हनुमान पाठ

।। श्री हनुमान पाठ ।।

|| १ ||
रामाचीया गोडी नामाची आवडी । केली रे तातडी रूद्र अवतार ।। १ ।।
भक्तिचिया वाट सांगती सुभट । प्रेम ते अलोट आपुलीया ।।२।।
अंजनीच्या पोटी केली कैशी दाटी । अरे जगजेठी शंभो तुची ।।३।।
हनुमंत म्हणा हनुमंत म्हणा । शिव तुची जाणा अवतार ।।४।।
दास दगा म्हणे काय मीगा जाणे । गुरू कृपा म्हणे पामराशी ।।५।।

|| २ ||

वज्राचीया धार कार्य कारण थोर । घेऊनी भक्तीभार आले जगी ।।१।।
राम पाहे पोटी राम तुझ्या ओठी । पाहुनीया मीठी मारी चरणा ।।२।।
असुराचा नाश सुराला उपदेश । तोडी तसे पाश ब्रम्हचारी।।३।।
सीमा उल्लंघीली दृढ कासोटी ठेली । सन्यांशी वहिली रूद्रशक्ती ।।४।।
दास दगा म्हणे स्त्री पुरुष झाली । लींग भेद भली जड देही ।।५।।

|| ३ ||

भासमान व्यापी पृथ्वीवर स्थापी । भुभुकार कंपी स्त्रीराज्यात ।।१।।
चिरंजीवीत्वानी चिरंतर जाना । मुळ पाहे खुणा शक्तित्वाच्या ।।२।।
सीतामाई साठी अशोकवना भेटी । रावणाच्या पाठी गुप्तचर ।।३।।
अर्जुनाच्या रथी भुभुकारे प्रिती । माया ते करिती बैसुनिया ।।४।।
दास दगा म्हणे जगती ती आई । सांगे लवलाही देऊनिया खुणा ।।५।।

|| ४ ||

वायुरूपी फेरा पंचभुती थारा । पंचतत्व भारा भासमाने ।।१।।
धरीलेशी जड अयोनी संभव गुढ । पंचशीला जोड जोडुनिया ।।२।।
होऊनीया भक्त मुऴ पाहे मुक्त । राहुनीया सुप्त मायानगरी ।।३।।
देऊनीया भाक राम देई हाक । हरीहर एक आपणची ।।४।।
दास दगा म्हणे काढी उनेसुने । भक्तीयोग देणे कलीमाजी ।।५।।

|| ५ ||

अलंकारले लेणे अक्षर गा म्हणे । मिथ्य हे जाणे नामाविण ।।१।।
रात्रंदीन गोडी अनुसंधान न सोडी । नामाचीया ओढी राहुनीया ।।२।।
खातापिता राम शयनी गा धाम । नाही काही काम नामाविणा ।।३।।
ह्रदय मंदीर राम निरंतर । हाची म्हणे थोर व्यापार आहे ।।४।।
दास दगा म्हणे ऐहीकांना जाणे । सत्य पाहा म्हणे रामरूप ।।५।।

|| ६ ||

ओळखीना पाही रामाविणा काही। वस्ती सर्व ठायी राम राम ।। १ ।।
निद्रेतही राम जागृतीत राम । नित्य पाहे काम नित्यानंदी ।।२।।
चालता वाटे रामचीया भेटे । झाडेवेली देठे राम आहे ।।३।।
आराम तो राम हरामीना राम । कैवल्य तो काम ऊर्ध्व आमुचा ।।४।।
दास दगा म्हणे नित्य देखे राम । सांडुनिया काम निष्काम तो ।।५।।

|| ७ ||

कली कलंकीला राम म्हणे झाला । साथ देण्या आला हनुमंत ।।१।।
नोळखीले कुणी देवा कलंकी तुम्हा । राम तुम्ही स्वामी माझे आहे ।।२।।
येऊन संगती सिध्दांतगा देती। गोरक्षा म्हणती चालचरा ।।३।।
हरीहर एक दत्त पाहे देख । राम तो विन्मुख कैसा राहे ।।४।।
दास दगा म्हणे देव देई खुणे । मुर्ती हनुमाने पुजुनिया ।।५।।

|| ८ ||

भुमीवरी भार पापाचा गा जोर । म्हणुनी अवतार कलंकी गा ।।१।।
जेथे ब्रम्ह लेखा तेथे सुत्र देखा । वैकुंठीचा ठेका ब्रम्हनादे ।।२।।
अनादीचा नाद काढुनिया बाध । भरविली गोद ज्ञानाचिया ।।३।।
नाही वस्र ठायी लंगोटी गा पाही । मुळ ते गा राही दृढ कासोटी ।।४।।
दास दागा म्हणे हनुमंत जाणे । देवाशी गा उणे नच आवडे ।।५।।

|| ९ ||

स्वामी माझा आला वाळीत टाकीला । कली काळोख्याला अभक्तीया ।। १ ।।
डोंगर गा दरी फिरे ब्रम्हचारी । फळे भक्ष करी उदरार्थी ।।२।।
ऊर्ध्व ही शक्ती हनुमंत येती । नामाभिधान घेती सृष्टी नेमे ।।३।।
हाती पाहे गदा अहंकारा वादा । न ची होय फिदा असुराशी ।।४।।
दास दगा म्हणे एकचिया जाणे । परब्रम्हा उणे काय आहे ।।५।।

|| १० ||

सीता माई ठायी कुंकुम गा पाही। सौभाग्य ते पाही शेंदुराचे ।।१।।
धर्म पाळी रामा मालक तु धामा । आलो पाहे कामा संसारीया ।।२।।
रामाला वरतो संसार करतो । ब्रम्हचारी ऊरतो कासोटीत ।।३।।
सदा लावी ध्यान दरी खोरी महान । ऊकरुनी भान गुहेचीया ।।४।।
दास दगा म्हणे चिंतनी हरत । विदेही गा होत राम नामा ॥५॥

|| ११ ||

जड गुहा पाही आत बाहेर ठायी । निवारा तो घेई राम नामे ।।१।।
त्याच्या विना पाही चैन नाही काही । मालक तो राही माझा जाणा ।।२।।
गमन करितो भुमीला स्मरतो । माताजीस म्हणतो जन्मदाती ।।३।।
बहरला राम निसर्ग गा काम । उच्चारला सोहम् निजस्वरूपे ।।४।।
दास दगा म्हणे स्वरूपीगा गुणे । रामाचीया म्हणे हनुमंत ।।५।।

|| १२ ||

रामची गा माता घेई सिते अहंता । मायेपणा पेरिता सीताशक्ती ।।१।।
कलंकी गा झाला कलीयुगी आला । भाव तो धरिला हनुमंते ।।२।।
कलंकीन झाली कलंकाला वरली । पुन्हा सोडवली हनुमंते ।।३।।
भुभुकारे साथ गुप्त गा कलित । वासना ती खात भासयोगे ।।४।।
दास दगा म्हणे जाणीव गा देती । प्रचिती गा होती भक्तालागे ।।५।।

|| १३ ||

काय कळे खेळ शक्ती ऊर्ध्व बळ । रथी तिच्या मेळ हनुमंते ।।१।।
जंगल गा झाडी पाहे याची वाडी । करितसे खोडी आभिमानाच्या ।।२।।
परे पलिकडे गुह्य याचे गुढे । मायेत गा मोडे लिला याची ।।३।।
धर्म तो स्थापिला भक्तियोगे भला । भगव्यात ठेला राम पाहे ।।४।।
दास दगा म्हणे जया मध्ये राम । तोच सत्य काम सांगे गुरू ।।५।।

|| १४ ||

जाणे हनुमंत मंत्र राम हा म्हणत । कोठे ना गुंतत मायालोभे ।।१।।
जन्मदाता पिता वायुरूप हिता । वाहुन तो नेता सर्व काही ।।२।।
जडा जडपण भाना दडपण । परि अडचण सोडी तोची ।।३।।
पोकळी मोकळी वायु पाहे सुकळी । कवणा न आकळी कोंडुनिया ।।४।।
दास दगा म्हणे हिता चिंतनाने । हनुमान म्हणे जगी आले ।।५।।

|| १५ ||

अष्टयोगे योग अष्टदिशा भोग। भुभुकारे रोग हरवुनी ।।१।।
गर्भगीरी राहे मुळ माया पाहे । भान ते गा मोहे धरूनीया ।।२।।
माकडी गा चाळा दरडी राहे मेळा । प्रगटुनी खेळा वानरात ।।३।।
हलवुनी पुच्छ म्हणे कोण उच्च । सर्व पाहे निच रामाविना ।।४।।
दास दगा म्हणे निष्ठावंत जाणे । भक्तियोग म्हणे दाखविती ।।५।।

|| १६ ||

अंतरबाह्य राम करतो गा काम । उच्चार तो सोहम सर्वाठायी ।।१।।
अनादीचा नाद मुळ पाहे स्वाद । काढीतसे बाध व्याधीचा गा ।।२।।
स्वार्थ लोभ माया रचियेली काया । खेळवितो माया विश्वामाजी ।।३।।
राम अन काम सत्य मिथ्य धाम । कोठे पाहे राम तयामाजी ।।४।।
दास दगा म्हणे गुरूविना जाणे । सांगे कोण खुणे मुढालागे ।।५।।

|| १७ ||

शिकवला धडा हनुमंते मुढा । एकनिष्ठा विडा उचलुनी ।।१।।
एकची गा राम एकची गा धाम । गुरू तोची नेम पुण्यक्षेत्रा ।।२।।
भगवंत गुरू गुरू भगवंत । नाही गा द्वैत तयामाजी ।।३।।
एकची गा प्रिती सांगती निवृत्ती । होय खरी ख्याती जन्माचीया ।।४।।
दास दगा म्हणे हनुमंत राया । चित्ति निवावया तुची एक ।।५।।

|| १८ ||

माया करी सीता बारे हनुमंता । विवाह बंधनीता करावे गा ।।१।।
तुज सम सारे जगी या गा बारे । माते नमस्कारे सर्व स्त्रिया ।।२।।
धरू नको हेका सन्यांशी हा देखा । सांडुनिया सुखा कारे रमशी ।।३।।
सर्व पाहे सुख प्रभो पाहे देख । आणखी ते दुःख सर्वकाही ।।४।।
दास दगा म्हणे भांडार गा सारे। हनुमंती बारे रामचीया ।।५।।

|| १९ ||

राम चराचरी गुरू गिरिधारी । वाजवी बासरी सप्तसुरे ।।१।।
ताल धरी सुर पंचभुती भार । ब्रम्हनादे थोर कोंदलासे ।।२।।
अनुहाती साथ सत्य अन मिथ्य । सांगे सर्व सत्य राम मंत्र ।।३।।
मंत्र तो गा राम अक्षर ते धाम । क्षेत्र ते सौम्य सामावले ।।४।।
दास दगा म्हणे ब्रम्ह ते कोंदले । अक्षरी वाहिले आभासीया ।।५।।

|| २० ||

साडेतीन मात्रा राम भरे यात्रा । हनुमंत सुत्रा सांगतसे ।।१।।
पेरियेले बीज राममंत्रे तेज । करविली शेज श्रध्देचिया ।।२।।
भावाविना भक्ती भक्तीविना मुक्ती । मुक्तीविना शक्ती काय कळे ।।३।।
राम आले जगी मिरवे ब्रम्हओजी । बैसविले शेजी विरक्तीच्या ।।४।।
दास दगा म्हणे हनुमंत वारी । ठायीचिगा सारी रामाची या ।।५।।

|| २१ ||

हनुमंत जन्मे पाहे गा उन्मन । तुर्याचे साधन ज्ञानयोग ।।१।।
सतचित्ती ठसा चित्तानंदे फासा । कसविला कसा वैराग्याचा ।।२।।
निजानंदे भाव विदेह ते गाव । ब्रम्हपुरी ठाव रामभक्त ।।३।।
सदा समाधीत राहे गा उदीत । भाव ते साधीत समाधीत ।।४।।
दास दगा म्हणे मुळचा हा स्वामी । नाही गा उर्मी देहदशा ।।५।।

|| २२ ||

अकार ऊकार पाहे गा मकार । झाले गा साकार उर्ध्व वाने ।।१।।
उर्ध्व गा वायु रेत रक्त कायु । पंचस्वरे स्नायु शुद्धीकरणा ।।२।।
मुळ रेत काय ब्रम्हअंड जाय । बिज त्यात काय शिवशक्ती ।।३।।
भासे अंजनीला वायु समीपाला । गर्भ तो उदेला उदरात ।।४।।
दास दगा म्हणे मानव गा नेणे । पुत्र अंजनी संभोगीला ।।५।।

|| २३ ||

पंचभुती माया रचियेली काया । त्यात पाहे ठाया ब्रम्हबीज ।।१।।
चिरंजीव केला दृष्य अदृष्याला । शक्तिमान भला मुळ माये ।।२।।
नव अवतारी तात्पर्य गा स्मरी । दश अवतारी उर्ध्व ही ।।३।।
बोले हनुमंता सिता पाहे माता । कलियुगी गाथा कलंकाई मी ।।४।।
दास दगा म्हणे अनादिगा जाणे । कार्य गा कारणे संबधित ।।५।।

|| २४ ||

नवनाथ वेळी योगिनी गा खेळी । कर म्हणे रळी हनुमंता ।।१।।
जाणुनिया हिता भाव पाहे चित्ता । योगीन तु सिता वैरागीण ।।२।।
भस्म लावी भाळा रुद्राक्ष गा माळा । रळीच्या गा खेळा काय पडे ।।३।।
गुहेत राहशी पुढे कार्य तुजशी । आज काय रमशी रानोरानी ।।४।।
दास दगा म्हणे स्वयंभु गा जाने । शिव पाहे म्हणे शंभु हा गा ।।५।।

|| २५ ||

वेशीवर बैसे वर्तमान पुसे । आले गेले कैसे रावणाशी ।।१।।
मुक्काम गा पाही रक्षणकर्ता ठायी । खुण ती गा पाही मंदिराची ।।२।।
दर्शन पहिले हनुमंत वहिले । तेव्हा गा पाऊले गावात गा ।।३।।
वैराग्या गा विना ज्ञान नोहे जाणा । त्यागावीना भाना परमार्थ ।।४।।
दास दगा म्हणे उद्बोध जाणे । दिला हनुमंते मानवाशी ।।५।।

|| २६ ||

करावे भजन आणिक पुजन । जावे उध्दरून तया कृपे ।।१।।
मांडीला सोहळा भक्तीचा गा मेळ । दाखविला केवळ मार्ग सत्य ।। २ ।।
निष्कामे प्रिती स्वार्था ना जाणती । आत्मभाव देती भक्तालागे ।।३।।
सर्वा सम राहे प्रेम तया ठाये । रक्षण ते पाहे अलौकिक ।।४।।
दास दगा म्हणे आनंद तो भाने । भक्तीचा गा जाणे हनुमंत ।।५।।

|| २७ ||

नववीधा भक्ती हनुमंत शक्ती । पवित्र गा होती तयाकृपे ।।१।।
भक्तीचा गा सार दाखविला थोर । पाहे हरिहर हनुमंता ।।२।।
करिता स्मरण भक्तीचे धोरण । भावने तोरण श्रध्दायुक्त ।।३।।
पुरवीले चोज भावने सहज । पाहा उर्ध्वराज हनुमंत ।। ४ ।।
दास दगा म्हणे काढी ऊणे सुने । भक्तीचे हे जाणे हनुमंत ।।५।।

||२८ ||

झाले अभंग हे जाणा अठावीस। गुरू गा कृपेस योग आला ।।१।।
वडगाव लांडगे बेबीमाया संगे । लेखणी ही रंगे अक्षराने ।।२।।
हनुमान जयंती गुरू इच्छेप्रती । निमित्य गा होती मी गा पाहे ।।३।।
शुभ कृत नाम संवत्सर जाण । शके १९४४ पाहे आज ।।४।।
चैत्र शुध्द पौर्णिमा शनिवार दिन । आला गा घडुन योग पाहे ।।५।।
दास दगा म्हणे प्रसाद हा जाने । दिला मज म्हणे हनुमंताचा ।।६।।

|| २९ ||


झाले एकोणतीस अभंग हे खास । सुगंध हा श्वास गुरू ची गा ।।१।।
हनुमंत पाठ अक्षरी हा थाट । मांडियेला पाट गुरू ओघे ।।२।।
करिता पठण प्रचिती ही जाण । देती हनुमान सर्वाठयी ।।३।।
संपविला पाठ गुरूकृपे देठ । शेंडा मुळपीठ तोची पाहे ।।४।।
प्रसाद ही वाणी गुरूची गा ध्वनी । येईल अनुभवुनी पढता पाहे ।।५।।
हनुमंत राया कृपेचा तु पाया । देई आम्हा ठाया तव चरी ।।६।।
दास दगा म्हणे अज्ञान मी गा जाणे । प्रसाद हा म्हणे गुरूदेवे ।।७।।

।। श्री हनुमान पाठ समाप्त ।।