।। कलंकी लक्ष्मी माता व्रत ।।

।। आदि शक्ती नमो नम: ।।

कलंकी माता लक्ष्मी व्रत
पाच गुरुवार व्रत विधी

पूजेची मांडणी

शुद्ध मनोवृत्तीने गंगा स्नान करून कलश मांडावे. कलशा संभावती हळद, सुपारी, बदाम, श्रीफळ ठेवावे. मनोभावनेने व सत मनाने ग्रंथाचे पठण कलशासमोर बसुन करावे. अशी पाच गुरुवार पूर्ण शुद्धी धरावी, ब्रह्मचार्य पाळावे. पाचव्या गुरुवारी पाच सुहासिनींना बोलवावे. त्यांची ओटी श्रीफळ, सुपारीने भरावी. यात अक्षदाही ठेवावी. ही साधीसुधी व्रत विधी मनोभावनेने आणि श्रद्धा भक्तीने करावी. मनाची व्यथा सुटेल. मनोवृत्ती ही बदलेल आणि घर लक्ष्मीच्या पावलाने सुखी-समाधानी नांदेल. इडा पिडा टळेल. मनात ही संतोष वाटेल. नेमले कार्य सिद्धीस येईल आणि गृहलक्ष्मी सुखी समाधानाने नांदेल.

।। सर्व मंगल मांगल्ये । शिव सर्वार्थ साधिके ।।
शरण्ये त्र्यम्बके गौरी । नारायणी नमोस्तुते ।।१।।
नमो देवे महादेव्ये। शिवाये सततं नमः ।।
नमः प्रकृत्ये
भद्राये । नियंता: प्रणता: स्मताम ।।२।।

।। ॐ चित्त चैतन्य दानी महायोगिनी नमो नमः ।।
।। चित्त चेतणा सुखी रमणी नमो नमः ।।
।। श्री गणेशाय नमः ।। श्री गुरुब्रम्हाय नमः ।।
जय जय जग्जननी । माता लक्ष्मी सर्व गुणी ।।
विष्णू ध्यान मग्न स्वामिनी । धाव पाव वेगे ।।१।।
देई सद्बुद्धी आम्हा भवानी । कैची करावी व्रत उपासना जानी ।।
हेची देई आम्हा सत भानी । नमन तुज पदकमळी ।।२।।
शुद्ध
देई माते चित्ता । हेची मागत असे गुरु माता ।।
तुची आमुची आंतर गाथा । देई ज्ञान अज्ञाना ।।३।।
त्रयलोक्याची तु स्वामिनी । गुण गुणांनी भरली त्रिभुवनी ।।
वंदन आमचे तुज चरणी । देई आम्हा विसावा ।।४।।
तु आमुची माऊली । माते कृपेची छाया सावली ।।
तुज विण बुद्धी खरी काय भावली । कळेचिना आम्हा ।।५।।
तरी ठाव देई चरणा । हेची मागतसे जाणा ।।
न मागे भले पणा । देई दर्शन आम्हा ।।६।।

माता बोले जगजननी । अगे एक भक्त सखी सद्गुणी ।।
शुद्ध आंतर जानी भानी । तेथेचि जाण व्रत माझे ।।७।।
भावभक्तीने उपासना करी । भुत दया मनी धरी ।।
कर्मठपणा नको नारी । खरी जानी भक्ती ही ।।८।।
काळाची मी महाकाळ । आसुरी निर्दाळी वेळो वेळ ।।
रूप धरुनी चंडिका केवळ । धरी जाणीव माझी मनी ।।९।।
व्रत उपासना माझी करी । दृष्ट दुर्गुणांचा उपवास धरी ।।
भक्ती प्रेमाचा साठा उदरी । हेची हवे व्रत मला ।।१०।।
आंतरी चित्ता मनी समोर धरी । तेज रुप माझे लहरी ।।
सदैव घोकीत अवधशि । घेई चित्त ठाई ।।११।।

अगं भक्त सखी ऐक, मी नेमात धर्मात आणि सद्गुणात सर्वज्ञ अशा ज्ञानात आहे. माझी प्राण प्रतिष्ठा पाहिली तर उत्तम अशा वस्तुस्थितीत आहे. म्हणून मला चराचर नमन कर. माझे व्रत तु तुझ्या स्वइच्छेने केले तरी चालेल. कारण मला दंभ अहंकार या वेगळे ठेव. तरच मी कलंकी लक्ष्मी तुला कळेल आणि तुझ्या घरात सदैव वास ठेवील. म्हणून माझे खरे व्रत नित्य नेम व साधी पूजा प्रार्थना केली तरी चालेल. मनाचा मन योग शुद्ध प्रेम प्रितीने वाढव आणि सदा चित्त मग्न कर. माझी नियमावली सत सदाचारी, पती सेवा, भक्ती पूजा प्रार्थना होय. खोटे बोलू नये, निंदा करु नये, प्रत्येक जीवा बरोबर प्रेमाने वागावे. मद मत्सर भेद करू नये, अज्ञ जीवांचे शांतवन करावे. चुकणाऱ्यास क्षमा करून, त्याला खऱ्या सत ज्ञानाने उपदेश करून एकमेकाची पात्रता जाणून वागावे. वडिलधाऱ्यांस पूज्य मानावे. यातच माझा आनंद सामावल्या जाणार आणि हि माझी जाणीव मी सुवासिनींना देऊन, त्यांचा भरला संसार सुखी करणार. माझी लक्ष्मीचा कोणतीही तस्वीर समोर ठेवून शुद्ध मनाने साधी पूजा प्रार्थना मला मान्य आहे. परंतु अहंकार मनी ठेवू नये.

।। ॐ चंडिका महायोगिनी यक्षणी नमो नमः ।।
।। ॐ चंडिका सत भामिनी नमो नमः ।।
।। त्रेलोक्य स्वामिनी सर्वज्ञ गुणी नमो नमः ।।

हे माते तू सर्वज्ञ असून शुद्ध ज्ञानाचा परिपूर्ण असा सागर आहे. आम्ही अज्ञ अशा अंधःकारात आहोत. म्हणून आम्हाला या आज्ञ अशा अंधःकारापासून सोडव आणि तुझ्या तेजोमय तेच स्थितीचा प्रकाश दे आणि यातच रममाण करुन ह्या संसारी भवसागरी सुखी कर. आम्हा सदा तुझे ज्ञानबोध पटवून दे. आम्ही सदा तुझ्या चरणी स्थिर राहु. अशीच कृपा कर आणि तुझ्या तेजस्वी स्वरूपी लीन कर.

।। ॐ म्हैशासुर मर्दिनी दुर्गा कवच वासिनी नमो नमः ।।
।। शुद्ध चित्त मन मोहिनी नमो नमः ।।
।। ॐ चैतन्य योगिनी माताय नमो नमः ।।

हे सरस्वती तु नामा वेगळी अशी अगम्य शक्ती आहेस. तु सदैव आमच्या जिव्हेवरती बसून नेम धर्माचे, सत कर्माचे असे गुण दे. आम्हा पामरांना सत ज्ञान बुद्धी देऊन तुझी ओढ वाढू दे. आम्ही तुज पदकमळी लिन होवू अशी सद्बुद्धी दे. आमच्या वाचेत वेदांच स्मरण दे. आमचे जीवन सुखी कर. हिच सत इच्छा प्रार्थना. आमचे जीवन आनंदीमय आनंदात रमु दे.

।। ॐ जगदपते लक्ष्मी माते नमो नमः ।।
।। स्वर्ग सुंदरी त्रिभुवन तारी नमो नमः ।।
।। शंख चक्र सुदर्शन गदा धारी नमो नमः ।।

हे माते तू चित्ता चैतन्य पुरवणारी आहेस. तेज रूपाचा प्रकाश देणारी आहे. दुष्ट असुर मतिचा वध करणारी आहे. चित्ताला चेतण शक्‍तीचा आधार देवून शुद्ध प्रेरणा देणारी आहे. तू जगद स्वामिनी ही आहे. सर्व जगाला माया लावणारीही आहेस. तशीच माया तोडणारी सुद्धा आहेस. तुझे चंचल पण आम्हा पामरांना आवरणारे नाही व समजणारे हे नाही. म्हणून आमच्या मनोवृत्तीला आकळणारी सुद्धा आहेस. तसी मनोवृत्ती वाढवणारी ही म्हणूनच या प्रारब्धाप्रमाणे मनोवृत्तीचा वेग वाढतो किंवा कमजोर ही ठरतो. म्हणून हे चित्त चैतन्य रूप शक्ती आमुची स्थिर कर आणि तुझ्या स्वरूपी तल्लीन कर.

।। ॐ जग मोहिनी विष्णू मन रमणी नमो नमः ।।
।। सर्वज्ञ स्वामिनी सर्वज्ञ गुण ग्रोहिनी नमो नमः ।।
।। सत लक्ष्मी मनोवेगे सांभाळी नमो नमः ।।

हे माते तू मन मोहिनी आहेस. चित्त मनाला मोहुन ठेवणारी अशी आदिशक्ती आदी दाती आहेस. म्हणून आम्हा पामरांच्या चित्ताला मोहुन सदैव तुझ्या नामस्मरणात तुझ्या चैतन्य अशा विराट स्वरूपात मोहुन टाक. सदा तुझाच द्यास लागू दे आणि आमच्यात स्वानंद खुलू दे व त्या स्वानंद धुंदीत आम्हाला तुझ्या चरणी वाहुन घे. तेव्हा आम्ही या संसार भवसागरी सदभक्त खुलणार आणि तुझी सेवा करुन संसार परब्रम्ह स्वामिनी विलीन होवू. तेच खरे सुख समाधानी भोगू.

।। ॐ विष्णुकांता विष्णू भुज धारी नमो नमः ।।

हे माते तू महा विष्णूची भुजा आहेस. म्हणूनच सुदर्शन चक्र हाती धरुन तू असुरी वृत्तीची काळ बनुन ती मारलीस व मनाची
मनोवृत्ती सुधारित बनवलीस. अशा माते आमचे तुला त्रिवार पणे नमन असो.

।। ॐ ब्रह्मचारी महायोगिनी नमोस्तुते ।।

हे माते जेव्हा तू योग आचरण केलेस तेव्हा तू शुद्ध तपाचारिण व पूर्ण ब्रह्मचर्य व्रत आपंगुण अनेक योगिनी तपस्विनी तयार केल्यास व त्यांना योग्य असा योगाचा अभ्यास देवून शुद्ध चिंतनीं रममान करून आपणात समरशी मिलन करुन घेतलेस. तेव्हा तू त्यांना परे पलीकडचा प्रवास देवून, विधीचे विधान शिकवून, योग्य वेळी विदेही स्थितित आणून स्वतःचा भोक्ता स्वतः बनविले. अशी महायोगिनी रुपे निर्भोग, निर्विषयी मनोवृत्ती करुन, शुद्ध चलन देवून, मनास प्रेरणा दिली आणि आंतर जगाचा प्रवास शिकवुन इकडच्या मोहमाये पासुन वाचवलेस. तशी कृपा योग्यतेविना तू देणार नाही. तरी आम्हा योग्यता साधावी व आम्ही या पात्रतेत यावे अशी कृपा कर.

।। ॐ महदादि स्वरुपिनी मोक्षदानी नमो नमः ।।
।। श्री पूर्ण ब्रह्म स्वरुपिनी महायोगिनी नमो नमः ।।

हे माते जेव्हा तू पूर्ण ब्रह्मस्वरुपिनी अशी आदिशक्ती महदादी स्वरुपाने या धरणी वास करतेस तेव्हा तू अनेकांचा उद्धार करते. आणि गर्द गाळात पडणारे वरती आणून तारते. तेव्हा तू महागंगेचा उगम असते. अशा या गंगा स्वरुपी तू अनेक आपणात घेते. तेव्हा तू सर्व घाण गंधी गटारी सह आपणात घेवून शुद्ध करतेस आणि गंगा ओढा समरशी मिलन करून त्याची इडा पिडा मायीक वासना गंधी शड रिपू सर्व भक्ष करून जिरवतेस. अशी महादादी मुळ महामायेचे विश्व विराट स्वरुप धरुण अनेक जीव प्राणी या मोह माये पासून सोडवतेस. अशी तू सर्वांची कृपाळू महा माता आहेस.

।। ॐ शुद्ध चित्त मोहिनी नमो नमः ।।
।। चित्तास प्रेरणा देणारी ओंकारी नमो नमः ।।

हे माते तू नामा रुपा वेगळी राहणारी अशी ओंकार स्वरुपाची शक्ती आहेस. तुला मुळ नाम-रूप नाही. तू ब्रह्म स्वरुपा पासून प्रगट होणारी मुळ लहरी आहेस. अशा तुझ्या चित्तमय चित्त स्वरुपाचा थांग पत्ता नाही. अशी तू वायुरुप येतेस आणि जातेस ती कुणाला दिसत नाही. परंतु सदभक्तास मात्र तुझी जाणीव देऊन तू प्रेरणा देतेस. तेव्हा तू कळतेस.
म्हणून हे सदभक्ता माझी महालक्ष्मीची उपासना निर्भेदा निष्कामी करत रहा. मला तुझे दुःख अडी अडचणी सर्व ठाईच कळते व त्याप्रमाणे ते मी हरण ही करते म्हणूननच माझी उपासना व्रत करताना मनोवेग शुद्ध ठेवावा. मनाची विकृती आपोआपच कमी होते. तेव्हा आहिक वस्तुस्थितीत नाही. म्हणून माझी खरी स्तुती करणारा अगदी शेकड्यात एक असतो. तोच माझी निष्ठा राखतो. असा भक्त मी इकडच्या नाशी सुखापासून सोडवते आणि माझ्या अविनाश सुखास त्यास प्राप्त करते.
परंतु तो जो पर्यंत या इकडच्या अहिक नाशिवंत सुखाचा भोग भोगू बघतो. तेव्हा मात्र त्या उपाधीचा फार त्रास भासतो. कारण जो पर्यंत काळे अज्ञान असते तोपर्यंत तो अहिक सुखाची प्राप्ती मागत असतो. म्हणून तो भाकड कथेला सत्य मानून माझी भदाने उपासनाही करतो. कारण खरे व्रत जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तो बनावट पोपट पंचीलाच मानून धन मानासाठी आणि आहिक ऐश्वर्यासाठी माझी उपासना जिकडे धन प्राप्त असेल तिकडे करतो.
परंतु मी सदभक्तीला नाशि धन देवून कदापी भुलवत नाही. त्याला वेळेप्रमाणे आणि कार्य कारणा पुरते यश देतेच आणि देणारच आहे. म्हणून मी कुणाला चमत्काराने धन लाभ देत नाही. कष्टानचे माणिक-मोती खरेच देणार आणि सद्भक्तांचे ऋणानुबंधन पूर्ण करणार आहे.
काही भाकडकथा आहेत. त्यावरती विश्वास ठेवून अनेक भोळे भाविक अंधश्रद्धेला बळी जात आहेत व हे बळी जाऊ नये या करता सत्यज्ञानाची जाणीव करावी. कारण धनलक्ष्मी ही कर्तुत्वा प्रमाणेच लाभत असते. परंतु खऱ्या सदभक्तीला भक्ति प्रेमाचा लोभ असतो. म्हणून व्रत खऱ्या अविनाशी सुखसमाधानासाठी करायचे असते. हे ते नाशिवंत क्षणिक धन लोभासाठी करायचे नसते. म्हणूनच व्रत उपासना करावी परंतु खऱ्या स्वहितासाठी आणि भक्ती शुद्धीसाठी करावी. अरे नुसते विना कष्टाचे कसे मिळणार. कारण नुसते व्रत करत बसले तर लक्ष्मी माता आपोआप धनाचे गाठोडे देणार आहे का नाही म्हणून कष्टाने आणि न्याय नितीन धन मिळवा. समतेचा विचार करा. आत्मा पारमात्मा याची जाणीव धरा. थोरांबरोबर थोराप्रमाणे वागा. आपल्या स्वार्थासाठी इतर जीवांचा मत्सर करू नका. सर्व जिव प्राणी महामातेचे आहेत.
म्हणून खरे व्रत गरिबांची सेवा करा. सन्मान धरा. धनिकाचा अभिमान धरु नका. खऱ्या कष्टानेच ऐश्वर्य मिळवा. एकमेकांची जाणीव धरा. संसार हा सत चित्ताने आणि खरा धर्म रुढी परंपरेने करा. संसारी चित्त असावे. परंतु ते नाशि नसावे. कष्टाचे जे माणिक असतात तेच मातेला पूज्य असते. लांड्या लबाड्या करून संसार करणे अयोग्य असते. संसारी लबाडी करावी लागते परंतु ती सात्विक वृत्तीतून हवी. आपस्वार्थी पण नको.
म्हणून कलंकी लक्ष्मी सांगते की मायिक मना तू अज्ञान आहेस. आणि या मायावी मृगजळात तू मला पाहत नाही. परंतु तू माझी व्रत उपासना करतो. म्हणून मला बोध करावासा वाटला. कारण तू माझे व्रत अपांगत आहेस. परंतु मी तुला चमत्काराने धनलाभ देतच नाही. तर ते तू कष्टाने मिळवतो आहे आणि तू कष्ट केलेच नाही तर तुला मी यशस्वी करणार नाही. म्हणून ह्या अंधश्रद्धेने मला भजू नकोस. सत्य ज्ञानाने व सत चित्ताने मला भजत रहा. कारण तुला मी अंधश्रद्धेने कळणार नाही. म्हणून माझी उपासना निर्भेदाने कर.
मी विश्व चराचर नटले आहे. माझी उपासना आंतर साक्षीने कर. या कष्टाच्या पिंडाला जाळू नकोस. उपास पोटी जठराग्री तप्त करू नकोस. म्हणून खराच उपवास कर. दुष्ट दुर्गुण भेद सोड. हाच उपवास मला मान्य आहे. विधीयुक्त माझी उपासना कर. परंतु त्या विधीत अहंकार वाढेल अशी नको. शुद्ध प्रेम प्रीती, शुद्ध भक्ती, सत निती हिच माझी विधीयुक्त सेवा आहे आणि तिच तू कर.
अरे ह्या भवसागरी भव रोगापासून निवृत्त होण्यासाठच माझी उपासना आहे. परंतु ती कशी करावी या ज्ञान मार्गास प्राणी जात नाही. तो अहिक सुखासाठी आणि लौकिकाच्या अभीमानासाठी मला अवमानित करत आहे. तर तो जगी सुखी कसा होईल सांग.
अरे जेथे जेथे माझे व्रत उपासना चालू आहे तेथे मी स्वतः जाऊन सुद्धा त्यांनी माझी भूक न जाणता मला उपाशी पोटी पाठविले आणि महान असे सन्मान धनिकाला दिले. खऱ्या भुकेल्या भिक्षा घातली नाही आणि उन्मत माजोरे भूक नसताना मान-सन्मानाने जेऊ घातले. मग खरा भुकी भिकारी जाणता येत नाही. तर या व्रत विधीचा काय बरे उपयोग सांग.
व्रत विधीयुक्त आसन टाकतात. माझी नामधारी ग्रंथाची पाठणे करतात. आणि खरा भुकेला दारा बाहेर काढतात. भिकारी म्हणून त्यांची निंदा कुचेष्टा करतात. अशा आचारांचा काय बरे उपयोग सांग.
म्हणून आधी स्वतःच्या आचार विचारांवरती बंधन टाका. आचार शुद्ध बनवा. गोर गरीब भिकारी दारी आला याची जाणीव धरा. आल्या अतिथींचा सन्मान धरा. त्याला भुकी पाठवू नका. परमेश्वरा वरती विश्वास ठेवा. नीच वृत्तीचा त्याग करा. मनोवृत्तीचे सुधारीक पणाने आराधना करा. खरे सुख कशात आहे. याची जाणीव धरा. न्याय नीती वाढवा भ्रष्टाचार सोडा. सर्व समतेची जाणीव धरा. म्हणजे मनाला शांती लाभेल. मनोवृत्ती सुधारेल. बिकट बंधने आपोआप सुटतील. या करता उपवास धरा. शुद्ध प्रेमाचा, सत इच्छा वासनेचा उपवास धरु नका. अन्न परब्रम्ह आहे. याचा धरु नका. वाईट नीतिमत्तेचा उपवास धरु नका मगच खरा जीवनात आनंद आहे व असतो.
व्रत असे करा, सत्य नितीमत्ते वरती विश्वास ठेवा. मनाचा मनोयोग वाढावा .लक्ष्मी मातेची सद्गभक्ती करा. त्या सद्भक्तीने आणि शुद्ध व्रत विधीने लक्ष्मी आपल्या पती विष्णू सह आपल्या संसारी वास करीन. परंतु याकरता पोटी जाळून उपवास करु नका. हा उपवास देहास जाळतो. तो देह जळतो. यात लक्ष्मी मातेला समाधान नाही वाटत. कारण तो देह भक्तीसाठी आहे. शुद्ध सतज्ञान मार्ग वाढवण्यासाठी आहे. म्हणून उपवास करा. परंतु तो दुष्ट दुर्गुणांचा करा. आणि सन्मार्ग धरा. सत्य सदाचारी वाढून एकमेकांचे मनोरत निवांत शांत होईल असे वागा व वागणे.
मनोवृत्ती जळेल किंवा त्यावरती काळा डाग पडेल व दुर्गुणांचा कलंक लागेल असे एकमेका संभावती वागू नका. सन्मार्गाने जेणेकरुन वागणूक द्याल तिच उदंड किर्ती वाढेल आणि माणूस माणसाजवळिक येणार. माणुसकी वाढणार, एकमेकांची पातळी कळेल. आणि यातच खरा आनंद लुटता येणार व घर लक्ष्मीने आनंदे भरणार. सुखाची उणीव उरणार नाही. शुद्ध चित्त वाढेल. एकमेकांची मनोवृत्ती सुधारुन मन प्रसन्नतेने भरेल आणि आत्मशांती मिळेल. म्हणून खरचे व्रत विधी करा की याने अनेक आपणात समरशी मीलन होऊन, आपण ह्या बाह्य जगात सुद्धा दुःख विसरून सुखाचा आनंद भोगू व भोगणार आहोत.
अरे मानवी मना व्रत विधी केल्यानेच लक्ष्मी वास करते असे नाही. शुद्ध चित्त, शुद्ध भक्ती प्रेम ठेवावे आणि मन प्रसन्नतेने सदा लक्ष्मी वास करते. मनाला दृष्ट दुर्भेद नको. सर्व समतेने एकमेकाला वागणूक दिली तरी घरादारात लक्ष्मी शांत सुखी असते. म्हणून आपण आपली खरी वर्तणूक चांगली ठेवली पाहिजे. नाहीतर व्रत उपासना करुन तरी काय बरे उपयोग सांगा.
या करता उपासना करताना मन प्रफुल्लित असावे लागते. घरादारात आनंद असावा लागतो. एकमेकाला प्रेमाची आणि सद्गुणाची वर्तणूक द्यावी लागते. यात भेदा भेद आणि मानवी मनाचा उगाचच ताठा नको किंवा व्रताचा अहंकार नको. व्रत करताना मनाची खरी-खुरीच तळमळ हवी. पूर्ण व्रत निष्ठा हवी व असली पाहिजे.
मनाला मनाचा लोभ हवा परंतु तो निष्काम पणे हवा. यात भेदाभेदीची वागणूक देणारा नको. नाहीतर कलंकी माता हे सहन करत नाही. कारण घर लक्ष्मी भरते. परंतु तशी सद्गुणी वागणूक देणे गरजेचे आहे. नाहीतर मनात एक आणि कर्तुत्व वेगळे हे नको. सर्व समता बंधुभाव निष्ठता पाहिजे. तरच माता लक्ष्मी आनंदी असते. तो आनंद आपणातही प्रगट होतो व होत असतो.
लक्ष्मीचे व्रत करत्या वेळी घरात सर्वांचे समानतेचे मत हवे. यात भेद नको. कारण सर्वांनीच प्रेमाने वागण्यास हवे. प्रेमाचा भंग नको नाहीतर केले ते काही उपयोगी नाही. सर्व समभावनेने वागणूक हवी नाहीतर घरात वाद घालू नये. कारण घरात सर्वांची समता असेल अशाच ठाई लक्ष्मी माता वास करते व तिच्या पावले सर्व कार्ये यशस्वी ठरते. म्हणून सत नेम धरणे, प्रेम करणे, प्रेमाने व सहनशीलतेने वागणे हेच खरे महत्त्व आहे. म्हणून वेळेत नेम करा. व सत्य नेम विसरु नका व विसरता कामा नये.
तरी हा छोटासा बोध वचनांचा ग्रंथ पठणाने खरा अविनाशी धन लाभ होणार आणि भक्त शुद्ध प्रेम प्रितीने हा भवसागर तरुन जाणार म्हणून ह्या नाशिवंत आहिक सुखासाठी नाही. तरी ही ते कार्य कारणापुरते यश मिळून तो संसारी सुखी होणार व या ग्रंथ पठणाने त्याला शुद्ध रसभरीत ज्ञानाचा लाभ होणार. तो सुखी संसारी आपत्त्यासह नौका किनारी लावणार.


।। लक्ष्मी माता आरती ।।

आरती लक्ष्मी माता । काढी भव भय चिंता ।।
शुद्धी देऊनीया चित्ती । काढी भवाची ही भिती ।।१।।
परब्रह्म तेजरुप । तुझे असे हे स्वरुप ।।
अज्ञान आम्ही देख । कळेनासे तुझे लेख ।।२।।
भक्ती देऊनिया चित्ती । काढी दारिद्र्याची भ्रान्ती ।।
देऊनिया भक्ती शुद्धी । काढावी ही वासना बद्धी ।।३।।


जय देवी जय देवी जय लक्ष्मी माता ।।
आलीस कलियुगी धर्म कार्यकारणी ।।१।। जय देवी ।।
पाहुनिया धर्म हा बुडता कलियुगी ।।
विष्णू-लक्ष्मी धरी अवतार जगी ।।२।। जय देवी ।।
काढून धर्माची अधर्म ही ग्लानी ।।
शुद्धी चित्ती देऊनी पती व्रते ठिकाणी ।।३।।  जय देवी ।।
घोर पाहुनी हा कलियुग भवानी ।।
साध्वी रूप धरुनी आली चंडिका घेऊन ।।४।।  जय देवी ।।
करूनी शब्दाची वाणी ही धार दार ।।
शब्दी असुरांचा करीत असे संहार ।।५।।  जय देवी ।।


।। बेबीमायांची आरती ।।

आरती बेबीमाया । महासती महामाया ।।
कृपावन्त तव दृष्टी । तारी भक्तीचीया पाया ।।ध।।
कलियुगी जाणाघोर । झाली ब्रह्माचीया माया ।।
अवतार कार्य असे थोर । करी कृपेचिया छाया ।।१।।
धरियेला कलंकीने । मूळ मायेचा अवतार ।।
फिरुनिया जग राहटी । केला पतितांचा उद्धार ।।२।।
सांगितले देवानीगा । धरी माया आवतार ।।
यावे संत या रुपाला । शांत करावया पाप भार ।।३।।
करुनिया सर्व सार । धरी माया आवतार ।।
सर्व सिद्धांचिया । झाली एकची भार ।।४।।
करुनिया उपासना । मुळ ओंकारिया भावा।।
धरी तसे छत्र गा । पाहून भक्तीचिया ठेवा ।।५।।
आली नटुनीया । कलियुगी ही माया ।।
अवतार जाणा पाया । पाहे कोल्हाटीगा माया ।।६।।
ही दत्ताचिया माया । आली घेवुनिया छाया ।।
अवतार दिगंबरी । मुळ सिद्धांचिया पायां ।।७।।
आरती बेबीमाया । महासती महामाया ।।

।। ॐ ब्रह्मस्वरुपिनी कलंकीनी बेबीनाथ आदिमाया शक्ती की जय ।।