हरी पाठ

।। श्री कलंकी देव वैजनाथ कृत हरी पाठ ।।

देवाचिया द्वारी शांती समाधान । ब्रह्मानंदी ध्यान लागत से ।
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा । वैकुंठीचा राणा जवळी मी ।
सत्संगाने मार्ग सुलभ भक्तिचा । मार्ग हा पुढचा सापडे गां ।
वैजनाथ म्हणे कलयुगी आहे । साधन गां पाहे नाम श्रेष्ठ ।।१।।

हरी हरी मंत्र मुखे जो उच्चारी । ऐशा यम पुरी जाणा कैची ।
चुकतसे लक्ष चौ-यांशीचा फेरा । सुखे येतो घरा नारायण ।
हरी नामी शुद्ध जयाचिया भाव । एश्या पुढे देव उभा आहे ।
वैजनाथ म्हणे सताही प्रचिती । जाय भव भिती हरी नामे ।।२।।

हरी नामा चिया वैभव गा थोर । जाणती साचार साधु संत ।
हरी नामी हरे संसारीचा शीण । वासनेचे जाण जळे बीज ।
पाप ताप दैन्य हरी नामी पळे । सहजची टळे आप मृत्यु ।
बैजनाथ म्हणे जेथे हरी नाम । कळी काळ यम टिकतीना ।।३।।

राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी । मुखे जो उच्चारी पांडुरंग ।
ऐश यांच्या सुखा पारावार नाही । स्थिरावे हा पाही ठाईचगा ।
माईक देहाचा पड़ेगा विसर । नामी निरंतर तल्लीन जो ।
वैजनाथ म्हणे हरी नामांमृत । अंगी बाणवित अमरत्व ।।४।।

जाय निरसुनी आधी व्याधीदुःख । हरी नामी देख अनुभव ।
हरी नाम संजीवनी श्रेष्ठ आहे । कलीयुगी पाहे तारक गा ।
इतर साधने मिथ्याही ठरती । बाणे मुक्त स्थिस्ती हरी नामे ।
वैजनाथ म्हणे भक्ति प्रेमाविण । प्रचीतीगा जाण येत नाही ।।५।।

योग याग क्रिया मिथ्या ही साधने । नोहे कदा मने स्थिरावती ।
हरी नामाचिया लागली ज्या गोडी । येई प्राप्त घडी चालुनिया ।
हरीनामी सुलभ हा परमार्थ । बाणते समर्थ पण अंगी ।
वैजनाथ म्हणे झालेगा निवांत । अवघे हे संत हरी नामे ।।६।।

सर्व सुखाचिया नाम हे माहेर । नाम असे सार वेदाचिया ।
हरी नाम मुळ ध्यान हे सगुण । साक्षात्कार जाण भक्तांसाठी ।
जया मुखी हरी नाम येत नाही । जन्म व्यर्थ पाही ऐशियांचा ।
वैजनाथ म्हणे हरी भक्ति विण । निवळेना जाण प्रारब्ध गा ।।७।।

घडावया लोकी भक्ति गा सगुण । भूमंडळी जाण संत येती ।
संतामुळे हरी अवतार धरी । लिला थोर करी युगायुगी ।
नामरुपी फरक हा झाला जरी । परब्रह्म परी बदलेना ।
वैजनाथ म्हणे संतांच्या विभुती । वर्मगा जाणती भक्तिचिया ।।८।।

रिद्धी सिद्धी पायी ऐश्यांच्या लोळती । हरी नामी प्रीती लागलीज्या ।
चारी मुक्ति ऊभ्या जोडुनिया कर । नमती साचार ऐशा भक्ता ।
नामाचा महिमा जयासी कळला । नोहे वाया गेला ऐसा प्राणी ।
वैजनाथ म्हणे संतांच्या विभुतो । वर्मगा जाणती भक्तिचिया ।।९।।

झाली तुझी जिव्हा चहाटळ भारी । अजुनी उच्चारी हरी नाम ।
हरी नामाविण जन्म जातो वाया। आवरी हा मायापाश आता ।
आहे जन्म वरी प्रपंच हा स्वार्थ । शेवटी अनर्थ ओढवे गा ।
वैजनाथ म्हणे नामाविण आहे। येर झारा पाहे चौ-यांशिच्या ।।१०।।

नामाविण आयुष्य हे फुका जाय । होतसे अपाय परमार्थी ।
करा मुखी सदा हरीचे भजन । जाल उद्धरून सहजची ।
हरीविण कृपाळू हा देव नाहीं । शोधीयल्या पाही बरे दजा ।
वैजनाथ म्हणे घालीतसे उडी । संकटी तातडी भक्ता साठी ।।११।।

पंथ सांप्रदाय करी गा निर्माण । वेळे ऐसा जाण पांडुरंग ।
वाढावया लोकी भक्तिभाव धर्म । दावी सत्य कर्म वेळे ऐसे ।
वेळेऐसी देऊनिया शिकवण । भक्ता लागी जाण तारितसे ।
वैजनाथ म्हणे जड मुढा साठी । धरी जग जेठी नाम रुप ।।१२।।

नाम संकीर्तन संताची आवडी । देती घडो घडी जागृती गा ।
संते सावध गा जग जनार्दन । वाढते भजन श्री हरीचे ।
हरी नामाचिया ज्या ठायी गजर । कापे थर थर कली काल ।
वैजनाथ म्हणे जेथे हरीदास । देवाचा विश्वास तेथे लागे ।।१३।।

करावया संत मालिका निर्माण । श्रीहरी मी जाण साकार गा ।
वेळे ऐसे प्रगटती भक्त संत । मी गा भगवंत यात रमे ।
नामाचा महिमा दाखविण्यापरी । लिला मी गा करी नाना विध ।
वैजनाथ म्हणे अवतारे राहे । युगायुगी पाहे घटना ते ।।१४।।

सर्व नामी आहे बारे में श्रीहरी । एकेश्वर परी ध्यान करा ।
धरीताती जैका माझ्या नामी भेद । ऐशिया गोविद दुरावे मी ।
असलीया विण भक्तिचिया ज्ञान । तरणे कोठुन परमार्थी ।
वैजनाथ म्हणे सद्गुरुच्याविण । वर्म हे गा जाण सापडेना ।।१५।।

जया नित्य संत साधु समागम । निरसुनी भ्रम जाय सारा ।
संत संगतीचा परिणाम थोर । मी तु हा विचार लोपतसे ।
मी तु विचार ही लोपलीया वरी । येणे जाणे परी उरेचिना ।
वैजनाथ म्हणे ब्रह्मी ब्रह्मर्पण । स्थिती बने जणि साधुसंगे ।।१६।।

हरी नामाचिया अनुष्ठान करा । यात लाभेखरा स्वानंद गा ।
हरीनाम अनुष्ठान जथे आहे । खोटी यज्ञ पाहे पुण्य लाभे ।
हरीनामी ज्याचा पूर्ण गा संकल्प । चिरंजीव कल्प वरी राहे ।
वैजनाथ म्हणे हरी नामाविण । ब्रह्ममय जाण द्रिष्टी नोहे ।।१७।।

हरीनामी निज ध्यास ज्या लागला । ठायी स्थिरावला प्राणी एसा ।
ब्रह्ममय दृष्टी झाली याची पूर्ण । हरी नामी जाण रंगला जो ।
रामकृष्ण नाम मुखी पंचाक्षरी । घोको जो का परी सर्व काळ ।
वैजनाथ म्हणे देव भक्त पाही । ऊरत गा नाही येथे भेद ।।१८।।

नामाविण वाचा जेव्हा दवडती । तरणे कल्पांती होईचना ।
नामाविण मुख नर्काचे ते कुड । अती यम दड ऐशा आहे ।
पाप पुण्या ऎसा देवे दिला भोग । चालुनिया योग तैसे येती ।
वैजनाथ म्हणे कळी काल यम । देवे केला भ्रम जैशा तैसा ।।१९।।

आहे ब्रह्म निराकार हे निर्गुण । भेट ही सगुण भक्तासाठी ।
भक्तापाठी नामरुप जाणा धरी । बारे मी श्रीहरी भुमंडळी ।
यगायुगी नानाविध अवतार । माझीया साचार ईश्वराचे ।
वैजनाथ म्हणे सुकृताच्या विण । श्रीहरी मी जाण जोडेचिना ।।२०।।

आहे ठायीच गा बरे यम पुरी । अजुनीया परी सावधान ।
हरावया लागी संसाराचा शीण । हरी नाम जाण औषध घ्या ।
हरीनामी पथ्य सांभाळल्याविण । भव रोग जाण हटेचीना ।
वैजनाथ म्हणे जीवन्मुक्त झाले । जयासी कळले गुढ हे गा ।।२१।।

पापाचे लक्षण आहे अधोगती । जयासी श्रीपती आठवेना ।
करूनिया माझे माझे जन्मवरी । घालविती परी जन्ममुढ ।
स्वार्थामुळे जन वाया सर्व जाती । बारे पस्तावती अंतकाळी ।
वैजनाथ म्हणे कुंथावेका परी । भोग आल्यावरी केल्या कर्मे ।।२२।।

मिथ्या जप तप क्रिया हे साधन । हरी नामी मन ज्याचे नाही ।
तीर्थ व्रत नेभधर्म वाया जाती । जेका नाठविती पांडुरंग ।
जया देव खरा नोहे हा कळला । काय इतराला तरविल ।
वैजनाथ म्हणे आत्मज्ञानाविण । भक्ति खरी जाण साधेचिना ।।२३।।

काशी आळंदी गा घडे ही पंढरी । नामी जे का परी रंगलेगा ।
नोहे जाणे लागे ऐशियासी दुरी । ध्यान हे सामोरी ऊभा ठाके ।
आत्मा हा विठ्ठल देह हि पंढरि । देव भक्त परी भेद नुरे ।
वैजनाथ म्हणे निश्चयाचे बळ । तेची ऊभे फळ साक्षात्कारे ।।२४।।

नोहे आयष्याचा भरवसा कांहीं । अजुनीया पाही सावधान ।
करी हरी कथा कानी ह्या श्रवण । वैकुंठासी जाण जासी झणी ।
सत्संगाने वैकुंठ हे ब्रह्म पद । लागेल गा दाद पुढे तुझी ।
वैजनाथ म्हणे होता ब्रह्म ज्ञान । एकेश्वर ध्यान सर्वं होय ।।२५।।

नामाचा महिमा गेले विसरून । कली माजी जन मायीक हे ।
तयासाठीं कलंकी हा अवतार । आता म्या साचार धरिलिया ।
वैजनाथ रूपे दिले सत्य ज्ञान । केले गा वर्णन ब्रह्म सुत्र ।
वैजनाथ म्हणे कळवळा भारी । धरी मी श्रीहरी भक्ताविशी ।।२६।।

कलीयुगी साक्ष नामाची सगुण । साक्षात्कार जाण नानाविध ।
कोणतेही नाम घेतियले जरी । तेणे मी श्रीहरी पावतसे ।
पंथ सांप्रदाय धरिती जे भेद । तेथे मी गोविंद राहीच ना ।
वैजनाथ म्हणे अध्यात्मीक ज्ञान । घेतिल्या वाचुन मोक्ष नाही ।।२७।।

हरी पाठी अभंग हे आठ्ठाविस । लोकात विश्वास प्रगटण्या ।
हरी नामी ज्याचि श्रद्धा पूर्ण आहे। धन्य होती पाहे संसारी ह्या ।
शके अठराशेपंचायशी आहे । संवत्सर पाहे शोभन नाम ।
कृष्ण पक्ष श्रावण मास हा साचार । आज मंगळवार प्रति पदा ।
पिंपळगाव ह्या बारे निपाणीसी । केला परियेसी हरी पाठ ।
वैजनाथ म्हणे तेथे मी श्रीहरि । पठण जो करी नित्य याचे ।।२८।।

केले जागृत गा निर्गुणा कारण । त्रयमुर्ती जाण दत्तानीय ।
दत्त दुर्वासाने झालो गा साकार । आता अवतार कलंकी मी ।
वैजनाथ रुपे भेट माझी आहे । शेवटची पाहे भारतात ।
शुद्ध तळमळ असलीया विण । ईश्वर मी जाण नोहे लाभे ।
वैजनाथ म्हणे सत्संगाच्या विण । परब्रह्म जाण सापडेना ।।२९।।

।। श्री कलंकी देव वैजनाथ कृत हरी पाठ समाप्त ।।