स्वानंद लहरी

।। ॐ ।।
।। श्री सद्गुरु दुर्वास दत्त प्रसन्न ।।
प्रस्तावना

सर्वतत्वे ज्ञान द्यावया साचार । आता अवतार कलंकी हा
केले साकार गा दत्ताने ईश्वर । भविष्य साचार ठरविले
आत्म जागृतीगा घडविण्याजाण । मानवा कारण बारे देखा
वैकुंठीच्या देवा साकार गा केले । त्यामुखी वणले अध्यात्मगा
भक्ती प्रेमाठायी लिला जाणा थोर । बारे गा साचार अवतारे
वैजनाथ म्हणे वेळेच्या प्रमाण । नेमा नेम जाण युगायुगी
(कलंकी देव वही नं. २१७ | ३३६)

आत्मा हा ब्रम्हरुप आहे. व ब्रम्ह हे ज्ञानरुप आहे. म्हणुनच ह्या समस्त जगतात जे जे काही आहे ते ते सर्व ब्रम्हापासूनच्या ज्ञानाची परिणिती आहे व्यवहरिक ज्ञान व आध्यात्मिक ज्ञान असे ज्ञानाचे ढोबळ मानाने विभाग केले जातात. व्यवहारिक ज्ञान हे अनुभवातून, गरजेतून, अनुकरणातून, निरिक्षणातून वगैरे द्वारा आत्मसात केले जाते. परंतु आध्यात्मिक ज्ञान ज्ञात होण्यासाठी मात्र त्याविषयीचा जो अधिकारी पुरुष असतो तोच त्याचे समाधानपूर्वक विश्लेषण करु शकतो. विद्वान लोक शाब्दिक पांडित्याने ह्या ज्ञानाचे तर्क ज्ञानाने, रसभरीत वर्णनाने विश्लेषण करत असतात, परंतु ते सर्वथा आपले आत्मिक समाधान कधीच करु शकत नाही. कारण अशा विव्हजनांच्या ठिकाणी स्वानुभवाचा लवशही सापडणे तितकेच दुरापास्त असते त्यामुळे त्यांचे विवेचनही आपणास तितकेच लटके वाटते. ह्या अनधिकारी लोकांच्या शब्दजलाने अज्ञजन ब-याच वेळा भारावून जातात व त्यांच्यावर विसंबल्याने अशांची परमार्थात फसगत झाल्याशिवाय रहात नाही.
परमेश्वरी शक्ती परमदयाळ कृपाळु आहे म्हणूनच तिला विद्वजनांद्वारे होणारी जड मूढांची फसवणूक पहावत नाही आणि त्यामुळेच या भूतलावर ठायीठायी वेळो-वेळी संत-सत्पुरुष, साध्वी, सिध्द-सद्गुरु, परब्रम्ह अवतार इ. स्वरुपात परत्म्याचे अवतरण होऊन सर्वतत्वे ज्ञान देत असतो. त्यांच्या सत्यज्ञान व ज्ञानामृतामुळेच आपणासारख्या सामान्य जीवांना त्या परमात्म्याच्या परंधामा पर्यंत पोहचण्याचा मार्ग सापडू शकतो व तो सुलभ होतो, अन्यथा जगात ईश्वर आहे किंवा नाही व तो कसा आहे याचा शोध तरी आपणास लागला असता का बरे ?
संत हे सामान्यातून प्रतिकुल परिस्थितीतून अशा मान्यवत बनतात. म्हणूनच त्यांचे ज्ञान प्रासंगिक स्वानुभवी व प्रभावी ठरत असते. त्यांच्या आयुष्य भर छळ होणे हे जणू समीकरणज ठरलेले आहे. त्यांच्या हयातीत त्यांच्या ज्ञानाची फारशी कदरही होत नाही. हाही एक दैवदुविलास आहे. आणि तरीही ते आपले कार्य कोणी ‘निदो अथवा वंदो’ याचा विचार न करता सतत चालू ठेवत असतात.
ह्या घोर कलियुगात अधर्म अराजकाला जेव्हा ऊत आलेला आहे. तेव्हा तो शमविण्यासाठी ठरल्याप्रमाणे भगवान विष्णुच्या दशावतार मालिकेतील शेवटचा कलंकी अवतार वैजनाथरुपे साकार झाला. त्यांच्या लेखणीद्वारे अध्यात्माचे गुढ असे ज्ञानभांडार सर्व जनमानसासाठी खुले केले गेले हे ज्ञानभांडार मराठी भाषेत जास्त प्रमाणात उपलब्ध आहे तसेच इतर अनेक भारतीय भाषेत ही श्री. कलंकी वैजनाथ भगवंतांनी लिखाण कार्य केले आहे. त्यांच्या अद्भुत लिखाणातील स्वानंद लहरी हा एक छोटासा परंतु अत्यंत उद्बोधक असा ग्रंथ आहे. त्यात एकूण ३५१ वचने आहेत. प्रस्तुत ग्रंथात स्वानंद लहरी म्हणजे आत्मानंद स्थिती म्हणजेच सहज स्थितीचा अनुभव कसा प्रगट होतो या विषयीचे विवेचन आले आहे. शुध्द भक्तीप्रेम हेच खरे स्वानंद लहरीचे उगमस्थान आहे. हे यात स्पष्ट करतांना कलंकी भगवंतानी अनेक दृष्टांत रुप उदाहरणे देऊन सद्गुरु कृपेचे महत्व विषद केले आहे व ज्यावेळी स्वानंद लहरी सुरु होतात त्याच वेळेस ख-या ईश्वरी साक्षात्काराला सुरवात होते व तेव्हा पासूनच कर्तुमाकर्तुम शक्तीचा अंर्तभाव होत जातो व साधक ईश्वरमय अवस्थेतला पोहचतो. सत्यसद वस्तु म्हणजे संत अवस्थेपासून पुढील पायरवरी सद्गुरु सिध्द विभुतीच्या ठायीच स्वानंदलहरी प्रगट असतात व त्या अवस्थली पोहचण्यासाठी ख-या साधकाने कुठला मार्ग चोखाळावा याचे अत्यंत समर्पक व प्रस्तुत ग्रंथात नमूद केले आहे. ग्रंथातील भाषा गद्यमय प्रासादिक साधी अशीच आहे व ती सर्वसामान्याला समजेल अशीच आहे. प्रस्तुत ग्रंथातील हा सर्व सज्जन भक्तांना हीतकारीच आहे तो त्यांनी आपल्या जीवनात करून आपले परमकल्याण साधून घ्यावे शुध्द भक्तीप्रेम शुध्द आत असेल तरच ख-या ज्ञानाचा झरा गवसतो. मग तो प्राशन करणा-याला दुर्गम वाट कशी बरे कठीण जाईल !
कलंकी देव भक्त कार्यकारी मंडळाचे हे षष्ठम प्रकाशन आपणा हाती देतांना आम्हास अत्यंत आनंद होत आहे.
दि. ६ जुलै १९८७ च्या कलंकी देवांच्या महानिर्वाणा नंतरचे हे प्रथमच प्रकाशन आहे. तत्पुर्वी त्यांच्या हयातीत भक्त मंडळाने ५ मोठी ३-४ छोटी पुस्तके प्रकाशीत केलेली आहेच हया पुस्तकाच्या प्रकाशनाला ते मानवी देहात साकार नसले तरी त्यांचे अस्तित्व ठायी ठायी भक्तांना जाणवतेच त्यांच्या सहवासाचा ज्यांना लाभ झाला ते भक्त धन्य होत ! ज्यांच्या हातून प्रत्यक्ष सेवा घडली ते परम धन्य होत ! ते लिखाण रुपाने सदासर्व काळ आपणा जवळच आहेत आणि म्हणूनच त्यांच्या लिखाण कार्याचे प्रकाशनार्थ सहाय्यभूत आपण सर्वानी व्हावे अशी आम्हा भक्त मंडळांची आपणा सर्व सज्जनांना नम्रतेची विनंती.
प्रस्तुत ग्रंथाचे प्रकाशन करण्यास आमचे कामगार सहकारी मुद्रणालय संगमनेर यांचे बंधू वर्गाचे पुन्हा एकदा आम्हास उत्स्फूर्त सहाय्य लाभले आणि त्यामुळेच एवढया अल्प वेळात व अल्प किमतीत ही ग्रंथ पुस्तीका आम्ही आपण सर्वाच्याप्रत पोहचवू शकत आहो. त्यांचे आम्ही अत्यंत ऋणी अहोत तसेच ह्या ग्रंथ पुस्तीकेसाठी ज्यांचे तनमन धनरुपे आम्हास साहाय्य लाभले त्या सर्वांचे अंतःकरणपूर्वक आभार !
शेवटी आपणा सर्वांना हे ग्रंथामृत उद्बोधक, आत्मप्रेरक, जीवनदायी आत्मकल्याणकारी ठरो व या ज्ञानरुपी सागरात आपण यथेच्य डुंबत रहाल अशी कलंकी वैजनाथ भगवंत चरणी व दत्तमाऊली चरणी प्रार्थना करून हा अमोलिक ग्रंथ आपण सर्वांच्या हाती देत आहोत.

।। जय जय दत्तराज माऊली ।।
।। जय जय वैजनाथ माऊली ।।