तसेच श्री. सुधाकर खानविलकर यांनी हे कार्य आपलेच समजून अत्यंत सचोटीने योग्य ते मार्गदर्शन करुन ग्रंथ छपाईसाठी अत्यंत मोलाचे सहकार्य केले म्हणून त्यांचा ऋणनिर्देशन करणे अत्यंत गरजेचे आहे. इतर भक्त व सज्जन यांचा ह्या ग्रंथपुस्तके प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहाय्य लाभले त्यांचे मनःपूर्वक आभार !
कलंकिनी आदिशक्ती मंडळाचे हे कलंकिनी बेबीनाथ माया यांच्या ग्रंथसमृद्धीतील ग्रंथाचे प्रथम प्रकाशन आपणा सर्वांच्या हाती देतांना आमचा आनंद तो काय वर्णावा ? हे ग्रंथरुपी ज्ञानामृत आपणा सर्वांना उध्दबोधक आत्मप्रेरक, जीवनदायी, आत्मकल्याणकारी ठरो व ह्या ज्ञानरुप सागरात आपण यथेच्छ डुंबत रहाल अशी माँ भगवती कलंकिनी ब्रह्मस्वरुपिनी बेबीनाथ माया आदिशक्ती यांच्या चरणी विनम्र प्रार्थना करून हे प्रथम प्रकाशन त्यांच्याच चरणी समर्पण करीत आहेत. लवकरच त्यांच्या द्वितीय प्रकाशनाचा योग येवो अशी सदिच्छा व सदभावना ठेवून ही ग्रंथ पुस्तीका आपणां हाती देत आहोत.

।। जय जय दत्तराज माऊली ।।
।। जय जय वैजनाथ माऊली ।।
।। जय जय बेबीनाथ माऊली ।।