कलंकी देव अल्प-परिचय

।। श्री पूर्ण परब्रह्म ।।
।। कलंकी अवतार ईश्वर वैजनाथ भगवान अल्प परिचय ।।

विश्वव्यापी बंधू-भगिनींनो ! आम्हाला कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, संत-साधू जनांच्या रक्षणासाठी, असुरी वृत्तीच्या दुष्ट मनोवृत्ती नष्ट करण्यासाठी, सद्धर्म रक्षणासाठी, सत् प्रवृत्तीचा उगम होण्यासाठी, युगायुगात परमेश्वराने कच्छ, मच्छ, रामकृष्णादि अवतार घेतले. त्यात ह्या घोर कलीयुगात महासती अनुसया अत्री यांचे पोटी अयोनी संभव परम पुजनीय, पूर्ण परब्रह्म कलंकी अवतार वैजनाथ नामे श्रावण शुध्द १ प्रतिपदा सोमवार सूर्योदयावेळी सन १९१६ रोजी महाराष्ट्रात नगर जिल्हा संगमनेर शहरात, साळीवाडा भागात गणपतसिंह सरदारसिंह परदेशी यांच्या वाड्यात, भूमंडळावर सगुण साकार झाले.
श्री. परम पुजनीय कलंकी देवाचे बालपण पंचवटी नाशिक येथे गेले. नंतर सन १९३१ साली पुण्यात वास्तव्य झाले. बराचसा काळ कलंकी देव देहभान स्थितीत नव्हते. पुढे सन १९३६ साली त्रैलोक्याधिपती ब्रह्मवेत्ते त्रैमुर्ती दत्त भगवान यांनी पुण्यात शुक्रवार पेठ गाडीखाना येथे मानवी स्वरुपात येऊन विजयादशमी (दसरा) या दिवशी अनुग्रह देऊन चिरंजीव हो ! म्हणून आशीर्वाद दिला. नंतर वृध्द माता, पिता, चुलता चुलतीसह श्री. कलंकी वैजनाथ देव तिर्थ यात्रेस बाहेर पडले. वाई, सातारा इ. महाराष्ट्रात ब-याच ठिकाणी फिरून सन १९४९ साली कलंकी देव संगमनेरला परत आले.
श्री. कलंकी भगवंताच्या बाह्मी स्थितीतून अद्वितीय, अफाट आणि अमोलिक असे हस्तलिखित ज्ञानभांडार बाहेर पडले. त्यात सतरा अठरा लहान मोठे ग्रंथ, लाखो अभंग, पदे, दोहरे, श्लोक इत्यादी सर्व प्रकारचे सामाजिक, अध्यात्मिक, भक्तिपर, चालु परिस्थितीवर आधारीत असे हे हस्तलिखित ज्ञान भांडार आहे. भक्तगण या दिव्य ज्ञानामृतांचा लाभ घेत असतात. परमार्थात मुरलेल्या ज्ञानी, समंजसानी व इत्यादींनी या दिव्य ज्ञानाचा लाभ घेऊन कृतार्थ होऊन जावे आणि अवतार कार्याचे मर्म जाणावे.
सन १९६३ साली श्री. कलंकी देवांची कुंडलिनी जागृत होऊन तिची पूर्णता सन १९६४ साली झाली. ज्ञानात्मा बौद्ध अवतार ज्ञानेश्वरी माऊलीने त्या काळातील संस्कृत भाषेतील ज्ञान प्राकृतात निर्माण करून भागवत धर्माची स्थापना केली. सर्व संतांना सांगितले की, त्यांचे भागवत धर्म कार्य पुढे मी कलंकी वैजनाथ रुपाने चालू राहील. विश्वधर्माची स्थापना होईल व धर्माचे मुळ जे समता, स्वातंत्र्य, बंधुभाव निर्माण होऊन भूतदया वाढेल. आजपर्यंत ईश्वराचे नऊ अवतार झाले. श्री. पूर्ण परब्रह्म कलंकी अवतार ईश्वर वैजनाथ भगवान, हे दहावा अवतार होत. त्यांचे महानिवार्ण आषाढ शु।। १०, सोमवार दिनांक ६ जुलै १९८७ साली संगमनेर येथे झाले.
श्री. कलंकी देव शिष्या श्री. संत बेबीनाथ माया यांनी कलंकी देवांचे कार्य पुढे चालू ठेवले आहे. वडगांव लांडगा, संगमनेर येथे श्री. संत बेबीनाथ माया यांचा आश्रम, दत्त मंदिर व ध्यान मंदिर आहे. माताजींनी हस्तलिखीतातून अनेक अध्यात्मिक ग्रंथांची निर्मीती केली आहे व अभंगवाणी आजही चालू आहे. अनेक भाविक भक्त श्री. कलंकी देव समाधी दर्शनाचा व ज्ञानाचा लाभ घेतात, श्री. संत बेबीनाथ माया यांच्या दर्शनाचा व ज्ञानामृताचा लाभ घेऊन कृतार्थ होतात !

टिप: कलंकी देवांचे वायुरुप स्थितीने साक्षात्कार लिला घटना घडत राहतीलच. सवे गोरक्ष, हनुमंत, दत्त हे राहतील. भक्तजनांना त्यांचे दृष्टांत, साक्षात्कार होत असतातच.

कलंकी अवतार ईश्वर वैजनाथ भगवान अल्प परिचय